||श्री स्वामी समर्थ ||
चराचरात असलेल्या परमेश्वराची अनंत रूपे आहेत आणि खर्या
सच्च्या भक्ताला कुठल्या ना कुठल्या रुपात तो दर्शन देतच असतो . प्रत्येक भक्त हा
आपल्या इष्ट देवतेच्या दर्शनासाठी व्याकूळ असतोच आणि त्याचे दर्शन झाल्यावर तो
कृतकृत्य होतो. पण ह्या दर्शनाची कास किंवा अभिलाषा असणे हि भावनाच मुळात
परमेश्वरावरील असीम भक्तीपोटी येते.
लहानपणापासून आपल्यावर घरात शुभंकरोति , मनाचे श्लोक
,रामरक्षा म्हणण्याचे संस्कार होत असतात. तेच बाळकडू पुढे आपण आपल्या मुलानाही देत
असतो . सांगायचे तात्पर्य असे कि देवाचे वेड हे आपल्याला आपल्यावरील संस्कारातून
लागते आणि पुढे ते आपल्यात रुजतेही. भविष्यात कुठल्यातरी संकट समयी आई आजीला आपण
देवाला साकडे घालताना पाहतो आणि मग त्यातून संकटाच्या वेळी बाप्पा धावून येतो हि
भावना आयुष्यभरासाठी मनात रुजते. आपणही पुढे आपल्या प्रापंचिक अडचणीसाठी पारायण
,नामस्मरण करू लागतो. आपण पूजन करत असलेल्या देवतेवर आपली निस्सीम श्रद्धा असते .
भगवंताचे रूप हे निर्गुण निराकार आहे हे शास्त्रात सांगितले
आहे आणि संतानीही त्याला दुजोरा दिला आहे. आपला देह हा देवाचे मंदिर असून आत्मा हा
परमेश्वर आहे. आत्मस्वरूप धारण करणारा देह हा सगुणरूपात असतो तर प्रत्यक्ष
आत्मस्वरूप हे निर्गुण असते. श्रीकृष्णाने त्याच्या जन्मापासून भक्तांना विविध
रुपात दर्शन दिले पण त्याचे मूळ रूप हे निर्गुणच आहे. बाप्पासमोर नेवैद्य ठेवला कि
तो त्याचा प्रसाद म्हणून आपणच ग्रहण करतो ,तो कुठे येतो फोटोतून बाहेर नेवैद्य
खायला असे प्रश्न विचारून लहान मुलेही आपल्याला भंडावून सोडतात नाही का .पण ह्या
निर्गुण रूपातील भगवंताने आपल्या भक्तीवर प्रसन्न होवून आपल्या हृदयात सगुण रूप
कधीच धारण केलेले असते .भक्तीच्या परमोच्च क्षणी भक्त आणि भगवंत जणू एक होवून
जातात जसे दुधात साखर .आपल्या मनातील घालमेल आपल्याही आधी त्याला समजते इतकी
एकरूपता होते किबहुना ती होणे अपेक्षित असते.
माझ्या घरात श्री गजानन महाराजांचा एक छान फोटो आहे. माझा
मुलगा लहान असताना त्याने हातपाय पुसून टॉवेल माझ्याकडे देताना चुकून फोटोवर पडला.
तेव्हा मी आणि त्याने महाराजांची माफी मागितली. मुलानेही विचारले अग आई महाराज
खरेच कुठे आहेत तिथे. त्या चिमुकल्या च्या डोक्यातून आलेला प्रश्न लहान असला तरी
त्यात दडलेला अर्थ खूप मोठा होता. त्याला काय समजवावे मला समजेना पण मी त्याला
सांगितले तो फोटो नाही त्यात महाराज खरेखुरे आहेत आणि तु अभ्यास करत आहेस ,शुभं
करोति म्हणत आहेस हे ते पाहत आहेत आणि तुला शाबासकीही देत आहेत .त्याच्या
बालबुद्धीला तेव्हा इतके पुरे होते . आपल्या सारख्या भक्तांना आपल्या देवाची भक्ती
करायची तीही अंतर्मनाने इतकेच समजते. त्याचे सगुण किंवा निर्गुण रूप म्हणजे काय
ह्यात न अडकता भक्तीत रममाण व्हावे हे जरी खरे असले तरी आज त्याची उकल करावीशी
वाटते .परमपूज्य बाबामहाराज सातारकर ह्यांच्या TV वरील एका मुलाखतीत त्यांनी
ह्याबद्दल अप्रतिम विश्लेषण केले. त्यांनी सांगितले मुलाखत घेणारा मला दिसत नाही
पण त्याचा आवाज ऐकायला येतोय .त्याच्या प्रश्नांना मी उत्तर देतोय. म्हणजेच
प्रश्नकर्ता मला दिसत नसला तरी तो आहे. तो असूनही नसल्यासारखा वाटणे हे त्याचे
निर्गुण रूप आणि तरीही तो प्रत्यक्षात आहे हे त्याचे सगुण रूप. भल्याभल्यांना
सांगता येणार नाही अश्या ह्या प्रश्नाचे उत्तर त्यांनी किती साधे उदाहरण देवून सांगितले
पहा, खरच त्यांना साष्टांग दंडवत.
निर्गुण रूपातील भगवंताला आपल्या भक्तीने भक्त सगुण रूप
धारण करायला लावतो तेव्हा त्याची भक्ती किती सोळा आणे सच्ची आणि अंतर्मनापासून
असते त्याचा दाखला मिळतो जणू .
डहाणू येथे समुद्राच्या जवळ श्री गजानन महाराजांचा छान मठ
आहे. ह्या मठाचे सर्वेसर्वा दादा पवार आज आपल्यात नाहीत. दादा महाराजांचे निस्सीम
भक्त होते. त्यांनी त्यांचे संपूर्ण जीवन महाराजांच्या नावाचा प्रसार करण्यात
व्यतीत केले. समुद्राच्या ठिकाणी असल्यामुळे तिथे हिवाळ्यात कडाक्याची थंडी असे .रात्री
झोपायच्या आधी दादा वाटीत गरम तेल घेवून महाराजांच्या पायाला मालिश करत असत.
त्यांना गरम कपडे घालत असत. काय म्हणावे ह्या भक्तीला? महाराजांचे अस्तित्व तिथे
कायम होते अश्या सगुण रूपातील महाराजांनी अनेकदा त्यांना दर्शन दिले होते. अश्या
ह्या निस्सीम भक्ताचे पाय माझ्याही घराला लागले होते हे आमचे पूर्वसुकृतच म्हणायला
हवे.
महाराज फोटोत आहेत ते जरी निर्गुण रुपात असले तरी ते आहेत
ह्याचे भान ठेवून भक्ती आणि आपले कर्म करत राहणे हे महत्वाचे आहे. रूप हे रूप आहे
मग ते सगुण असो अथवा निर्गुण ,आपली भक्ती ह्या सगळ्याच्या पलीकडेच असायला हवी
,नाही का? आपला भाव हा सर्वश्रेष्ठ आहे. एखाद्या झोपडी वजा घरात एखादा महाराजांचा
भक्त असेल आणि त्याच्याकडे महाराजांचा फोटो सुद्धा नसेल पण तरीही त्याने
अंतर्मनाने त्याला हात जोडले ,प्रार्थना केली तर ती त्याच्यापर्यंत निसंदेह
पोहोचणार .संत शिरोमणी श्री गजानन महाराजांनी क्षेत्र शेगाव येथे समाधी घेतली तरी
आजवर अनेक भक्तांना ते दर्शन देत आहेत. आपल्या भक्तीला कसलेही निर्बंध किंवा भिंती
नसाव्यात ,भगवंत आहे आणि तोही सगुण रुपात हे जेव्हा मनात पक्के असेल तेव्हा त्याचा
परिणाम आपल्या प्रत्येक कर्मावर होत राहील . महाराजांच्या नजरेचा धाक आपल्यातील
षडरिपू कमी करेल इतकच नाही तर आपली प्रत्येक कृती विचारपूर्वक व्हायला लागेल.
सुकर्म वाढतील आणि आयुष्य अधिक सुकर होईल. महाराजांचे अस्तित्व आहेच आणि ते अबाधित
आहे . आपले कसे आहे महाराजांचा फोटो भिंतीवर लावून आपण आपल्याला हवे ते करायला
मोकळे असतो . आपल्याला हव्या असतील तेव्हा आणि हव्या तश्या सगुण आणि निर्गुण
ह्याच्या व्याख्या बदलत असतो . नामस्मरण आपल्याला घडवते आणि अंतर्बाह्य बदलवते हे
खरे आहे . अध्यात्मातील प्रवास आपल्याला विचारी करतो . वरवर हा महाराजांचा फोटो
आहे हे म्हणणारे आपण त्याचे सगुण अस्तित्व खरतर अंतर्मनात मान्य करत असतो
.कालांतराने आपली भक्ती एकेक पायरी वर चढू लागते आणि आपल्याला महाराजांचे अस्तित्व
जाणवू लागते . मुळात कुठल्यातरी अपेक्षेने भक्ती करूच नये. आई आपल्या मुलांवर
प्रेम करते तेही कुठलीही अपेक्षा न ठेवता अगदी तसेच प्रेम आपल्या देवतेवर असावे. कुठल्यातरी
अंतस्त हेतूने केलेली भक्ती आपल्याला त्यांच्यापासून दूर नेते कारण त्यात प्रेम
,माया काहीच नसते त्यात असतो फक्त व्यवहार .
भगवंताचे अस्तित्व कसे आहे ह्याबद्दलच्या आपल्या कल्पना कश्याही
असोत पण आपण करत असणार्या भक्तीमुळे आपल्यात आणि आपल्या आयुष्यात काय चांगले
सकारात्मक बदल होत आहेत ह्याकडे मात्र आपले लक्ष असायला हवे. अनेक वर्ष नामस्मरण
करून ,पारायणे करून आपल्यात अंतर्बाह्य बदल होणे अपेक्षित आहे. जसा भगवंत चराचरात
आहे अगदी तसेच आपल्या मनात अंतर्मनात सुद्धा त्याचे अस्तित्व जाणवू लागते. नामस्मरणाने
आपले मन अधिक विचारी होत जाते ,शांत होते . भगवंताशी एकरूप होणे हे खचितच सोपे
नाही .पी हळद हो गोरी हा नियम इथे लागत नाही. तो आपल्या अनेक परीक्षा घेयील आपण त्याच्या
प्रत्येक परीक्षेत पास व्हायचेच . एक काळ असा येतो कि आपले सततचे मागणे आपली हाव
कमी होते .सतत काहीतरी हे दे ते दे मागण्यातच जन्म जातो आपला आणि भक्ती करणे
राहूनच जाते .तसेही मागणे म्हणजे भिकच कि ,कश्याला सतत काहीतरी मागायचे ,आपण आपली
भाकरी कष्टानेच मिळवली तर त्याची अवीट गोडी चाखता येते. असेल हरी तर देयील
खाटल्यावरी असे करणाऱ्या भक्तांना महाराजांना कशी मदत करणार ,विचार करा .
आपल्या स्वतःच्या आयुष्याकडे जेव्हा आपण त्रयस्थाच्या
नजरेतून बघू तेव्हा खरे. आपण ज्या देवाची भक्ती करतो तो आपल्याला किती समजला आहे
ह्याचा अभ्यास केला पाहिजे ,आपल्यात किती बदल झालाय ? आपले किती अवगुण सुगुणामध्ये
परिवर्तीत झाले आहेत ? जराजराश्या गोष्टीनी , अपयशाने चिडचिड करणे ,खचून जाणे हे
कमी झाले आहे का? कुणाबद्दल वाटणारी असूया ,मत्सर कमी झाला आहे का? आपण अधिकच
प्रयत्नवादी झालो आहोत का? ह्या सर्वाची उत्तरे मिळाली पाहिजेत. नुसते सगुण आणि
निर्गुण रुपात न अडकता आपली भक्ती किती शुद्ध ,बावनकशी सोन्यासारखी होईल , आपण
आपल्या अराध्याच्या किती जवळ जावू हे महत्वाचे.
भक्ताने आपल्या लाडक्या भगवंताचे रूप कसेही पाहावे मग ते
निर्गुण असो अथवा सगुण पण सेवा आणि भाव मात्र खरा असावा .भक्तीत भेसळ नसावी . आपला
देव आपल्याला कधीच अंतर देत नसतो .अधून मधून आपणच त्याला दुरावत असतो , आयुष्य
चांगले असते तेव्हा ह्याच भगवंताला आपण किती सहजतेने विसरतो आणि संकटसमयी बरोबर
त्याची आठवण येते ,हेही चूकच. भक्ती निरपेक्ष हवी , भक्तीत व्यवहार नको ,तु माझे
हे काम कर मग मी ५ नारळाचे तोरण बांधीन असा व्यवहार भगवंताशी तर नकोच नको. फक्त
एकदा मनापासून जिथे असाल तिथून त्याला हाक मारली तर तो तत्क्षणी तुमच्या मदतीला
धावून येयील ह्यावर आपली श्रद्धा असली पाहिजे.
इतकी सेवा भक्ती करूनही जेव्हा एखाद्या गोष्टीची काळजी करत
राहतो म्हणजे आपल्या भक्तीत निश्चितच काहीतरी राहून गेले आहे. हो ना? ज्या क्षणी आपण
आपल्या महाराजांवर आपले आयुष्य सोडून देवू तो क्षण खरा ,मग कशाचीच चिंता उरणार
नाही कारण एकदा त्यांच्या शाळेत नाव घातले कि मग ते नेतील तिथे हा भाव वृद्धिंगत
होईल आणि मग जे आयुष्य जगू ते पैशाने किती समृद्ध असेल माहित नाही पण मानसिक समाधान
ओतप्रोत भरलेले असेल , रात्रीची शांत झोप असेल हे नक्की.
प्रत्येक दिवशी आपली वाटचाल मृत्यूच्या दिशेने होते आहे ,
सेवा करण्याचा वेळ कमीकमी होत आहे .आपल्याला नेमून दिलेले काम झाले कि आपण इथून
जाणार पण जाताना पुढील जन्मासाठी लागणारी पुण्याची शिदोरी बरोबर घेवूनच .तसेच
शेवटचा क्षण सुद्धा गोड व्हावा ह्याचसाठी हा सारा अट्टाहास म्हणून साधना
,ध्यानधारणा हवी . घ्यानात ,आपल्या विचारात ,मनात अंतर्मनात सतत त्याचे विचार हवेत
तरच आपण त्याच्याशी एकरूप होवू . जितका वेळ ध्यान तितका वेळ तोंड खाण्यासाठी आणि
बोलण्यासाठीही बंद राहील . म्हणजे पहा किती कर्म कमी झाली आपली. तसेच आपण केलेल्या
नामस्मरणाचा परिणाम सुद्धा आपल्या शरीरावर ,मनावर आणि आपल्या वास्तूवर होत असतो.
आपल्या भक्तीमुळे ,केलेल्या सेवेमुळे महाराजांची कृपा आपल्यावरच नाही तर आपल्या
लेकरांवर , संपूर्ण घराण्यावर होते ह्याचे अनेक दाखले पोथी पुराणातून मिळतात .
शेगावच्या संत शिरोमणी श्री गजानन महाराजांची कृपा पाटील वंशावर होती ह्याची नोंद
श्री गजानन विजय ह्या ग्रंथात आढळते .आपल्या भक्तीचा आलेख हा उंचावत गेलाच पाहिजे
आणि जितक्या लवकर आपण त्याच्याशी एकरूप होवू तितका तो वाढतच जाणार.
एक क्षण असा
येतो कि त्याच्या सहवासात आपल्याला शांत ,समाधानी वाटते , आता काहीच नको असे
वाटायला लागते ,जे जे दिलेस त्यासाठी मनात कृतज्ञता असते आणि समाधानाच्या त्या
उत्तुंग शिखरावर असताना मग म्हणावेसे वाटते ..तुज सगुण म्हणू कि निर्गुण रे.
अस्मिता
लेख आवडला तर अभिप्राय द्यायला विसरू नका.
Antarnad18@gmail.com