Monday, 14 December 2020

थेट मनाला भिडले...

 ||श्री स्वामी समर्थ ||


व. पु. काळे माझे अत्यंत आवडते लेखक आहेत. अत्यंत वाचनीय असे शेअर करत आहे त्यांच्याच शब्दात...

एखादा माणूस माझ्या मनातून उतरला की, मी आयुष्यभर त्याच्याकडे ढुंकूनही बघणार नाही.. ह्या अश्या स्वतःच्या ग्रेट स्वभावाचा काही लोकांना प्रचंड गर्व असतो, म्हणूनच हा मेसेज मला सगळ्यांबरोबर शेअर करावासा वाटला..

कधी तरी निवांत बसून आयुष्यात येऊन गेलेल्या आणि दुरावलेल्या नात्यांचा डोळसपणे अभ्यास केला की, लक्षात येतं की, असे अनेकजण ज्यांनी "आपल्याला दुखावलं" म्हणून आपल्या आयुष्यातून आपण त्यांना  वजा केलं होतं ते अनेकदा समर्थनीय नव्हतंच !

भावना दुखावल्या, असं म्हणत आपण आपल्या अहंकाराला विनाकारण जोपासत बसलो..आणि सोन्यासारखी माणसं आपल्या प्रतिक्षेला कंटाळून आपापल्या मार्गे निघूनही गेली.

त्यांची एखादी कृती, चूक हा जणूकाही जन्म-मरणाचा प्रश्न बनवून ती हकनाक आपल्या अहंकाराची बळी कधी झाली, हे कळलंच नाही.

आपण जसे जसे परिपक्व होत जातो तसं तसं लक्षात येतं की, भावना आणि अहंकार ह्यांच्यात असलेली सूक्ष्म रेषा योग्य वेळी जाणून वागायला हवं होतं.

त्या माणसांनी आपल्यासाठी केलेल्या चांगल्या गोष्टी लक्षात ठेवायला हव्या होत्या. स्वतःच्या चुकासुद्धा आठवून निदान स्वतःशी तरी मान्य करायला हव्या होत्या...

भावना क्षमाशील असते तर अहंकार मात्र एक घाव दोन तुकडे करून मोकळा होतो..
भावना दुखावली,असं आपण म्हणतो तेव्हा खूप वेळा भावना नाही तर अहंकार दुखावलेला असतो !

अगदी एखादी आनंदाची बातमी जरी कुणी आपल्याला उशिरा दिली, तर त्या गोष्टीचं दुःख आणि राग म्हणून त्यांचं अभिनंदनही आपण केलेलं नसतं आणि हे अनेकदा घडतं..

जगणं म्हणजे फक्त श्वास घेणं नसतं, तर त्या जगण्यालाही स्वतःचं असं वेगळं रूप आणि अस्तित्व असतं..

कुणाचंच कुणावाचून काही अडत नाही, पण आयुष्यात आलेली चांगली माणसं जेव्हा गैरसमजुतींमुळे दुरावतात..

तेव्हा मात्र जर ती माणसं आपल्या आयुष्यात राहिली असती तर जगणं अजून सुंदर आणि अर्थपूर्ण झालं असतं, असं मात्र नक्कीच वाटून जातं.

क्षणभंगुर आयुष्याचे लाड करताना आपल्या जगण्याचा दर्जा आपण राखायला हवा, आणि ह्यासाठीच ते जगणं सुसंस्कृत आणि अर्थपूर्ण बनवणाऱ्या चांगल्या माणसांची ओळख आणि जोपासना करणं आणि अहंकारामुळे त्यांना न गमावणे हे जाणीवपूर्वक आपण करावं असं मनापासून वाटतं..

बऱ्याचदा तर समोरच्या व्यक्तिच्या वागण्याचा आपण आपल्या मतानुसार अर्थ काढतो, तसा विचारही समोरच्याचा नसतो, तो सहज आपलं म्हणून वागत असतो.. परंतु आपण चुकीचा अर्थ काढून समोरच्याला आयुष्यातून सहज काढून टाकतो, अन आपला अहंकार आपल्याला या गोष्टीची जाणीवही होऊ देत नाही.

म्हणून...कुणाची कितीही मोठी चूक असली तरी ती आयुष्यापेक्षा व नात्यापेक्षा मोठी नाहीच...!

व.पू.काळे

No comments:

Post a Comment