Monday, 14 December 2020

श्री कृष्णार्पणमस्तु (मार्गशीर्षारंभ)

|| श्री स्वामी समर्थ ||



हिंदू संस्कृतीमध्ये व्रत वैकल्ये ,उपासना ह्याला अनन्य साधारण महत्व आहे. प्रत्येक महिन्यात येणारे ऋतू आणि त्यातील सण, उत्सव याचीही योग्य सांगड विधात्याने घातली आहे. श्रावण महिना जसा व्रत वैकल्ये ,पूजापाठ ह्यासाठी महत्वाचा आहे तश्याच प्रकारे येणारा मार्गशीर्ष मास सुद्धा. मार्गशीर्ष हे सुद्धा भगवान कृष्णाचेच एक रूप मानले आहे म्हणून मार्गशीर्ष महिना हा कृष्णभक्तीसाठी विशेष मानला आहे.

मृगशीरा हे 27 नक्षत्रातील एक नक्षत्र आहे. मार्गशीर्ष पौर्णिमेचा संबंध हा मृगशीरा ह्या नक्षत्राशी असल्याने ह्या महिन्याला मार्गशीर्ष म्हणतात .श्रावण महिन्याप्रमाणेच मार्गशीर्ष महिन्यात हवेत सुखद गारवा असतो. ह्या महिन्यात सर्व प्रकारच्या भाज्या भरपूर प्रमाणात येतात. उपासना , साधना , नामस्मरण ह्यासाठी पोषक असा हा काळ असतो .ह्या महिन्यात पवित्र नदीतील स्नानाला विशेष महत्व आहे. कृष्णभक्तांसाठी मार्गशीर्ष मास हि उपासनेसाठी एक अनोखी पर्वणी आहे. ओंम नमो भागवते वासुदेवाय ह्या जपाचे अनुष्ठान करून श्रीकृष्णाच्या सेवेत रुजू होणारे असंख्य भक्तगण आहेत. अनेक ठिकाणी वैयक्तिक किंवा सामुदायिक रीतीने श्री भगवत गीतेचे पारायण केले जाते. मार्गशीर्ष महिन्याला सत युग सुद्धा म्हंटले जाते.

मार्गशीर्ष महिन्यात दर गुरुवारी स्त्रिया महालक्ष्मीचे म्हणजेच वैभव लक्ष्मीचे व्रत करतात. महालक्ष्मीची पूजा करून वैभवलक्ष्मीच्या पोथीचे वाचन आणि नेवैद्य करतात . शेवटच्या गुरुवारी ह्या व्रताचे उद्यापन केले जाते.



मार्गशीर्ष पौर्णिमेला मृगशीर्ष ह्या नक्षत्रावर दत्ताचा जन्म झाला म्हणून त्या दिवशी दत्त जयंती सर्वत्र साजरी केली जाते. पूर्वीच्या काळी भूलोकावर आसुरी शक्ती प्रचंड प्रमाणत वाढल्या त्यांच्या विनाशासाठी सर्व देवगण उभे ठाकले पण ह्या आसुरी शक्ती म्हणजेच दैत्यांचा पराभव करण्यास देवांना यश प्राप्त झाले नाही . त्यावेळी ब्रम्हदेवांच्या आदेशावरून दत्त देवता अनेक ठिकाणी प्रगट झाली आणि ह्या दैत्यांचा संहार झाला म्हणून दत्त जयंती साजरी होते. दत्त जयंतीच्या दिवशी दत्ततत्व हे भूलोकावर हजार पटीने कार्यरत असते म्हणून ह्या दिवशी दत्ताची उपासना आणि श्री गुरुदेवदत्त हा जप केल्यास अधिक फलदायी होते.

श्री गुरुचरित्राचे पारायण दत्त जयंतीच्या आधी सात दिवस सुरु करून दत्त जयंतीच्या दिवशी त्याची नेवैद्य दाखवून सांगता करावी. नेवैद्या मध्ये घेवड्याच्या भाजीचा समावेश असावा. श्री गुरुचरित्राच्या संक्षिप्त पोथीचे पारायण सुद्धा करता येते.

दत्ताच्या हातातील कमंडलू आणि जपमाळ हे ब्रम्हदेवाचे ,शंख चक्र विष्णूचे तर त्रिशूल आणि डमरू हे शंकराचे प्रतिक आहे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त हा जयघोष आपण नेहमी ऐकतो. अवधूत म्हणजे नेहमी आनंदात असणारा ,वर्तमानात जगणारा . त्याप्रमाणे आपणही नेहमी आनंदात आणि वर्तमानात जगले पाहिजे . प्रत्येक क्षण आनंदात जगता आला पाहिजे .

अध्यात्म ,उपासनेचा आपल्या जीवनाशी घनिष्ठ संबंध आहे. कुठलेही व्रत किंवा नामस्मरण हे डोळसपणाने त्याचा अर्थ समजून घेतले तर अधिक उत्तम होईल आणि चिरकाल टिकणारा आनंद देवून जायील ह्यात शंकाच नाही. उगाचच ह्याने त्याने सांगितले म्हणून काहीतरी करणे उचित नाही. आपण करत असलेल्या उपासनेत जीव ओतला तर आणि तरच त्याचे फळ मिळेल .धरसोड उपयोगाची नाही .

ह्या वर्षाची अखेरही आणि नवीन वर्षाची सुरवात देखील अत्यंत शुभ होणार आहे कारण 31 डिसेंबर रोजी गुरुपुष्यामृत योग आहे. तेव्हा साधकांसाठी हा मार्गशीर्ष महिना व्रत वैकल्ये ,उपासना , पारायण ह्या सर्वांसाठी शुभ फळे प्रदान करणारा आहे. माणसाच्या आयुष्यातील अधून मधून येणाऱ्या संकटांनी तो हताश होतो आणि त्याला मार्ग दिसत नाही. अश्यावेळी उपासना त्याला मार्गस्थ करते. अध्यात्माला आपल्या जीवनात अनन्य साधारण महत्व आहे. प्रपंच करून परमार्थ केला तरच तो यश प्रदान करेल . खुलभर दुधाची गोष्ट आपल्या सर्वाना माहितच आहे .श्री गजानन विजय ,श्री साई चरित्र, श्री गुरुचरित्र अश्या धार्मिक ग्रंथांचे पठण , नित्य उपासना , कुलस्वामीनीचां जप , कुंकुमार्चन अश्या विविध माध्यमातून आपण आपल्या इष्ट देवेतेची उपासना करू शकतो.

उपासना आपल्याला मार्ग दाखवते , संकटांचा सामना करण्यास धीर देते आणि आपले मनोबल वाढवते. परमेश्वराची भक्ती करण्यासाठी सुद्धा त्याची कृपा व्हावी लागते आणि ती ज्यावर झाली त्याची जीवनरूपी नैया पार होणार ह्यात शंकाच नाही.

तेव्हा अश्या ह्या परमेश्वरी कृपेचा आनंद तुम्हा आम्हा सर्वाना प्राप्त होवूदे आणि सर्वांचे आयुष्य आनंदाने बहरून जावूदे हीच त्या परमेश्वरचरणी प्रार्थना .

 

अस्मिता

लेख आवडल्यास अभिप्राय द्यायला विसरू नका.

antarnad18@gmail.com

 

 

 

 

 

 

 

  

2 comments:

  1. माहितीपूर्ण लेख मृगशीरा नक्षत्र प्रथमच ऐकले

    ReplyDelete
  2. खूप सुंदर माहिती दिलीय मॅडम,

    आपले क्लास मी केलाय खूप सोप्या भाषेत आपण ज्योतिष शास्त्र शिकवले, तसेच आपले मार्गदर्शन खूप मौल्यवान ठरले आहे मला, आपण सांगितलेल्या उपासना केलाय खूप मानसिक आधार मिळाला, आपले शतशः धन्यवाद

    ReplyDelete