|| श्री स्वामी समर्थ ||
अमृततुल्य योग –गुरुपुष्यामृत
आपले आयुष्य प्रत्येक क्षणाला बदलत असते . कधी हे बदल
आपल्या पथ्यावर पडतात म्हणजे शुभ असतात तर काही बदल आपल्याला कठीण वळणांवर आणतात .
प्राप्त परिस्थितीतून मार्ग काढणे हेच आपल्या हाती असते आणि अश्यावेळी अध्यात्म , उपासना
मनुष्याला मदत करते.
उपासना , साधना ह्यासाठी शुभ असलेल्या “गुरुपुष्य योगा ”
बद्दल आज जाणून घेवूया. पुष्य नक्षत्र जेव्हा गुरुवारी येते त्या दिवसाला “
गुरुपुष्य ” म्हंटले जाते.
पुष्य हे शनीचे शुभ नक्षत्र आहे . पुष्य म्हणजे पोषण करणारा
.हे नक्षत्र अत्यंत शुभ आणि कल्याण करणारे ,सकारात्मकता , उर्जा देणारे आहे पण
तरीही हे विवाहास वर्ज्य मानले आहे . ह्या दिवशी केलेल्या सर्व गोष्टींची वृद्धी
होते म्हणून ह्या दिवशी सोने खरेदी केले जाते.
ह्या योगावर केलेले जप , ग्रंथ पोथी वाचन ,पारायण ,तप ,
ध्यान धारणा , दान मोठे फळ देते .कुठल्याही नवीन किंवा बंद पडलेल्या कामाचा श्री
गणेशा ह्या योगावर केला तर यश नक्कीच मिळते . भगवंताची आराधना करून त्याचा
आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी साधक ह्या दिवशी साधना करतात . ह्या योगावर केलेली
श्री महालक्ष्मीची साधना सुद्धा विशेष फलदायी होते.
गुरुपुष्य योगावर केलेली साधना वृद्धिंगत होते म्हणून ह्या
योगावर संकल्प करून धर्मग्रंथांचे पारायण , जपजाप्य केले जाते.
श्री दासगणू महाराजांनी श्री गजानन महाराजांच्या लीला
शब्दांकित केलेला श्री गजानन विजय ह्या पवित्र , रसाळ ग्रंथांचे पारायण गजानन भक्त
गुरुपुष्यामृत योगावर आवर्जून करतात . ह्या ग्रंथाच्या २१ व्या अध्यायात श्री दासगणू
महाराज लिहितात ..जो ह्या अमृततुल्य ग्रंथाचे पारायण दशमी एकादशी आणि द्वादशी ह्या
दिवशी तसेच गुरुपुष्य योगावर करील त्याच्या अवघ्या मनोकामना खचितच होतील
पूर्ण .कसल्याही असोत यातना त्या निरसन होतील. श्री गजानन विजय ह्या ग्रंथात
प्रचंड ताकद आहे .आपल्याला मार्ग नक्कीच मिळतो आणि संकट हरण होते हे नक्की , अनुभव
जरूर घ्यावा .
आपल्या अध्यात्मिक प्रगतीसाठी ,उपासनेसाठी ,साधनेसाठी आणि शुभकार्याचा
श्रीगणेशा करण्यासाठीचा हा अमृततुल्य “ गुरुपुष्य योग ” 31 डिसेंबर 2020 रोजी येत
आहे. हा योग सायंकाळी 7.48 पासून ते १ जानेवारी सकाळी 7.14 पर्यंत असणार आहे.
2020 हे वर्ष आपल्या सर्वांसाठीच प्रत्येक क्षणी परीक्षा
देणारे ठरले. शेवटी हे 2 हस्तक आणि एक मस्तक त्या परमेश्वरालाच जोडायचे आहे ह्याची
अनुभूती प्रत्येक क्षणी आपल्याला मिळाली . नवीन वर्षाची म्हणजेच २०२१ ची सुरवात गुरुपुष्या
सारख्या अमृततुल्य योगाने होत आहे हि खचितच आनंदाचीच बाब आहे. आपल्या सर्वांवर हाबी
झालेल्या ह्या कोविड च्या संकटातून आपली 2021 मध्ये सुटका होवूदे ह्या साठी ह्या
योगावर साधना , जप , प्रार्थना नक्कीच करू शकतो. आपले सर्व व्यवहार , अर्थचक्र पुन्हा एकदा गतिमान
होवूदे , सर्वाना मोकळा श्वास घेता येऊदे ह्यासाठी त्या विधात्याला आपण साकडे
घालूया .
“गुरुपुष्यामृत ” योगासारख्या अत्यंत प्रभावी योगावर केलेली
प्रत्येक साधना विशेष आणि अद्भुत फलदायी आहे . प्रत्येकाने ह्या योगावर आपल्या कुलस्वामिनीचा
, इष्टदेवतेचे नामस्मरण अथवा पारायणरुपी साधना करून आपले जीवन कृतकृत्य करावे.
केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे ह्या युक्तीला धरून
साधनेस आरंभ करावा आणि गुरुकृपेचा लाभ घ्यावा.
शुभं भवतु
अस्मिता
लेख आवडला तर अभिप्राय द्यायला विसरू नका .
antarnad18@gmail.com
श्री स्वामी समर्थ
ReplyDelete