||श्री स्वामी समर्थ ||
कलियुगात माणसाचे आयुष्य अनेक संकटांनी युक्त आहे . दुक्ख गळ्याशी आले कि पाऊल अध्यात्मात पडते हे म्हणतात ते खोटे खचितच नाही . स्वामी समर्थ , साईबाबा ,गजानन महाराज हि नावे घेण्याची पात्रता सुद्धा आपल्या अंगी नाही खर तर .हि नुसती नावे नाहीत तर त्यात ओतप्रोत भरलेले आहे ते गुरुतत्व . ते समजे पर्यंत आपली वर जायची वेळ येयील.
अश्या ह्या अवलियांची सेवा मग माध्यम काहीही असो ग्रंथाचे पारायण असो किंवा नामस्मरण , लेखन चिंतन ,प्रवचन काहीही असो त्यांचे नाम आपल्या मुखातून जाते आहे हि केवळ आणि केवळ त्यांची कृपा आहे आणि आपण त्या कृपेचेच तर अभिलाषी आहोत . अहो आपल्या सारख्या सामान्य भक्ताला अजून हवय तरी काय ?
आपण त्यांच्या सेवेत आहोत किबहुना ते आपल्या कडून सेवा करून घेत आहेत हा मान आपल्याला मिळणे हेच आपले अहोभाग्य म्हंटले पाहिजे . पण ह्या भाग्याचा खरा अर्थ आपल्याला समजत नाही आणि आपला विठोबा घाटोळ होतो. हे जरा फक्त जपले पाहिजे नाही का?आपल्याला विठोबा नाही तर पितांबर ,जणू गवर्या व्हायचे आहे ह्याचे भान ठेवले पाहिजे .
आपल्या सेवेमुळे आपण जसजसे महाराजांच्या जवळ जावू लागतो तसा आपण त्यांच्यावर अधिकार (अर्थात प्रेमाने ) सांगू किंवा गाजवू लागतो . विठोबा घाटोळ ने हेच केले. त्याचा उद्देश वाईट नव्हता पण पण दिशा , कृती चुकली हे नक्कीच.
आणि म्हणूनच अध्यात्मात येणे जितके कठीण त्याहीपेक्षा तिथे टिकून राहणे हे त्याहून कठीण. प्रत्येक क्षणी महाराज परीक्षा घेतात . मला तर रोजच पेपर असतो त्यांचा पण मी त्यांचे पाय सोडत नाही हीसुद्धा त्यांचीच कृपा आहे.
अध्यात्म आपल्याला कात टाकल्यासारखे बदलून टाकते ,नवीन दिशा आणि आशा देते . जीवनाकडे पाहण्याचा मोठा दृष्टीकोण सुद्धा देते. मी मी म्हणणाऱ्या आपल्या देहाची सुद्धा चिमुटभर राख होणार आहे . आपल्या शरीरातून आत्मा निघून गेल्यावर आपल्या शरीराला “ बॉडी ” म्हंटले जाते . आपले नाव सुद्धा घेतले जात नाही हे सारे जितके आपल्याला लवकर समजेल तितके बरे.
ह्या मोहजालात मी अडकणार नाही हा निर्धार मनी जागृत ठेवणे आणि तो टिकवण्या साठी कष्ट घेणे हि सुद्धा परीक्षाच असते.
महाराजांच्या अनेक परीक्षांमध्ये आपण जसजसे उत्तीर्ण होत जातो तसतसा आपण म्हणजे कुणी वेगळे आहोत हा अहंकार मनात फुलायला लागतो आणि तोच आपल्या कसोटीचा क्षण असतो . महाराजांना त्यांच्या हातातील सोटा उचलायला लावला तो विठोबा घाटोळ ह्याने, म्हणूनच प्राण गेला तरी आपण आपला विठोबा होऊ द्य्याचा नाही हि खुणगाठ मनात पक्की बांधली पाहिजे .
सेवेचा अधिकार हा सर्वोत्तम आहे . आपण महाराज व्हायला नाही जायचे .आपला जन्म हा सेवा करण्यासाठी झालेला आहे ह्याचा क्षणभर देखील विसर पडू न देणे हीच आपली परीक्षा आहे आणि ते भान आपल्याला कायम असले पाहिजे . मग बघा महाराज काय काय देतील तुम्हाला. हा जन्मच काय तर पुढील कित्येक जन्म सत्कारणी लागलेच म्हणून समजा.
ह्याच देही ह्याची डोळा महाराजांचे दर्शन नाही झाले तरच नवल. आणि हे मिळवणे सोप्पे नाही त्यासाठी उभा जन्म वेचावा लागतो .कश्यासाठी तर फक्त सेवेसाठी आणि तीसुद्धा निष्कपट मनाने, अपेक्षा विरहित केली पाहिजे . आपल्या मनीचा भाव ते जाणतात . अहो हे सर्व बोलायला सोपे असले तरी प्रापंचिक जीवन जगताना माणूस हताश होतो आणि शेवटी त्यांच्यासमोर हात जोडतो . पण अध्यात्मिक आयुष्य जगताना हळूहळू माणसाचे मन शांत होते आणि मनात विश्वासाचे रोपटे मूळ धरू लागते. मग त्यांच्याकडून सतत काहीतरी मागणे कमी होऊ लागते . प्रत्येक गोष्टीची एक वेळ असते आणि ती आली कि ते सर्व देणार , आपल्याला हवे होते त्याहीपेक्षा कितीतरी पटीने अधिक सुंदर देणार हा विश्वास एकदा बसला कि मग सगळे सोप्पे होवून जाते. मग आपण आणि महाराज हे दोन वेगळे असे उरतच नाही .
अवघा रंग एक झाला ...रंगी रंगला श्रीरंग ...अशीच अवस्था आपली होते . पण ह्या सर्वासाठी फक्त आपल्याला एकच करायचे आहे आणि ते म्हणजे महाराज व्हायला जायचे नाही .2-4 पारायणे केली म्हणून आपल्याला लई शाने समजायचे तर अजिबातच नाही. महाराजांचा भक्तपरिवार अनगीणत होता पण त्यांच्या सेवेचा अधिकार बोटावर मोजण्याइतक्याच भक्तांना होता .तेच त्यांची उठबस करत .किती भाग्य थोर असेल नाही त्यांचे .
म्हणूनच फक्त सेवा करत राहायचे आणि तीही आजन्म अखेरच्या श्वासापर्यंत कारण .....सेवेचा अधिकार सगळ्यात मोठा असतो .
अस्मिता
antarnad18@gmail.com
👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
ReplyDelete