Sunday, 21 February 2021

असामान्य दृष्टीकोण

 ||श्री स्वामी समर्थ ||

तुझे रूप चित्ती राहो... मुखी तुझे नाम 


दर महिन्याला १ ते २१ तारीख असे २१ अध्यायाचे  श्री गजानन विजय  ग्रंथाचे पारायण करायचे असा संकल्प २०२१ साठी केला आणि महाराजांना सांगितले कि मला सेवेची संधी द्या. काल २१ तारखेला ह्या महिन्यातील पारायण पूर्ण झाले. महाराजांना मनोभावे नमस्कार केला आणि खुदकन हसायला आले. 

कालच मी माझ्या ज्योतिष कार्यशाळेत विद्यार्थ्यांना सांगत होते कि ज्योतिष हे अथांग सागर आहे. किती शिकाल तितके कमीच आहे बघा . कायम ह्या नवग्रहांचे वाचन करत राहा. प्रत्येक वेळी बुध शुक्र तुम्हाला नव्यानेच भेटतील आणि वाटेल अरेच्च्या शुक्रातील हि रसिकता किंवा बुधाचे हे कंगोरे मला नव्यानेच उलगडत आहेत. प्रत्येक ग्रह आणि स्थान आपण रोजच्या जीवनात जगतच असतो आणि म्हणूनच ज्योतिष आणि आपले आयुष्य हे वेगळे असूच शकत नाही .पत्रिकेतील भाग्य स्थानाचा विचार करताना असे वाटते कि मला ज्या वेळी एखादी गोष्ट हवी आहे ती त्या वेळी मिळणे हेच भाग्य नाही तर अजून काय आहे? प्रचंड पाऊस पडत असताना घरी जायला नेमकी रिक्षा मिळणे , मला हवी त्या रंगाची साडी किंवा लिपस्टिक खरेदीला जाताना मिळणे , ठरवलेले सर्व कार्यक्रम सुरळीत पार पडणे ,लाडवांचा एक तारी पाक मस्त होणे हे सर्व मी माझे भाग्याच समजते. ५० लोक मुलाखतीला असताना मला जेव्हा नोकरी मिळते तेव्हा ते माझे भाग्यच असते. असो बरेच विषयांतर होत आहे. म्हंटले ना ज्योतिष आणि आपले आयुष्य एकच आहे ते हे असे बर का.

तर सांगायचे असे कि पोथी वाचताना ह्याही वेळी मी श्री गजानन विजय हा ग्रंथ अत्यंत वेगळ्या रुपात मी अनुभवला . त्यातील एक दोन वाक्य वाचताना असे वाटले अरे ह्याआधी इतका सखोल विचार ह्यावर आपण  ह्या पूर्वी कधीच केला नव्हता .

प्रत्येक वेळी हा ग्रंथ मला एक वेगळा दृष्टीकोन देत आहे हा आणि अगदी असाच विचार आपण रोजच्या आयुष्यातील घटनांकडे पाहताना केला तर ?  अनेक वेळा आपण ज्या गोष्टीसाठी खूप चिडतो त्या गोष्टीकडे एका वेगळ्या नजरेने शांतपणे पाहिले तर असे लक्ष्यात येते कि  ह्यात इतके चिडण्यासारखे खरच काहीच नव्हते आणि मग आपले आपल्यालाच बरेच काही उमजते . असे सारखे चिडून रागवून आणि त्यातून होणारे गैरसमज ह्यामुळे आपण आपल्या आयुष्यातील अनेक लहान सहान आनंदाना स्वतःचे पारखे होत असतो .हो कि नाही ? आले ना तुम्हाला माझ्याच सारखे हसू ? 

आपण पोथी वाचताना त्यात जितके समरसून जाऊ , तितकी ती प्रत्येक वेळी आपल्याला नव्याने भेटत जायील आणि आयुष्यातील अनेक आनंद कसे मनमुराद उपभोगायचे  ह्याचे बाळकडू सुद्धा मिळेल. पोथी वाचन हीसुद्धा महाराजांची सेवा आहे आणि त्याचे अपरिमित फायदेच आहेत .जसे आपण तासभर पोथी वाचणार ,नामस्मरण करणार म्हणजे आपला तोंडाचा पट्टा तासभर बंद. आपली वाचा म्हणजेच जिव्हा तिला जरा विश्रांती . कुणाबद्दल काहीच चांगले वाईट बोलण्यापासून तासभर तरी परावृत्त झालो आपण तसेच तासभर कुणी आपल्याशीही बोलणार नाही म्हणजे गावगप्पांना तिलांजली . बघा किती फायदे आहेत . ह्या वाचनाचा आपल्या Aura आणि विचारांवर वर सुद्धा चांगलाच परिणाम होतो ,देखा फायदेच फायदे है.

आज जवळजवळ २१ वर्ष श्री गजानन विजय ग्रंथ महाराजांच्या कृपेने ते माझ्याकडून वाचून घेत आहे , ह्यासाठी मी महाराजांची खरच ऋणी आहे. संत वांग्मय  शेवटी काय शिकवते आपल्याला तर आयुष्य कसे जगायचे ? अशी साधी सोपी सुटसुटीत व्याख्या मला करावीशी वाटते . संतानी समाज सुधारणे साठीच मनुष्य देह  धारण केला आणि जिवनाची सूत्री आपल्याला शिकवली. 

म्हणूनच जेव्हा प्रत्येक वेळी मला ग्रंथ वाचताना नव्याने एखादी ओळ दिसते तेव्हा मला उमजते कि हेच सूत्र मी खर्या जीवनात पण वापरले पाहिजे.  एखादी घटना अशीच का घडली किंवा एखादी व्यक्ती एखाद्या प्रसंगात अशीच का वागली ह्याचा लगेच वेडावाकडा अर्थ न काढता त्याकडे वेगवेगळ्या नजरेने पहिले तर त्यातून वेगळा बोध आणि अर्थ निघेल जो कदाचित आपल्याला अभिप्रेत सुद्धा नसेल. म्हणूनच सरसकट कुणालाही पटकन वाईट ठरवून त्याला बोल लावणे आपण बंद केले पाहिजे नाही ? अश्याने नाते संबंधातील प्रेम मायेचा ओलावा टिकून राहील आणि नाती अधिक परिपक्व होतील.

हा दृष्टीकोन देण्यासाठीच ग्रंथातील प्रत्येक ओवी आपल्याला रोज नव्या रुपांत भेटत असावी .आपले आयुष्य किती साधे सोप्पे असते नाही आपण आपल्या खोट्या अहंकाराने आणि अविचाराने ते उगीचच गुंता गुंतीचे करत असतो त्यामुळे नाती तर दुरावतातच पण  पर्यायी सगळे मानसिक आजार ओढवून घेतो. मी मैत्रीणीला २ वेळा फोन केला पण तिने नाही केला फोन परत , झाल मोडला पापड आपला लगेच . कारण राग आपल्या नाकावर घेवूनच फिरत असतो कि आपण. तिला असेल काही अडचण ,कुणी आजारी असेल काहीही असू शकते ,पण फक्त मी आणि माझे ह्या कोशातून बाहेर येऊ तेव्हा ना हा  वेगळा विचार करायला सुचेल  ,पटतंय का? आणि जेव्हा तिचा कालांतराने खरच फोन येतो आणि तिच्या संकटांची शृंखला आपल्याला समजते तेव्हा तिने फोन केला नाही म्हणून आपण काढलेल्या चुकीच्या अर्थाची आपल्याला मनात लाज वाटते  हेही तितकेच खरे आहे.  जसे हा ग्रंथ रोज आपल्याला नव्याने भेटतो अगदी तसेच आपले  स्वतःचे आयुष्य आणि आपल्या जवळच्या माणसांचे सुद्धा आहे. त्यांची रंग रूपे स्वभाव आपल्याला रोज नव्याने उलगडत असतात त्यामुळे खरतर कुठल्याही गोष्टीचा पटकन चुकीचा  अर्थ काढूच नये . थोडे थांबलो नाही तर मोठ्या आनंदाला आणि खर्या मैत्रीला ,प्रेमाला पारखेच होऊ आपण.  शेवटी आयुष्य म्हणजे काय आपल्या आजूबाजूची कुटुंबातील माणसेच कि. त्याहून वेगळे असे काहीच नसते .त्यांच्या सोबतचा हा जीवनाचा प्रवास आनंदी करण्यासाठी आपला रोजचा चष्मा बदलला पाहिजे .प्रत्येक घटनेकडे वेगळ्या दृष्टीने बघायला शिकले पाहिजे.काय वाटते?

दासगणू महाराजांनी हा ग्रंथ लिहिताना किती विचारपूर्वक शब्द रचना केली आहे बघा . म्हणूनच त्यांनी लिहिले आहे कि ग्रंथ एकदाच वाचा आणि एकदातरी महाराजांचे दर्शन घ्या पण जे वाचाल अनुभवाल ते आचरणात मात्र आणा . आपण नेमके त्याउलट करतो .आपल्याला पारायण करण्याचीही घाई प्रसाद नेवैद्य आरती सगळ्याची घाई असते, त्यामागील भावना कितीही उत्कट असली तरी .चिंतन मनन ह्यासाठी वेळ नसतो आपल्याला , कितीही कटू असले तरी ते खरे आहे. पण जो हे मोठ्या मनाने स्वीकारेल तोच महाराजांच्या सर्वात जवळ जायील ह्यात तिळमात्र शंका नाही.

जसा मला आज वेगळा दृष्टीकोन लाभला तसा तुम्हा सर्वाना लाभूदे हीच त्या गजानना चरणी प्रार्थना .

माझी ज्योतिष कार्यशाळेतील विद्यार्थिनी  सुवार्णा खेर हिला मी बुध आणि शुक्रच समजावत होते आणि त्यातून  मला हा लेख सुचला म्हणून तिचेही आभार . 

आज मला खूप छान वाटत आहे . आजकाल कार्यशाळेमुळे लेखन खुप कमी झाले आहे .पण ह्यापुढे असे होऊ देणार नाही हे नक्की. 

अस्मिता

antarnad18@gmail.com

लेख आवडल्यास अभिप्राय आणि तुमचे अनुभव सुद्धा जरूर कथन करा . शेवटी विचारांची देवाणघेवाण आणि संवाद महत्वाचा आहे.  

 



 


3 comments:

  1. श्री स्वामी समर्थ@! छानच

    ReplyDelete
    Replies
    1. Khup chaan lekha 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻

      Delete
  2. मॅडम असाच संकल्प मी जानेवारी 2020 पासून सुरू केलेला आहे फारच आनंद होतो व एक आत्मिक समाधान प्राप्त होते पारायण पूर्ण केल्यावर, छान नियम आहे हा सर्वांनी अवलंबिला तरी हरकत नाही💐💐👍💐💐

    ReplyDelete