|| श्री स्वामी समर्थ ||
प्रत्येक पिढी आपल्यातील सर्व गोष्टींचा ठेवा पुढील पिढीला सुपूर्द करत असते. आपली संस्कृती परंपरा, आपल्या कुळातील रीतीरिवाज कुळाचार ह्या सार्याचे ज्ञान आपल्याला आई आजी ह्यांच्याकडून होतच असते. हे सर्व बाळकडू मिळतेच पण पूर्वजांचे प्रेम त्यांचे असणे हेही तितकेच महत्वाचे असते. त्यांच्या नसण्याने आयुष्यात कधीही न भरून येणारी पोकळी निर्माण होते . उरते ती आठवणींची शिदोरी . अनुवंशिकतेने आपल्याला अनेक गोष्टी प्राप्त होतात जसे एखादी सवय , एखादी खास आवड , खाण्यापिण्याच्या सवयी किंवा रूप रंग ,दिसणे , व्यवसाय , छंद आणि असे बरेच काही.
आपल्या वाडवडीलांच्या पश्चात आपल्याला त्यांच्याकडून अनेक गोष्टी जसे धन संपत्ती , शेतजमीन ,वास्तू ,दागदागिने वारसाहक्काच्या रुपात प्राप्त होतात . आज त्याच संबंधी मनातील गोष्टींचे कथन करत आहे .
आपल्या मुलांना ,आप्त स्वकीयांना आपली संपत्ती लिखित स्वरूपात देण्याचे माध्यम म्हणजे “ मृत्यूपत्र “ आजकालच्या जगात अनन्यसाधारण महत्व असणारी हि गोष्ट आहे. पूर्वीच्या काळी ह्या गोष्टीला इतके महत्व नव्हते .तेव्हाही भाऊबंदकी होती नाही असे नाही . पण आईवडिलांचा शब्द शेवटचा असे. कुणी काही लिहून नाही ठेवले तरीही त्यांच्या इच्छेप्रमाणे सर्व होत असे. मग कुणाला शेतजमीन मिळो,कुणाला पैसा तर कुणाला दागदानीने . आजच्या कलियुगात सुद्धा अजूनही काही घरात ह्या गोष्टी बघायला मिळतात . नुसता तोंडी व्यवहार ,कसलीही कागदपत्रे नाहीत कारण प्रेम विश्वास आणि दिलेला शब्द ह्याचे अपार महत्व ,पण अशी उदाहरणे फार विरळाच . लाखात एक कुटुंब मिळेल.
आज पैसा हेच आयुष्य आहे ,पैशापाठी दुनिया धावत आहे. गेलेल्या माणसाच्या शरीरावरचे दागिने आधीच काढून ठेवतात ते ,अयोग्य आहे असे नाही म्हणता येणार कारण त्या मायेची गरज आहे.
गेल्या काही दशकात शहरीकरण झाल्यामुळे लोकांचे गावाकडून शहराकडे स्थलांतर झाले .नोकरी धंद्याच्या निम्मित्ताने कुटुंबे विभक्त झाली. बहुतेक जणांचे गावाकडील वास्तव्य कमी किंवा शून्य झाल्यामुळे तेथील घरांना कुलुपे लागली. गावाकडे वर्षानुवर्ष ढुंकूनही न पाहणारे आणि त्या घराच्या डागडूजीसाठी एक पैसाही खर्च न करणारे महाभाग आई वडिलांच्या पश्चात मात्र त्या घराचा संपत्तीचा जमिनीचा वाटा मागण्यासाठी सातासमुद्रापलीकडून सुद्धा हजर होतात . शेवटी हि सर्व माया आहे. पैसा हा जोडताना फार क्वचित पाहिला असेल बहुतांश वेळेला तो माणसे तोडतानाच आपण बघतो.
वडिलोपार्जित संपत्तीच्या विभाजनावरून भावंडात कुटुंबात युद्ध पेटते आणि त्यात प्रेम भावना ह्या सर्वाची होळी होते. आजवर अनुभवलेल्या प्रेमाच्या सर्व क्षणांची त्यात राख होते . त्यात एखाद्या भावाने घर बांधले असेल आणि आई वडिलांच्या पश्चात इतरांनी त्या घराचा वाटा मागितला तर ते योग्य होयील का ? हा विचार करण्यासारखाच प्रश्न आहे.
आईवडिल हयात असताना त्यांच्याजवळ किती माणसे असतात आणि त्यांच्या पश्चात मृत्युपत्राच्या वाचनाला किती असतात ह्यात प्रचंड तफावत दिसते.
खर पाहता आज आपल्या पालकांनी आपल्यावर उत्तम संस्कार केले आणि माणूस म्हणून घडवण्यात प्रचंड योगदान दिले. नोकरी करण्या इतपत सक्षम केले. त्यामुळे त्यांच्या सांपत्तिक स्थितीशी मुलांचा संबंधच नसावा. आपल्या हिमतीवर मुलांनी आपली घरेही घ्यावीत आणि आपला चरितार्थ चालवावा .शेवटी एका वयानंतर दुसर्याच्या जीवावर जगणे हे चूकच आहे.
आपल्या कष्टाने जशी आपल्या आईवडिलांनी वास्तू घेतली तशीच आपल्याला घेता का येऊ नये ? दुनियादारी आणि नीच प्रकारचे राजकारण , भाऊबंदकी नाही केली तर लक्ष्मी प्रसन्न होईल आणि सर्व गोष्टी सहज जुळून येतीलच .
थोडे विषयांतर होते आहे पण हेच चित्र आज दिसत आहे आणि ते बोलके आहे.
मृत्युपत्र म्हणजे जाणार्या व्यक्तीची अखेरची इच्छा नमूद केलेले इच्छापत्र. आपल्या आईवडिलांच्या इच्छेप्रमाणे त्यात लिहिलेल्या प्रत्येक शब्दाचे त्यांची अखेरची इच्छा म्हणून पालन करणे हेच आपले कर्तव्य आहे. मग त्या गोष्टी आपल्याला आवडो अथवा न आवडो.पटो अथवा न पटो .
जाणार्याची अखेरची इच्छा म्हणून भावनिक तत्वावर त्याचे पालन करावे पण आजकाल तशी स्थिती राहिलेली नाही. पैसा हेच सुख आणि सर्वस्व मानणाऱ्या माणसाने भावनांचे पाश कधीच फेकून दिले आहेत .माणसे माणसांना दुरावत आहेत त्यांच्यातीन मायेचे बंध गळून पडले आहेत .राहिला आहे तो फक्त व्यवहार .
कलियुगात माणूस माणुसकी विसरत चालला आहे . कुटुंबातील हेवेदावे , दुस्वास , हेवा , मत्सर ह्या गोष्टी शिगेला पोहोचल्या आहेत .त्यामुळे आता इच्छा वगैरे शब्द दूर राहिले असून मृत्युपत्र कोर्टात च्यालेंज केले जाते.
आपल्याला ज्यांनी माणूस म्हणून घडवले .आपल्याला आपल्या पायावर उभे राहण्यासाठी कष्ट केले त्यांच्या शेवटच्या इच्छेचा मानसुद्धा राखावा असे आपल्याला न वाटणे इतके कृतघ्न झालो आहोत का आपण ? हा प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारला पाहिजे.
इथून काहीही बरोबर नेणार नाही आपण . आपली कर्म आपल्या पुढील प्रवासाची सोबती असणार आहेत .ह्या सर्व विचार करण्यासारख्या गोष्टी आहेत . गुंजभर सोन्यासाठी आणि २ फुट जमिनीसाठी एकमेकांच्या उरावर बसणारे आपण एकमेकातील पवित्र बंधनांना तिलांजली देत आहोत.ह्या मोहात फसून आपण होत्याचे नव्हते करतो.
ह्या सर्वामुळे जाणार्या माणसांच्या इच्छांची राखरांगोळी होतेच पण त्यांचा आत्माही दुखावला जातो. जाणार्या माणसाची इच्छा हि आपली असेलच असेल असे नाही . कदाचित ती आपल्या मनाला पटणारी नसेलही पण काहीही झाले तरी भावना आणि कर्तव्य ह्यांचा मेळ इथे घालणे अपेक्षित आहे. नाही तर त्यांच्या आत्म्याला सद्गती मिळणार नाही.
ह्या सर्वाचा परिणाम म्हणूनच मग पत्रिकेत पूर्वजांचे शाप आणि तळतळाट. अर्थात ह्याला इतरही अनेक कारणे आहे. पण जाणार्याच्या अंतिम इच्छेचा मान न ठेवणे ह्यातून आपण आपली कर्म मात्र नक्कीच वाढवत असतो. पुढे आपल्या कुटुंबाला आणि स्वतःलाही त्याचा त्रास होतो. मनाविरुद्ध घटनांची जणू शृंखला तयार होते आणि त्यात आपले जीवन व्यथित होते .
आपल्यालाही पुढील पिढीला काहीना काही देवून जायचेच आहे . काय देणार आहोत आपण ? एकमेकांचा दुस्वास करा ,आईवडिलांच्या इच्छेचा मान ठेवू नका ,विचारा आपल्याच मनाला .आपले अनुकरण मुले करतील हे नक्की .
म्हणूनच ज्यांनी आपल्याला अंगाखांद्यावर वाढवले त्यांच्या अंतिम इच्छेचे पालन करणे हे आपले कर्तव्य आहे ,ह्यापेक्षा उत्तम कर्म दुसरे असूच शकत नाही .
अस्मिता
#वारसाहक्क#मृत्युपत्र#वाडवडील#इच्छापत्र#परंपरा#अंतिमइच्छा#पूर्वज