|| श्री स्वामी समर्थ ||
मानसपूजा हि आपल्या गुरूच्या प्रती उत्कट होणारी अभिव्यक्ती आहे. मानस पूजा आपल्याला आपल्या आराध्याच्या , इष्ट देवतेच्या अत्यंत समीप घेवून जाणारी साधना आहे , त्यामुळे त्याला अनन्य साधारण असे महत्व आहे.
मानसपूजा करणारा भक्त हा महाराजांच्या प्रत्येक क्षणी जवळच असतो किबहुना त्याच विश्वात तो रममाण होतो. मानसपूजा हा पारमार्थिक सेवेतील उच्च बिंदू म्हंटला तर वावगे ठरू नये.
संसारिक जीवन जगताना , अनेक लढाया लढताना थकलेला जीव जेव्हा गुरुपदी क्षणभर विश्रांती घेतो तेव्हा त्याच्या मनातील गुरुभक्ती शिगेला पोहोचते आणि एका अवीट गोडीचे आत्यंतिक समाधान भक्ताला मिळते.
मानसपूजा हा सर्वश्रेष्ठ उपचार आहे आणि एका भक्ताची महाराजांच्या पायाशी असलेल्या असीम भक्तीची परिसीमा सुद्धा.
प्रत्येक भक्ताला आपले गुरु आपल्याला कधी दर्शन देतील ह्याची नेहमीच आस असते किबहुना तो त्याचा हट्ट असतो. महाराज आपल्या लाडक्या भक्तांना दर्शन देतात ते मानसपूजेत .
आज आपण सर्वच दडपणाखाली आहोत . जीवनात एक अनिश्चितता आहे. मानसपूजेच्या माध्यमातून महाराजांशी अनुसंधान साधता यावे आणि जीवनात विश्वास , संयम आणि सकारात्मकता ह्याचे बीज पुनश्च पेरले जावे म्हणून मानसपूजा महत्वाची आहे.
मनातील विचारांवर सुद्धा महाराजांचेच अधिराज्य असते . त्यांच्या कृपेने आणि इच्छेने आपल्या जमेल तशी मानसपूजा नक्की करावी ह्यासाठी हा लेखनप्रपंच.
श्री स्वामी समर्थ
अस्मिता
antarnad18@gmail.com
उत्तम आणि छान लेख
ReplyDelete