|| श्री स्वामी समर्थ ||
अध्यात्माचा मार्ग कितीही खडकाळ असला तरी गुरुकृपेमुळे त्या वाटेवरील काटे मात्र भक्ताला कधीही टोचत नाहीत. प्रत्यक्ष महाराज आपल्या सोबत आहेत हि भावना प्रत्येक भक्ताला आनंदाच्या उत्तुंग शिखरावर नेवून ठेवणारी असते. आपण फक्त शरीराने इथे आहोत आणि मन मात्र आपल्या गुरूंच्या चरणाशी गुंतलेले आहे हि मनाची अवस्था जेव्हा होते तेव्हा काहीच नकोसे वाटू लागते आणि एक आत्यंतिक प्रेमाची अनुभूती आपण अनुभवू लागतो . भक्तिरसात इतके आकंठ बुडतो कि कश्याचीच आस राहत नाही. परमेश्वराचे सानिध्य अनुभवणे ह्यालाही त्यांची कृपा आणि आपले पूर्व संचित लागते ह्यात दुमत नसावे.
गुरूंच्या पदी असलेल्या आपल्या निष्ठा आणि त्यांच्याप्रतीचा भाव हा डोळ्यातील अश्रूंच्या रुपात जेव्हा महाराजांच्या चरणावर वाहू लागतो तेव्हा आत्यंतिक समाधानाने प्रसन्न झालेले गुरुही भक्ताला सांगतात ...माग तुला काय मागायचे आहे ते.
एकेकाळी महाराजांच्या समोर मागण्यांची याचना करणारा भक्त आज कात टाकल्याप्रमाणे बदललेला असतो . प्रापंचिक यातना ,समस्या ह्यांनी गलीतमात्र झालेला भक्त गुरुसेवेत दाखल होतो आणि त्यांना विनवणी करू लागतो कि मला ह्या सर्व त्रासांपासून मुक्ती द्या. म्हंटलेच आहे ना कि भक्तिविना प्रचीती नाही आणि प्रचीती वीना भक्ती नाही. नामस्मरणाची गोडी वाढू लागते तसे प्रापंचिक आसक्ती कमी होऊ लागते. महाराजांच्या चरणाशी एकरूप व्हावे इतकच वाटू लागते . मोह मायेचे वेष्टण दूर होऊ लागते आणि समाधी अवस्थेकडे मन प्रयाण करते. मागणे दूरच राहिले काय स्वतःचे अस्तित्व सुद्धा विसरून गेलेला असतो.
मनाची शांतता आणि उच्च अध्यात्मिक अनुभूती अनुभवणाऱ्या ह्या मनाला गुरु दर्शनाची आस लागते .गुरु कृपेसाठी मन क्षणोक्षणी तळमळत राहते आणि आनंदाने हर्षभरित झालेला भक्त आर्जव करू लागतो ....
प्रसाद हा मज द्यावा देवा, प्रसाद हा मज द्यावा देवा
सहवास तुझाची घडावा देवा, प्रसाद हा मज द्यावा...
परमेश्वरा तुझ्या सहवासात मी तृप्त आहे , समाधानाची अवीट गोडी चाखत आहे म्हणूनच हा तुझा सहवास मला अखेरच्या क्षणापर्यंत लाभावा. हाच प्रसादरूपी आशीर्वाद मजला द्यावा ...
निशिदिनी तव मी नाम स्मरावे, वियोग ना तव व्हावा देवा
प्रसाद हा मज द्यावा देवा, प्रसाद हा मज द्यावा देवा...||१||
परमेश्वरा प्रत्येक क्षण मी तुझ्याच नामस्मरणात आकंठ बुडावे कारण तुझे अस्तित्व नामाशिवाय वेगळे नाहीच , तुझा वियोग हि कल्पना सुद्धा मला सहन होणार नाही .
हरिभजनामृत निशिदिनी पाजुनी, जन्म मृत्यु चुकवावा देवा
प्रसाद हा मज द्यावा देवा, प्रसाद हा मज द्यावा देवा...||२||
तुझ्या ह्या भक्तीचा रस नित्य सेवन करण्याचे सौभाग्य मला लाभूदे आणि त्या योगे जन्म मृत्यू च्या ह्या फेर्यातून हे परमेश्वरा तू माझी सुटका कर .
ह्र्दय मंदिरी तुवा बैसवूनी, ज्ञानयोग शिकवावा देवा
प्रसाद हा मज द्यावा देवा, प्रसाद हा मज द्यावा देवा...||३||
माझ्या हृदयातील तुझे स्थान हे अढळ आहे ,ज्ञान ग्रहण करण्याचा हा योग माझ्या आयुष्यात पुन्हापुन्हा यावा , ते सौभाग्य मला लाभावे हेच मागणे आहे.
आत्मसुखाची हीच विनंती , विसर तुझा न पडावा देवा
प्रसाद हा मज द्यावा देवा, प्रसाद हा मज द्यावा देवा..||४||
तुझी सेवा करण्यातच माझ्या आयुष्याची अखेर व्हावी .कुठल्याही क्षणी मला तुझा विसर पडू नये इतकीच हात जोडून विनंती आहे.
गुरुपदी लीन झालेला भक्त महाराजांकडे दुसरे काय मागणार ? एकच मागणे आहे .... तुमची सेवा करण्याचे भाग्य मला जन्मोजन्मी मिळूदे. किती मागायचे आणि कायकाय मागायचे ...भरून पावलो कि..आता तर द्यायची वेळ आली .अतीव समाधानाचा हा क्षण आयुष्य एका वेगळ्याच उंचीवर घेवून जातो.
अस्मिता
#अंतर्नाद #स्वामीसमर्थ#स्वामीलीला#भक्ती#प्रसाद#गुरुसहवास#मंदिर#सेवाभाव#जन्मोजमी
खूप छान लेख
ReplyDeleteखूप छान लेख श्री स्वामी समर्थ
ReplyDeleteवाह फारच. छान श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
ReplyDeleteखूप छान🙏🙏🙏
ReplyDeleteखूप छान लेख आणि निरुपण
ReplyDeleteखूपच सुंदर लेख.अध्याम्यात देवांची, गुरूंची नावे वेगवेगळी असतील पण त्यांचे नामस्मरण करून त्यांची भक्ती केल्याने भक्तांना समाधान मिळते, आनंद मिळतो आणि त्या समाधानाच्या,आनंदाच्या शिदोरी वर आयुष्यातील विविध संकटाना आपण विनासायास तोंड देऊ शकतो.
ReplyDelete