||श्री स्वामी समर्थ ||
उन्हाळ्यात इतकी उष्णता वाढते कि धरती मातेचा जणू कोप झाल्यासारखाच भास होतो. पण निसर्गचक्र अफलातून आहे. उन्हाने तापलेल्या आणि त्रासलेल्या सर्व जीवांना पुन्हा एकदा जीवदान मिळते ते पावसाच्या सरींनी. पाणी हे जीवन आहे आणि त्याशिवाय सर्व व्यर्थ आहे.
कुठलीही गोष्ट प्रमाणाबाहेर असेल तर ती वाईटच . तसेच पाऊसपाणी हवेच त्याशिवाय जनजीवन नाही , शेतीभाती , अन्न धान्य पिकणार नाही आणि आपल्या सर्व प्राणिमात्रांच्या मुखी घास सुद्धा पडणार नाही . पण कधीकधी वरुणराजाचा कोप होतो आणि प्रचंड वृष्टीमुळे जनजीवन तर विस्कळीत होतेच पण पुराच्या पाण्यात गावच्या गावे वाहून जातात , पिकांचे पर्यायाने शेतकर्यांचेही नुकसान होते. त्याच्या जोडीला वादळी पाऊस आला तर बघायलाच नको. असो .
तर सांगायचे तात्पर्य असे कि संपूर्ण सृष्टीला पुन्हा एकदा बहरून टाकणारा हा पाऊस आला कि आबाल वृद्ध सर्वच आनंदी होतात , धबधबे आणि नद्या वाहू लागतात आणि सृष्टी जलमय होते.
लहान मुले पाण्यात होड्या सोडण्याचा आनंद मनमुराद लुटतात तर तरुण तरुणी पावसाचा आनंद घेत भ्रमंती करतात. अगदी सामान्य माणूस सुद्धा आपल्या घराच्या खिडकीतून वाफाळलेल्या चहाचा आनंद घेत पावसाचे स्वागत करतो.
निसर्गाने सगळ्याची चोख व्यवस्था ठेवली आहे. आकाशातील लुकलुकणारे तारे म्हणजेच हि नक्षत्रे . सूर्याचा अमुक एक नक्षत्रात प्रवेश झाला आणि त्याचे वाहन कुठले आहे हे बघून पाऊस पडणार किंवा पडणार नाही , किती कसा पडणार हे भाकीत आपल्या घरातील मोठी माणसे आपल्याला सांगत असतात . ह्या सर्वाची इत्यंभूत माहिती पंचांगात असतेच.
सहदेव भाडळी ह्या भावंडांच्या संवाद स्वरूपात कथन केलेल्या ह्या ज्योतिष विषयक ग्रंथात निसर्गाचे चक्र , पंचांग ह्याच्या आधारे असणारी उत्तम माहिती आहे . पाऊस ,घरबांधणी , मुहूर्त ह्यासारख्या आपल्या रोजच्या जीवनाशी निगडीत असणार्या गोष्टींविषयीचे समर्पक कथन ह्यात केलेलं आहे.
ह्यातील काही श्लोकांतून सूर्याचे भ्रमण कुठल्या नक्षत्रातून होताना किती आणि कसा पाऊस पडेल याचे वर्णन आहे . पूर्वीच्या पिढीत ग्रामीण भागातील शेतमजूर , शेतकरी ह्यांना हे सर्व तोंडपाठ असायचे आणि त्यानुसार शेतीची कामेही केली जात असत .
नक्षत्रा प्रमाणे पर्जन्य फळ
रोहिणी वाजे गडगडाट, मृग पडे दिवस आठ ||
भाडळी म्हणे सहदेवजी , नद्या वाहती काठोकाठ||१||
अर्थ – रोहिणी नक्षत्र नुसता गडगडाट झाला आणि मृगाचा आठ दिवस पाऊस चांगला झाला तर नद्यांना पूर येतील असे भाडळी सहदेवास सांगत आहे.
मृग करी झाडाझाड आर्द्रा न पडे कोय ||
भाडळी कहे सहदेवजी , पुथ्वी प्रलय होय ||२||
अर्थ – भाडळी सहदेवास सांगत आहे , जर मृग नक्षत्री नुसता वारा सुटला व आर्द्रा नक्षत्री पाऊसच पडला नाही तर मोठा दुष्काळ पडून सर्वत्र हाहाकार उडेल.
पुनर्वसु न पडे काही , पुष्य जाय कोरडा |
भाडळी म्हणे सहदेवजी , वाळूच्या कण्या भरडा||३||
अर्थ – सहदेवास भाडळी सांगते , जर पुनर्वसु व पुष्य या नक्षत्री पाऊस पडला नाही तर धान्या ऐवजी मातीचे दळण करावे लागेल..
पुष्य पडे सबंध , आश्लेषा वाहे पूर |
भाडळी म्हणे सहदेवजी , घरघर बाजे तूर ||४||
सहदेवास भाडळी म्हणते – सर्व पुष्य नक्षत्री पाऊस पडला व आश्लेषा नक्षत्रात पूर आला तर , धान्याची समृद्धी होऊन लोक घरोघरी विजयोत्सव करतील.
उत्तरा पडे ४ दिन , हस्त न पडे कोय |
भाडळी कहे सहदेवजी , पृथ्वी प्रलय होय ||५||
भरपूर पडतील उत्तरा तर भात खाईना कुत्रा |
न पडतील उत्तरा तर भात मिळेना पितरा ||६||
सहदेवास भाडळी सांगते उत्तरा नक्षत्राचा पाऊस चार दिवस झाल्यावर हस्ताची पर्जन्य वृष्टी झाली नाही तर महागाई होयील आणि हाहाकार होईल.
उत्तरा भरपूर पडल्या तर सुकाळ होईल , कुत्र्याला अन्न मिळेल ,पण नाही पडल्या तर पितरांना सुद्धा अन्न मिळणार नाही .
पडल्या साई स्वाती , तर तर पिकतील माणिक मोती |
न पडे स्वाती तर राजहंस माती खाती ||७||
सहदेवास भाडळी सांगते स्वाती नक्षत्राच्या पावसाने माणिक मोती सुद्धा पिकतील परंतु जर पडला नाही तर राजहंसाला माती खायला लागेल .
हस्त जाय कोरडा ,चित्रा करी ताणाताण |
भाडळी म्हणे सहदेवजी , दुष्काळ पडेल तुझी आण ||८||
हस्ताचे नक्षत्र जर पावसाशिवाय सुके गेले तर मोठा दुष्काळ पडेल असे सहदेवास भाडळी शपथ घेवून सांगते.
रोहिणीने घातले आंडे ,मृगाने भिजवली पाठ |
सहदेव कहे भाडळी पाऊस गेला दिवस आठ ||९||
रोहिणी नक्षत्राचे मेघ जागीच जिरले , आणि मृगाचा नुसता पाठ भिजवण्याइतका पाऊस पडला तर पुढे ८ दिवस पाऊस पडणारच नाही असे सहदेवास भाडळी सांगत आहे.
वरील सर्व वर्णन वाचून आता आपल्या सर्वाना पावसाची नक्षत्रे कुठली आणि कुठल्या नक्षत्रावर कमी अधिक कसा पाऊस पडेल त्याचा अंदाज नक्कीच आला असेल.
सूर्याने आपल्याकडे 9 नक्षत्र राखून ठेवली आहेत आणि त्या नक्षत्रातून सूर्याचे भ्रमण होताना पाऊस पडतो म्हणूनच एकूण २७ नक्षत्रातून हि पावसाची ९ नक्षत्रे वजा केली तर बाकी शून्य उरते , कारण पाऊस नसेल पाणी नसेल तर जीवन अशक्य आहे . हि संपूर्ण सृष्टी पाण्यावर जगते आहे .पाण्यामुळे आपण सर्व जीवित आहोत फुलेफळे झाडे बहरत आहेत .
पाऊस हा आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक आहे तो जेव्हा प्रमाणत असतो तेव्हा जीवन सुसह्य करतो पण जेव्हा अतिवृष्टी होते तेव्हा हाहाकार माजवतो. होत्याचे नव्हते करतो . आयुष्यात अश्या अनेक अनेक गोष्टी आपल्या गरजेच्या असतात जसा पैसा .पण कुठलीही गोष्ट गरजेपेक्षा अधिक मिळाली कि त्याची किंमत राहत नाही . अनेक खेड्यातून आजही लोकांना मैला मैलावरून पाणी आणावे लागते तेही उन्हातान्हातून , आणि आपण आपल्या घरातील पाण्याचा नळ धबधबा सोडत असतो.
पृथ्वीवरील पिण्याच्या पाण्याचा साठा कसा आणि किती आहे एक दिवस आपल्याला प्यायला सुद्धा पाणी मिळणार नाही , पाण्याचे दुर्भिक्ष जाणवेल आणि त्याला सर्वस्वी आपणच जबाबदार असू . तेव्हा लवकर जागे होवुया आणि वरुणराजाच्या ह्या असीम कृपेचा यथाशक्ती मान ठेवूया .
संदर्भ : सहदेव भाडळी “ज्योतिषशास्त्र “ ग्रंथ .
अस्मिता
#अंतर्नाद #पाऊस#वादळ#चक्रीवादळ#पूरस्थिती#जलाशय#नक्षत्र#सूर्य#चित्रा#स्वाती#रेवती#मघा
No comments:
Post a Comment