Wednesday, 29 June 2022

जीवनाला सोन्याची झळाळी देणारे गुरुपुष्य

 || श्री स्वामी समर्थ ||


शनीचे पुष्य नक्षत्र गुरुवारी येते तेव्हा “ गुरुपुष्य “ म्हणजेच “ गुरुपुष्यामृत “ योगाची निर्मिती होते .ज्योतिष शास्त्रातील काही असामान्य योग आहेत त्यापैकी हा एक . शनी आणि गुरु दोन बलाढ्य ग्रहांच्या युतीने बनलेला हा योग .दोघेही साधक व उपासक . दोघेही विरक्तीचे ग्रह पण त्यातही फरक आहेच . शनीला प्रपंचाची फारशी ओढ नाही पण गुरुचे तसे नाही . प्रापंचिक जीवन जगताना धर्माचे पालन करा आणि आपली इतिकर्तव्ये पूर्ण झाली कि परमार्थाचे धडे गिरवा हे सांगणारा गुरु आहे. दोन्ही ग्रहांची शिकवण एकच पण शिकवण्याचे मार्ग वेगळे.

गुरूच्या सेवेचे अनन्यसाधारण असे फळ आहे. गुरुविना जीवन ते काय . ते परीक्षा घेतील पण अभाळा इतके पदरात टाकतील. शनी तर आपला मित्रच आहे . पण हा सखा जरा शिस्तप्रिय आणि कडक , न्यायी आहे. 

ह्या दोन्ही ग्रहांचा शुभयोग असताना केलेली साधना अत्युतम फळ प्रदान करेल ह्यात शंकाच नाही.  गुरुपुष्य योगावर सोने खरेदी करतात . ह्या सोन्यासारखेच तेजपुंज आपले आयुष्य देखील व्हावे म्हणून साधना करणेही आवश्यक आहे. गुरुपुष्य योगावर दान अवश्य करावे ,सोने जमले नाही तर चण्याची डाळ आणावी पण ती गुरुपुष्य योगातच .गरिबास गुळ गहू द्यावा .जमेल तितके नामस्मरण करत दिवस आनंदात घालवावा .

दासगणू महाराजांनी श्री गजानन विजय ह्या ग्रंथात “ गुरुपुष्यामृता” ची महती सांगताना ह्य योगावर जो अनन्यभावे श्री गजानन विजय ह्या पोथीचे पारायण करेल त्याच्या कसल्याही असोत यातना त्याचे निरसन होयील अशी ग्वाही दिली आहे . आपल्याला सगळे काही हवे असते पण त्यासाठी कष्ट परिश्रम करायची तयारी नसते. इंस्तंट चा जमाना आहे ना ,धीर म्हणून नसतो आपल्याला. पण अध्यात्मात तसे चालत नाही. शनी सगळ्याला विलंब करतो ,आपली प्रत्येक क्षणी परीक्षा बघतो ,त्याच्या परीक्षा कठोर असतात पण त्या देता देताच आपण आपल्याही नकळत घडत जात असतो.

शनी अत्यंत न्यायी आहे ,जसे कर्म तसे फळ म्हणूनच शनी कर्मप्रधान आहे .जीवन  कसे करायचे ते शिकवणारा ग्रह आहे . शनी आणि गुरु ह्या दोन्ही ग्रहांचा मिलाफ होणारा हा शुभदिन सर्व शुभ गोष्टींसाठी उत्तम दिवस आहे . शनी आणि गुरु हे दोन्ही विरक्त , साधक असल्यामुळे ह्या योगावर विवाह मात्र वर्ज आहे. ह्या दोन्ही ग्रहांना विवाहाचे वावडे आहे म्हणून ह्या योगावर नवीन आयुष्याची सुरवात करू नये .

गुरु आणि शनी ह्या दोन्ही ग्रहांचे सोन्यासारखे गुण कसे ग्रहण करता येतील हे पाहणे म्हणजेच “ गुरुपुष्य ”.

आपल्या सर्वांच्या आयुष्यात हे गुरुपुष्य एका नवीन सोनेरी किरणांची पहाट घेवून येणारे असुदे हीच गुरु आणि शनी महाराजांच्या चरणी प्रार्थना .

संकलन : सौ. अस्मिता दीक्षित 

संपर्क : 8104639230

 








No comments:

Post a Comment