Thursday, 9 February 2023

विवाह आणि वैवाहिक सौख्य – वास्तव

 || श्री स्वामी समर्थ ||


आजच्या काळात विवाह संस्थेचे स्वरूप पार बदलून गेले आहे. चहा पोह्याचे कार्यक्रम आणि देण्याघेण्याच्या याद्या तर कधीच इतिहास जमा झाल्या आहेत . असो. आपले लेकरू वयात आले कि प्रत्येक आईबापाला त्याचा विवाह व्हावा असे वाटते आणि ते योग्यच आहे. मग स्थळांसाठी शोधाशोध सुरु होते. आजकाल त्याचीही सोय अगदी घरबसल्या नेट च्या माध्यमातून झालेली आहे. आपल्या परंपरा रूढी ह्यांची पाळेमुळे हिंदू संस्कृतीत अगदी घट्ट आहेत . आजकाल त्याला आधुनिक स्वरूप देवून मेहेंदी , संगीत वगैरे कार्यक्रम सुद्धा केले जातात त्यामुळे विवाह अगदी 8 दिवस चालतो. 

विवाह म्हणजे एक नवीन नाते आणि ते नाते अनेक अपेक्षाही घेवून येणार असते . आजकाल अनेकविध कारणांमुळे विवाहाचे वय अगदी 32-35 पर्यंत सुद्धा गेलेले आपण पाहतो. विवाह होणे जितके आवश्यक आहे तितकेच तो सुखावह होणे आणि पुढे त्या दोघांचा संसार 30-35 वर्ष आनंदात होणे आवश्यक आहे. प्रत्येकाने विवाह करताना दोघांच्याही पत्रिका उत्तम ज्योतिष अभ्यासकाकडून जाणून घ्याव्यात . अगदी ज्यांचा प्रेम विवाह आहे त्यांनी सुद्धा . आयुष्यात अनेक चढ उतार असतात त्यावर आपला जोडीदार आपल्याला कसा साथ देणार आहे , वैचारिक बैठक जुळते आहे ना , मनोमिलन होते आहे ना , वंश वेल वाढणार आहे कि नाही ह्या तत्सम पण अति आवश्यक बाबी पडताळून बघणे गरजेचे आहे. 


अगदी 36 गुण नाही जुळले तरी चालतील पण एकमेकांचे स्वभाव आणि मन जुळणे आवश्यक आहे तरच पुढील प्रवास सुखकर होयील. जीवनात आनंदाच्या प्रसंगी सगळेच असतात पण उतारांवर साथ देणारा जोडीदार खरा असतो आणि त्याचा शोध घेतला कि सगळेच सोपे होते . 


अनेकदा मुलगा किंवा मुलगी वयात आले कि त्यांच्यासाठी स्थळ शोधायला सुरवात होते पण त्याआधी आपला मुलगा वैचारिक , मानसिक , शारीरिक , आर्थिक आणि लैंगिक दृष्टीने सक्षम आहे कि नाही त्या मुलीला सर्वार्थाने सुख देऊ शकेल कि नाही ह्याची जेव्हा आपल्याला खात्री होईल तेव्हाच मुलांचे विवाह करावेत असे मला वाटते आणि तुम्हीही त्याच्याशी सहमत असला असे वाटते . वरील गोष्टीत कुठेतरी कमतरता असेल तर मग पुढे रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग असे होते .


विवाह कधी होईल त्या पेक्षा आपल्या पत्रिकेत किंवा आपली पत्रिका वैवाहिक सुखाची आहे कि नाही हेही समजून घेणे आवश्यक आहे. विवाह तर होणारच आहे पण तो झाला म्हणून आज ह्या जगात किती लोक सुखी आहेत हा प्रश्न आहे.  काही खरच भाग्यवान असतात ज्यांना अगदी मनासारखा जोडीदार मिळतो , मनोमिलन होते आणि त्यांचा अगदी 50 वर्षाहून अधिक सुखाचा संसार होतो पण आजकाल बहुतांश वेळी विवाहानंतर तडजोड किंवा तत्सम समस्या येताना दिसतात आणि त्याची परिणीती विभक्त होण्यात होते.

पत्रीका मिलन करताना नुसते गुण मिलन नाही तर ग्रह मिलन होणे हि आवश्यक आहे. आपल्या पाल्याची पत्रिका किती ताकदीची आहे हे पालकांनी जरूर बघावे त्यानुसार स्थळे शोधावीत .  समोरच्या स्थळाकडून अपेक्षा करताना आपला मुलगा किती पाण्यात आहे हेही बघावे. असो .

ज्योतिष शास्त्राच्या दृष्टीने उहापोह करताना दोघांचे  लग्न  आणि चंद्राचा षडाष्टक योग टाळणे उचित . वैवाहिक सुखाचा कारक शुक्र पत्रिकेत सुस्थितीत असेल तर वैवाहिक सुख बरे मिळते अन्यथा नाही . सप्तम स्थान पाप ग्रहांच्या दृष्टीत किंवा सप्तमेश पाप ग्रहांनी युक्त किंवा दृष्ट असेल तरीही वैवाहिक सुख बिघडते . सप्तम स्थानावर किंवा सप्तमेशावर 2 किंवा अधिक पापग्रहांच्या दृष्ट्या असतील तर सप्तमेश फळे देणार नाही . सप्तमेश निचीचा असेल , षष्ठ किंवा अष्टम स्थानाच्या अधिपतीच्या नक्षत्रात असेल .सप्तमेश वक्री असेल , बाधकेश मारकेश असेल , त्रिक स्थानात असेल तर वैवाहिक सुख नष्ट होतेच अनेकदा विवाह सुद्धा होत नाही . सप्तम स्थानात हर्शल नेप असतील किंवा लग्नेश सप्तमेश ह्याच्या कुयोगात नेप सारखा ग्रह आला तर अनेकदा लग्नात फसवणूक होताना दिसते .शनी हा प्रत्येक गोष्टीत विलंब करणारा ग्रह आहे त्यामुळे त्याची सप्तमस्थान , सप्तमेश , चंद्र ह्यावर दृष्टी विवाहास विलंब करते . वक्री ग्रह काहीतरी वेगळे फळ निश्चित देतात त्यामुळे सप्तमेश लग्नेश वक्री असणे हि ग्रहस्थिती वैवाहिक सुखाला अनुकूल नक्कीच नाही . पंचम सप्तम स्थानाचा शुभ योग प्रेमविवाहाचे संकेत देतो. 

सर्वात महत्वाचे म्हणजे महादशा . कारण घटना घडवण्याचा अधिकार सर्वार्थाने महादशा स्वामीला आहे. त्यामुळे विवाहाला अनुकूल स्थानांच्या दशा असतील तर त्या दशा अंतर्दशेत विवाह होतो. षष्ठ स्थानाशी संबंधित दशा विवाह देत नाही किंवा अडथळे देते . अमुक एक ग्रह बघून विवाहच काय आयुष्यातील कुठलीही घटना सांगता येणार नाही त्यासाठी संपूर्ण पत्रिका अभ्यासावी लागते. पण दशा अनुकूल नसेल तर उगीचच लग्नातून गुरुचे भ्रमण शुक्रावरून गुरुचे भ्रमण होयील तेव्हा विवाह होयील अशी चुकीची भाकिते करू नये . पत्रिका मिलन करताना ज्योतिषाने सुद्धा अभ्यासाला  पुरेसा वेळ घ्यावा तसेच जातकाने सुद्धा ह्या बाबत घाई किंवा आग्रह धरू नये. विवाह हा आयुष्याचा मोठा टर्न आहे. निर्णय विचारपूर्वक घ्यायचा असतो . उगीचच मुंडावळ्या बांधूनच पत्रिका दाखवायला येऊ नये असे स्पष्ट सांगावेसे वाटते . त्या नंतर वेळ आली कि बांधायच्या आहेतच पण योग्य व्यक्तीशी विवाहाची गाठ बांधताना .

आपल्या जोडीदाराचा स्वभाव आपल्याशी 100% जुळेल असे नाही पण मुलभूत गोष्टी तरी जुळल्या पाहिजेत . जीवनाकडे बघण्याचा दृष्टीकोण , आर्थिक गणिते , पुढील शिक्षणे ,मुले , परदेशगमन , वास्तू , एकत्र किंवा विभक्त कुटुंब , रीतीभाती ह्या मुलभूत गोष्टीत विचार अत्यंत स्पष्ट असले पाहिजेत , भारंभार अपेक्षांचे ओझे आपणही घेवू नये आणि दुसर्याकडून ते अपेक्षिले हि जाऊ नये. सर्वसामान्य आयुष्य आहे तेच जगणार आहोत मग उगीच कश्याला मुखवटे.  लग्नाआधी , लग्न होताना , झाल्यावर आणि पुढील काही वर्षात सगळच बदलणार आहे जसे विचार आर्थिक स्थर . मग त्यासाठी वेळोवेळी मनाची तयारी ठेवली पाहिजे किबहुना ती ठेवण्याची तयारी असलीच पाहिजे. आपणही बदलणार आहोत तसा समोरचा सुद्धा . प्रत्येक वेळी सगळे छान छान दिवस असतील असे नाही काही परीक्षांचे क्षण सुद्धा येतील. थोडक्यात “ हे माझे कुटुंब आहे आणि हि आपली माझी माणसे आहेत “ हि भावना दोघांचीही असली पाहिजे . तरच विविध आघाड्यांवर त्यांना एकजुटीने लढता येयील . 

हे सगळे लिहिताना एक वेगळा पेहलू लिहावासा वाटतो . विवाह ठरवताना प्रत्येक पालकाने आपल्या पाल्याची पत्रिका सुद्धा तपासून बघावी , अगदी त्रयस्ताच्या नजरेतून बघावी. त्यातील गुण दोष , विवाहासाठी पत्रिका काय बोलते , कसे आहे वैवाहिक आयुष्य अश्या अनेक गोष्टींची पडताळणी करावी आणि जे आहे ते खुल्या दिलाने स्वीकारून पुढे जावे. अनेकदा मुलाच्या पत्रिकेत विवाहाचा योग नसतो किंवा द्विभार्या योग असतो किंवा तत्सम बाबी असतात . कुठल्याही आईला हे पचवणे नक्कीच जड आहे पण तरीही मला सांगावेसे वाटते कि जे आहे ते आहे. ज्या जगात सगळ्यांच्या पदरात त्या विधात्याने विवाह हि घटना दिलेली नाही पण म्हणून आपण जगणे सोडून देत नाही आणि द्यायचेही नाही. अनेक वेळा जातक त्यावर उपाय किंवा उपासना सांगा असेही विचारतात . तर ज्याच्या नशिबात विवाह नाही ती घटना ओढून ताणून होयील का ? किंवा ती होण्यासाठी उपासना फलदायी होईल का? हि विचार करण्यासारखी गोष्ट आहे. शिक्षण अर्थार्जन घर कुटुंब सर्वार्थाने उत्तम स्थिती असूनही विवाह न जमणे हे त्रासदायक , मनाला क्लेश देणारे आहे पण त्याला काहीही उत्तर नाही. प्रारब्ध भोग हे भोगूनच संपवायचे असतात .

वास्तव जितक्या लवकर आपण स्वीकारू तितके सुखी होऊ नाहीतर मनाची उमेद घालवून बसू .आपल्या मागे आपल्या मुलाला सांभाळणारी पत्नी त्याला मिळावी हा विचार चुकीचा नाही पण अनेकदा हा विचार प्रत्यक्षात उतरत नाही . ज्यांच्या पत्रिकेत वैवाहिक सुख नाही त्यांना त्याच प्रकारच्या म्हणजे वैवाहिक सुख नसलेल्या पत्रिकाच सांगून येतात हा अनुभव आहे. अनेकदा आपण गोचर भ्रमण बघून विवाह हि घटना कधी होयील हे बघतो आणि तिथेच आपण फसतो कारण मूळ दशास्वामी अनुकूल नसताना घटना घडेलच कशी ???? हा अत्यंत नाजूक विषय आहे.  तर आहे हे असे आहे. विवाह आयुष्यभराचा असतो आणि म्हणूनच सामोपचाराने निर्णय घेणे आवश्यक आहे. 

विवाह म्हणजे त्या दोघातील गोड सुरेल बंध असला तरी विवाहाने दोन कुटुंब एकत्र येत असतात . दोन्ही कडील सर्व मंडळीना फक्त आणि फक्त तुम्ही आनंदाने नांदताना पाहायचे असते दुसरे काहीही नाही हे इतकच त्या दोघांनी लक्ष्यात ठेवावे .

प्रत्येकाच्या आयुष्यात त्याला किंवा तिला मनासारखा जोडीदार मिळावा आणि त्यांचे सहजीवन सुखी व्हावे ,बहारावे आणि आनंदाने फुलतच राहावे ह्याच सदिछ्या .

संकलन : सौ. अस्मिता दीक्षित 

संपर्क : 8104639230





 













  


No comments:

Post a Comment