|| श्री स्वामी समर्थ ||
सध्या गुरु महाराज बुद्धी,आकलन शक्तीचा कारक असणार्या बुधाच्या रेवती ह्या देवगणी नक्षत्रातून भ्रमण करत आहेत . 22 एप्रिल 23 पर्यंत त्यांचा मुक्काम इथेच असणार आहे . मीन राशीतील आणि नक्षत्र मालिकेतील हे शेवटचे नक्षत्र आहे. गुरु म्हणजे ज्ञान आणि बुध म्हणजे बुद्धी ह्या दोघांचा सुरेख संगम इथे होताना दिसतो . त्यात मीन राशी हि गुरु महाराजांची स्वतःची राशी आहे .
ज्या जातकांच्या पत्रिकेत गुरु किंवा बुधाची दशा , अंतर्दशा चालू असेल , चंद्र किंवा लग्न गुरु किंवा बुधाच्या नक्षत्रात असेल किंवा रेवती नक्षत्रात असणार्या एखाद्या ग्रहाची दशा चालू आहे त्या सर्वांवर ह्या गोचर भ्रमणाचा परिणाम होईल. गुरु म्हणजे पद प्रतिष्ठा मान सन्मान देणारा ग्रह असला तरी बिघडला तर संकटांची मालिका , जीवनात अनेक अडथळे प्रसंगी आजारपणे सुद्धा देणारा ग्रह आहे. गुरु सात्विक आहे आणि नैसर्गिक शुभ ग्रह आहे ,ग्रहमालिकेतील सर्वात बलाढ्य आकाराने मोठा ग्रह आहे . लग्नी गुरु येतो तेव्हा समाजातील आणि स्वतःचेही वजन वाढवतो म्हणजेच मेद वृद्धी करतो . गुरुप्रधान व्यक्ती आशावादी असतात , सामाजिक जीवन उत्तम असते , प्रेम , माया , करुणा , विश्वास ह्यांनी मन ओतप्रोत भरलेले असते. क्षमाशील असतात , परमेश्वरावर श्रद्धा असते त्यामुळे धर्मादाय ठिकाणी कार्यरत दिसतात .
मीन राशी जलतत्व आहे. जल राशी आणि मोक्ष ह्यांचा जवळचा संबंध आहे कारण जल म्हणजेच संवेदना , भावना आणि त्याशिवाय मोक्ष नाहीच नाही . मीन हि मोक्षाची राशी आहे जिथे पाऊले येतात .मनुष्य अहंकाराने कितीही उन्मत्त झाला तरी त्याला एक दिवस परमेश्वराचे अस्तित्व स्वीकारून त्याच्या पावलांवर नतमस्तक व्हावेच लागते तरच मोक्षाची द्वारे उघडतात अन्यथा पुन्हा त्याच कर्मबंधनात अडकून पुनरपि जननं , पुनरपि मरनं . असो. थोडक्यात अहंकाराचा त्याग केल्याशिवाय ईश्वर प्राप्ती होत नाही .
तसे बघता गुरु आणि बुध दोन वेगवेगळे प्रवाह आहेत . गुरु सौजन्य , परोपकार , धार्मिकता ह्याचे प्रतिक आहे. बुध म्हणजे पृथ्वीतत्व , मला काय मिळणार , मी माझे , साठवणूक , स्वतःचा फायदा , पैसा पैसा करणारे . प्रत्येक गोष्ट स्वतःच्या फायद्यासाठी आणि बौद्धिक कसोटीवर तोलून पाहणारे .
रेवती हे बुधाचे मृदू सात्विक देवगणी शुभ नक्षत्र आहे जे विष्णूला प्रिय आहे . बुध हा बोलघेवडा राजकुमार आहे. माणसाची आकलन शक्ती आणि बौद्धिक कुवत बुधावरून समजते . मोक्षप्रदान नक्षत्र आहे. मीन राशीत शुक्र सुद्धा उच्चीचा होतो.
एखादे गोचर भ्रमण फळे देते पण मूळ पत्रिकेतील ग्रहयोग त्याहीपेक्षा अधिक किबहुना तेच अधिक महत्वाचे असतात. मूळ पत्रिकेतील ग्रहयोगानुसार गोचर काम करणार हे नक्की.
प्रत्येक ग्रहाचे गोचर हे तुमच्या मूळ पत्रिकेतील ग्रहाच्या स्थितीवर अवलंबून असते , त्यामुळे प्रत्येकाला मिळणारे फळ त्याचे स्वरूप भिन्न असणार हे वेगळे सांगायला नको. जसे सिंह लग्नाला गुरु बुधाच्या रेवती नक्षत्रातून फळे देयील आणि बुध हा सिंह लग्नाला धनेश आणि लाभेश आहे त्यामुळे सिंह लग्नाच्या जातकांना आर्थिक लाभ करून देणारे हे गोचर असेल . सर्वाना हे गुरुचे रेवती मधील गोचर समृद्ध करणारे असुदे हीच सदिछ्या .
संकलन : सौ. अस्मिता दीक्षित
संपर्क : 8104639230
No comments:
Post a Comment