Monday, 20 February 2023

गुरुकृपा हाच खरा राजयोग

 || श्री स्वामी समर्थ ||



ज्योतिष शास्त्राच्या अभ्यासकांना “ राजयोग “ हा शब्द नवीन नाहीच . जनसामान्यांना सुद्धा राजयोग म्हणजे काय ते सांगायची गरज नाही. पत्रिकेत अनेक शुभ ग्रहांच्या युत्या असतात किंवा भाग्यस्थान धनस्थान पंचमस्थान ,लक्ष्मी विष्णू स्थानांचे स्वामी ह्यांचे असंख्य योग राजयोगाची निर्मिती करत असतात . उत्तम वस्तूचा लाभ , मनासारखा जोडीदार मिळणे , नोकरी व्यवसायात होणारी प्रगती आणि त्यातून होणार्या उत्पन्नाचा लाभ अश्या एक ना दोन असंख्य गोष्टी राजयोग प्रदान करतात . त्या ग्रहांच्या दशा अंतरदशेत हे ग्रह राजयोगासारखी फळे देताना दिसतात . 

राजयोग पत्रिकेत असताना मनुष्य आयुष्यातील काही काळ तरी राजासारखे सौख्य प्राप्त करताना आणि राजासारखेच जीवन व्यतीत करताना दिसतो .अनेकांचे भाग्य अगदी एका रात्रीत बदलते . 

राजयोग याचा अर्थ म्हणजे राजा बनणे असा नाही तर राजयोग म्हणजे यश आणि समृद्धीचे योग . राजयोग हा एक योगाचे नाव नाही तर योगांचे प्रकार आहेत. जितके जास्त राजयोग कुंडली मध्ये असतात तितकेच  व्यक्तीचे जीवन समृद्ध असते.  प्रत्येक माणसाला आपल्या कर्माचे फळ भोगावंच लागतं मग ते शुभ असो वा अशुभ म्हणूनच म्हंटले आहे कि  “पुर्व कर्मेशु भार्या, पुर्व कर्मेशु पुत्रा, पुर्व कर्मेशु धना ”.

म्हणजे मनुष्यास पुर्व जन्माच्या कर्मानुसार चांगली पत्नी, कन्या-पुत्र, धन, प्राप्त होते त्यामुळे कुंडलीतील भाग्य स्थान पहावे .पूर्व संचित, कर्माचे शुभ फळ जेव्हा अधिक होते तेव्हाच आपल्याला ‘राजयोग’ प्राप्त होतो आणि राजनितीत प्रवेश करणं हे या राजयोगामुळेच घडतं.

अनेकदा शुभ ग्रहांच्या दशा आयुष्याच्या उत्तरार्धात येतात त्यामुळे राजासारखे वैभव त्यांना आयुष्याच्या संध्याकाळी मिळते आणि उमेदीची वर्ष असंख्य प्रापंचिक आघाड्यांवर लढत व्यतीत करावी लागतात  .

प्रत्येकाचे प्राक्तन वेगळे आहे त्यामुळे दुसर्याच्या आयुष्याशी आपल्या आयुष्याची तुलना करणे फोल ठरते . ह्या सगळ्यावर उहापोह करताना एका गोष्टीचा विशेष उल्लेख करावासा वाटतो कि राजयोग आहे का? किंवा घडेल का? ह्याची वाट पाहण्यापेक्षा आपले नित्य कर्म मनापासून जीव ओतून केले तर आयुष्यातील प्रत्येक क्षण राज योगासारखा च व्यतीत होयील,नाही का? 

आपण सर्व प्रापंचिक माणसे आहोत आणि प्रापंचिक माणसाला कर्म चुकलेले नाही . उत्तम कर्म करत उपासनेच्या श्रेष्ठ मार्गाने पुढे जात राहणे हे आपल्या हाती नक्कीच आहे. उपासनेचे अनन्य साधारण महत्व आहे. जीवन कसेही असो नामस्मरणाची कास सोडू नये, जपाची माळ जपत राहावी मग कितीही संकटे आली तरी बेहत्तर . गोंदवलेकर महाराजांनी आपल्याला “ जिथे नाम आहे तिथे मी आहे “ हे वचन दिले आहे. “ मी गेलो ऐसे मानु नका भक्तीत अंतर ठेवू नका “ हे शेगाव निवासी समर्थ सद्गुरू गजानन महाराजांचे वचन विसरून कसे चालेल ? आणि म्हणूनच ह्या खडतर पण अंतिम सुखाचे क्षण पदरात घालणार्या नामाचा घोष जसा आपल्या प्रत्येक श्वासात रुंजी घालू लागतो तशी एक दिवस अचानक आपल्यावर गुरुकृपा कधी होते ते आपले आपल्यालाही समजत नाही . मग प्रापंचिक समस्यांची होळी होऊ लागते. संकटांचे निरसन झाले कि मन शांत होऊ लागते आणि आयुष्यात आनंद सौख्याला जणू बहर येतो . तेच निरास आयुष्य पुन्हा नव्याने जगावेसे वाटू लागते  आणि त्याच क्षणी जाणवते कि
 “ गुरुकृपा हाच खरा राजयोग “ . 

आपल्या अगणित चांगल्या कर्मानी जेव्हा आपला संचिताचा घडा ओसंडून वाहू लागतो तेव्हा गुरुकृपेचा अनुभव घेता येतो .

गुरुकृपा ज्याच्यावर झाली तो सुखीच जाहला. गुरुकृपा हीच मोठी देणगी आहे, गुरुकृपा हाच आशीर्वाद आहे, आपल्या गुरुंची आपल्यावर असणारी माया त्याचेच हे जणू प्रतिक आहे आणि गुरुकृपा हाच सर्वोत्तम राजयोग सुद्धा आहे.

गुरुकृपेसारखा अनमोल दागिना नाही . ती ज्यावर झाली त्याच्या आयुष्यात सुखाची अगणित दालने अपोआप उघडली जातात , मनातील सर्वेछ्या फलद्रूप होतात , भक्ताची झोळी सुखाने आणि अचंबित होणार्या गोष्टीनी भरून टाकताना त्या विध्यात्याला सुद्धा आनंदच होत असणार . गुरुकृपा हा चिरकाल टिकणारा परमानंद आहे आणि तो ज्याचा त्यानेच अनुभवायचा असतो . आयुष्यात सगळे मिळते पण मनुष्य समाधान मिळवण्यासाठी तडफडत असतो. गुरुकृपा नामक राजयोग झाला कि आत्मा समाधानाची कवचकुंडले घेवून पुढील प्रवासाला जातो आणि जीवनाचे साफल्य झालेले अनुभवतो. 

अनेक अनाकलनीय गोष्टींची साजिरी शृंखला सुरु करण्याचे प्रबळ सामर्थ्य फक्त सद्गुरूंच्यातच आहे. ते प्राप्त करण्यासाठी कुठेही न थांबता , निराश हताश न होता नामस्मरणाची कास धरून ठेवणे अत्यावश्यक आहे.  

तोच हा अत्युच्य आनंदाचा क्षण फक्त निष्काम सेवेमुळे प्रदान होतो. परमेश्वराचे अखंड चिंतन , भक्ती आणि भक्तीच , निर्गुण अश्या परमेश्वराला सतत सगुण रुपात अनुभवणे हीच खरी गुरुकृपा आणि हाच “ राजयोग “ सुद्धा आहे . हा राजयोग झाला कि कधीच न घडणाऱ्या असंख्य गोष्टी तितक्याच सहजतेने घडू लागतात . कधीही प्रत्यक्षात न घडणारे राजयोग प्रत्यक्षात आणण्याचे सामर्थ्य सुद्धा गुरुकृपेत आहे.  आयुष्यातील प्रत्येक क्षण समाधान देणारा असेल तर त्याहून वेगळा असा “ राजयोग “ असणार करी कुठला ?

माझ्या आयुष्यात प्रत्येक क्षणाला सुख आनंद आणि समाधानाची प्रचीती देणारे अगणित राजयोग घडवणाऱ्या समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराज आणि श्री स्वामी समर्थ ह्यांच्यासमोर मी नतमस्तक आहे. त्यांच्याच सेवेत त्यांनीच दिलेली हि लेखणी अखेरपर्यंत रुजू असुदे हीच त्यांच्या चरणी विनम्र विनंती आहे. 


संकलन : सौ. अस्मिता दीक्षित

संपर्क : 8104639230

  


No comments:

Post a Comment