Sunday, 29 January 2023

डोळे हे जुल्मी गडे

 || श्री स्वामी समर्थ ||


विश्वाचा चालक ,मालक ,पालक रवीचा जेव्हा उदय होतो तेव्हा चराचर सृष्टीत जणू एक नवचैतन्य निर्माण होते . उमेद , आत्मविश्वास आणि सकारात्मकता देणारा हा रवी सुर्य मालिकेचा राजा आहे. आज रवीचे कृतिका नक्षत्र आहे म्हणून ह्या राजाबद्दल चार शब्द .

रवी आला कि अंधकार दूर होतो आणि सृष्टी पुन्हा एकदा फुलू लागते . सूर्याच्या तेजस्वी प्रकाशांत आपल्याला जगण्याची उमेद निर्माण होते . मनुष्यच नाही तर झाडे पाने ,सर्व प्राणीमात्र त्याच्या आगमनाने नव्याने जगू लागतात .असा हा रवी सर्व गोष्टी प्रकाशात आणतो ,प्रकाशमान करतो. आपल्या शरीरातील प्रत्येक अवयवाला काही ना काही काम दिलेले आहे .जसे डोळ्यांना हि सृष्टी पाहण्याचे काम दिले आहे. डोळे हे अतिमहत्वाचे कारण दृष्टी नसेल तर सृष्टी दिसणार नाही . अत्यंत सुंदर पाणीदार डोळे हि देवाची देणगीच म्हंटली पाहिजे . अनेक कवीमनाच्या लोकांना डोळे स्पुर्ती देतात त्यांना त्यावर काव्य सुद्धा करण्याची प्रेरणा देतात . आपले डोळे इतके सुंदर असले पाहिजेत कि त्याच्याकडे पाहून इतरांना जगण्याची प्रेरणा मिळाली पाहिजे. आपल्या मानत असते तेच डोळ्यात दिसते. काही लोकांचे डोळे अत्यंत बोलके तर काहींचे निस्तेज असतात . राग लोभ मत्सर द्वेष ह्या गोष्टी डोळ्यातून प्रखरपणे दिसतात अर्थात त्या भावना वाचता येणे हे कौशल्य आहे. अनेकांचे डोळे तेजस्वी असतात तर अनेकांच्या डोळ्यात तेजच नसते . त्यांच्या संभ्रमित ,मलूल कोमेजलेल्या निष्प्राण आयुष्याचे ते जणू प्रतिक असते. 

रवी आपल्याला प्रकाशाकडे नेतो आणि सृष्टीचे दर्शन घडवतो . हि सृष्टी पाहण्याचे काम अर्थात डोळ्यांकडे आहे. रवी चांगला नसेल तर डोळे निष्प्राण दिसतात . रवी डोळ्यात तेज निर्माण करतो. अनेक जण समोरच्याच्या डोळ्यात डोळे घालून बघूही शकत नाहीत कारण कुठेतरी आत्मविश्वास कमी असतो .

रवी हा एखाद्या गोष्टीवर प्रकाश टाकतो म्हणून त्याच्या पुढे पत्रिकेत ग्रह हवेत . टोर्च लावली तर पुढील गोष्टी दिसणार मागच्या नाही . रवी ज्या भावात असेल त्या भावाने दर्शवलेल्या गोष्टी प्रकाशात आणेल. रवी आणि चंद्राचा कधीही अस्त होत नाही पण त्यांच्या युतीतील ग्रहांचा मात्र अस्त होतो .अश्यावेळी ते ग्रह फळ देण्यास सक्षम नसतात . 

रवी हा राजा तर चंद्र हि त्याची राणी ,बुध हा राजकुमार आहे. आता लहान मूल हे नेहमीच बाबांजवळ असते म्हणून पत्रिकेत आपल्याला रवी जिथे असतो त्याच भावात किंवा पुढील मागील भावात बुध दिसतो. बुधाला अस्तंगताचा दोष लागत नाही .

रवी आपल्याला आयुष्य खर्या अर्थाने जगायला शिकवतो . रात्र आणि दिवस जसे एकेमागून एक येतात अगदी तसेच आयुष्यातील सुख दुक्ख सुद्धा. रवीचा उदय ,मध्यान्ह आणि रवीचा अस्त ह्या घटना आपल्याला अंतर्मुख करतात .आपणही आयुष्यात कधीतरी उंची गाठून पुन्हा होते तिथेच येणार हाच संदेश तर द्यायचा नसेल ना त्याला समस्त मानव जातीला. म्हणूनच जो उंचीवर जायील तो खाली येणार हेही लक्ष्यात ठेवले पाहिजे. उंची गाठली कि अहंकार येतोच येतो आणि तिथेच आपली परीक्षा असते. 


रवी म्हणजे राजा आणि राजाला राज्याचा कारभार पाहावा लागतो. म्हणजेच व्यवस्थापन क्षेत्र आले. व्यवस्थापन म्हणजे MBA. म्हणूनच ज्यांचा रवी पत्रिकेत चांगला असेल आणि शिक्षणाच्या दशा चांगल्या असतील तर व्यक्ती नक्कीच MBA होऊ शकते. राजा म्हणजे अधिकार , सत्ता , मानसन्मान , मानमरातब . म्हणूनच रविचे बळ असणार्या व्यक्तीना उच्च पदस्थ अधिकारी , लाल दिव्याची गाडी ,अधिकार , सरकारी नोकरी ,मान ह्या सर्व गोष्टीचा उपभोग घ्यायला मिळतो .

परवा मी माझ्या डोळ्यांच्या डॉक्टर कडे गेले होते तेव्हा ते सहज म्हणाले माझीहि पत्रिका बघा कधीतरी .मी म्हंटले पत्रिका बघू पण त्याहीआधी ती न बघता ही अनेक गोष्टी समजू शकतात जसे आता डोळ्यांचा डॉक्टर म्हणजे रवी उत्तम सुस्थितीत असणार . डॉक्टर होण्यासाठी लागणाऱ्या दशा असणार . डॉक्टर म्हणजे सेवाभाव जनतेशी संपर्क म्हणजे चंद्र चांगला पाहिजे. आपल्या पेशंट शी बोलणे उत्तम हवे ते पेशंट पुन्हा आपल्याकडे आले पाहिजेत म्हणून बोलण्यात माधुर्य , विश्वास देण्याचे कौशल्य म्हणून संवादाचा कारक बुध चांगला पाहिजे . आता एक डॉक्टर म्हणून समाजात लोकांनी मान देणे आणि प्रसिद्धी म्हणून गुरु चांगला हवा. एखादा प्रश्न किंवा विषय आला तर त्या अनुषंगाने आपले विचार धावले पाहिजेत हेच सांगण्यासाठी हे उदा. दिले. 

रवी म्हंटला कि मान आला ,अधिकार आला पण त्यातून निर्माण होतो तो अहंकार आणि तो मात्र प्रमाणात असला पाहिजे . अहंकार हाताबाहेर गेला तर आयुष्याची माती होते आणि म्हणूनच रवीचा उदय अस्त हि घटना विसरून चालणार नाही. जो उदय पावतो त्याचा अस्त होतो तो लयास जातो हि रवीची शिकवण आहे. अहंकाराने आयुष्याची माती करायची का आपल्या अधिकाराचा , शिक्षणाचा उपयोग इतरांसाठी करून त्यांना प्रेरणा द्यायची हे ज्याचे त्याने ठरवायचे आहे. 

रवी ची रास सिंह आणि सिंह हा वनराज आहे जो आपले वर्चस्व अबाधित ठेवतो. रविला कुणी दुसर्याने त्याच्यावर सत्ता गाजवलेली कशी आवडेल ?

रवीचा उदय झाला कि चराचर सृष्टीला पुनश्च जगण्याचे बळ प्राप्त होते . रवी चे बळ वाढवण्यासाठी उगवत्या सूर्याला प्रणाम करून अर्घ्य देणे , सूर्यनमस्कार घालणे ,गायत्री मंत्राचे पठण करणे हितावह ठरेल. रविला आत्माकारक म्हंटले आहे .रवी सुस्थितीत नसेल तर आत्मविश्वासात कमतरता येणार .  रवी बिघडला तर अंधत्व , जनमानसातील प्रतिमा , अधिकार , मान मरातब ह्यापासून व्यक्ती परे राहते . रवी बिघडला तर हृदयाचे विकार ,डोळ्यांचे विकार होतात. रवी हा आरोग्याचा कारक आहे त्यामुळे रवी बिघडला तर तब्येतीच्या कुरबुरी चालू असतात . रवी हा पिता आहे स्त्रियांच्या पत्रिकेत रवी हा पतीकारक पण मानला आहे. लिहिण्यासारखे खूप आहे तूर्तास इथेच पूर्णविराम देत आहे.

संकलन : सौ. अस्मिता दीक्षित 

संपर्क : 8104639230 

















 






No comments:

Post a Comment