Friday, 10 February 2023

तुज मागतो मी आता ....

 || श्री स्वामी समर्थ ||


संत शिरोमणी शेगाव निवासी समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराजांचा प्रगट दिन सोहळा शेगावातच नाही तर चराचर सृष्टी साजरा करत आहे. भक्तांना काय करू आणि काय नको असे झाले आहे. महाराजांचे स्वागत दणक्यात करायच्या योजना आखल्या जात आहेत . भक्त सेवेत रुजू आहेत . प्रत्येक भक्ताच्या हृदयात विराजमान असणार्या ह्या आपल्या लाडक्या गुरूंची हजेरी प्रत्येकाच्या घरी क्षणभर तरी लागणार हे निर्विवाद सत्य आहे. 

चराचर सृष्टीवर आणि भक्तांच्या तनामनावर राज्य करणारे, चंद्र सूर्य आणि अखिल ब्रम्हांड , सृष्टीतील सजीव निर्जीव , पंचतत्वे सर्वात त्यांचेच अस्तित्व आहे. आपण वाहिलेल्या प्रत्येक फुलात ते आहेत , डोळ्यातून येणार्या प्रत्येक अश्रूत , जपाच्या माळेतील प्रत्येक मण्यात , घरी आणि दारी , विचारात , श्वासात , मनात सर्वत्र त्यांचा वास आहे आणि त्याची प्रचीती ते पदोपदी भक्ताना देत आहेत . उगीच नाही समाधी घेतल्यावर लाखोंच्या संखेने भक्तांनी शेगावात हजेरी लावली कारण महाराजांनी समाधी घेतल्याचे भक्तांना स्वप्नात जाऊन सांगितले. संत दासगणू महाराजांच्या हातून श्री गजानन विजय ग्रंथाची अनमोल निर्मिती उगीच नाही झाली . त्यात महाराज स्वतः आहेतच कि आणि हा भाव मनात धरून तो ग्रंथ वाचला त्याची पारायणे केली तर प्रचीती मिळणार नाही असे होणे नाही. महाराज तुम्ही आहात म्हणून हे जीवन सुसह्य आहे हे सत्य आहे . तुमच्याच मुळे आम्हाला जीवन समजले आहे . आमची उमेद , ताकद सर्व काही तुम्हीच आहात महाराज. 

 

ज्याची अपार श्रद्धा आहे तोच माझा आहे इतरांची ना गरज मला आणि म्हणूनच जो माझा आहे त्याच्या घरी ते जाणारच ..त्यांना बस ट्रेन कसल्याही तिकीटाची गरज नाही. लेकी सुना नेवेद्याची तयारी करू लागल्या आहेत , आसमंत त्यांच्या नामघोषाने दुमदुमू लागला आहे. 21 रुपी मोदकांचा पारायण रुपी अभिषेक भक्त घरोघरी करत आहेत ... साधुसंत येती घरा तोची दिवाळी दसरा ह्याप्रमाणे आबाल वृद्ध समस्त भक्तगण सेवेत काहीही कमी पडू नये ह्याची जातीने काळजी घेत स्वागतासाठी सज्ज आहेत .महाराजांना आवडणारे पदार्थ ,त्यांच्या स्नानाची तयारी , त्यांची वस्त्रे , पंचारती , नेवैद्य झुणका भाकर कानवले , विडा सर्व काही तयार आहे .

शेगाव संस्थान तर लक्ष लक्ष दिव्यांनी उजळून निघाले आहे. जगभरातून लाखोंच्या संखेने भक्त शेगाव मध्ये दाखल होत आहेत आणि डोळ्यात प्राण आणून दर्शनासाठी आसुसलेले आहेत . पशुपक्षी , झाडे झुडपे अगदी वारा सुद्धा त्यांच्या येण्याकडे डोळे लावून आहे. प्रत्येक जण महाराजांचे विलोभनीय रूप डोळ्यात साठवून ठेवण्याच्या प्रयत्नात आहे. भक्ती भक्ती आणि भक्ती दुसरे काहीही नाही. महाराजांचा प्रगट दिन शब्दबद्ध करण्याची ताकद माझ्या पामराच्या लेखणीत नाही . त्या शक्तीसमोर नतमस्तक . महाराज आपल्या प्रत्येक श्वासात आहेत , सर्वत्र आहेत , माझ्या लेखणीत , प्रत्येक शब्दात सर्वत्र आहेत .हे लिखाण सुद्धा त्यांचे मी निम्मित्त आहे आणि ते मी क्षणभर सुद्धा विसरत नाही विसरणार हि नाही.

अद्भुत असा हा महाराजांचा प्रगट दिन सोहळा ज्याचे करावे तितके वर्णन कमीच आहे. भक्त आणि महाराज हे एक अद्भुत समीकरण आहे जे कधी कुणाला कळणार नाही. महाराजांचे चित्त कवराच्या भाकरीवर गुंतले ते उगीच नाही. त्यामागे ओथंबून असलेला भाव महत्वाचा म्हणूनच भाऊ कवर , जणू गवर्या , बंकटलाल , भास्कर पाटील , खंडू पाटील हे निस्सीम भक्त झाले. त्यांनी ना कधी महाराजांच्या शिवाय कसला विचार केला ना कधी इतर ठिकाणी आपले लक्ष केंद्रित केले . सर्व चित्त फक्त त्यांच्या चरणाशी आणि आपला उभा संसार त्यांच्या चरणाशी अर्पण केला. 

आज कलियुगातील प्रापंचिक संकटांनी बेजार होणारा भक्त शेवटी महाराजांनाच साकडे घालणार तेही हक्काने. महाराज आपले सर्वस्व आहेत . मी तर प्रत्येक क्षण त्यांच्या सहवासात राहते आणि तेच योग्य वाटते. त्यांच्याच कानात सर्व सांगते ...भाजी स्वस्त असुदे नाहीतर महाग सर्व काही त्यांनाच सांगायचे . ते आपले हक्काचे आहेत आणि म्हणूनच त्या हक्काने आज काय बरे मागावे त्यांच्याकडे असे मनात येते. तसे त्यांना सर्व माहीतच आहे पण लेकी त्यांच्याचकडे हट्ट करणार ना. शेगाव आपले माहेर आहे आणि माहेराहून पाठवणी करताना काहीतरी देणारच कि वडील आपल्याला. 


म्हणूनच मागावेसे वाटते आमरण वारी घडो आणि क्षणभर सुद्धा तुमचा विसर न पडो , मला भाकरी करता येत नाही ती चांगली करता येवूदे. महाराज मला अवती भवती तुमचे अस्तित्व जाणवते ते तसेच जाणवत राहूदे , शेवटच्या क्षणी निदान एकदातरी तुम्ही मला अस्मिता अशी हाक मारावी हि अंतर्मनापासूनची इच्छा . माझ्याकडून आपल्या बद्दल सतत लिखाण व्हावे त्यातून चार लोकांना प्रेरणा मिळून भक्तगण तयार व्हावेत . महाराजांनी मला भरभरून दिले आहे तसे सर्वाना मिळावे त्याहीपेक्षा अधिक मिळावे. 


नित्य मानसपूजा , पारायण , दर्शन होत राहावे.  महाराज हा जगण्याचा मोठा स्त्रोत आहे, तुमच्या प्रेमाचा वर्षाव सदैव होत राहावा आणि आमचे सर्वांचे आयुष्य मार्गस्त व्हावे. खूप मागायचे आहे खूप लिहायचे आहे पण शब्द नाहीत अशी मनाची अवस्था आहे. तनु घरात आणि मन शेगावात आहे. डोळे मिटले तरी महाराज आणि उघडले तरी महाराज . शेगावातील सकाळचा घंटानाद , काकड आरती , अभिषेक , वस्त्रालंकार , फुलांची आरास, पंचारती , आरती , एकाच वेळी सगळ्या देवळातून होणारा घंटानाद , गजराज आणि आपल्या लाडक्या अश्वाची आरतीच्या वेळी असलेली हजेरी आणि त्यांनी महाराजाना दिलेली सलामी ,प्रदक्षिणा , महाप्रसाद , प्रत्येकाच्या डोळ्यातील महाराजांबद्दल असणारे प्रेम माया , कृतज्ञता ,सेवेकरांची लगबग , दासगणू महाराजांच्या भक्तीरसाने ओथंबलेला श्री गजानन विजय ग्रंथ , मंदिराच्या आवारातील भक्तांमधून फेरफटका करताना सर्वांवर मायेची पाखरण करणारे आणि “ मी गेलो ऐसे मानू नका भक्तीत अंतर ठेवू नका म्हणणारे माझे लाडके महाराज ..आहाहाहा डोळे भरून पाहूदे हे सर्व मला. शेगाव अगदी जसेच्या तसे डोळ्यासमोर उभे राहिले आहे कदाचित दिसते आहे त्याहीपेक्षा कित्येक पटीने आधी सुंदर , लक्षणीय . आज माझ्या जन्माचे सार्थक झाले. गेले चार महिने शेगाव ला जायचे होते पण इथल्या कामामुळे जाता आले नाही म्हणून ह्या लेखन रुपी सेवेतून आता शेगाव डोळे भरून पाहताना आनंदाचे भरते आले आहे नुसते.

आपण कुठेही असू आपल्या चित्तवृत्ती महाराजांच्या चरणाशीच असल्या पाहिजेत . महाराजांनी आपल्याला खूप काही दिले आहे तरीही निरंतर सेवेची संधी मिळत राहावी हेच मागावेसे वाटते . महाराज म्हणजेच जीवन आहे ,त्यांच्याविना सर्व फोल आहे. त्यांच्या करड्या नजरेचा धाक आमच्या प्रेत्यक कृतीवर शब्दावर हवा आणि त्यांचा तितकाच प्रेमळ हस्त डोक्यावर . महाराज हि व्यक्ती नसून ते गुरुतत्व आहे ,भले त्याची नावे कित्येक असतील पण ह्या गुरुतत्वाला सलाम आहे. 

तुमचा नित्य सहवास लाभावा, आपल्या स्मरणात उभा जन्म जावा , तुमची सेवा करता करता जन्म मृत्युच्या फेर्यातून आपणच सुटका करावी आणि आपला मृत्युपश्चात सुद्धा वियोग होऊ नये हेच आज मागणे मागावेसे वाटते . आपण सर्व भक्तांचे लाड पुरवता आणि प्रचीतीही देता . आमच्या जीवनाचा सुकाणू तुमच्याच हाती आहे. श्री गजानन विजाय ग्रंथातून आपण आमच्या समीप हृदयात विराजमान आहात . आपल्या दर्शनाचे एका कटाक्षाचे अभिलाषी आहोत .आपल्या नुसत्या विचारांनी डोळ्यातून अश्रू धारा येऊ लागल्या आहेत . आम्हाला जे झेपेल पेलवेल तेच धनुष्य उचलण्याची बुद्धी द्यावी आणि आमची हि इहलोकीची जीवनयात्रा सुफळ संपन्न व्हावी .

गजानना गजानना शेगावीच्या गजानना |

गजानन गजानना सांभाळ आपल्या भक्तजना || 


संकलन : सौ. अस्मिता दीक्षित

संपर्क : 8104639230

 



 


No comments:

Post a Comment