Monday, 24 April 2023

कर्मानुसार फलित देणारे ग्रह

 || श्री स्वामी समर्थ ||


हा विषय खूप गहन आहे आणि त्याला अनेक कंगोरे आहेत . मी स्वतः सुद्धा अभ्यासक , वाचक आहे त्यामुळे कुठेतरी काहीतरी लेखनाच्या तृटी राहतील किंवा सर्व मते पटतील असे नाही तसा अट्टाहास तर अजिबात नाही . उलट जाणकारांनी ह्यात आपल्या ज्ञानाचे योगदान निश्चित द्यावे हि विनंती.

जर ग्रह सगळी फळे देणार हे ठरलेलेच आहे तर मग आपल्या कर्माचे योगदान काय ?  मग केलेले कर्म निष्फळ जाणार का ? कश्याला कर्म करायचे हे प्रश्न आपल्या भाबड्या मनात आल्याशिवाय रहात नाहीत . कुठलाही ग्रह आपल्याला जीवन कसे जगायचे ते सांगणार नाही ते फक्त आपल्या कर्माचे प्रतिबिंब आहेत .पण कर्म आपल्या जीवनाचा सुकाणू धरून आहेत हे नक्की . 

कर्म केले कि त्याचे फळ आपल्याला भोगायलाच लागते मग ते चांगले असो अथवा वाईट आणि म्हणूनच कर्म करताना डोळस पणे , विचारपूर्वक केले पाहिजे. आपले आयुष्य हे कर्मावर किबहुना कर्म प्रधान आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही .

आपली पत्रिका जर आपण व्यवस्थित अभ्यासली तर अमुक एक ग्रह इथेच का आणि तमुक एक ग्रह तिथेच का , हे हे योग आहेत आणि ते ते योग नाहीत असे आपल्याला दिसून येते . मग ह्या ग्रहांना त्या त्या भावात स्थित केले कुणी ? तर आपल्या मागील जन्मातील कर्मांनी . जर मागील जन्मातील कर्मे चांगले असतील तर शुभ ग्रह , अनेक राजयोग , नवपंचम योग , उच्चीचे ग्रह आपल्याला पत्रिकेत पाहायला मिळतील आणि हीच कर्मे “ कुकर्मे “ असतील तर उलट चित्र पाहायला मिळते. याचाच अर्थ असा घ्यावा लागेल कि आपल्या पूर्व कर्मानुसार ग्रह पत्रिकेत असतात आणि आपल्या कर्मांची फळे देण्यास ते सक्षम असतात , हि फळे त्या ग्रहाच्या दशा आल्या कि प्रकर्षाने मिळतात .

आपल्या मनातील विचार “ कर्माला “ जन्माला घालत असतात . आपल्या शब्दातून , कृतीतून , चेहऱ्यावरील प्रगट होणार्या हावभावातून सुद्धा अनेक कर्म प्रगट होत असतात . कर्म शुद्ध असतील तर मग मोक्ष प्राप्तीसाठी वेगळे काही करायची गरजच उरत नाही . थोडक्यात आपली कर्म आयुष्याची दिशा ठरवतात पण ग्रहांच्या माध्यमातून असे म्हणायला हरकत नाही . साडेसाती शेवटी काय आहे ? आपल्या कर्माचा लेखाजोखा . चांगल्या कर्माची उत्तम फळे जसे विवाह , उच्च शिक्षण , परदेशगमन ई. आणि वाईट कर्माची फळे तुरुंगवास , असाध्य आजार ई. मग आपण ह्यात शनीला दोष नाही देऊ शकत कारण शनी महाराजांकडे दंड देण्याचे  खाते असल्यामुळे ते निरपेक्षपणे आपले काम करत असतात इतकच . आपल्या कर्माप्रमाणेच तेही वागणार . मग आपले छान झाले कि शनी चांगला नाहीतर तो व्हिलन असे सर्व आहे. पण ह्याच्या मुळापर्यंत गेलो तर समजेल कि आपलीच कर्मे साडेसातीत एक एक करून अनेक समस्या आजार संकटे ह्या रुपात आपल्या समोर उभी आहेत आणि आता ती आपला हिशोब करत आहेत .

ग्रह म्हणजे हा आत्मा आपल्यासोबत पूर्व जन्मातून कायकाय घेवू आला आहे त्याचे निदर्शन करणारे माध्यम आहे. मूळ आहे ते अर्थातच आपले गतजन्मीचे कर्म . काही कर्म आपल्याला भोगूनच संपवावी लागतात त्यात आपले गुरुहि काहीच करू शकत नाहीत . ते भोग आहेत आणि भोगूनच संपवायला लागतात . नियती त्यात बदल करत नाही.  दुसर्या प्रकारात आपले कष्ट , प्रयत्न असाध्य गोष्टीही साध्य करून दाखवतात तसेच आपली उपासना आणि गुरूंच्या वरील दृढ विश्वास आपल्याला ह्या कर्म बंधनातून थोडी मुक्ती मिळवून देतो पण तरीही ती अल्प प्रमाणात का होयीना भोगायलाच लागतात . त्याउपर  अशीही काही कर्म असतात जी सद्गुरूंच्या आपल्या आयुष्यातील वास्तव्याने त्यांच्या असण्याने, त्यांच्यावरील असीम श्रद्धेने जणू लोप पावतात किंवा त्याचा दाह जाणवत सुद्धा नाही , पण त्यासाठी पराकोटीची श्रद्धा उपासना असेल तरच अन्यथा नाही , मग तीही भोगायलाच लागतात .

आपली कुंडली हे मागील जन्माचे पूर्वसंचीत दर्शवते आणि ते ह्या जन्मात भोगायचे आहे ज्याला आपण “ प्रारब्ध “ म्हणतो . हे पूर्वसंचीत फक्त मागील काहीच जन्माचे असेल असे नाही तर मागील कित्येक जन्माचे “ संचित कर्म “ असते. त्यातील काही भाग ह्या जन्मात आपल्याला भोगायचा असतो. ह्या सर्वाचा सखोल अभ्यास केला तर असे लक्ष्यात येयील कि आपण इतके ज्ञान प्राप्त करतो तर निदान उरलेल्या ह्या जन्मातील कर्मे तरी शुद्ध सात्विक असावीत कारण तीच पुढील जन्मात संचित म्हणून आपल्या समोर येणार आहेत आणि पुढील जन्माचे प्रारब्ध म्हणून ती आपल्याला भोगायला लागणार आहेत  . हा फेरा असाच चालू राहणार कि कधीतरी खंडित होणार हे शेवटी आपल्याच हाती नाही का.

जन्मपत्रिका आपल्याला मागील जन्मातील किती कर्म ह्या जन्मात भोगायची आहे त्याचे ज्ञान देते त्यालाच आपण “ प्रारब्ध “ म्हणतो.  हे कितीही असले तर नवग्रहांच्या वरती  संतांची आगाध सत्ता आहे आणि संत हे ईश्वराचेच रूप आहेत . आपल्या सद्गुरूंचे नाम आणि महादेवाचा जप आपले प्रारब्ध भोग भोगण्यास निश्चित मदत करतो . भोग कमी होणार नाहीत त्याची तीव्रता कमी होईल किबहुना आपली भोग भोगण्यासाठी लागणारी सहन शक्ती वाढेल.

अशक्य हि शक्य करतील स्वामी हे महाराजांचे वचन आहेच आणि ते आपल्याला अनुभवायला सुद्धा मिळते . 

“नाम आहे तिथे मी आहे “  हे ब्रम्हचैतन्य गोंदवलेकर महाराजांचे सुद्धा अभिवचन आहे आणि ह्यातच नामाचे महत्व दडलेले आहे .

कर्म , संचित आणि प्रारब्ध ह्यातील मागील अनेक जन्माचे साठलेले कर्म म्हणजे संचित ज्यात आता बदल होणे नाही कारण प्रारब्धाच्या  रुपात ते आपल्याला आता भोगायचे आहे पण आत्ताच्या ह्या क्षणाला आपल्या हातात काय आहे जे आपण सहज करू शकतो तर ते “ कर्म “ आणि ते उत्तमच असले पाहिजे . आपल्याला समजते सर्व पण वळत नाही हीच मोठी मेख  आहे. सकाळची पूजा दिवसभरातील कर्मातून अजिबात झळकत नाही कारण तिथे सर्व षडरिपू आड येतात म्हणूनच मनावर सातत्त्याने नामाचा वर्षाव होत राहाणे आवश्यक आहे. 

आपले भाग्य बदलण्यासाठी देवाने “ कर्म “ नावाचे एक शस्त्र दिले आहे . जिथे शेवट असतो तिथेच नवीन काहीतरी सुरु होत असते म्हणूनच ह्या अक्षय तृतीयेपासून अखंड नामस्मरण सुरु करुया जेणेकरून आपल्या संचितात चांगल्या कर्माची भर पडेल .दृढ निश्चय असेल तर काय जमणार नाही , सर्व शक्य आहे. पण नुसते देवदेव करून उपयोग नाही त्याला शुद्ध सात्विक कर्माची जोड हि हवीच . कारण मृत्यूपश्चात सुद्धा आपल्या कर्माचा जाब आपल्याला कुणालातरी द्यायचाच आहे आणि तो दिल्याशिवाय आपली सुटका नाही .

संकलन : सौ. अस्मिता दीक्षित 

संपर्क : 8104639230

  





Friday, 21 April 2023

अक्षय कृपा

 || श्री स्वामी समर्थ ||


अक्षय तृतीयेला गुरु महाराज मीन हि आपली स्वराशी सोडून मेष ह्या आपल्या मित्र ग्रहाच्या राशीत प्रवेश करणार आहेत . मीन हि राशीचक्रातील शेवटची राशी तर मेष आरंभाची राशी आहे . मीन हि जलतत्व तर मेष अग्नीचा निखारा . गुरु हा ग्रहमालिकेतील आकाराने सर्वात मोठा आणि नैसर्गिक शुभ ग्रह आहे . गुरु शनी सारखे मोठे ग्रह जेव्हा राशी परिवर्तन करतात तेव्हा आयुष्यात सुद्धा अनेक बदल होताना दिसतात . अधिकतम हे गोचर त्यांना  प्रभावित करते ज्यांना गुरूची दशा अंतर्दशा चालू आहे. 


दर चार वर्षांनी गुरु गंडातातून प्रवास करतो . गेले काही महिने कुठेतरी मनासारखे न घडणाऱ्या घटनांमुळे त्रास , वैफल्य जाणवत आहे पण आता हळूहळू मार्ग दिसेल कारण गुरु जलतत्त्वातून अग्नीतत्वात प्रवेश करणार आहे . पुढील 1-2 महिन्याचा काळ महत्वाचा कारण ह्या काळात चुकीचे निर्णय , चुकीची गुंतवणूक होऊ शकते ह्या पुढे त्रासदायक ठरतील. 


मेष राशीतील प्रथम नक्षत्र अश्विनी. हे देवगणी नक्षत्र आहे आणि अश्विनीकुमार हि देवता . ह्याचा संबंध मेडिकल क्षेत्र आणि उपचार ह्यांच्याशी असल्यामुळे ह्या क्षेत्रात नवनवीन शोध लागणे , नवीन संशोधन , त्याला यश मिळेल. गेल्या काही दिवसात अनेक वाटणारी अस्वस्थता , मनाने हरवलेली उमेद ,अशांतता , संभ्रम दूर होऊन आकाश निरभ्र होणार आहे. प्रत्येक गोष्टीत दिशा मिळू लागेल . थोडक्यात मनाची हरवलेली उमेद गुरुमहाराजांच्या कृपेने पुन्हा गवसणार आहे.  

गुरु ह्या शुभ ग्रहाने मेषेत प्रवेश केला असला तरी तिथे असलेल्या राहुकडे आपल्याला दुर्लक्ष्य करून चालणार नाही. राहू आणि गुरु दोघेही केतुच्याच नक्षत्रातून जाताना गुरु चांडाळ दोष ज्याला ब्रम्ह चांडाळ दोष सुद्धा म्हंटले जाते त्याची निर्मिती करणार आहे. मेष राशीत राहू हर्शल आहेतच त्यांच्या सोबत आता गुरु येणार आहे. पत्रिकेत जिथे मेष राशी आहे त्या भावाने दर्शवलेल्या गोष्टीत खूप आव्हाने आपल्या समोर आधीच आहेत पण आता तिथे गुरु आल्यामुळे थोडासा दिलासा मिळणार आहे. प्रत्येक वेळी गुरु राहू युती संपूर्ण वाईटच फळे देयील असे गृहीत धरू नये . राहू हा छल कपट करणारा मायावी आहे तर गुरु सात्विक तेचे प्रतिक. गुरूला त्याच्या मार्गातून परास्त करणे हेच राहूचे काम आहे. शनी आणि राहूच्या तावडीतून सुटून गुरूला आपल्या सचोटीच्या मार्गावर चालताना त्रास होणारच आहे .पण  कुठल्यातरी प्रलोभनात फसवणे हे राहूचे काम तर  गुरु हा ज्ञानाचा आणि आशेचा किरण दाखवणारा नैसर्गिक शुभ ग्रह आहे. त्यामुळे झालेला गुंता सोडवण्यात तो नक्कीच अग्रेसर असणार आहे. साधना , नामस्मरण आणि उपासना , अध्यात्मिक ग्रंथांचे वाचन ह्या काळात जितकी अधिक तितका फायदा अधिक . सप्टेंबर मध्ये राहू मीनेत गेल्यावर गुरु त्याची शुभ फळे देण्यासाठी संपूर्णपणे सक्षम होयील. 


गुरु ची उत्तम फळे मिळण्यासाठी नामस्मरण , साधना थोडक्यात गुरुतत्वात आपण कसे समरसून जाऊ  त्यासाठी प्रयत्नशील राहणे. ज्योतिष हे तारतम्याने वापरले तर ते सहज समजू लागते. वृषभ लग्नाला गुरु व्ययात येणार आहे . नैसर्गिक कुंडलीमध्ये व्ययात मीन राशी येते जिथे आपल्या शरीराची पाऊले येतात . वृषभ राशीच्या लोकांनी ह्या वर्षभरात गुरु पादुकांचे पूजन , मानसपूजा , पादुकांवर अभिषेक आणि दानधर्म केल्यास त्यांना नक्कीच त्याचा लाभ होयील . 

गुरु कधीच कुणाचेही वाईट करत नाहीत , बघा ना आपले आईवडील हे आपले प्रथम गुरु आहेत .फक्त आपल्याला गुरु आणि गुरुतत्व समजले पाहिजेत आणि त्यांचा योग्य मान राखता आला पाहिजे. अहो ते देणारच ते द्यायलाच बसले आहेत आपल्याला घेता येत नाही किबहुना आपण त्यास पात्र ठरत नाही हा आपला दोष आहे. मग काही मनासारखे झाले नाही कि सगळ्यांच्या नावाने बोंबलायला आपण मोकळे . असो .


आयुष्यात वेळोवेळी कसोटीचे क्षण येतात आणि ते येतच राहणार पण ज्यांचा आपल्या गुरूंवर संपूर्ण विश्वास आहे त्यांना कश्याचीच भीती संदेह वाटायला नको. शंका कुशंका घेवून सेवेत राहूच नये. ह्या गुरु राशी परिवर्तनाचा विचार करताना मला काय मिळणार ह्यापेक्षा मी माझ्या गुरूना काय देणार ह्यावर लक्ष्य केंद्रित करुया .

अक्षय तृतीया , अक्षय म्हणजे अखंड . ह्या शुभ दिनी घडणारी प्रत्येक गोष्ट , दान अखंड राहते ,नाश पावत नाही असे म्हंटले जाते . अक्षय तृतीयेला होणारा गुरु बदल पारमार्थिक उन्नती करणारा आणि  आपल्या सर्वांच्या आयुष्यात सुख समृद्धी उत्तम आरोग्याची अखंड बरसात करणारा असुदे हीच सदिछ्या .

संकलन : सौ. अस्मिता दीक्षित 

संपर्क : 8104639230


Tuesday, 18 April 2023

पुण्यस्मरण

 || श्री स्वामी समर्थ ||




आज स्वामींचे स्मरण करताना मनात विचार आला कि प्रत्येक भक्ताचे महाराजांकडे काहीतरी मागणे असतेच आणि महाराज सुद्धा आपले आजन्म लाड पुरवत आहेत . आपणही त्यांना आवडेल असे वागण्याचा प्रयत्न नको का करायला , तर नक्कीच करायला हवा. थोडा विचार केला तर लक्ष्यात येयील कि त्यांना काय आवडत नाही ? तर त्याचे एकच उत्तर आहे

 “ आळस “. महाराजांना आळशी माणसे अजिबात आवडत नाहीत . आळशी माणसाचे तोंड सुद्धा पाहू नये असे ते म्हणत असत . परमेश्वराने दोन हात कष्ट करायलाच दिले आहेत .  24 तास जप करा असे कुठल्याच गुरुनी सांगितलेले नाही. तर त्यांनी दाखवलेल्या मार्गावरून चला मग मार्गात कितीही अडथळे संकटे येवुदेत . त्यांनी सांगितलेल्या गोष्टींचे पालन करा . नीतीने , सचोटीने , सन्मार्गाने जीवन व्यतीत करा आणि ते करत असताना त्यांचे विस्मरण होऊ देऊ नका हीच तर त्यांची शिकवण आहे .


“ शेत पिकवून खा “ आणि मिळेल त्यात संतुष्ट रहा असे स्वामिनी भक्तांना सांगितले आहे. स्वाहाः  मी ह्याचा अर्थ जिथे आपण मी पणाची आहुती देतो तिथेच स्वामी प्रगट होतात . जिथे मीपणा अहंकार आहे तिथे स्वामीच काय त्यांची सावली सुद्धा फिरकायची नाही . स्वामी स्वामी करणार्यांनी आधी आपल्यातील “ मी “ ला तिलांजली द्यावी , मिळेल ते काम करावे आणि स्वाभिमानाने जीवन व्यतीत करावे . असा भक्त महाराजांच्या अधिक समीप असेल. २४ तास जप करून आपण लाडके होऊ हा संभ्रम दूर करा आणि कामाला लागा .

ज्यांना काम करायचे आहे त्यांना काम मिळेल , स्वामी तुम्हाला पोस्टाने चेक नाही पाठवणार पण पैसे मिळवण्यासाठी काम मात्र आणून देतील . आता ते आपण केलेच नाही आळस केला तर स्वामिना ते कदापि आवडणार नाही . जे मिळेल ते काम करा , कुणावरही आपला भार नको , स्वकष्टार्जित धन आपल्यातील आत्मविश्वास वाढवेल आणि ताठ मानाने जगायला शिकवेल. जी व्यक्ती काहीच काम करत नाही त्याची घरात आणि समाजात सुद्धा काहीच पत नसते . अश्या कोडग्या लोकांच्या मागे स्वामी कदापि उभे राहणार नाहीत . स्वामींचे नाव घ्या आणि काम शोधा नक्की मिळणार . केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे . 


मनापासून क्षणभर देवापुढे उभे राहिले तर पुढचे 24 तास तो आपल्याला प्रेमाने सांभाळेल . त्याला शिरापुरी नको फक्त तुमची मनापासून घातलेली साद हवी आहे . ती ऐकू आली कि असतील तिथून ते धावत येतील अनुभव घेवून बघा .

मनातील हेवेदावे , आळस , दुसर्यावर विसंबून राहण्याची वृत्ती आपल्याला स्वामी चरण आणि स्वामी सेवा ह्यापासून दूर नेयील. प्रापंचिक माणसाने प्रपंचासाठी धन जोडलेच पाहिजे आणि त्यासाठी मरेपर्यंत कष्ट केले पाहिजेत .आहे हे आयुष्य कायम तसेच राहणार नाही हा धडा आपल्याला करोनाच्या रुपात ईश्वराने शिकवला आहे. आता त्यावरून जो शिकला तो खरा नाही का. आपला भार भूमीला आहे तो खूप आहे आपल्या कुटुंबियांना नको. जी व्यक्ती कष्ट करून धन कमवत नाही त्याला कायमच अपमानित आयुष्य जगायला लागते . सगळेच हाड्तुड करतात . म्हणूनच कुठल्याही कामाला कमी न लेखता जे मिळेल ते काम करून सन्मार्गाने जगणे हीच खरी स्वामिसेवा आहे. मनुष्याने आपले कर्म करत राहिले पाहिजे , आपली वेळ आली कि आपण जाणारच पण त्याही आधी आपल्या गुरूना आपल्याबद्दल अभिमान वाटेल असे काहीतरी करूनच ,पटतंय का?

संकलन : सौ. अस्मिता दीक्षित 

संपर्क : 8104639230

 


Sunday, 16 April 2023

सामर्थ्य विचारांचे

 || श्री स्वामी समर्थ ||


माणसाचे मन हे फार विचित्र आहे आणि त्याच्या मनाचा थांगपत्ता लागणे कर्म कठीण गोष्ट आहे. मन हे नेहमीचच विचारांच्या लाटेवर आरूढ असते . मनातील विचारांचे प्रतिबिंब चेहऱ्यावर , आपल्या देहबोलीतून प्रगट होत असते. एखाद्या प्रसंगी मन आनंदाने बहरते तर कधी दुखी होते . आनंद आणि दुक्ख ह्या मनाच्या अवस्था सुद्धा क्षणभंगुर असतात , त्या अवस्थांच्या हिंदोळ्यात मन विहार करत असते .

मनातील विचारांचे समर्थ्य जबरदस्त असते . विचार आणि मन ह्यांचे अतूट नाते आहे . मनातील विचार माणसाचे आयुष्य घडवू शकतात आणि बिघडवू सुद्धा शकतात . आयुष्यातील सर्वच गोष्टी मनावर अवलंबून असतात . तर असे हे मन दिसले नाही तरी असते . 

मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे मनातील विचार डोक्यात थैमान घालत असतात मग ते चांगले असोत अथवा वाईट . विचारांचे शब्द होतात आणि शब्दातून कृती घडते . मनातील विचार हे असंख्य आजार जन्माला घालतात . आपले मनस्वास्थ जपणे हे ज्याला जमले त्याला आयुष्याचे गणित जमले. त्याचे आयुष्य सदा सर्वकाळ आनंदीच असेल ह्यात शंका नाही . कुठलाही मनातील विचार तत्क्षणी सोडून देता आला पाहिजे . थोडक्यात त्यात गुंतायचे नाही हे सवयी नुसार जमणारे आहे, नक्की करून पहा. 

दैनंदिन आयुष्यात रोज असंख्य गोष्टी मनाविरुद्ध होतात , कधी सकाळ चांगली असते तर कधी संध्याकाळ . पूर्ण जीवन सोडा एक अख्खा दिवस सुद्धा संपूर्णपणे चांगला किंवा वाईट जात नसतो . अनेकदा खूप दुक्ख होऊन आपण त्यात कोलमडून जातो आणि आयुष्य निरस  होते . मन उदास विचारांनी घेरले जाते , कुठेही आशेचा किरण दिसत नाही आणि मग जगावेसे सुद्धा वाटत नाही . अश्या ह्या सर्व विचारांचा पूर्णतः परिणाम आपल्यावर म्हणजे शरीरावर होतो . म्हणूनच म्हंटले आहे कि आधी मन आजारी पडते आणि मग शरीर . अनेक आजार आपल्या वैफल्य अवस्थेतून निर्माण होतात , शरीरातील हार्मोन्स बिघडतात आणि नकारात्मकता वाढू लागते . मधुमेह हा आजार सुद्धा किबहुना कुठलाही आजार चिंता केल्यानेच होतो . शिक्षण , वास्तू , विवाह , संतती ह्या सर्व घटना आयुष्यात त्या त्या वेळेस घडणार आहेत त्या विचार करून करून लवकर किंवा उशिरा घडणार नाहीत हे नक्की . संयम ठेवावाच लागतो .

मनुष्य हा षडरीपुनी वेढलेला आहे.  आपल्या मनाविरुद्ध वागणाऱ्या किंवा आपल्याला त्रास देणाऱ्या असंख्य वेगवेगळ्या नात्यातून आजूबाजूला वावरणाऱ्या अनेकांबद्दल आपल्या मनात तिढा , द्वेष , मत्सर , राग असतो . अनेक लोक शीघ्रकोपी आणि दीर्घद्वेषी असतात , वर्षानुवर्ष त्याच घटना आणि विचार मनात अगदी तसेच्या तसे साठवून ठेवतात . ह्या विचारांचे थर इतके जबरदस्त नकारात्मकता निर्माण करतात कि अमुक एक व्यक्ती समोर आली तरी सुद्धा ह्या लोकांचा चेहरा , डोळे ,देह सर्वच द्वेषाने फुललेले सहज इतरांच्याही लक्ष्यात येते . 

हत्या , वैर आणि ऋण हे मनुष्याला चुकलेले नाही असे सुंदर वाक्य श्री गजानन विजय ह्या ग्रंथात दासगणू महाराजांनी उगीच नाही लिहिले. आपण त्यावर सखोल विचार केला पाहिजे आणि तद पश्चात कृती सुद्धा . आयुष्यात सगळच आपल्या मनासारखे कसे होयील . सगळ्यांचीच मते आपल्याशी कशी जुळणार नाही का. आपल्याला जसे सगळे आवडत नाहीत तसे अनेकांना आपणही नाही आवडत त्यात काय ? असो तर सांगायचे तात्पर्य असे कि ह्या विचारांच्या चांगल्या वाईट अविष्कारामुळे मन आणि पर्यायाने शरीर आजारी पडते .

मन चंगा तो सबकुछ चंगा असे म्हंटले आहेच. आजूबाजूला आणि स्वतःकडे एक त्रयस्थाच्या नजरेतून बघा , तुम्हाला जाणवेल आत्यंतिक मत्सर , द्वेष , कुणाचेही चांगले न पहावणे , सतत दुसर्याच्या आयुष्याशी आपल्या आयुष्याची तुलना आणि त्यातून निर्माण होणारी वैफल्य अवस्था , स्पर्धा करणाऱ्या व्यक्तींना अनेक वर्ष शरीरात ठाण मांडून बसणारे आजार झालेले दिसतील . त्यातून बरे होणे सोडा उलट एकातून दुसरा आजार होताना दिसतो कारण मन शांत नाही.

कुणीही कसेही वागले तरी आमचे मन आम्ही शांत ठेवणार हे म्हणायला जितके सोपे तितकेच कृतीतून यायला अवघड आहे . पण हे सत्य आहे कि मनातील विचार हेच आजारांचे मूळ आहे. 

कश्याला कुणाशी स्पर्धा करायची , आपल्याला देवाने दिलेले आयुष्य मग ते आपल्या पूर्व कर्मानुसार आहे ते भोगायचे आणि मुक्त  व्हायचे. दुसर्याचा द्वेष करून , दुसर्याला पाण्यात बघून होणार काय ? आपणच दवाखान्याच्या फेर्या मारणार समोरचा नाही हे पक्के लक्ष्यात ठेवा.

नामस्मरण , अध्यात्म , गुरुसेवा इथे आपल्या नक्कीच मदतीला येते . जसजसे नामस्मरण वाढते तसे आपण स्वतःचे राहत नाही. जे आहे ते स्वीकारायला शिकतो . मनातील विचार स्वछ्य होतात . प्राप्त परिस्थिती स्वीकारून आपले कर्म शुद्ध ठेवण्यासाठी मन स्थिर लागते ते होण्यास मदत होते.  हळूहळू गोष्टी सोडून द्यायला शिकतो आणि मन विर्विकार होते . कसलीही आसक्ती , स्पर्धा उरत नाही , हे हवे ते हवे कमी कमी होत जाते आणि फक्त सद्गुरूंचे चरण आपल्याला दिसू लागतात आणि तिथे मन आणि मनातील विचार स्थिरावतात .

स्वामी पुण्यतिथीला ह्याच गोष्टीची सुरवात करुया . गोष्टी सोडून द्या . जो तो आपापले नशीब घेवून आला आहे , ज्याचे त्याचे कर्म वेगळे आणि प्रवास सुद्धा वेगळे आपण दोन पावले बरोबर चालू शकतो पण त्याच्या कर्माचे फळ भोगू शकत नाही ते ज्याचे त्यानेच भोगायचे आहे हे त्रिवार सत्य आहे  . माणूस एकदा आपला म्हंटला कि त्याच्या सर्व चांगल्या वाईट गुणांसकट तो स्वीकारता आला पाहिजे . रोजचे जीवन स्वामीचरणी अर्पण करायची मनाला सवय लावली तर अहंकार येण्यासाठी आपल्या जवळ काही उरणारच नाही . आसक्ती , मोह ह्यापासून दूर जाण्यसाठी नित्य उपासना आवश्यक आहे आणि ती करण्याची प्रेरणा होणे हीच गुरुकृपा .

मनातील विचार शांत करण्यासाठी साधना करणे , योग करणे आवश्यक आहे. सर्वात मुख्य म्हणजे ह्या सर्व गोष्टीत सातत्य हवे. मन स्थिर एका रात्रीत होणार नाही . वर्षानुवर्षाची मनातील जळमटे जाण्यास पुरेसा अवधी लागणारच पण आपण साधना सोडायची नाही . आपल्यात झालेला बदल आपल्याही आधी इतरांना जाणवेल आणि तोच आपल्या आयुष्यातील आत्यंतिक महत्वाचा क्षण असेल. मनाला आणि पर्यायाने शरीराला हि नको असणार्या ह्या मनातील द्वेष , मत्सर ह्या सर्व नकारात्मक भावनांना तिलांजली देवून मन महाराजांच्या सेवेत रुजू होयील त्याच क्षणी आपल्या जीवनाचे सार्थक होयील.

विचारांचे सामर्थ्य किती आहे ह्याचा पदोपदी अनुभव घेतलेल्या वाचकांना माझे म्हणणे नक्कीच पटेल. आजपासून कुणाचाही द्वेष मत्सर करणे कुणाशीही स्पर्धा करणे सोडून देवूया निदान त्यासाठी प्रयत्न तरी करुया कारण त्यात आपलीच आहुती जाते आहे तीही आपल्या नकळत . दुसर्याचा द्वेष मत्सर करून आपल्याला कसलीही प्राप्ती होत नाही, उलट समोरच्याची प्रगती होते आणि आपली फक्त अधोगती . सर्वात प्रथम रोजच्या प्रपंचाला धन मिळवणे कठीण जाते , बरे न होणारे आजार , जीवनातील स्थैर्य हरवणे एक ना दोन असंख्य गोष्टींची शृंखला मागे लागते . 

स्वामी समर्थांची सेवा करायला मिळणे ह्यालाही पूर्वसुकृत लागते . ते जन्मोजन्मी आपल्या सोबत आहेत आणि पुढेही असणार आहेत . महाराजांवरचा विश्वास प्रत्येक क्षणी निसंशय द्विगुणीत करा इतका कि इतरानाही त्यातून प्रेरणा मिळेल . आपल्या विचारात मनात आणि आपल्या प्रत्येक श्वासात फक्त त्यांचे रूप दिसायला हवे हीच त्यांना खरी भावांजली . 

संकलन : सौ. अस्मिता दीक्षित 

संपर्क : 8104639230

 



Monday, 10 April 2023

सप्तम स्थानाची महती

 || श्री स्वामी समर्थ ||




विवाह म्हंटले कि आपले लक्ष आपोआपच पत्रिकेतील सप्तम स्थानाकडे जाते . सप्तम स्थान म्हणजे आयुष्यातील आणि  पत्रिकेतील मध्यबिंदू . मुलगा शिकून मिळवता झाला आपल्या पायावर उभा राहिला म्हणजेच विवाह योग्य झाला कि पालकांना त्याच्या विवाहाचे वेध लागतात . विवाह हा आयुष्यातील सर्वार्थाने होणारा मोठा बदल आणि त्याचे मार्गदर्शन करणारे सप्तम स्थान ह्या विषयी जाणून घेवूया .

पत्रिकेतील प्रत्येक स्थान शरीरातील एखादा अवयव , नाती आणि इतर अनेक गोष्टी सूचित करते. सप्तम स्थान हे मुख्यत्वेकरून जोडीदार कसा असेल ह्याबद्दल लक्ष्य वेधते . सप्तम स्थान हे मध्य बिंदू आहे म्हणजेच आयुष्याचा मध्य. ह्या वयात आचार विचार , वागणूक , समंजस पणा , समोरच्याला समजून घेण्याची मानसिकता , शारीरिक आर्थिक मानसिक वैचारिक आणि लैंगिक कुवत असणे आवश्यक आहे . ह्या सर्वाचा  विचार विवाह करताना होणे आत्यंतिक गरजेचे आहे . वरील सर्व कसोट्यांवर आपले अपत्य खरे उतरत असेल तर आणि तरच त्याचा विवाह करावा अन्यथा एखाद्या मुलीचे किंवा मुलाचे आयुष्य बरबाद करून आपल्याला काय मिळणार , नाही का?

एखादा मुलगा वयात आला म्हणजे त्याचे लग्न करा हे दिवस आता नाहीत . खरतर विवाह झाल्यावर पुढेच खरी मोठी आव्हाने असतात ती पेलण्याचे सामर्थ्य असायला हवे आणि ते असल्याची खात्री पालकांना हवी . आज समाजातील विभक्त होण्याची अनेक करणे पण त्यातील सर्वात महत्वाचे कारण “ संयम संपला आहे “ सगळे लगेच हवे आहे . असो ह्यावर पुन्हा लिहीन .आज सप्तम स्थान .

सप्तम स्थानामध्ये निसर्ग कुंडलीत तूळ रास येते .ह्या राशीचे बोध चिन्ह “ तराजू “ आहे. विवाहाच्या पूर्वी असणारी असंख्य नातीगोती विवाह पश्च्यात पण तशीच जपायची आहेत किबहुना नवीन आणि जुन्या सर्व नात्यांचा योग्य तो समतोल आयुष्यात राखता आला पाहिजे हेच जणू हा तराजू सूचित करत आहे . अर्धांगिनी आली म्हणून आधीच्या नात्यांना तिलांजली न देता नवीन नात्यांची त्यात गुंफण कशी योग्य रीतीने करता येईल हे जो पाहिल तो जिंकला. 

सप्तम स्थान आपल्या व्यवसायातील पार्टनर पण दर्शवतो म्हणा. तर सप्तम स्थान हे षष्ठ आणि अष्टम ह्यातील मधले स्थान आहे. षष्ठ स्थान म्हणजे रोग ऋण शत्रू तर अष्टम म्हणजे मनस्ताप आणि अचानक धनलाभ सुद्धा .विवाहाचा मुख्य उद्देश हा आपली वंशवेल वाढणे हा असला तरी हे नाते खर्या अर्थाने बहरले पाहिजे तरच ते फुलेल . आयुष्यात येणाऱ्या अनेक चढ उतार जसे एखाद्या गोष्टीसाठी कर्ज घ्यावे लागणे , येणारी आजारपण त्यातून होणारा मनस्ताप ह्या सर्वातून प्रवास करणारे हे सप्तम स्थान आहे. ह्या सर्व उण्या गोष्टीत सुद्धा आपल्या बेटर हाफ ची योग्य साथ असेल तर आयुष्य सुखमय होयील आणि नात्यातील गोडवा कायम राहील. हीच तर खरी सप्तम स्थानाची मेख आहे. 

सहजीवनाचा प्रवास मोठा असतो ,त्यात फक्त ती दोघ नाही तर त्या दोघांचे संपूर्ण कुटुंब , आप्तेष्ट असतात आणि ह्या सर्वांच्या सोबतीने केलेला तो दीर्घकालीन प्रवास असतो . म्हणूनच सप्तम स्थान खर्या अर्थाने समजून घेतले पाहिजे. ह्यातील ग्रह , जोडीदाराचा स्वभाव , त्याच्या आवडी निवडी , परस्परातील आकर्षण , मानसिकता दर्शवणारे हे स्थान महत्वाचे आहे आणि त्यातील विविध पेहलू समजून घेणेहि तितकेच आवश्यक आहे. 


लग्न म्हणजे आपण स्वतः आणि सप्तम म्हणजे समोरील जनता जनार्दन . एखादा व्यवसाय सुरु केला तर आपल्या दुकानात ग्राहक येणार कि नाही ह्याचा वेध ह्याच स्थानातून होतो. असो आज आपण फक्त विवाहाच्या अनुषंगाने हे स्थान अभ्यासात आहोत . 

आपल्या मुला/मुलीसाठी सुयोग्य जोडीदार पाहताना खालील गोष्टीं व्यवस्थित तपासून घ्याव्यात .

लग्नातील पापग्रह कारण त्यांची दृष्टी सप्तम स्थानावर असते . सप्तम स्थानातील पापग्रह आणि त्यावर दृष्टी टाकणारे शुभ अशुभ ग्रह , सप्तमेश कुठे आहे त्याची स्थिती ,सप्तम स्थान शुभ किंवा पाप कर्तरीत आहे का . सप्तम स्थानातील असणारे नीच / वक्री ग्रह . वैवाहिक सुखाचा ग्रह शुक्र ह्यांचाही अभ्यास असला पाहिजे. पत्रिकेतील गुरु आणि हजेरी लावणारा दशास्वामी काय सांगतोय ? पत्रिकेतील आत्म्याचा कारक रवी आणि मनाचा कारक चंद्र ह्यांची स्थिती महत्वाची आहे. हर्शल नेप ह्याकडे दुर्लक्ष नको . 

कुणी सांगून एखादी गोष्ट करणे आणि मनापासून करणे ह्यात फरक आहे म्हणूनच एखादा मुलगा मनापासून विवाहाचे नाते स्वीकारत असेल तर तो त्यांना निश्चित न्याय देयील पण ते लादले असेल किंवा मनाविरुद्ध असेल तर पुढे अनेक समस्या निर्माण होतील म्हणून मुलामुलींच्या मनाचा कल समजून घेणे आवश्यक आहे. एकदा विवाहात फसवणूक झाली तर मग लग्न आणि लग्नसंस्था ह्याबद्दल मुलांच्या मनात अढी निर्माण होते ती कायमची . इतरांचे मोडलेले विवाह पाहून सुद्धा अनेक जण विवाहाला तयार होत नाहीत असो. अश्यावेळी सप्तम स्थानाचा अभ्यास उपयोगी पडतो. 

आपल्या मुलांचे अवगुण पालकांना माहित असतात ते लपवून न ठेवता उघडपणे सांगितले तर नवीन नाते विश्वासावर निक्कीच उभे राहील . लग्न म्हणजे दोन मनाचे मिलन पण खरतर दोन कुटुंबांचे मिलन त्यामुळे हल्ली गमतीने कुटुंबातील इतरांच्याही पत्रिका बघा जुळतात का असे म्हंटले जाते .

सप्तम स्थान समजून घेतले तर विवाहाबद्दल मार्गदर्शन होईल आणि अनेक गोष्टींचा योग्य खुलासाही होईल . खरतर विवाह हा त्या दोघांचा असतो . सूर जुळले , मनोमिलन झाले तर पुढील प्रवास सुखाचा होतो आणि सहजीवनाचा आनंद वृद्धिंगत होतो .

संकलन : सौ. अस्मिता दीक्षित 

संपर्क : 8104639230