Sunday, 16 April 2023

सामर्थ्य विचारांचे

 || श्री स्वामी समर्थ ||


माणसाचे मन हे फार विचित्र आहे आणि त्याच्या मनाचा थांगपत्ता लागणे कर्म कठीण गोष्ट आहे. मन हे नेहमीचच विचारांच्या लाटेवर आरूढ असते . मनातील विचारांचे प्रतिबिंब चेहऱ्यावर , आपल्या देहबोलीतून प्रगट होत असते. एखाद्या प्रसंगी मन आनंदाने बहरते तर कधी दुखी होते . आनंद आणि दुक्ख ह्या मनाच्या अवस्था सुद्धा क्षणभंगुर असतात , त्या अवस्थांच्या हिंदोळ्यात मन विहार करत असते .

मनातील विचारांचे समर्थ्य जबरदस्त असते . विचार आणि मन ह्यांचे अतूट नाते आहे . मनातील विचार माणसाचे आयुष्य घडवू शकतात आणि बिघडवू सुद्धा शकतात . आयुष्यातील सर्वच गोष्टी मनावर अवलंबून असतात . तर असे हे मन दिसले नाही तरी असते . 

मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे मनातील विचार डोक्यात थैमान घालत असतात मग ते चांगले असोत अथवा वाईट . विचारांचे शब्द होतात आणि शब्दातून कृती घडते . मनातील विचार हे असंख्य आजार जन्माला घालतात . आपले मनस्वास्थ जपणे हे ज्याला जमले त्याला आयुष्याचे गणित जमले. त्याचे आयुष्य सदा सर्वकाळ आनंदीच असेल ह्यात शंका नाही . कुठलाही मनातील विचार तत्क्षणी सोडून देता आला पाहिजे . थोडक्यात त्यात गुंतायचे नाही हे सवयी नुसार जमणारे आहे, नक्की करून पहा. 

दैनंदिन आयुष्यात रोज असंख्य गोष्टी मनाविरुद्ध होतात , कधी सकाळ चांगली असते तर कधी संध्याकाळ . पूर्ण जीवन सोडा एक अख्खा दिवस सुद्धा संपूर्णपणे चांगला किंवा वाईट जात नसतो . अनेकदा खूप दुक्ख होऊन आपण त्यात कोलमडून जातो आणि आयुष्य निरस  होते . मन उदास विचारांनी घेरले जाते , कुठेही आशेचा किरण दिसत नाही आणि मग जगावेसे सुद्धा वाटत नाही . अश्या ह्या सर्व विचारांचा पूर्णतः परिणाम आपल्यावर म्हणजे शरीरावर होतो . म्हणूनच म्हंटले आहे कि आधी मन आजारी पडते आणि मग शरीर . अनेक आजार आपल्या वैफल्य अवस्थेतून निर्माण होतात , शरीरातील हार्मोन्स बिघडतात आणि नकारात्मकता वाढू लागते . मधुमेह हा आजार सुद्धा किबहुना कुठलाही आजार चिंता केल्यानेच होतो . शिक्षण , वास्तू , विवाह , संतती ह्या सर्व घटना आयुष्यात त्या त्या वेळेस घडणार आहेत त्या विचार करून करून लवकर किंवा उशिरा घडणार नाहीत हे नक्की . संयम ठेवावाच लागतो .

मनुष्य हा षडरीपुनी वेढलेला आहे.  आपल्या मनाविरुद्ध वागणाऱ्या किंवा आपल्याला त्रास देणाऱ्या असंख्य वेगवेगळ्या नात्यातून आजूबाजूला वावरणाऱ्या अनेकांबद्दल आपल्या मनात तिढा , द्वेष , मत्सर , राग असतो . अनेक लोक शीघ्रकोपी आणि दीर्घद्वेषी असतात , वर्षानुवर्ष त्याच घटना आणि विचार मनात अगदी तसेच्या तसे साठवून ठेवतात . ह्या विचारांचे थर इतके जबरदस्त नकारात्मकता निर्माण करतात कि अमुक एक व्यक्ती समोर आली तरी सुद्धा ह्या लोकांचा चेहरा , डोळे ,देह सर्वच द्वेषाने फुललेले सहज इतरांच्याही लक्ष्यात येते . 

हत्या , वैर आणि ऋण हे मनुष्याला चुकलेले नाही असे सुंदर वाक्य श्री गजानन विजय ह्या ग्रंथात दासगणू महाराजांनी उगीच नाही लिहिले. आपण त्यावर सखोल विचार केला पाहिजे आणि तद पश्चात कृती सुद्धा . आयुष्यात सगळच आपल्या मनासारखे कसे होयील . सगळ्यांचीच मते आपल्याशी कशी जुळणार नाही का. आपल्याला जसे सगळे आवडत नाहीत तसे अनेकांना आपणही नाही आवडत त्यात काय ? असो तर सांगायचे तात्पर्य असे कि ह्या विचारांच्या चांगल्या वाईट अविष्कारामुळे मन आणि पर्यायाने शरीर आजारी पडते .

मन चंगा तो सबकुछ चंगा असे म्हंटले आहेच. आजूबाजूला आणि स्वतःकडे एक त्रयस्थाच्या नजरेतून बघा , तुम्हाला जाणवेल आत्यंतिक मत्सर , द्वेष , कुणाचेही चांगले न पहावणे , सतत दुसर्याच्या आयुष्याशी आपल्या आयुष्याची तुलना आणि त्यातून निर्माण होणारी वैफल्य अवस्था , स्पर्धा करणाऱ्या व्यक्तींना अनेक वर्ष शरीरात ठाण मांडून बसणारे आजार झालेले दिसतील . त्यातून बरे होणे सोडा उलट एकातून दुसरा आजार होताना दिसतो कारण मन शांत नाही.

कुणीही कसेही वागले तरी आमचे मन आम्ही शांत ठेवणार हे म्हणायला जितके सोपे तितकेच कृतीतून यायला अवघड आहे . पण हे सत्य आहे कि मनातील विचार हेच आजारांचे मूळ आहे. 

कश्याला कुणाशी स्पर्धा करायची , आपल्याला देवाने दिलेले आयुष्य मग ते आपल्या पूर्व कर्मानुसार आहे ते भोगायचे आणि मुक्त  व्हायचे. दुसर्याचा द्वेष करून , दुसर्याला पाण्यात बघून होणार काय ? आपणच दवाखान्याच्या फेर्या मारणार समोरचा नाही हे पक्के लक्ष्यात ठेवा.

नामस्मरण , अध्यात्म , गुरुसेवा इथे आपल्या नक्कीच मदतीला येते . जसजसे नामस्मरण वाढते तसे आपण स्वतःचे राहत नाही. जे आहे ते स्वीकारायला शिकतो . मनातील विचार स्वछ्य होतात . प्राप्त परिस्थिती स्वीकारून आपले कर्म शुद्ध ठेवण्यासाठी मन स्थिर लागते ते होण्यास मदत होते.  हळूहळू गोष्टी सोडून द्यायला शिकतो आणि मन विर्विकार होते . कसलीही आसक्ती , स्पर्धा उरत नाही , हे हवे ते हवे कमी कमी होत जाते आणि फक्त सद्गुरूंचे चरण आपल्याला दिसू लागतात आणि तिथे मन आणि मनातील विचार स्थिरावतात .

स्वामी पुण्यतिथीला ह्याच गोष्टीची सुरवात करुया . गोष्टी सोडून द्या . जो तो आपापले नशीब घेवून आला आहे , ज्याचे त्याचे कर्म वेगळे आणि प्रवास सुद्धा वेगळे आपण दोन पावले बरोबर चालू शकतो पण त्याच्या कर्माचे फळ भोगू शकत नाही ते ज्याचे त्यानेच भोगायचे आहे हे त्रिवार सत्य आहे  . माणूस एकदा आपला म्हंटला कि त्याच्या सर्व चांगल्या वाईट गुणांसकट तो स्वीकारता आला पाहिजे . रोजचे जीवन स्वामीचरणी अर्पण करायची मनाला सवय लावली तर अहंकार येण्यासाठी आपल्या जवळ काही उरणारच नाही . आसक्ती , मोह ह्यापासून दूर जाण्यसाठी नित्य उपासना आवश्यक आहे आणि ती करण्याची प्रेरणा होणे हीच गुरुकृपा .

मनातील विचार शांत करण्यासाठी साधना करणे , योग करणे आवश्यक आहे. सर्वात मुख्य म्हणजे ह्या सर्व गोष्टीत सातत्य हवे. मन स्थिर एका रात्रीत होणार नाही . वर्षानुवर्षाची मनातील जळमटे जाण्यास पुरेसा अवधी लागणारच पण आपण साधना सोडायची नाही . आपल्यात झालेला बदल आपल्याही आधी इतरांना जाणवेल आणि तोच आपल्या आयुष्यातील आत्यंतिक महत्वाचा क्षण असेल. मनाला आणि पर्यायाने शरीराला हि नको असणार्या ह्या मनातील द्वेष , मत्सर ह्या सर्व नकारात्मक भावनांना तिलांजली देवून मन महाराजांच्या सेवेत रुजू होयील त्याच क्षणी आपल्या जीवनाचे सार्थक होयील.

विचारांचे सामर्थ्य किती आहे ह्याचा पदोपदी अनुभव घेतलेल्या वाचकांना माझे म्हणणे नक्कीच पटेल. आजपासून कुणाचाही द्वेष मत्सर करणे कुणाशीही स्पर्धा करणे सोडून देवूया निदान त्यासाठी प्रयत्न तरी करुया कारण त्यात आपलीच आहुती जाते आहे तीही आपल्या नकळत . दुसर्याचा द्वेष मत्सर करून आपल्याला कसलीही प्राप्ती होत नाही, उलट समोरच्याची प्रगती होते आणि आपली फक्त अधोगती . सर्वात प्रथम रोजच्या प्रपंचाला धन मिळवणे कठीण जाते , बरे न होणारे आजार , जीवनातील स्थैर्य हरवणे एक ना दोन असंख्य गोष्टींची शृंखला मागे लागते . 

स्वामी समर्थांची सेवा करायला मिळणे ह्यालाही पूर्वसुकृत लागते . ते जन्मोजन्मी आपल्या सोबत आहेत आणि पुढेही असणार आहेत . महाराजांवरचा विश्वास प्रत्येक क्षणी निसंशय द्विगुणीत करा इतका कि इतरानाही त्यातून प्रेरणा मिळेल . आपल्या विचारात मनात आणि आपल्या प्रत्येक श्वासात फक्त त्यांचे रूप दिसायला हवे हीच त्यांना खरी भावांजली . 

संकलन : सौ. अस्मिता दीक्षित 

संपर्क : 8104639230

 



2 comments: