Monday, 24 April 2023

कर्मानुसार फलित देणारे ग्रह

 || श्री स्वामी समर्थ ||


हा विषय खूप गहन आहे आणि त्याला अनेक कंगोरे आहेत . मी स्वतः सुद्धा अभ्यासक , वाचक आहे त्यामुळे कुठेतरी काहीतरी लेखनाच्या तृटी राहतील किंवा सर्व मते पटतील असे नाही तसा अट्टाहास तर अजिबात नाही . उलट जाणकारांनी ह्यात आपल्या ज्ञानाचे योगदान निश्चित द्यावे हि विनंती.

जर ग्रह सगळी फळे देणार हे ठरलेलेच आहे तर मग आपल्या कर्माचे योगदान काय ?  मग केलेले कर्म निष्फळ जाणार का ? कश्याला कर्म करायचे हे प्रश्न आपल्या भाबड्या मनात आल्याशिवाय रहात नाहीत . कुठलाही ग्रह आपल्याला जीवन कसे जगायचे ते सांगणार नाही ते फक्त आपल्या कर्माचे प्रतिबिंब आहेत .पण कर्म आपल्या जीवनाचा सुकाणू धरून आहेत हे नक्की . 

कर्म केले कि त्याचे फळ आपल्याला भोगायलाच लागते मग ते चांगले असो अथवा वाईट आणि म्हणूनच कर्म करताना डोळस पणे , विचारपूर्वक केले पाहिजे. आपले आयुष्य हे कर्मावर किबहुना कर्म प्रधान आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही .

आपली पत्रिका जर आपण व्यवस्थित अभ्यासली तर अमुक एक ग्रह इथेच का आणि तमुक एक ग्रह तिथेच का , हे हे योग आहेत आणि ते ते योग नाहीत असे आपल्याला दिसून येते . मग ह्या ग्रहांना त्या त्या भावात स्थित केले कुणी ? तर आपल्या मागील जन्मातील कर्मांनी . जर मागील जन्मातील कर्मे चांगले असतील तर शुभ ग्रह , अनेक राजयोग , नवपंचम योग , उच्चीचे ग्रह आपल्याला पत्रिकेत पाहायला मिळतील आणि हीच कर्मे “ कुकर्मे “ असतील तर उलट चित्र पाहायला मिळते. याचाच अर्थ असा घ्यावा लागेल कि आपल्या पूर्व कर्मानुसार ग्रह पत्रिकेत असतात आणि आपल्या कर्मांची फळे देण्यास ते सक्षम असतात , हि फळे त्या ग्रहाच्या दशा आल्या कि प्रकर्षाने मिळतात .

आपल्या मनातील विचार “ कर्माला “ जन्माला घालत असतात . आपल्या शब्दातून , कृतीतून , चेहऱ्यावरील प्रगट होणार्या हावभावातून सुद्धा अनेक कर्म प्रगट होत असतात . कर्म शुद्ध असतील तर मग मोक्ष प्राप्तीसाठी वेगळे काही करायची गरजच उरत नाही . थोडक्यात आपली कर्म आयुष्याची दिशा ठरवतात पण ग्रहांच्या माध्यमातून असे म्हणायला हरकत नाही . साडेसाती शेवटी काय आहे ? आपल्या कर्माचा लेखाजोखा . चांगल्या कर्माची उत्तम फळे जसे विवाह , उच्च शिक्षण , परदेशगमन ई. आणि वाईट कर्माची फळे तुरुंगवास , असाध्य आजार ई. मग आपण ह्यात शनीला दोष नाही देऊ शकत कारण शनी महाराजांकडे दंड देण्याचे  खाते असल्यामुळे ते निरपेक्षपणे आपले काम करत असतात इतकच . आपल्या कर्माप्रमाणेच तेही वागणार . मग आपले छान झाले कि शनी चांगला नाहीतर तो व्हिलन असे सर्व आहे. पण ह्याच्या मुळापर्यंत गेलो तर समजेल कि आपलीच कर्मे साडेसातीत एक एक करून अनेक समस्या आजार संकटे ह्या रुपात आपल्या समोर उभी आहेत आणि आता ती आपला हिशोब करत आहेत .

ग्रह म्हणजे हा आत्मा आपल्यासोबत पूर्व जन्मातून कायकाय घेवू आला आहे त्याचे निदर्शन करणारे माध्यम आहे. मूळ आहे ते अर्थातच आपले गतजन्मीचे कर्म . काही कर्म आपल्याला भोगूनच संपवावी लागतात त्यात आपले गुरुहि काहीच करू शकत नाहीत . ते भोग आहेत आणि भोगूनच संपवायला लागतात . नियती त्यात बदल करत नाही.  दुसर्या प्रकारात आपले कष्ट , प्रयत्न असाध्य गोष्टीही साध्य करून दाखवतात तसेच आपली उपासना आणि गुरूंच्या वरील दृढ विश्वास आपल्याला ह्या कर्म बंधनातून थोडी मुक्ती मिळवून देतो पण तरीही ती अल्प प्रमाणात का होयीना भोगायलाच लागतात . त्याउपर  अशीही काही कर्म असतात जी सद्गुरूंच्या आपल्या आयुष्यातील वास्तव्याने त्यांच्या असण्याने, त्यांच्यावरील असीम श्रद्धेने जणू लोप पावतात किंवा त्याचा दाह जाणवत सुद्धा नाही , पण त्यासाठी पराकोटीची श्रद्धा उपासना असेल तरच अन्यथा नाही , मग तीही भोगायलाच लागतात .

आपली कुंडली हे मागील जन्माचे पूर्वसंचीत दर्शवते आणि ते ह्या जन्मात भोगायचे आहे ज्याला आपण “ प्रारब्ध “ म्हणतो . हे पूर्वसंचीत फक्त मागील काहीच जन्माचे असेल असे नाही तर मागील कित्येक जन्माचे “ संचित कर्म “ असते. त्यातील काही भाग ह्या जन्मात आपल्याला भोगायचा असतो. ह्या सर्वाचा सखोल अभ्यास केला तर असे लक्ष्यात येयील कि आपण इतके ज्ञान प्राप्त करतो तर निदान उरलेल्या ह्या जन्मातील कर्मे तरी शुद्ध सात्विक असावीत कारण तीच पुढील जन्मात संचित म्हणून आपल्या समोर येणार आहेत आणि पुढील जन्माचे प्रारब्ध म्हणून ती आपल्याला भोगायला लागणार आहेत  . हा फेरा असाच चालू राहणार कि कधीतरी खंडित होणार हे शेवटी आपल्याच हाती नाही का.

जन्मपत्रिका आपल्याला मागील जन्मातील किती कर्म ह्या जन्मात भोगायची आहे त्याचे ज्ञान देते त्यालाच आपण “ प्रारब्ध “ म्हणतो.  हे कितीही असले तर नवग्रहांच्या वरती  संतांची आगाध सत्ता आहे आणि संत हे ईश्वराचेच रूप आहेत . आपल्या सद्गुरूंचे नाम आणि महादेवाचा जप आपले प्रारब्ध भोग भोगण्यास निश्चित मदत करतो . भोग कमी होणार नाहीत त्याची तीव्रता कमी होईल किबहुना आपली भोग भोगण्यासाठी लागणारी सहन शक्ती वाढेल.

अशक्य हि शक्य करतील स्वामी हे महाराजांचे वचन आहेच आणि ते आपल्याला अनुभवायला सुद्धा मिळते . 

“नाम आहे तिथे मी आहे “  हे ब्रम्हचैतन्य गोंदवलेकर महाराजांचे सुद्धा अभिवचन आहे आणि ह्यातच नामाचे महत्व दडलेले आहे .

कर्म , संचित आणि प्रारब्ध ह्यातील मागील अनेक जन्माचे साठलेले कर्म म्हणजे संचित ज्यात आता बदल होणे नाही कारण प्रारब्धाच्या  रुपात ते आपल्याला आता भोगायचे आहे पण आत्ताच्या ह्या क्षणाला आपल्या हातात काय आहे जे आपण सहज करू शकतो तर ते “ कर्म “ आणि ते उत्तमच असले पाहिजे . आपल्याला समजते सर्व पण वळत नाही हीच मोठी मेख  आहे. सकाळची पूजा दिवसभरातील कर्मातून अजिबात झळकत नाही कारण तिथे सर्व षडरिपू आड येतात म्हणूनच मनावर सातत्त्याने नामाचा वर्षाव होत राहाणे आवश्यक आहे. 

आपले भाग्य बदलण्यासाठी देवाने “ कर्म “ नावाचे एक शस्त्र दिले आहे . जिथे शेवट असतो तिथेच नवीन काहीतरी सुरु होत असते म्हणूनच ह्या अक्षय तृतीयेपासून अखंड नामस्मरण सुरु करुया जेणेकरून आपल्या संचितात चांगल्या कर्माची भर पडेल .दृढ निश्चय असेल तर काय जमणार नाही , सर्व शक्य आहे. पण नुसते देवदेव करून उपयोग नाही त्याला शुद्ध सात्विक कर्माची जोड हि हवीच . कारण मृत्यूपश्चात सुद्धा आपल्या कर्माचा जाब आपल्याला कुणालातरी द्यायचाच आहे आणि तो दिल्याशिवाय आपली सुटका नाही .

संकलन : सौ. अस्मिता दीक्षित 

संपर्क : 8104639230

  





No comments:

Post a Comment