|| श्री स्वामी समर्थ ||
आज स्वामींचे स्मरण करताना मनात विचार आला कि प्रत्येक भक्ताचे महाराजांकडे काहीतरी मागणे असतेच आणि महाराज सुद्धा आपले आजन्म लाड पुरवत आहेत . आपणही त्यांना आवडेल असे वागण्याचा प्रयत्न नको का करायला , तर नक्कीच करायला हवा. थोडा विचार केला तर लक्ष्यात येयील कि त्यांना काय आवडत नाही ? तर त्याचे एकच उत्तर आहे
“ आळस “. महाराजांना आळशी माणसे अजिबात आवडत नाहीत . आळशी माणसाचे तोंड सुद्धा पाहू नये असे ते म्हणत असत . परमेश्वराने दोन हात कष्ट करायलाच दिले आहेत . 24 तास जप करा असे कुठल्याच गुरुनी सांगितलेले नाही. तर त्यांनी दाखवलेल्या मार्गावरून चला मग मार्गात कितीही अडथळे संकटे येवुदेत . त्यांनी सांगितलेल्या गोष्टींचे पालन करा . नीतीने , सचोटीने , सन्मार्गाने जीवन व्यतीत करा आणि ते करत असताना त्यांचे विस्मरण होऊ देऊ नका हीच तर त्यांची शिकवण आहे .
“ शेत पिकवून खा “ आणि मिळेल त्यात संतुष्ट रहा असे स्वामिनी भक्तांना सांगितले आहे. स्वाहाः मी ह्याचा अर्थ जिथे आपण मी पणाची आहुती देतो तिथेच स्वामी प्रगट होतात . जिथे मीपणा अहंकार आहे तिथे स्वामीच काय त्यांची सावली सुद्धा फिरकायची नाही . स्वामी स्वामी करणार्यांनी आधी आपल्यातील “ मी “ ला तिलांजली द्यावी , मिळेल ते काम करावे आणि स्वाभिमानाने जीवन व्यतीत करावे . असा भक्त महाराजांच्या अधिक समीप असेल. २४ तास जप करून आपण लाडके होऊ हा संभ्रम दूर करा आणि कामाला लागा .
ज्यांना काम करायचे आहे त्यांना काम मिळेल , स्वामी तुम्हाला पोस्टाने चेक नाही पाठवणार पण पैसे मिळवण्यासाठी काम मात्र आणून देतील . आता ते आपण केलेच नाही आळस केला तर स्वामिना ते कदापि आवडणार नाही . जे मिळेल ते काम करा , कुणावरही आपला भार नको , स्वकष्टार्जित धन आपल्यातील आत्मविश्वास वाढवेल आणि ताठ मानाने जगायला शिकवेल. जी व्यक्ती काहीच काम करत नाही त्याची घरात आणि समाजात सुद्धा काहीच पत नसते . अश्या कोडग्या लोकांच्या मागे स्वामी कदापि उभे राहणार नाहीत . स्वामींचे नाव घ्या आणि काम शोधा नक्की मिळणार . केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे .
मनापासून क्षणभर देवापुढे उभे राहिले तर पुढचे 24 तास तो आपल्याला प्रेमाने सांभाळेल . त्याला शिरापुरी नको फक्त तुमची मनापासून घातलेली साद हवी आहे . ती ऐकू आली कि असतील तिथून ते धावत येतील अनुभव घेवून बघा .
मनातील हेवेदावे , आळस , दुसर्यावर विसंबून राहण्याची वृत्ती आपल्याला स्वामी चरण आणि स्वामी सेवा ह्यापासून दूर नेयील. प्रापंचिक माणसाने प्रपंचासाठी धन जोडलेच पाहिजे आणि त्यासाठी मरेपर्यंत कष्ट केले पाहिजेत .आहे हे आयुष्य कायम तसेच राहणार नाही हा धडा आपल्याला करोनाच्या रुपात ईश्वराने शिकवला आहे. आता त्यावरून जो शिकला तो खरा नाही का. आपला भार भूमीला आहे तो खूप आहे आपल्या कुटुंबियांना नको. जी व्यक्ती कष्ट करून धन कमवत नाही त्याला कायमच अपमानित आयुष्य जगायला लागते . सगळेच हाड्तुड करतात . म्हणूनच कुठल्याही कामाला कमी न लेखता जे मिळेल ते काम करून सन्मार्गाने जगणे हीच खरी स्वामिसेवा आहे. मनुष्याने आपले कर्म करत राहिले पाहिजे , आपली वेळ आली कि आपण जाणारच पण त्याही आधी आपल्या गुरूना आपल्याबद्दल अभिमान वाटेल असे काहीतरी करूनच ,पटतंय का?
संकलन : सौ. अस्मिता दीक्षित
संपर्क : 8104639230
No comments:
Post a Comment