|| श्री स्वामी समर्थ ||
अक्षय तृतीयेला गुरु महाराज मीन हि आपली स्वराशी सोडून मेष ह्या आपल्या मित्र ग्रहाच्या राशीत प्रवेश करणार आहेत . मीन हि राशीचक्रातील शेवटची राशी तर मेष आरंभाची राशी आहे . मीन हि जलतत्व तर मेष अग्नीचा निखारा . गुरु हा ग्रहमालिकेतील आकाराने सर्वात मोठा आणि नैसर्गिक शुभ ग्रह आहे . गुरु शनी सारखे मोठे ग्रह जेव्हा राशी परिवर्तन करतात तेव्हा आयुष्यात सुद्धा अनेक बदल होताना दिसतात . अधिकतम हे गोचर त्यांना प्रभावित करते ज्यांना गुरूची दशा अंतर्दशा चालू आहे.
दर चार वर्षांनी गुरु गंडातातून प्रवास करतो . गेले काही महिने कुठेतरी मनासारखे न घडणाऱ्या घटनांमुळे त्रास , वैफल्य जाणवत आहे पण आता हळूहळू मार्ग दिसेल कारण गुरु जलतत्त्वातून अग्नीतत्वात प्रवेश करणार आहे . पुढील 1-2 महिन्याचा काळ महत्वाचा कारण ह्या काळात चुकीचे निर्णय , चुकीची गुंतवणूक होऊ शकते ह्या पुढे त्रासदायक ठरतील.
मेष राशीतील प्रथम नक्षत्र अश्विनी. हे देवगणी नक्षत्र आहे आणि अश्विनीकुमार हि देवता . ह्याचा संबंध मेडिकल क्षेत्र आणि उपचार ह्यांच्याशी असल्यामुळे ह्या क्षेत्रात नवनवीन शोध लागणे , नवीन संशोधन , त्याला यश मिळेल. गेल्या काही दिवसात अनेक वाटणारी अस्वस्थता , मनाने हरवलेली उमेद ,अशांतता , संभ्रम दूर होऊन आकाश निरभ्र होणार आहे. प्रत्येक गोष्टीत दिशा मिळू लागेल . थोडक्यात मनाची हरवलेली उमेद गुरुमहाराजांच्या कृपेने पुन्हा गवसणार आहे.
गुरु ह्या शुभ ग्रहाने मेषेत प्रवेश केला असला तरी तिथे असलेल्या राहुकडे आपल्याला दुर्लक्ष्य करून चालणार नाही. राहू आणि गुरु दोघेही केतुच्याच नक्षत्रातून जाताना गुरु चांडाळ दोष ज्याला ब्रम्ह चांडाळ दोष सुद्धा म्हंटले जाते त्याची निर्मिती करणार आहे. मेष राशीत राहू हर्शल आहेतच त्यांच्या सोबत आता गुरु येणार आहे. पत्रिकेत जिथे मेष राशी आहे त्या भावाने दर्शवलेल्या गोष्टीत खूप आव्हाने आपल्या समोर आधीच आहेत पण आता तिथे गुरु आल्यामुळे थोडासा दिलासा मिळणार आहे. प्रत्येक वेळी गुरु राहू युती संपूर्ण वाईटच फळे देयील असे गृहीत धरू नये . राहू हा छल कपट करणारा मायावी आहे तर गुरु सात्विक तेचे प्रतिक. गुरूला त्याच्या मार्गातून परास्त करणे हेच राहूचे काम आहे. शनी आणि राहूच्या तावडीतून सुटून गुरूला आपल्या सचोटीच्या मार्गावर चालताना त्रास होणारच आहे .पण कुठल्यातरी प्रलोभनात फसवणे हे राहूचे काम तर गुरु हा ज्ञानाचा आणि आशेचा किरण दाखवणारा नैसर्गिक शुभ ग्रह आहे. त्यामुळे झालेला गुंता सोडवण्यात तो नक्कीच अग्रेसर असणार आहे. साधना , नामस्मरण आणि उपासना , अध्यात्मिक ग्रंथांचे वाचन ह्या काळात जितकी अधिक तितका फायदा अधिक . सप्टेंबर मध्ये राहू मीनेत गेल्यावर गुरु त्याची शुभ फळे देण्यासाठी संपूर्णपणे सक्षम होयील.
गुरु ची उत्तम फळे मिळण्यासाठी नामस्मरण , साधना थोडक्यात गुरुतत्वात आपण कसे समरसून जाऊ त्यासाठी प्रयत्नशील राहणे. ज्योतिष हे तारतम्याने वापरले तर ते सहज समजू लागते. वृषभ लग्नाला गुरु व्ययात येणार आहे . नैसर्गिक कुंडलीमध्ये व्ययात मीन राशी येते जिथे आपल्या शरीराची पाऊले येतात . वृषभ राशीच्या लोकांनी ह्या वर्षभरात गुरु पादुकांचे पूजन , मानसपूजा , पादुकांवर अभिषेक आणि दानधर्म केल्यास त्यांना नक्कीच त्याचा लाभ होयील .
गुरु कधीच कुणाचेही वाईट करत नाहीत , बघा ना आपले आईवडील हे आपले प्रथम गुरु आहेत .फक्त आपल्याला गुरु आणि गुरुतत्व समजले पाहिजेत आणि त्यांचा योग्य मान राखता आला पाहिजे. अहो ते देणारच ते द्यायलाच बसले आहेत आपल्याला घेता येत नाही किबहुना आपण त्यास पात्र ठरत नाही हा आपला दोष आहे. मग काही मनासारखे झाले नाही कि सगळ्यांच्या नावाने बोंबलायला आपण मोकळे . असो .
आयुष्यात वेळोवेळी कसोटीचे क्षण येतात आणि ते येतच राहणार पण ज्यांचा आपल्या गुरूंवर संपूर्ण विश्वास आहे त्यांना कश्याचीच भीती संदेह वाटायला नको. शंका कुशंका घेवून सेवेत राहूच नये. ह्या गुरु राशी परिवर्तनाचा विचार करताना मला काय मिळणार ह्यापेक्षा मी माझ्या गुरूना काय देणार ह्यावर लक्ष्य केंद्रित करुया .
अक्षय तृतीया , अक्षय म्हणजे अखंड . ह्या शुभ दिनी घडणारी प्रत्येक गोष्ट , दान अखंड राहते ,नाश पावत नाही असे म्हंटले जाते . अक्षय तृतीयेला होणारा गुरु बदल पारमार्थिक उन्नती करणारा आणि आपल्या सर्वांच्या आयुष्यात सुख समृद्धी उत्तम आरोग्याची अखंड बरसात करणारा असुदे हीच सदिछ्या .
संकलन : सौ. अस्मिता दीक्षित
संपर्क : 8104639230
No comments:
Post a Comment