Monday, 10 April 2023

सप्तम स्थानाची महती

 || श्री स्वामी समर्थ ||




विवाह म्हंटले कि आपले लक्ष आपोआपच पत्रिकेतील सप्तम स्थानाकडे जाते . सप्तम स्थान म्हणजे आयुष्यातील आणि  पत्रिकेतील मध्यबिंदू . मुलगा शिकून मिळवता झाला आपल्या पायावर उभा राहिला म्हणजेच विवाह योग्य झाला कि पालकांना त्याच्या विवाहाचे वेध लागतात . विवाह हा आयुष्यातील सर्वार्थाने होणारा मोठा बदल आणि त्याचे मार्गदर्शन करणारे सप्तम स्थान ह्या विषयी जाणून घेवूया .

पत्रिकेतील प्रत्येक स्थान शरीरातील एखादा अवयव , नाती आणि इतर अनेक गोष्टी सूचित करते. सप्तम स्थान हे मुख्यत्वेकरून जोडीदार कसा असेल ह्याबद्दल लक्ष्य वेधते . सप्तम स्थान हे मध्य बिंदू आहे म्हणजेच आयुष्याचा मध्य. ह्या वयात आचार विचार , वागणूक , समंजस पणा , समोरच्याला समजून घेण्याची मानसिकता , शारीरिक आर्थिक मानसिक वैचारिक आणि लैंगिक कुवत असणे आवश्यक आहे . ह्या सर्वाचा  विचार विवाह करताना होणे आत्यंतिक गरजेचे आहे . वरील सर्व कसोट्यांवर आपले अपत्य खरे उतरत असेल तर आणि तरच त्याचा विवाह करावा अन्यथा एखाद्या मुलीचे किंवा मुलाचे आयुष्य बरबाद करून आपल्याला काय मिळणार , नाही का?

एखादा मुलगा वयात आला म्हणजे त्याचे लग्न करा हे दिवस आता नाहीत . खरतर विवाह झाल्यावर पुढेच खरी मोठी आव्हाने असतात ती पेलण्याचे सामर्थ्य असायला हवे आणि ते असल्याची खात्री पालकांना हवी . आज समाजातील विभक्त होण्याची अनेक करणे पण त्यातील सर्वात महत्वाचे कारण “ संयम संपला आहे “ सगळे लगेच हवे आहे . असो ह्यावर पुन्हा लिहीन .आज सप्तम स्थान .

सप्तम स्थानामध्ये निसर्ग कुंडलीत तूळ रास येते .ह्या राशीचे बोध चिन्ह “ तराजू “ आहे. विवाहाच्या पूर्वी असणारी असंख्य नातीगोती विवाह पश्च्यात पण तशीच जपायची आहेत किबहुना नवीन आणि जुन्या सर्व नात्यांचा योग्य तो समतोल आयुष्यात राखता आला पाहिजे हेच जणू हा तराजू सूचित करत आहे . अर्धांगिनी आली म्हणून आधीच्या नात्यांना तिलांजली न देता नवीन नात्यांची त्यात गुंफण कशी योग्य रीतीने करता येईल हे जो पाहिल तो जिंकला. 

सप्तम स्थान आपल्या व्यवसायातील पार्टनर पण दर्शवतो म्हणा. तर सप्तम स्थान हे षष्ठ आणि अष्टम ह्यातील मधले स्थान आहे. षष्ठ स्थान म्हणजे रोग ऋण शत्रू तर अष्टम म्हणजे मनस्ताप आणि अचानक धनलाभ सुद्धा .विवाहाचा मुख्य उद्देश हा आपली वंशवेल वाढणे हा असला तरी हे नाते खर्या अर्थाने बहरले पाहिजे तरच ते फुलेल . आयुष्यात येणाऱ्या अनेक चढ उतार जसे एखाद्या गोष्टीसाठी कर्ज घ्यावे लागणे , येणारी आजारपण त्यातून होणारा मनस्ताप ह्या सर्वातून प्रवास करणारे हे सप्तम स्थान आहे. ह्या सर्व उण्या गोष्टीत सुद्धा आपल्या बेटर हाफ ची योग्य साथ असेल तर आयुष्य सुखमय होयील आणि नात्यातील गोडवा कायम राहील. हीच तर खरी सप्तम स्थानाची मेख आहे. 

सहजीवनाचा प्रवास मोठा असतो ,त्यात फक्त ती दोघ नाही तर त्या दोघांचे संपूर्ण कुटुंब , आप्तेष्ट असतात आणि ह्या सर्वांच्या सोबतीने केलेला तो दीर्घकालीन प्रवास असतो . म्हणूनच सप्तम स्थान खर्या अर्थाने समजून घेतले पाहिजे. ह्यातील ग्रह , जोडीदाराचा स्वभाव , त्याच्या आवडी निवडी , परस्परातील आकर्षण , मानसिकता दर्शवणारे हे स्थान महत्वाचे आहे आणि त्यातील विविध पेहलू समजून घेणेहि तितकेच आवश्यक आहे. 


लग्न म्हणजे आपण स्वतः आणि सप्तम म्हणजे समोरील जनता जनार्दन . एखादा व्यवसाय सुरु केला तर आपल्या दुकानात ग्राहक येणार कि नाही ह्याचा वेध ह्याच स्थानातून होतो. असो आज आपण फक्त विवाहाच्या अनुषंगाने हे स्थान अभ्यासात आहोत . 

आपल्या मुला/मुलीसाठी सुयोग्य जोडीदार पाहताना खालील गोष्टीं व्यवस्थित तपासून घ्याव्यात .

लग्नातील पापग्रह कारण त्यांची दृष्टी सप्तम स्थानावर असते . सप्तम स्थानातील पापग्रह आणि त्यावर दृष्टी टाकणारे शुभ अशुभ ग्रह , सप्तमेश कुठे आहे त्याची स्थिती ,सप्तम स्थान शुभ किंवा पाप कर्तरीत आहे का . सप्तम स्थानातील असणारे नीच / वक्री ग्रह . वैवाहिक सुखाचा ग्रह शुक्र ह्यांचाही अभ्यास असला पाहिजे. पत्रिकेतील गुरु आणि हजेरी लावणारा दशास्वामी काय सांगतोय ? पत्रिकेतील आत्म्याचा कारक रवी आणि मनाचा कारक चंद्र ह्यांची स्थिती महत्वाची आहे. हर्शल नेप ह्याकडे दुर्लक्ष नको . 

कुणी सांगून एखादी गोष्ट करणे आणि मनापासून करणे ह्यात फरक आहे म्हणूनच एखादा मुलगा मनापासून विवाहाचे नाते स्वीकारत असेल तर तो त्यांना निश्चित न्याय देयील पण ते लादले असेल किंवा मनाविरुद्ध असेल तर पुढे अनेक समस्या निर्माण होतील म्हणून मुलामुलींच्या मनाचा कल समजून घेणे आवश्यक आहे. एकदा विवाहात फसवणूक झाली तर मग लग्न आणि लग्नसंस्था ह्याबद्दल मुलांच्या मनात अढी निर्माण होते ती कायमची . इतरांचे मोडलेले विवाह पाहून सुद्धा अनेक जण विवाहाला तयार होत नाहीत असो. अश्यावेळी सप्तम स्थानाचा अभ्यास उपयोगी पडतो. 

आपल्या मुलांचे अवगुण पालकांना माहित असतात ते लपवून न ठेवता उघडपणे सांगितले तर नवीन नाते विश्वासावर निक्कीच उभे राहील . लग्न म्हणजे दोन मनाचे मिलन पण खरतर दोन कुटुंबांचे मिलन त्यामुळे हल्ली गमतीने कुटुंबातील इतरांच्याही पत्रिका बघा जुळतात का असे म्हंटले जाते .

सप्तम स्थान समजून घेतले तर विवाहाबद्दल मार्गदर्शन होईल आणि अनेक गोष्टींचा योग्य खुलासाही होईल . खरतर विवाह हा त्या दोघांचा असतो . सूर जुळले , मनोमिलन झाले तर पुढील प्रवास सुखाचा होतो आणि सहजीवनाचा आनंद वृद्धिंगत होतो .

संकलन : सौ. अस्मिता दीक्षित 

संपर्क : 8104639230

 

 

 



1 comment:

  1. ✍️🙏🤲😇 well articulated

    ReplyDelete