Monday, 13 November 2023

एक पाऊल पुढे

 || श्री स्वामी समर्थ ||



पाडव्याच्या नुसत्याच शुभेछ्या नाहीत तर विचार करायला लावणाऱ्या गोष्टींकडे लक्ष देऊन पुढील वर्ष खर्या अर्थाने समृद्ध करुया . आज जागतिक आव्हाने आणि त्यात भरडली जाणारी आपली युवा पिढी त्यातून स्ट्रेस वाढतोय . आपले  विचार अत्यंत खालच्या थराचे आणि मने  नको त्या अहंकाराने आणि अत्यंत टुकार गोष्टीनी भरलेली आहेत , त्या सर्व अहंकाराला , मत्सर , दुसर्यापेक्षा मी कसा सरस ह्या खोट्या अहंकारातून वाढीला लागलेल्या भावनांना आज तिलांजली देण्याचा प्रयत्न करुया . कुणाशी स्पर्धा आहे आपली ? जमले तर स्वतःशीच करा , तरच आयुष्य खर्या अर्थाने पुढे जायील. दुसर्याला कमी लेखणे बंद करा . मीच काय तो शहाणा ह्यामुळे स्वतःचीच शोभा होतेय ती करून घेवू नका. इतरानाही बुद्धी आहे , त्यानाही विचार शक्ती आहे त्यांच्याही मतांचा आदर करा . नुसते अविचारी ,आत्मप्रौढी मिरवणे नको , खूप झाले . नुसते बोलणे नको तर प्रत्यक्षात आणले पाहिजे तरच हे सर्व सण खर्या अर्थाने साजरे होतील . एकजुटीचा अभाव आहे त्यासाठी  खर्या अर्थाने प्रयत्नशील राहूया . 


प्रगत जगाचा भाग आहोत आज आपण जिथे यूट्यूब गुगल – विकिपीडिया वापरात आहोत . फेसबुक - लिंक्डइनची च्या मोठ्या गप्पा मारत आहोत . ट्विटर – इंस्टाग्रामच्या  जगात वावरत आहोत पण मने कोत्याच मनोवृत्तीची आहेत . परदेशातील रस्ते किती सुंदर हे सांगणारे आपण आपल्याच रस्त्यांवर बिनधास्त बिन बोभाट थुकत आहोत .


आजची युवापिढी तरुण मुलेमुली  हि सर्व आव्हाने समर्थपणे पेलत आहे , त्यांना पाठींबा द्या . त्यांना त्याचीच अधिक गरज आहे. त्यांच्या पाठीशी भक्कम उभे राहिलो तर समर्थ भारताची निर्मिती आपल्या हयातीत आपल्याला पाहायला मिळेल. आज तरुण पिढी घर , नोकरी ह्याच प्रश्नात अडकून आहे . कर्तुत्व असूनही जीवघेण्या स्पर्धेचा भाग होणारी आणि त्यातून निर्माण झालेल्या चिंतेमुळे व्यसनांकडे झुकणारी , घरासाठी कर्ज देणार कोण आणि मिळाले तर फेडणार कसे ,त्यात असंख्य इमारती पुनर्विकासात अडकलेल्या , मुलांचे विवाह तोंडावर आहेत ह्या सर्व चिंता आणि व्यथा हे आजकालची तरुणाई समोरील आव्हान आहे आणि ते त्यांच्या पद्धतीने सोडवत आहेत , त्यांच्या पाठीवर विश्वासाची थाप हवी आहे .पुढे जाण्यासाठी त्यांना बळ हवे आहे . अनेक सुसंस्कृत कुटुंबातील युवक आज खरच उत्तम माणूस असूनही व्यसनाधीन होताना दिसत आहेत पण त्याची कारणे शोधली आहेत का आपण कधी ? त्यांची मजा पाहण्यापेक्षा त्यांचे मन आणि मते समजून घेतली आहेत का आपण कधी ? त्यांना त्यातून बाहेर काढण्यचा खर्या अर्थाने एकदातरी प्रयत्न केलाय का आपण ? उत्तर आहे कधीही नाही . 


आपल्या आजूबाजूला घटनांचा , समाजाचा आपण सुद्धा एक भाग आहोत त्याचे भानच हरपून जात आहे आज. मी आणि माझे आयुष्य असे नसते आणि कधी नव्हतेच . जाती जमातीमध्ये आणि वैयक्तिक राजकारणातून क्लेश निर्माण होतात  आणि नाती तुटतात तीही कायमची. एकजूट कुठेच दिसत नाही दिसते ती फक्त इर्षा , दुसर्यापेक्षा मी कसा शहाणा हे सिद्ध करण्यात उभी हयात जाते आहे आपली आणि काय आदर्श ठेवणार आपण आपल्या पुढील पिढीकडे ? हाच का कि समोरच्याच्या मतांचा आदर न करता त्याच्या विरुद्ध सतत उभे राहून नको त्या गोष्टीना प्राधान्य देत बसा. अहो जग कुठे चालले आहे पहा जरा .


आपले चिमुकले जग आहे त्यातून जरा बाहेर या मोकळा श्वास घ्या , सामाजिक आर्थिक मानसिक राजकीय सर्व स्थरांवर प्रचंड बदल उलथापालथ होत आहे. इंटरनेट मुळे जग जवळ आले आहे पण आपली मने ? त्यांचे काय ? ती खरच जवळ आली आहेत का? सतत दुसर्याचा दुस्वास ,अपमान करत राहणे . पराकोटीचा अहंकार जपत आणि जोपासत आहोत आपण . हो हो अगदी रोज तेच करत असतो आपण आणि त्यातून अधोगती होत आहे कुणाची ? तर आपली स्वतःचीच . जरा थोडेसे ब्रोड माइंडेड व्हा आणि डोळसपणे जगाकडे पहा , स्वतःच्या चुका स्वीकारण्यात अजिबात कमीपणा नाही त्यातून झालीच तर प्रगतीच होईल आपली आणि सर्वांचीच .


धन्यवाद देवूया आजच्या प्रगत युगाला , संशोधनाला आणि संशोधकांना . किती आयुष्य आहे आपले अजून ? गेलेला वेळ गेलाच आहे पण जो हातात आहे त्यात अनेक गोष्टी करता येण्यासारख्या आहेत . आज एकत्र ( तन मन धन ) येण्याची खर्या अर्थाने गरज आहे . पण त्यासाठी खोट्या अहंकाराची कवचकुंडले टाकून द्यावी लागतील . जमणार आहे का? जमवावेच लागेल . बदल एका क्षणात सुद्धा घडतो , अशक्य काहीही नाही आणि नसणार आहे . आपण पृथ्वीतलावर यायच्या आधीही सर्व छान चालू होते आणि आपण गेल्यावर सुद्धा अगदी तसेच किबहुना अधिक छान चालू राहणार आहे तेव्हा स्वतःला महत्व देणे प्रथम बंद केले पाहिजे . मीच काय तो बाकीचे मूर्ख आणि आपल्याशिवाय सगळ्यांचे अडते ह्या खोट्या कल्पना विश्वातून बाहेर या .त्यात आपले भलेच आहे. जीवन सुंदर आहे माणसे तोडू नका तर जोडा .


माणूस कुठेही असो कसाही असो विचारधारा बदलली पाहिजे . अशक्य काहीच नाही पण ते करण्याची आंतरिक कळकळ हवी इतकेच . आज एकमेकांबद्दल प्रेम ओढ माणसातील माणुसकीच संपत आली आहे . नुसते फालतू मेसेज इथून तिथे पाठवायचे . कुणाला फोन करायचा नाही कुणाचा उचलायचा नाही . कुठलाही पुढचा मागचा विचार न करता चांगल्या लोकांशी संबंध तोडून टाकायचे . समोरच्याने फोन केला मेसेज केला तरच मी करणार , कीव करावीशी वाटते अश्या लोकांची .माणसांशिवाय अस्तित्व शून्य आहे आपले . पण आज घरी कुणी यायला नको आपल्याला कुणाकडे जायचे नाही सगळे अगदी सिक्रेट ठेवायचे. कसले डोंबलाचे सिक्रेट .  एक दिवस अश्या लोकांचा फोन वाजणे बंदच होईल. कारण तुम्ही मी मी मी करत बसणारे स्वतःच्याच धुंदीत मश्गुल आहात .तेच करा मग . आपल्याच आयुष्याची सगळ्यांना पडली आहे ह्या भ्रामक कल्पनातून बाहेर या आणि मोकळ्या खुल्या दिलाने जगुन बघा, मोकळा श्वास घ्या , माणसे नाती जोड तेच आयुष्य अत्यंत सुरेल होईल .


अत्यंत कोत्या मनोवृत्तीची लोक ह्या सर्वावर टीका नक्कीच करतील , होवूदे टीका पण त्यातील काही जण तरी डोळसपणे ह्याचे वाचन आणि मनन करतील. एकात जरी बदल झाला तरी लेखन प्रपंच फळास गेला असे समजूया. मनावरची जळमटे दूर करायची वेळ आली आहे .

 

आज प्रतिपदा , सर्वाना नवीन वर्षाच्या मनापासून शुभेछ्या . येणारे वर्ष आपल्या संकल्प पूर्तीचे असुदेत उत्तम उपासनेचे , ध्येयाकडे वाटचाल करणारे , आर्थिक घडी बसवणारे , माणसांशी कनेक्ट करणारे , इतरांना प्रेरित करणारे कार्य हातून होणारे ,  उत्तम आरोग्याचे असुदे हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना .


सौ. अस्मिता दीक्षित 
संपर्क : 8104639230 


No comments:

Post a Comment