Thursday, 23 November 2023

उत्तम ज्योतिषी व्हायचे आहे ?

 || श्री स्वामी समर्थ ||



आज ज्योतिष शास्त्राचा प्रसार आणि अभ्यास जगात सर्वत्र चालू आहे. हे इंटरनेट चे युग असल्यामुळे सोशल मिडिया प्रगत आहे आणि म्हणून ह्या शास्त्राच्या अभ्यासाला आणि प्रसाराला गती मिळाली आहे. असो.

 

आपल्या भविष्यात काय घटना घडतील ह्याची उत्सुकता कमी अधिक का होईना पण प्रत्येक व्यक्तीला असतेच असते . ज्योतिष शास्त्र आहे कि नाही ह्याबद्दल अनेक जणांची अनेक मते आणि मत प्रवाह आहेत अर्थात आज आपण त्याबद्दल विचार करत नाही . पण आज अनेक जण ह्या शास्त्राचा अभ्यास करताना दिसत आहेत हि आनंदाची बाब आहे. 


अनेकदा एक उत्सुकता म्हणून आपण ह्या शास्त्राचा अभ्यास करतो . काही जण ह्या शास्त्राच्या उत्सुकतेपोटी त्याचा अभ्यास करतात . काही फक्त कुतूहल म्हणून ह्याचा अभ्यास करतात आणि मग अभ्यासाची खरच गोडी लागते आणि पुढे सखोल अध्ययन करताना दिसतात . अनेकवेळा एखाद्याच्या आयुष्यात एखादा मन हेलावून टाकणारा प्रसंग घडतो आणि तो का घडला ह्याचा शोध घेण्यासाठी सुद्धा ह्या अभ्यासाकडे वळणाऱ्या लोकांची उदा आहेत . 


ज्योतिष शास्त्राचा अभ्यास सखोल आहे आणि तो करायचा असेल तर वरवरचा करून चालणार नाही. त्यासाठी अथक परिश्रम , अध्ययन , संशोधक वृत्ती , समर्पण आणि ह्या शास्त्राबद्दल तळमळ असेल तरच अध्ययन उत्तम होईल अन्यथा सर्व फोल आहे. आजकाल दोन पुस्तक आणि एखाद दुसरी  कार्यशाळा करून सुद्धा लोक स्वतःला ज्योतिष समजू लागले आहेत . असो तर सांगायचे असे कि ज्योतिष नामक महासागरात उडी मारली कि न संपणारा अभ्यास सुरु होतो आणि तो करताना उपासनेची जोड पण लागते . नुसती पुस्तके प्रवचने आणि कार्यशाळा करून ज्योतिष होता येत नाही . स्वतःचे योगदान लागते . २४ तास डोळे कान उघडे ठेवायला लागतात , निसर्गाशी एकरूप व्हावे लागते कारण तोच आपल्याला उत्तरे देत असतो .


आपल्या कडे आलेल्या जातकाचा , त्याच्या मानसिक जडण घडणीचा , व्यक्तिमत्वाचा  एखाद्या प्रसंगात तो जातक काय आणि कसा वागेल ह्या सर्वच सखोल अभ्यास करावा लागतो मग त्याचा प्रश्न कुठलाही असो. 

ते तर्कशास्त्र आहे त्यामुळे एखाद्याचे लॉजिक उत्तम असावे लागते . पत्रिकेतील ग्रहतारकांशी संवाद साधण्याची कला अवगत झाली तर जातकाच्या प्रश्नांची अचूक उत्तरे देता येतील. आपल्याला हे शास्त्र अवगत आहे ह्याचा तसूभरही अहंकार नसावा , प्रत्येकानं स्वतःला अभ्यासक समजावे कारण हे इतके दिव्य शास्त्र आहे आणि महासागरासारखी त्याची व्याप्ती आहे त्यामुळे पूर्ण हयातीत सुद्धा त्याचे संपूर्ण आकलन होणे कठीण आहे. आपले भाकित बरोबर ठरले तर अहंकाराचा वारा लागू नये आणि चुकले तर पुनश्च अभ्यास करावा.


आज आपण पत्रिकेत उत्तम ज्योतिषी होण्याचे काही ग्रहयोग बघुया . तर्कशास्त्र म्हणजे बुद्धीशी संबंध म्हणून अर्थात बुध आणि ज्ञानाचा कारक गुरु हे सुस्थितीत असावेत. लग्नेश बलवान असणे अत्यावश्यक आहे तसेच त्याचा संबंध अष्टमेशा सोबत असावा. शनी हा सुद्धा अति महत्वाचा ग्रह आहे. शनीचा संबंध अष्टम भावाशी असेल आणि गुरु बुध बलवान असतील त्याचसोबत शनी गुरूने दृष्ट असेल तर व्यक्तीची शास्त्रात उत्तम प्रगती होते. अष्टम पंचम भावाच्या दशेत तसेच राहूच्या दशेत उत्तम ज्योतिषी  तयार होण्याचे योग असतात . शनी नेप युती किंवा नवपंचम योग तसेच अंतर्स्फुर्तीचा कारक नेप ची भाग्येश ग्रहासोबत युती किंवा शुभ योग ह्या शास्त्राच्या अध्ययनाला पूरक ठरतात . थोडक्यात बुध गुरु चंद्र नेप शनी केतू अभ्यासावेत .

एखादी घटना का घडली हे पाहताना त्या घटनेच्या खोलाशी जाण्याची जिज्ञासू वृत्ती हवी . उदा . कुणीही जन्मतः व्यसनी नसते तर त्याच्या आयुष्यातील एखादा कालखंड आणि त्यात घडणाऱ्या घटनांमुळे तो व्यसनाकडे वळलेला असतो . उगीच उठसुठ कुणी व्यसनी होत नाही. कमकुवत मानसिकता , आयुष्यातील कठीण स्थितीला तोंड देण्यास असमर्थ , आव्हाने पेलण्याची कुवत नसणे , आर्थिक कुचंबना अशी अनेक करणे त्यास असू शकतात . तेव्हा ह्यातील कुठले कारण आहे ते शोधता आले पाहिजे आणि त्यातून जातकाला बाहेर सुद्धा काढता आले पाहिजे . अनेकदा प्रश्नाच्या मुळाशीच त्याचे उत्तर सुद्धा असते . असो सांगायचे तात्पर्य जातकाच्या प्रश्नाच्या मुळापर्यंत जाता आले पाहिजे आणि म्हणूनच पत्रिकेतील ग्रहांची बैठक कशी आहे हे समजले पाहिजे. ग्रह आपले वाईट करण्यासाठी निश्चित नाहीत . एखादा पापग्रह सुद्धा आयुष्यात आपल्याला खूप उंचीवर नेण्यास कारणीभूत ठरतो .

अजूनही लिहिता येण्यासारखे खूप आहे तूर्तास इथेच पूर्णविराम देते .

सौ. अस्मिता दीक्षित 

संपर्क : 8104639230  


No comments:

Post a Comment