|| श्री स्वामी समर्थ ||
आजकालच्या जगात सर्वात श्रीमंत तोच माणूस असतो ज्याला कुठलेही आजार नाहीत . हे माझे वैयक्तिक मत आहे. पण ते तुम्हालाही पटेल . कुणाच्याही ऋणात म्हणजे कर्जात नसणे , कसलाही आजार नसणे आणि कुणाशीही शत्रुत्व नसणे ह्यासारखे सुख ते काय ? अर्थात हे सर्व अगदी 100% सही होणार नाही हे खरे , पण झाले तर त्यासारखा आनंद नाही.
आपल्या ऋषीमुनींनी निसर्ग कुंडली किती विचारपूर्वक तयार केली आहे खरच. ह्या निसर्ग कुंडलीतील षष्ठ भाव म्हणजेच रोग ऋण शत्रू भाव ह्याबद्दल आज जाणून घेवूया .
पत्रिकेतील 12 भावांची माहिती अगाध आहे. प्रत्येक भावाचे आपल्या आयुष्यात काही ना काही योगदान आहे . आपल्या संपूर्ण शरीराचे अवयव सुद्धा इथे प्रत्येक भावातून ज्ञात होतात . षष्ठ भाव हा महत्वाचा भाव . अर्थ त्रिकोणातील हा गाभा आहे. मुलगा शिकला कि अर्थात त्याला अर्थार्जनाकडे वळायला लागते . साहजिकच आहे स्वतःच्या पायावर उभे राहणे आणि स्वावलंबी होणे महत्वाचे आहे. त्यामुळे नोकरी साठी हा भाव पाहावा लागतो . ज्यांना षष्ठ भावाची दशा आहे त्यांनी नोकरी जाण्याची चिंता कधीच करू नये . तुम्ही सोडल्याशिवाय नोकरी जाणार नाही . अर्थ त्रिकोण म्हणजे पत्रिकेतील 2 6 10 भाव . दशम भावावरून आपण नोकरी धंदा कुठला करणार ते समजते , आपली कारकीर्द किती उंची गाठणार , किती वेळा नोकर्या बदलणार त्याचा अंदाज येतो तसेच नोकरी व्यवसायाचे स्वरूप कसे असेल ते समजते. व्यवसाय भागीदारीत करावा कि एकट्यानेच किंवा करूच नये कारण तो फळणार नाही ह्याबद्दल इथेच उहापोह होतो.
आजकालच्या जीवनात वेळ हा महत्वाचा असतो , चाकरमानी मंडळी सकाळी लवकर उठून कामाला निघतात आणि रात्री उशिरा घरी परत येतात त्यामुळे दिवसभरात अनेकदा जिथे मिळेल ते पोटात ढकलून तात्पुरती भूक भागून घेणे पण त्याचा दुरगामी परिणाम चांगला होत नाही आणि अनेक आजारांची नांदी त्यातून होत जाते . पूर्वीच्या काळी लोक अंग मेहनतीचे काम खूप करत पण आता एक मोबाईल घेऊन किंवा टीव्ही समोर तासंतास बसून राहणे ह्यामुळे पचनशक्ती बिघडून अनेक व्याधी जडतात , तसेच वर्टिगो , मानसिक समस्या होतात ह्या सर्वाचा परामर्श घेणारे हे षष्ठ स्थान आहे. आपले आजोळ सुद्धा ह्या भावातून पहिले जाते.
षष्ठ भाव म्हणजे रोजचे आयुष्य ज्याला आपण “ डे टू डे लाईफ “ म्हणतो. मग रोजच्या आयुष्यात जे होते ते सर्व इथूनच पाहावे लागते जसे रोज आपण नोकरीसाठी जातो . रोज ऑफिस ला जातो म्हणून महिन्याच्या अखेरीस पगार मिळतो. रोज आपल्याकडे मोलकरीण येते , आपल्या घरातील प्राणी , पक्षी तसेच घरातील झाडे झुडपे ह्यानाही रोज पाणी लागते .ह्या सर्व गोष्टी रोज नियमित होत असतात म्हणून षष्ठ स्थान महत्वाचे आहे.
आयुष्यातील प्रगती होते तशी शत्रुहि निर्माण होतात , ह्या भावावरून आपले शत्रुत्व कुणाशी कसे हे पहिले जाते. कोर्ट केसेस मधून मिळणारे यशापयश , नोकरचाकर , नोकरीत मिळणारा दुय्यम दर्जा , रोजचे आयुष्य इथून पाहतात .ऋण काढून सण साजरे करू नये अशी म्हण असली तरी अनेकदा शिक्षण , विवाह , आजारपण ह्या साठी कर्ज काढावे लागते . कर्ज मिळणार कि नाही हे हा भाव दर्शवतो .हे सप्तम भावाचे व्यव भाव आहे त्यामुळे पत्नीपासून होणारा वियोग इथे दिसतो .
षष्ठ भाव हा त्रिकभाव आहे. इथे पापग्रह अधिक फळतील . शनी हा प्रत्येक गोष्टीत विलंब करणारा ग्रह आहे आणि तो षष्ठात असेल तर आजार इतकं बळावतो किंवा त्याचा कंटाळा येतो आणि अनेकदा परलोकाची वाट धरायला सुद्धा भाग पाडतो. षष्ठ भावात चंद्र असेल तर प्रकृती नाजूक असू शकते , ऋतू बदलला कि ह्यांना लगेच सर्दी पडसे होते . षष्ठ भावावरून आपल्या रोजच्या ( अर्थात चुकीच्या )जीवनशैलीतून निर्माण होणारे आजार आणि अष्टम भावातून अनुवांशिक आजार .
षष्ठ हे दशमाचे भाग्य आणि भाग्याचे दशम आहे . वडिलांची सांपत्तिक परिस्थिती आणि आजारही इथून ज्ञात होतात .
लग्नेश षष्ठात असेल तर स्वतःच्या चुकीच्या निर्णयामुळे आयुष्यभर नुकसान सोसावे लागते . षष्ठेश लग्नात आणि तोही मंगळ असेल तर पोलीस खात्यात नोकरी साठी उत्तम लाभ देतो. षष्ठेश षष्ठात किंवा अष्टमात , व्यय भावात विपरीत राजयोगाची निर्मिती करतो. षष्ठेश सप्तम भावात योग्य नाही . अश्या लोकांच्या वैवाहिक जीवनात कलह , वादळे निर्माण होतात तसेच भागीदारीत यश मिळत नाही. षष्ठात चंद्र असेल तर समाजात प्रसिद्ध आवडते असतात कारण ते दशमाचे भाग्य आहे. पण षष्ठातील चंद्र प्रकृतीला विशेषकरून शनीने दृष्ट असेल तर कफाचे आजार देतो.
ग्रह हे त्यांच्या दशा अंतर्दशेत फळे अधिकतम देतात .
पत्रिकेतील प्रत्येक भाव आपले विशिष्ठ अधिष्ठान आणि अधिकार ठेवुन आहे त्यामुळे कुठलाच भाव दुसर्या कुठल्याही भावापेक्षा कमी नाही . प्रत्येकाची एकमेकांत असलेली गुंफण आयुष्याला खरा अर्थ प्राप्त करून देते.
सौ. अस्मिता दीक्षित
संपर्क : 8104639230
No comments:
Post a Comment