|| श्री स्वामी समर्थ ||
आपले आयुष्य हे सर्वार्थाने कुणाचे आहे तर आपले . मनुष्य स्वभावाप्रमाणे काहीही वाईट स्वीकारायला आपले मन तयार नसते . काहीही चांगले झाले कि त्याचे श्रेय घ्यायला आपण सगळ्यात पुढे असतो . आपल्या आयुष्यात घडणाऱ्या प्रत्येक चांगल्या आणि वाईट गोष्टीना आपण स्वतः आणि आपली पूर्व कर्म जबाबदार असतो . पण ती जबाबदारी स्वीकारायचे धाडस मात्र आपल्या अंगी नसते .
आयुष्यभर प्रत्येक गोष्टीत दुसर्याला दोष देत बसण्यात शहाणपणा नसतो तर प्रत्येक घटनेचा कृतीचा सारासार विचार करून ती तशीच्या तशी स्वीकारणे हेच अभिप्रेत असते जे आपल्याकडून होत नाही. माझ्या आयुष्यात जे जे काही घडत आहे त्या सर्वाला इतर कुणीही दोषी नसून मी स्वतः आहे हे जितक्या लवकर आपण स्वीकारू आयुष्य सुखाकडे प्रवास करू लागेल . आपले नामस्मरण ह्यात निश्चित मदत करते . जितके नाम घेवू तितके आपल्या आतमध्ये बघायला शिकू , हा जन्म आपल्या पूर्व कर्मांचा आरसा आहे. चांगल्या कुळात जन्म मिळणे , उत्तम कुटुंब कुटुंबात एकमेकांच्याबद्दल असलेले प्रेम अबाधित राहणे ,उत्तम शिक्षण , संस्कार , राहणीमान आणि कुटुंबियांचे प्रेम मिळणे हे भाग्य आहे. पुढे मनासारखी नोकरी , अर्थार्जन , आपल्या गुणांचे कौतुक आणि अर्थार्जनाच्या रुपात त्याचे चीज होणे चांगला जोडीदार मिळून आयुष्यातील आनंदाची चव चाखता येणे , भरपूर प्रवास , देवदर्शन आणि योग्य गोष्टी त्या त्या वेळेस मिळणे हे भाग्य आहे. आणि ते आपल्या पूर्ण आयुष्यातील चांगल्या केलेल्या कर्मांचा परिपाक आहे.
ह्याउलट जेव्हा गोष्टी मनासारख्या घडत नाहीत तेव्हा मनुष्य नेहमीच दुसर्याला दोष देत राहतो . पण माझ्याच बाबत हे का घडले. माझे कुठे चुकले ह्याचा विचार केला तर दुसर्याला दोष देणे थांबेल . प्रत्येक कृतीमागे आणि विचार मागे आपण स्वतःच असतो ह्याचा अर्थ उमगतो तो नामातून .
नामस्मरणाचे अनन्य साधरण असे महत्व सांगितलेले आहे ते ह्याच साठी कि आपली आपल्याला ओळख होण्यास मदत व्हावी. मी ह्याच कुळात का जन्म घेतला मला व्यसनी नवरा का मिळाला , माझा घटस्फोट का झाला , मला अपत्य का नाही , चांगले जीवन नाही , आर्थिक कुचंबना का आहे , चिडचिडा स्वभाव का आहे , असे काय आहे जे मला हवे आहे पण मला ते मिळताच नाही म्हणून मी इतरांचा द्वेष करत आहे , अनेक इच्छांची पुर्तता न झाल्यामुळे आयुष्यात आलेले रितेपण , कर्तेपणाची भावना पण अहंकार ह्यामुळे मिळालेला एकटेपणा , संसार आहे पण टिकवता आला नाही ह्याला जबाबदार कोण ? तर मी स्वतः ..जे इतके मोठे सूर्य प्रकाशा इतके सत्य स्वीकारायला पण अंगी खरेपणा लागतो . इथेच आपल्यावर केलेल्या संस्कार दिसतात .
जे जे काही मिळणार आहे ते तुमच्याच कर्माने आणि जे जे ओंजळीतून निघून जाणार आहे तेही तुमच्याच कर्माने . देवाने दिले पण ते सांभाळता आले नाही , मग तो पैसा असो कि माणूस ...शेवटी ते राहिले नाहीच मग ह्याचा दोष कुणाचा तर आपला स्वतःचाच .
तरुणपणी मनुष्य बेभान होवून वागतो , हातपाय धड असतात , मनात उमेद असते पुढे जाण्याची आणि एका वेगळ्याच इर्षेत जीवन पुढे जात असते पण अचानक ब्रेक लागल्यासारखे सगळे कोलमडून पडते तेव्हा लगेच ह्याने हे असे केले त्याने तसे केले म्हणून हे सर्व असे झाले . कुणीही काहीही केलेले नाही. जे जे काही घडले , घडत आहे आणि भविष्यातही घडणार आहे ते तसेच घडणार होते कारण ती तुमच्या पूर्व कर्माचीच फळे आहेत जी तुमच्या कर्माने तुम्हालाच चाखायची आहेत . आयुष्याच्या संध्याकाळी पैसा तर हवाच पण त्याही पेक्षा गरज असते ती माणसांची . कुणीतरी बोलायला लागते सहवास लागतो . पण त्याचा विचार तरुणपणी केलेला नसतो आणि विचार करावासा वाटतो तेव्हा कुणीही जवळ नसते हि खरी शोकांतिका आहे. पैसे फेकून माणसे कायमची धरून ठेवता येत नाहीत , माणसे कमवावी लावतात ,
एखाद्याच्या आयुष्यात काहीतरी वाईट झाले कि आपण हळहळतो पण त्याची कर्म पहिली तर झालेली शिक्षा कमीच वाटते .आयुष्यभर ना पैसा सांभाळता आला न माणसे , मग आयुष्याच्या शेवटी उरतो तो फक्त पोकळ अहंकार जो माणसे जोडू शकत नाही हे नक्की . एखादी गोष्ट स्वीकारायला तसेच दुसर्याला माफ करायला सुद्धा मोठे मन , धाडस लागते . ते नसेल तर शेवटी जवळ ना माणूस उरतो ना पैसा . शेवटी चार माणसे लागतात आपल्याला पोहोचवायला आणि ती जमवायला आयुष्य खर्ची करावे लागते . आयुष्यभर अनेकदा चूक असो अथवा नसो पडते घ्यावे लागते . तू माझ्या आयुष्याची वाट लावलीस तुला माफ करणार नाही हे बोलणारे तुम्ही आम्ही कोण ??????????? उलट असा विचार करा हे सर्व माझ्याच बाबत का घडतेय कारण मी तसे पूर्वजन्मी कर्म केले आहे म्हणून. साधे सोपे गणित आहे. विचारणा शुद्ध करा मन शुद्ध होईल आणि मन निर्मळ झाले तर पाणी वाहते होईल म्हणजे विचार साचून राहणार नाहीत आणि तसे झाले तर कुठलेही मानसिक शारीरिक आजारही होणार नाहीत . आपली जिव्हा हि माणसे जोडायला दिलेली आहे तोडायला नाही ह्याचे भान ठेवले तर आयुष्य अनेक अर्थानी सुसह्य होईल .
तात्पर्य आपले आयुष्य हे आपल्या कर्माभोवतीच सीमित आहे. जसे कर्म तसे फळ हा साधा सोप्पा नियम आहे त्यामुळे आपल्या आयुष्यात जे जे काही घडत आहे , घडले आहे आणि पुढे अंतिम श्वासापर्यंत घडणार आहे त्याला सर्वस्वी आपण स्वतःच जबाबदार आहोत . पास झालो तर श्रेय आपल्याला आणि कमी मार्क मिळाले तर पेपर कठीण होता ..असो . तुमच्या दुक्ख वेदना एकटेपणा जे काही असेल त्याला दुसरा दोषी असूच शकत नाही. ती आपलीच कर्म फिरून आपल्याला शासन करत असतात ह्याचा विचार का आणि आपल्या चुका मोठ्या मनाने स्वीकारा . जो हे करेल तो महासुखी होईल.
आपणच आपल्या माणसांशी किती वाईट वागलो आहोत ह्याचा विचार आयुष्याच्या संध्याकाळी एकटे पडल्यावर करण्यापेक्षा खूप आधी केला तर शेवटचा क्षण सुखात जायील. काही लोकांचा कितीही शिक्षा झाल्या तरी सुंभ जळला तरी ...अशी अवस्था असते त्याला कोण काय करणार .
शेवटी तुज आहे तुझ्यापाशी ....हेच सत्य आहे...त्रिवार सत्य ...
सौ. अस्मिता दीक्षित
पत्रिकेसाठी संपर्क : 8104639230
No comments:
Post a Comment