Friday, 15 August 2025

लग्नातील “ Harmony “ टिकवणारा “ शुक्र “

 || श्री स्वामी समर्थ ||

काही दिवसापूर्वी मला एका जातकाचा फोन आला. म्हणाल्या विवाहित जोडपे आहे पण अजून मुलबाळ नाही कारण काय तर अजून दोघे एकत्रच आलेले नाहीत . अश्या गोष्टी अनेकदा ह्याही पुर्वी ऐकल्या आहेत . विवाह हा एकमेकांच्या पसंतीने झालेला असतानाही अशी वेळ का यावी .

वैवाहिक सुख आणि भिन्नलिंगी आकर्षण दर्शवणारा ग्रह म्हणजे “ शुक्र “ सर्वप्रथम नजरेसमोर येतो. विवाहाची पहिली वीट रचणारा शुक्रच असतो. मुलीला मुलगा आणि मुलाला मुलगी प्रथम हळूच पाहते आणि मनोमन एकमेकांना वरतात , लाजून हसतात वगैरे , तर हि कळी खुलवणारा शुक्रच असतो .

दोघांच्याही पत्रिका गुण मिलन केल्यावर ग्रह मिलन करताना प्रामुख्याने शुक्र तपासावा लागतो . दोघांच्या मध्ये असणारे प्रेम खुलते ते आकर्षणं असेल तरच . शारीरिक आकर्षण नसेल तर पुढे त्या विवाहाची परिणीती काय होणार त्याचा अंदाज बांधू शकतो . हे आकर्षण क्षणिक नसले पाहिजे म्हणजेच निव्वळ शारीरिक ओढ नसावी तर प्रेमाचे धागे विणले जाणारे प्रेम हवे तरच विवाह दीर्घकाळ टिकेल .

दोघांच्याही आचार विचारातील साधर्म्य सुद्धा महत्वाचे आहे . जीवनाकडे बघण्याचा दृष्टीकोन , प्रवासाच्या कल्पना त्याची नेमकी स्थळे , संसारातील गोडवा माधुर्य , खाण्यापिण्याच्या चोखंदळ आवडी , गुंतवणुकीचे विचार , एकमेकांचे छंद आणि त्यासाठीचे अपेक्षित सहकार्य , एकमेकांना पुरेसा वेळ देणे म्हणजे फक्त शारीरिक संबंध नाही तर एकमेकांचे होऊन जगणे , मन जपणे . एकमेकांच्या विचारात अति भिन्नता असेल तरीही संसार पुढे जाताना त्रासदायक होतो. संसार आनंदाने झाला पाहिजे , मनापासून केला पाहिजे तो लादला गेला नसावा.

लग्नातील “ Harmony “ टिकवायची असेल तर शुक्र ह्या ग्रहाची संमती असलीच पाहिजे. दोघांच्याही पत्रिकेतील शुक्र एकमेकांना पूरक असला पाहिजे . दोघांच्याही पत्रिकेत शुक्र एकाच ठिकाणी असेल तर चांगलेच. शुक्र प्रतियोगात नको . मुलाच्या कुंडलीत जिथे शुक्र आहे तिथे मुलीचा रवी नसावा . जिथे मुलाचा शुक्र आहे तिथे मुलीचा चंद्र असेल तर काही कालावधीनंतर मानसिक संघर्ष सुरु होतो आणि वैवाहिक जीवन भावनात्मक दृष्टीने डगमगू लागते . मुलाचा शुक्र आहे तिथे मुलीचा मंगळ असेल तर प्रेम आकर्षण ओढ अधिक असते. शुक्र असेल तिथे पत्नीचा बुध नसावा नाहीतर नाते टिकताना दिसत नाही . शुक्र असेल तिथे स्त्रीचा गुरु असेल तर एकमेकांच्यात बौद्धिक वाद होतील पण नाते टिकेल . शनी असेल तर मात्र विवाह खूप वर्ष टिकतो कारण शनी हा परिपक्व ग्रह आहे. Matured planet आहे. एकमेकांना समजुतीने घेतील. राहू असेल तरी विवाह टिकेल पण केतू असेल तर अजिबात सौख्य मिळणार नाही . केतू शुक्राला शुष्क करेल .

ह्या व्यतिरिक्त मुलाच्या किंवा मुलीच्या पत्रिकेत शुक्र हा ग्रह शनी राहू केतू हर्शल नेप ह्या ग्रहांनी दुषित झाला असेल तर वैवाहिक सुखाचे बारा वाजू शकतात . शेवटी आयुष्यातील आनंदाचा स्त्रोत म्हणजे शुक्र आणि जिथे त्यालाच ग्रहण लागते तिथे सुखाची होळी झाल्याशिवाय राहत नाही आणि म्हणूनच अत्यंत लक्षपूर्वक पत्रिका मिलन करावे लागते .

विवाह एकदाच होत असतो. विवाह हा फक्त त्या दोघांचे नाही तर एकंदरीत कुटुंबातील आनंद , सौख्य वृद्धींगत करणारा आणि दोन मने , कुटुंबे जोडणारा असल्यामुळे तो घाई घाई करून उरकून टाकू नये म्हणजे पुढील विघ्ने टळतील . सहमत ?????????

सौ. अस्मिता दीक्षित

पत्रिकेसाठी संपर्क : 8104639230

No comments:

Post a Comment