Monday, 1 May 2023

ब्रम्ह चांडाळ दोष कि योग ? – दृष्टीकोण बदलण्याची गरज

 || श्री स्वामी समर्थ ||


देवगुरु बृहस्पती म्हणजे ज्ञान , विद्या , बुद्धी ,अध्यात्म , उपासना , संतती ,धन , धर्म ह्या सर्व गोष्टी प्रदान करणारा अत्यंत नैसर्गिक असा जीवकारक शुभग्रह आहे त्याउलट राहू हा छलकपट करणारा दैत्य मायावी राक्षस आहे . धर्म आणि अधर्म ह्याची युती दर 7-8 वर्षात होत असते आणि त्याला आपण “ चांडाळ युती “ म्हणून संबोधतो . नावा प्रमाणेच हि युती नकारात्मक आहे हे सर्वश्रुत आहे. पण डोळस पणे विचार करता प्रत्येक शुभ ग्रह हा संपूर्ण शुभ फळे देत नाही जसे चंद्र . तो बिघडला तर निद्रानाश , वेड लागणे , मानसिक आजार सुद्धा देतो . एखादा हुशार विद्यार्थी वाईट संगतीमुळे एखाद्या परीक्षेत नापास होतो किंवा नेहमीपेक्षा कमी मार्क मिळवतो अगदी तसेच आहे हे. 

गुरु हा ग्रहमालीकेतील सर्वात मोठा , प्रभावशाली ,नैसर्गिक शुभग्रह आणि आयुष्यातील अनेकविध आनंदाचा स्त्रोत असल्यामुळे गुरुचे राशी परीवर्तन नेहमीच ज्योतिष जगताचे आणि सर्व सामान्यांचे लक्ष्य वेधते . गुरु नीतीने राजमार्गाने जाणारा तर राहू कुठल्याही नियमांना झुगारून देणारा . राहू हा सध्या मेष ह्या मंगळाच्या राशीत आहे आणि मंगळ हा उतावळा आहे ,झटपट अविचाराने  निर्णय घेणे हा मंगळाचा स्वभाव आहे . राहुसोबत युती म्हणजे असंगाशी संग. राहू हा अत्यंत दुष्ट , मायावी ,चतुर चलाख आहे त्यामुळे राहू हा नेहमी पत्रिकेत एकटाच असावा कारण तो ज्या ग्रहाच्या सानिध्यात येयील त्या ग्रहाच्या गुणांना ग्रहण लावेल त्यात कमतरता करेल. अशी  युती झाली असता राहू सोबत असणारा ग्रह त्याची पूर्ण फळे देऊ शकणार नाही . कलियुगातील इंटरनेट चे युग प्रवर्तन करणारा राहूच आहे . छक्के पंजे करणारा , मती गुंग करणारा , स्वार्थी , शोर्टकट मारणारा , वाईट संगतीत फसवणारा , खोटारडा असा हा राहू हा छाया ग्रह आहे त्यामुळे गुरुसोबत असताना तो गुरुवर एक प्रकारचे आच्छादन तयार करेल ज्यामुळे गुरु ग्रहाच्या चांगल्या प्रभावापासून आपण वंचित राहू .  गुरूच्या कारकत्वामध्ये सुद्धा न्यूनता येयील. गुरु धर्माचा कारक असल्यामुळे एकंदरीत धार्मिकता आणि रोजच्या जीवनातील ताणतणाव किंवा नकारात्मकता वाढीला लागणे हि ह्या युतीची सर्वात महत्वाची बाजू ठरते. राहू आपल्यातील राक्षसी प्रवृत्ती बाहेर काढण्यात प्रयत्नशील राहील आणि त्यातूनच अनेक अनैतिक व्यवहार घडतील जसे खोटे दस्तऐवज बनवणे , खोट्या सह्या , खोटे करारमदार ,फसवणूक, दिशाभूल ई.

अमेरिकेत सप्टेंबर 2001 रोजी घडलेला सर्वात मोठा आतंकवादी हल्ला झाला तेव्हा हीच युती मिथुन राशीत होती. धर्माच्या विरोधात आंदोलने किंवा आतंकवादी कारवाया ह्याला उधाण येणे ह्या घटना ह्या काळात घडतात . डिसेंबर 13 मध्ये झालेला पार्लमेंट वरील हल्ला ,2009 तसेच 2016 मध्ये शेअर मार्केट मधील अनिश्चितता ह्या सर्व घटनाक्रम गुरु राहू युती असतानाच झालेल्या आहेत असे लक्ष्यात येते . 22 मार्च 2023 ते सप्टेंबर 2023 पर्यंतचा काळ ह्या युतीच्या प्रभावाखाली असेल . एकंदरीत नोकरीच्या क्षेत्रातील सद्य स्थितीत खूप मोठा उतार दिसून येयील. गुरु ज्या ज्या गोष्टींचे कारकत्व दर्शवतो त्या सर्व गोष्टीवर राहूचा प्रभाव असेल. 

गुरु हा धन संपत्तीचा कारक असल्यामुळे शेअर मार्केट वरती पण ह्या युतीचा प्रभाव असणार आहे. ह्या वर्षी त्यात भर म्हणून शनीची तिसरी दृष्टी ह्या युतीवर असणार आहे . राहू हा नियम धाब्यावर बसवणारा तर शनी न्यायाच्या चौकटीत  काम करणारा .

राहुला काहीतरी भव्य दिव्य करून दाखवायचे आहे तर शनीला कायद्याच्या चौकटीत काम करायचे आहे.  येणाऱ्या काळात प्रत्येक गोष्ट पूर्ण भान ठेवुन विवेकाने केली तरच यश मिळेल अन्यथा राहू बुद्धी भरकटून टाकण्यात यशस्वी होयील. 

चांडाळ योगाचा अर्थ राहू गुरूच्या सगळ्याच शुभ प्रभावाला नष्ट करेल असा नसून त्यात कमतरता होयील असा आहे. नीतीने वागलो आणि कायद्याची चौकट नाही ओलांडली तर कुठलाही त्रास होणारच नाही पण कुठल्याही प्रलोभनात फसलो तर कसे होणार , परिणामांना आपणच जबाबदार . 

गुरु भाग्य आहे तर राहू त्यात अडथळे आणणारा त्यामुळे ह्या युती दरम्यान प्रत्येक कार्यात अडथळे येतील. ह्या युतीचा परिणाम 30 ऑक्टोबर पर्यंत असला तरी 9 मे ते 13 जून 2023 ह्या दरम्यान त्याचा प्रभाव प्रकर्षाने जाणवेल कारण दोन्ही ग्रह अंशात्मक युतीत असतील .गुरु राहुला सोडून जसजसा पुढे जायील तसे ह्याचे परिणाम कमी होत जातील हे ओघानेच आले. उगीचच कुठल्यातरी निष्कर्षावर यायचे नाही . शनी स्वतः त्याच्या मुल त्रिकोण राशीतून ह्या युतीकडे पाहत आहे त्यामुळे कुठलीही चूक नको . नाहीतर त्वरित दंड होयील ह्याची जाणीव ठेवायची आहे. 

प्रत्येक गोष्टीला दोन बाजू असतात त्यामुळे ह्या युतीची दुसरी बाजू बघितल्याशिवाय हा विषय संपणार नाही . गुरु राहू युती अश्विनी नक्षत्रात होणार आहे . मेषेतील पहिले नक्षत्र अश्विनी जे केतूचे आहे आणि अश्विनी कुमार हे ह्या केतूच्या  नक्षत्राची देवता आहे. अश्विनी कुमार हे देवांचे वैद्य होते आणि हे प्रामुख्याने “ हिलिंग “ चे कारक आहेत . अश्विनी कुमार ह्यांनी बृहस्पती आणि राहू ला सुद्धा त्यांच्या वाईट काळात “ हिलिंग “ करून मदत केलेली आहे हे अनेक पौराणिक कथामधून वाचायला मिळते. 

राहू आणि गुरु युती  आपल्या पत्रिकेत ज्या भावात असेल त्या भावाने दर्शवलेल्या अनेक गोष्टींचे हिलिंग होईल . मुळात आपल्या पत्रिकेत चांडाळ दोष आहे कि योग आहे हे समजले पाहिजे. आपल्या पत्रिकेतील गुरु आणि राहू ह्यांच्या स्थितीवरून ते आपल्याला समजते .त्यामुळे प्रत्येकाला ह्या युतीची फळे वाईटच मिळतील असा पूर्व ग्रह करून घेवू नये. 

आपल्या स्वतःच्या पत्रिकेत ग्रह कसे आहेत कुठल्या भावात आहेत ह्यावर सुद्धा गोचर ग्रहांचे परिणाम अवलंबून असतात .आता ह्या सर्व काळात आपण आपले जगणे सोडून तर देणार नाही  ना ? नक्कीच नाही . उलट ह्या ग्रहस्थिती केलेली उपासना अधिक फळेल. चांडाळ म्हणजे राक्षस . राक्षस हे देवांपेक्षा अधिक सक्षम होते अधिक ताकदवान होते आणि त्यांच्या कडे एक महान अस्त्र होते ते म्हणजे दुर्दम्य इच्छाशक्ती . दानवांनी प्रचंड उपासना केलेली आहे त्याचे उत्तम उदा म्हणजे रावण . त्यामुळे ह्या काळात गुरु , विष्णू तसेच देवीची उपासना केली तर त्याचा निश्चित लाभ आपल्याला झाल्याशिवाय राहणार नाही. चांडाळ दोषाचे रुपांतर आपण चांडाळ योगात करू शकतो . जे आधीपासून ह्या उपासना करत आहेत त्यांनी त्या वाढवाव्यात . गुरुच नाही तर राहू सुद्धा उपासना , अध्यात्म , साधनेचा कारक आहे . ज्योतिष शास्त्राचे उत्तम ज्ञान आपण राहू दशेत ग्रहण करू शकतो .


गुरु राहू युती मुळे उगीचच घाबरून न जाता सतर्क राहिले , डोळसपणे व्यवहार केला , आपल्या आराध्य देवतेवर आणि आपल्या स्वतःच्या कर्मावर विश्वास ठेवला तर काहीच वाईट होणार नाही . आपल्या आयुष्यात हि मोठी हिलिंग ची संधी आहे. एखादा आजार मग तो शरीराचा असो अथवा मनाचा हिलिंग मुळे बरा होण्याचे योग असताना आपण त्याचा उपयोग करून घेतला पाहिजे आणि त्यासाठी आवश्यकता आहे तो मुळात ह्या योगाकडे बघण्याचा “ दृष्टीकोण “ बदलण्याची.


संकलन : सौ. अस्मिता दीक्षित 

संपर्क : 8104639230


No comments:

Post a Comment