|| श्री स्वामी समर्थ ||अनुभवसिद्ध लेखणी
लेखन हि एक फक्त कला नसून जबाबदारी आहे. लेखणीत असामान्य ताकद आहे . दर्जेदार लेखन हातून होण्यासाठी पत्रिकेत ग्रहस्थिती साजेशी तर लागलेच पण त्या सोबत विषयाची जाण , समज त्याची खोली ह्याचाही अभ्यास लागतो . रोजच्या जीवनात आयुष्यात घडणाऱ्या अनेक घटना , आयुष्यातील स्वानुभव , व्यक्तींचे स्वभावदर्शन , प्रवास वर्णने ह्यासारख्या कित्येक विषयांचे प्रतिबिंब लेखकाच्या लेखनात दिसते.
अभ्यासपूर्ण लेखन हे लेखकाचा व्यासंग ,जीवनाकडे पाहण्याचा दृष्टीकोण , वाचन अभ्यास ह्याची खोली दर्शवतात . लेखन हा विषय समाज कारणाशी अत्यंत जवळीक साधणारा आहे . जसे एखादी जाहिरात इतकी प्रभावी असते कि ती पाहूनच आपण ती वस्तू विकत घेतो अगदी त्याचप्रमाणे लेखकाचे शब्दभांडार वाचकांच्या मनाची पकड घेत असते. समाजात चांगल्या गोष्टी परिवर्तीत करण्याची धार ज्यांच्या लेखणीला आहे असे असंख्य लेखक आपल्याला विचार करायला प्रवृत्त करतात .
खर तर प्रत्येकात एक उत्तम लेखक दडलेला असतो . मी लहान असताना माझे वडील नेहमी डायरी लिहिताना मी पहिले आहे. ते म्हणायचे मनातील भावनांना मोकळे करून देण्यासाठी लेखणी हे उत्तम मध्यम आहे. अनेकांना बोलता येत नाही पण आपल्या भावना लेखन कलेद्वारे समोरच्यापर्यंत नक्कीच पोहोचवता येतील.
लेखणीत खूप ताकद असते हे मी वेगळे सांगायला नको. म्हणूनच आजही वृत्तपत्र ते वृत्तपत्रच . असो . लहानपणी आपल्याला शाळेत निबंध लेखन अशी स्पर्धा असे उपक्रम असत. कित्येक जण त्यात हिरीरीने भाग घेत असत तर काहीना मुळात लिखाणाचा कंटाळा येत असे.
उत्कृष्ट आणि दर्जेदार वाचक वर्ग मिळणे हे खरतर लेखकाचे भाग्य म्हंटले पाहिजे . आपण लिहिले पण ते कुणी वाचलेच नाही तर लिहायचे तरी कुणासाठी . आजकालच्या अत्यंत प्रगत अश्या सोशल मिडियाने अनेक उत्स्फूर्त लेखकांना एक उत्तम व्यासपीठ निर्माण करून दिले आहे . त्यामुळे आज अनेकजण व्यक्त होत आहेत आणि इतरानाही त्यांच्या लिखाणातून लिखाणाची , वाचनाची प्रेरणा मिळत आहे. आपल्या मनातील आलेले विचार रोज चार ओळीत रेखाटा बघा सगळे आजार दूर होतील आणि मन मोकळे निरभ्र आकाशासारखे होऊन आनंदाने विहार करू लागेल.
माझे गुरु श्री स्वामी समर्थ आणि श्री गजानन महाराज ह्यांनी क्षणोक्षणी दिलेल्या प्रचीतीमुळे मी त्यांची सेवा म्हणूनच त्यांच्या बद्दलचे विचार , अनुभूती , स्वानुभव शब्दांकित करून मी त्यांच्या सेवेत एक खारीचा वाटा उचलत आहे . मी सेवेकरी आहे ह्याचे भान क्षणात सुद्धा विसरत नाही आणि त्यांच्या चरणाशी मिळालेली जागा सुद्धा . आजवर मी लिहिलेला प्रत्येक शब्द हा महाराजांचीच प्रेरणा आहे आणि आजन्म ती मिळत राहील हा विश्वास आहे.
उत्तम लेखन कौशल्य हि गुरुकृपाच आहे असे म्हंटले तर वावगे ठरू नये मग ते लेखन कुठल्याही विषयावरील किंवा क्षेत्रातील असो . त्यामागे थोरामोठ्यांचे आशीर्वाद , गुरुकृपा आणि आपल्या सर्व दर्जेदार व्यासंगी वाचकांचे प्रोत्चाहन असेल तर लेखनाचा प्रवास उत्तम होणारच .
लेखन हे खुल्या दिलाने केले पाहिजे. एखादा विषय मांडताना त्याचा पूर्ण सखोल अभ्यास असणे आवश्यक आहे. शब्दांची मांडणी आणि त्यातील आशय हा लेखाच्या विषयाला धरून असला पाहिजे . विषय भरकटला नाही पाहिजे तसेच लेखनाला मर्यादा असल्या पाहिजेत कारण आजकाल वेळेचे बंधन असते . आपल्या धकाधकीच्या आयुष्यात इच्छा असूनही मोठे लेख वाचले जात नाहीत म्हणून लेख हे सुटसुटीत पण त्यातून अपेक्षित संदेश देणारे असले पाहिजेत . मोठे लेख क्रमशः असे लिहावेत असे वाटते. लेखकाने सामाजिक बांधिलकी लेखन करताना जपली पाहिजे. लेखन हे लोकांपर्यंत आपले विचार पोहोचवण्याचे प्रभावी माध्यम आहे . विषय निवडताना तो कुठे प्रकाशित केले पाहिजे त्याचाही अभ्यास केला पाहिजे . आपल्या लेखाचा नेमका वाचक वर्ग ओळखून तिथेच लेख प्रकाशित केला तर लेखनाचे सार्थक होईल .
प्रत्येक वेळी आपले विचार समोरच्याच्या विचारांशी जुळतील आणि वाहवा मिळेल हे गृहीत धरू नये. प्रत्येकाचे विचार वेगळे असणारच त्यामुळे अनेकदा अनेकांनी आपल्या लेखावर सुचवलेले अभिप्राय मग ते कसेही असोत स्वीकारले पाहिजेत .सूचना आपल्या चांगल्यासाठीच असतात त्यामुळे त्याकडे सकारात्मक दृष्टीने पाहिले पाहिजे . आपले तेच खरे किंवा आपल्या लेखावर टीका टिप्पणी करणाऱ्या लोकांवर डूख धरणे हे उत्तम लेखकाचे गुण नाहीत . प्रत्येकाचे विचार स्वागतार्ह असले पाहिजेत . उलटपक्षी टीका करणारे अधिक जवळचे वाटले पाहिजेत . शांतपणे विचार केला तर अश्या लोकांनी केलेल्या सूचनांवर अंबलबजावणी केली तर आपलेच लेख अधिक प्रगल्भ होतील , विचार करा .
आपले विचार कमीतकमी शब्दात आणि अधिकाधिक आशय समाविष्ट करून लिहिणे आणि वाचकांच्या हृदयाचा ठाव घेणे हे गुरुकृपेशिवाय केवळ अशक्य आहे . लेखकहि उत्तम उपासक असेल तर त्याचा लेखनाचा दर्जा उंचावतो हे नक्की . मुळात आपण लिहित असलेल्या विचारांशी आपण स्वतः सहमत असावे , मग ते समाजातील चित्र असो अथवा स्वानुभव . कुठल्याही स्थितीत अहंकाराचा वारा लागू देऊ नये तरच त्या लेखात सातत्य आणि दर्जा राहील अन्यथा कठीण .
उत्तम लेखन किंवा लेखन कौशल्य ह्यासाठी पत्रिकेत असणारी ग्रहस्थिती ह्याकडे एक कटाक्ष टाकूया . चपलखपणे शब्दांची केलेली मांडणी , खुमासदार शैली , त्यातून वेळ प्रसंगी झालेल्या विनोदाची निर्मिती ह्यासाठी पत्रिकेतील बुध आकर्षित करेल . लेखकाचे वाचन , व्यासंग , विषयाचा गाभा समजण्याची आणि तो लेखातून अलगद उमलून सांगण्याची शैली हि गुरु शिवाय शक्य नाही. लेखकाचे संपूर्ण ज्ञान , विचार ,अभ्यासपूर्ण लेखन हे गुरूंच्या आशीर्वादाशिवाय शक्यच नाही . मनस्वी आणि उत्स्फुर्तपणे लिहिणे हा अंतस्फुर्ती देणाऱ्या नेपचून चे काम तर मनाचा कारक चंद्र ह्या सर्वांची सुरेल मोट बांधेल.
उत्तम शब्दसंपदा , वाचकाला खिळवून ठेवण्याची कला ह्या गोष्टी उत्तम ग्रहस्थिती प्रदान करेल. लेखकाचे लेखन हृद्य स्पर्शी होऊन त्याला दर्जेदार वाचकांची दाद मिळणे हे पूर्वसुकृता शिवाय घडणे नाही . उत्तम कर्म , मनातील सात्विक विचारांची जोड आणि काहीतरी देण्याची तळमळ ह्याच गोष्टींची छाप लेखांवर दिसते आणि म्हणूनच वाचकांचे उस्फुर्त अभिप्राय येतात . प्रत्येक लेखकाने स्वतःचा लेख त्रयस्ताच्या नजरेतून बघण्याची ताकद ठेवली पाहिजे म्हणजे त्यातील त्रुटी लगेच लक्ष्यात येतील. आपल्यातील कुणीच परिपूर्ण नाही त्यामुळे चुका करूनच आपण शिकणार आहोत .
मला एकदा माझ्या विद्यार्थ्याने फोन केला कि तुमचा लेख मी वाचला आणि खाली तुमचे नाव नव्हते पण मी ओळखले कि हा अस्मिता ताईंचा लेख आहे. मी म्हंटले कसे? तर म्हणाला कि त्यात शुद्धलेखनाच्या इतक्या चुका होत्या कि त्यावरून ओळखले कि हा तुमचाच लेख आहे. मला मेल्याहून मेल्यासारखे झाले. कारण मी धबधब्यासारखे लिहिते आणि पोस्त करते पण त्यातील व्याकरणाकडे कोण बघणार ? हा धडा मला त्या दिवशी मिळाला , तो मी खुल्या दिलाने स्वीकारला आणि आता प्रत्येक लेख खुपदा वाचून मग प्रकाशित करते. तरीही कुठेतरी कानामात्रा , अनुस्वार चुकत असतील सुद्धा . असो.
आपल्यातील अनेकांनी माझ्या ब्लॉग लिखाणाला प्रोत्चाहन दिले , वेळोवेळी सूचना केल्या आणि विषय सुद्धा सुचवले. तुम्ही सर्व वाचक आहात म्हणून माझी लेखणी काम करत आहे आणि खर्या अर्थाने ती मला निर्भेळ आनंद देवून जगवते सुद्धा आहे . म्हणूनच आज म्हणावेसे वाटते तुम्ही सर्वच माझ्या लिखाणाचे “ टॉनिक “ आहात .
माणसे जोडण्याचा माझा स्वभाव असल्यामुळे कधी नात्यात कटुता आली तरी फार काळ टिकत नाही हे आवर्जून सांगावेसे वाटते . वाचकांचे अभिप्राय म्हणजे माझ्यासाठी पाठशाला , आनंदाचा मोठा ठेवा आहे . अनेक लोक ह्या निम्मित्ताने जोडली जात आहेत , जीवनाचा प्रवास सुखकर होतो आहे , अजून काय हवे ??
सर्वांना लक्ष लक्ष शुभेछ्या , सर्वांचे प्रेम आशीर्वाद असेच राहूदेत ,सद्गुरूंच्या सेवेत जीवनाचा खरा आनंद उपभोगत आहे , जन्म स्वामी सेवेसाठी आहे ह्याचा तिळमात्र विसर पडू दिलेला नाही . कुठल्याही गोष्टीने हर्षवायू होऊ द्यायचा नाही आणि वेळ प्रसंगी गर्भगळीत सुद्धा व्हायचे नाही हे मला महाराजांनी शिकवले आहे , त्यांच्याच चरणी हा लेख समर्पित .
संकलन : सौ. अस्मिता दीक्षित
संपर्क : 8104639230
No comments:
Post a Comment