|| श्री स्वामी समर्थ ||
बरेच दिवस हा विषय लिहायचा होता . आजकाल जातक एका ज्योतिषाला पत्रिका दाखवत नाही . ज्योतिष वारी केल्या शिवाय त्यांना चैनच पडत नसावे बहुधा . आपल्याला हवे ते उत्तर ज्योतिषाकडून येयीपर्यंत ( निदान त्या आशेवर ) हि वारी चालू असावी असे वाटते. अहो शेवटी ज्योतिषी हाही एक तुमच्या सारखाच माणूस आहे, फक्त त्याला हे ज्ञान अवगत आहे जे तुम्हाला अवगत नाही . ह्या शास्त्राचा आधार घेवून आपल्या प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न ज्योतिष ह्या माध्यमातून आपण करत असतो .
अनेक जण आजकाल ह्या शास्त्राच्या अध्ययनाकडे वळत आहेत . करोना नंतर त्याचे प्रमाण खूप वाढले आहे कारण करोनामध्ये घरात करायचे काय म्हणून अनेक प्रकारचे विषय झूम च्या माध्यमातून हाताळले गेले आणि लोकांना घर बसल्या अनेक प्रकारचे ज्ञान माहिती घरी बसल्या मिळाली . अर्थात हे उत्तमच आहे पण कुठलेही शास्त्र किंवा विद्या शिकायचे तर ती खोलात जाऊन त्याचे टोक गाठले पाहिजे किंवा अत्यंत खोलात जाऊन त्याचे अध्ययन केले तर त्याचा उपयोग होतो. नुसतेच 4 महिने शिकून काहीही होणार नाही. कारण मनन चिंतन अध्ययन आणि साधना उपासना म्हणजेच ज्योतिष .
जसे भाजीत 10 जिन्नस घातले तर भाजी रुचकर लागते अगदी तसेच कुंडली हि भाव , ग्रह , राशी , नक्षत्र , दशा ह्या सर्वांचा एकत्रित अभ्यास करूनच फलादेश सांगता येतो अन्यथा नाही . पण म्हणतात ना कळते पण वळत नाही.
समुपदेशन करायला सुरवात केली कि आपण काही बोलायच्या आधीच समोरून आवाज येतो “ माझे कर्क लग्न आणि मेष राशी आहे “.
मनातल्या मनात खरतर हसू येते . काही वेळाने पुन्हा माझा मकरेचा गुरु आहे , माझी शनीची दशा आहे चालूच असते . तेव्हा मग मी सरळ विचारते आपला अभ्यास आहे का? आपण जाणता का ज्योतिष ? तेव्हा मग समोरून जातक सांगतात नाही 2 जणांना दाखवली आहे ना पत्रिका त्यांनी सांगितले म्हणून मला माहिती .
अश्यावेळी काय बोलावे समजत नाही. खरच हे अर्धवट ज्ञान किती धोक्याचे आहे . मी कुणाला दोष देत नाही पण अनेकदा पत्रिकेचे अध्ययन संपूर्ण पणे न करता केलेले समुपदेशन चुकीचा फलादेश देते आणि पुढे सगळेच चुकते . त्यामुळे एकतर पूर्ण सखोल अभ्यास करूनच कुणाच्याही पत्रिकेवर फलादेश द्यावा . त्याचसोबत जातकांनी सुद्धा अनेकांना पत्रिका दाखवणे गैर आहे. ज्याला दाखवाल त्याची माहिती घ्या , त्याने सांगितलेले भाकीत जुळते का ते पहा, त्याच्यावर विश्वास ठेवा , जर काही उपाय सांगितले तर करा . उठसुठ आपल्या मनासारखे होत नाही तोवर किंवा आपल्याला अपेक्षित उत्तर मिळेपर्यंत हा ज्योतिष तो ज्योतिषी असे करून नको ते अगाध ज्ञान पदरात पाडून घेवू नका . नाहीतर स्वतःच ह्या शास्त्राचा व्यवस्थित अभ्यास करा .
काय आहे शाहण्या माणसाने फार ज्योतिष ज्योतिष करू नये ह्या मताची मी स्वतः आहे. अत्यंत आवश्यक असेल तेव्हा मात्र ह्या शास्त्राचा जरूर आधार घ्या , कारण समस्या निर्माण झाल्याशिवाय प्रश्न बघूच नये असा नियम आहे . कुणीतरी पैसे देत आहे म्हणून कुठलाही प्रश्न ज्योतिषाने सुद्धा बघू नये कारण हा शास्त्राचा अपमान आहे. पण खरच समस्या आहे आणि प्रश्न विचारला तर योग्य . अश्यावेळी हे दैवी शास्त्र नक्कीच मदतीला धावून येयील आणि मार्गदर्शन करेल ह्याच शंकाच नाही . पण उठसुठ ज्योतिष हे बंद करा. तुम्ही छान अभ्यास केलात तर मार्क चांगलेच मिळणार , कर्म उत्तम करत राहा आणि रोजची उपासना कारण ती फळ देणारच . आमटी कुठली करू आणि आज कुठली साडी नेसू ह्यासाठी ज्योतिष नाही . मतितार्थ लक्ष्यात घ्या तो आलाच असेल म्हणा . लोक हुशार आहेत सुज्ञ आहेत.
आजकाल समुपदेशन करताना फोनवर बोलणारी व्यक्ती अनेक ज्योतिषांकडे जावून आलेली असते आणि पुढे अनेकांकडे जाणार असते हे गृहीतच धरते . माझ्या पत्रिकेत मेषेचा चंद्र आहे पण तो बुधाच्या नवमांशात आहे हे माहित नसते , त्यामुळे नुसतीच ती व्यक्ती तापट आहे इतकेच कळते पण ती बुद्धिमान पण आहे कारण मिथुन नवमांश हा बुधाचा असल्यामुळे विचार , बुद्धी चांगलीच असणार हे समजत नाही कारण माझ्या पत्रिकेत चंद्र मेषेचा आहे ह्यापलीकडे सुद्धा चंद्रा चा अभ्यास आहे , चंद्राच्या नक्षत्रात कुठले ग्रह आहेत का? चंद्र शुक्ल कि कृष्ण पक्षातला आहे , चंद्राचे कुणाशी योग होत आहेत ह्याचा थांगपत्ता नसतो फक्त माझा चंद्र मेषेत म्हणून माझी मेष रास हेच वरवरचे ज्ञान असते . एखादा मुलगा तोतरा असेल किंवा बोलतच नसेल तर बुधाच्याही आधी गुरु बघायचा हे कुठे माहित आहे , त्यामुळे माझी सर्वाना मनापासून विनंती आहे कि ज्योतिष शास्त्र हे महासागर आहे , कुणाकडे पत्रिका दाखवली आणि त्याने सांगितलेले दुसर्या ज्योतिषाकडे pass on केले कि झाले का? कश्याला सांगता हे सर्व ? तेच समजत नाही . बर इतके ज्ञान मिळवून तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले नाही किबहुना समस्या तशीच आहे म्हणून दुसर्या ज्योतिषाला पत्रिका दाखवायची वेळ आली किंवा छंद म्हणून सुद्धा दाखवली असेल. असो . ज्योतिषाने सांगितलेले डोक्यात ठेवुन आपले तर्क करत बसायचे नाही . तेच डोक्यात ठेवुन जगायचे तर अजिबात नाही . अहो आपण फार साधी माणसे आहोत काही वाईट होत नाही आपले. स्वमिभक्तानी कुणालाही घाबराचे नाही आणि चिंता तर अजिबात करायची नाही .
सांगायचे तात्पर्य असे अर्ध्या हळकुंडाने पिवळे होण्यापेक्षा सखोल ज्ञान ग्रहण करा ,स्वतःवर , स्वतःच्या गुरूंवर आणि उपासनेवर मनापासून विश्वास ठेवा ती एक दिवस फळणारच.
ते द्यायलाच बसले आहेत आणि वेळ आली कि देणारच आहेत ........
संकलन : सौ. अस्मिता दीक्षित
संपर्क : 8104639230
No comments:
Post a Comment