Monday, 22 May 2023

Depth & Surrender ( आम्ही अध्यात्म करतो म्हणजे नेमके काय करतो ?? )

 || श्री स्वामी समर्थ ||


अध्यात्म हा जीवनाचा आधार आहे. दुक्ख गळ्यापर्यंत आले कि सगळेच देवाचा आधार घेतात आणि त्यात चुकीचे काहीच नाही . ज्याने आपल्याला जन्माला घातले तोच तर आपला तारणहार आहे , शेवटी हे मस्तक आणि दोन हस्तक त्यालाच तर जोडणार आपण. 

आजकाल समुपदेशन करताना पलीकडची व्यक्ती मला अनेकदा सांगत असते कि मी हि पोथी वाचते ,त्या देवाचे नामस्मरण करते , अभिषेक करते ,अश्या अनेक गोष्टी लोक करता असतात आणि ते ऐकताना आपल्या रूढी आपली संस्कृती किती पक्की आहे ह्याचा वारंवार अनुभव येत असतो. कुळाच्या देवतेचे स्मरण तर नित्य झालेच पाहिजे , तसेच इष्ट देवता आपल्या कुळाच्या रीतीभाती जपल्याच पाहिजेत . पण प्रश्न असा आहे कि इतक्या गोष्टी करूनही आयुष्यातील प्रश्न सुटत नाहीत ते तसेच कदाचित अजूनच जास्ती गुंतागुंतीचे का होत आहेत ? ह्याचे उत्तर शोधावेसे वाटले म्हणून हा लेखन प्रपंच .

आज सगळे स्ट्रेस फुल जीवनशैली जगतात , कुणाला नोकरीचा प्रश्न तर कुणाचा विवाहाचा , घराचा अनेक प्रश्न असतात . अश्यावेळी मग उपासना , जपतप , पोथी पुराणे ह्यांचा आधार त्या प्रश्नापुरता का होईना घेतला जातो. असो. 

अनेकजण अनेक गोष्टी करतात , कुठल्या म्हणून देवाला सोडत नाहीत त्यात अत्यंत प्रगत असा सोशल मिडीयाचा platform घरबसल्या अनेकविध माहिती पुरवण्यास सक्षम असतो . त्यात अगदी जपाची माळ कुठून घ्यावी इथपासून कुठला ग्रंथ कुठे मिळेल इथवर सगळे अगदी एका क्लीक च्या अंतरावर असते. 

Whatsapp university आपल्याला रोज ज्ञानामृत पाजत असते. हे सगळे छानच आहे पण आपल्यासाठी ह्यातील नेमके काय आहे किंवा आपल्या प्रश्नाची उकल करण्यासाठी निदान कुठली आराधना करावी हे तरी ज्याचे त्याला सर्वार्थाने समजले पाहिजे  आणि हीच गोम आहे.  दर दोन दिवसांनी उपासना बदलणे , जप बदलणे किंवा सोडून देणे , वस्त्राप्रमाणे गुरु सुद्धा बदलणे अश्या अनेक गोष्टी होतात ज्या अयोग्य आहेत .

अध्यात्म, उपासना ह्या डोळसपणे करायच्या गोष्टी आहेत . असो . प्रत्येक व्यक्तीचे आयुष्य वेगळे आणि स्वतंत्र आहे त्याचसोबत ज्याचे त्याचे प्रश्न सुद्धा त्यामुळे अमुक एक माणूस हे करतो म्हणून मग मीही तेच करावे हे चुकीचेच होईल. योग्य वेळी योग्य व्यक्तीचे मार्गदर्शन घेऊन  समजून घेवून केलेली उपासना योग्य मार्गाने जायील आणि फलदायी सुद्धा ठरेल हे निश्चित पण तसे झाले नाही तर त्या व्यक्तीचा विश्वास ह्या सर्व गोष्टींवरून उडेल किंवा व्यक्ती पराकोटीची नास्तिक सुद्धा होईल.

उपासना हि वरवरची नसावी किंवा सकाम नसावी. अमुक एका गोष्टीसाठी उपासना न करता ती कायम स्वरूपी करावी. जी निश्चितपणे ह्याच नाही तर पुढील जन्मात सुद्धा उपयोगी होयील.  फक्त आपल्या समाधानासाठी काहीही करू नये तर आपण ज्या देवतेची उपासना करतो त्यावर आपली नितांत श्रद्धा , पराकोटीची प्रेम असेल तर ती देवता आपल्याला संकटातून मार्ग दाखवेल , बाहेर काढेल पण आपण मनी नाही भाव अश्या प्रकारे उपासना केली तर त्याला काहीच अर्थ उरणार नाही . 

आपल्या इष्ट देवतेवर आपले असलेले नितांत प्रेम श्रद्धा आपल्या उपासने च्या माध्यमातून त्या देवतेच्या चरणी रुजू होते ती कायमची. उपासनेला जीवनात अनन्य साधारण असे महत्व आहे . उपासनेचे महत्व ज्याला समजले त्याचे जीवन सुखी होणार ह्यात शंकाच नाही.

फक्त हे जपतप , नामस्मरण वरवरचे नसावे . मनाच्या आतल्या गाभ्यातून स्वामिना हाक मारली तर त्याच क्षणी ते येणार हा विश्वास असला पाहिजे संदेह नको. आज हजारो लोक श्री गजानन विजय , श्री साई चरित्र , रामायण , ज्ञानेश्वरी , श्री भगवत गीता , गुरुचरित्र अश्या अनेक ग्रंथांचे वाचन करतात . मलाही अनेक जातक रोज कायकाय उपसना करतात ते सांगतात . प्रश्न आहे कि त्यातील किती जणांना ती फलदायी होते किंवा झाली आहे. का फळली नाही ह्याचा विचार करा . आज एक माळ केली कि आम्ही लगेच उपासक होतो . एक पारायण केली कि जणू महाराजांनी येऊन आमचा सत्कार केला पाहिजे अशी उपकार केल्याची भावना आपली असते. मग म्हणायला मोकळे कि आम्ही इतके करतो पण फळ नाही मिळाले आम्ही जैसे तिथेच आहोत . ह्याचे एकमेव कारण हे कि तुम्ही केलेली उपासना हि समजून न घेता केलीत . कुठल्यातरी भौतिक सुखासाठी केलीत , ज्या देवतेची गुरूंची उपासना करता त्यांच्या आठवणीने स्मरणाने तुम्हाला ना कधी पाझर फुटला ना कधी डोळ्यातून अश्रूंची धार लागली . तुम्ही आणि गुरु ह्यातील अंतर कमी झालेच नाही ते तेव्हडेच राहिले मग कसे फळ मिळणार तुम्हाला.

एकतर उपासनेत सातत्य हवे तसेच उपासना जीवन मरणाचा प्रश्न असल्यासाठी अंतर्मनाने , संपूर्ण श्रद्धेने केली पाहिजे. कुठलेही कल्प विकल्प , शंका घेवून ती केली तर सर्व व्यर्थ आहे. जीवनात आपल्या सर्वच गोष्टी मनासारख्या घडणार नाहीत हे स्वीकारले पाहिजे आणि ते स्वीकारायला आपण केलेले नामस्मरण उपयोगी येते . प्रत्येक गोष्टीवर उपासना हे औषध नाही कारण काही भोग आहेत ते भोगूनच संपवायचे असतात गुरु आपल्याला ते भागण्याची ताकद देतात त्याला कारण तुम्ही केलेली उपासना , ते तुम्हाला सहनशक्ती देतील, मार्ग दाखवतील पण भोग तुम्हाला भोगावेच लागतील.

नामस्मरण करताना त्यात सातत्य हवे , आज मूड नाही आज उशीर झाला वगैरे बाष्कळ कारणे सांगायची नाहीत , प्रत्येक क्षणी त्यांचे स्मरण आणि त्यांच्या चरणाशी आपले समर्पित जीवन असल्याशिवाय आयुष्यात बदल शक्य नाही. जीवन त्यांच्यावर सोडून देता आले पाहिजे आणि ते जे करतील मग ते आपल्याला आवडो आपल्या पसंतीचे असो अथवा नसो ते खुल्या दिलाने त्यांचा आशीर्वाद म्हणून स्वीकारता आले पाहिजे . जे होते आहे त्यातच माझे हित आहे हा ढळ विश्वास हवा . ज्या क्षणी त्यांच्या इच्छेत आपण आपल्या इच्छा विलीन करू तेव्हा समजावे आपली त्यांच्या चरणाशी असलेली जागा कायमस्वरूपीच असणार आहे. 

आपली आई कधी आपल्याला कुशीत घेते माया करते तर वेळप्रसंगी आपल्याला शिस्त लावताना एखादा धपाटा सुद्धा घालते ,काहीही झाले तरी आपले आपल्या आईवरचे प्रेम किंचित सुद्धा कमी होत नाही अगदी तसेच आपले आपल्या महाराजांवरचे प्रेम असले पाहिजे , काहीतरी मिळवण्यासाठी ते प्रेम नसावे तर त्यांच्याविषयी मनात कळकळ ,  हृदयात ओतप्रोत प्रेम असावे , त्यांच्या शिवाय आपले आयुष्य शून्य आहे हि भावना असावी तर आणि तरच त्या नात्याला मूर्त स्वरूप येयील. आपल्या गुरूंप्रती संपूर्ण विश्वास आणि तळमळ , सोळा आणे भक्ती , निष्काम सेवा आणि हृदयापासून मारलेली आर्त हाक असेल तर आणि तरच ते धावत येतील अन्यथा व्यर्थ आहे. नुसते देखल्या देवा दंडवत उपयोगी नाही. त्यात भर म्हणून आपली केलेली उपासना मी हे केले मी ते करतो , मी इतकं जप केला मी अभिषेक केला एक न दोन गावभर सांगत सुटायचे...बघा प्रत्येक वाक्याच्या सुरवातीला असतो तो “ मी “ ..मी हे केले मी ते केले ...केव्हडा तो अहंकार जणू काही जप करून देवावर आपण उपकार केले ह्याच भावनेतून सर्वाना सांगत सुटायचे. काय सध्या करायचे आहे आपल्याला ? काय दाखवायचे आहे? कि मी किती अध्यात्मिक आहे , मी कसा सात्विक आहे पण हे सगळे करून आपण आपला अहंकार जोपासतो त्याला खतपाणी घालतो हे लक्ष्यातच येत नाही का आपल्या ?? आपण महाराजांच्या जवळ नाहीच उलट दूर जात आहोत ह्याचे भान असावे कारण जोवर हा “ मी “ आपल्यात आहे तोवर आपल्याला महाराज कदापि जवळ करणार नाहीत . ह्या मी पणाची भिंत जेव्हा गळून पडेल तेव्हाच त्यांचे खर्या अर्थाने दर्शन होईल. अहो कसला मी मी घेवून बसलात ..क्षणभंगुर अस्तित्व आहे आपले इथे...आपले काम झाले कि आपण जाणार , काहीही मागे राहणार नाही , कुणी क्षणभर सुद्धा आठवण काढणार नाही पण आपली अखेर चांगली करेल ती आपण आजन्म केलेली उपासना .

जागे व्हा , विचार करा आणि पटले तर आजपासून आपण केलेली उपासना कुणालाही सांगू नका , त्याचे अवडंबर वाजवू नका , त्याचे स्तोम नको त्याचा उदोउदो नको. उपासना गुप्त ठेवायची असते...ती जितकी गुप्त तितके फळ अधिक. 

आम्ही अध्यात्म करतो उपासक आहोत म्हणजे नेमके काय करतो ???????????????

उपासना करत राहा जसजशी पुढे जायील आपला दृष्टीकोण बदलेल , आपलयाला स्वतःही अंतर्बाह्य बदल झाल्याची अनुभूती येयील.  वाचेवर ताबा मिळवाल म्हणजे अधिक चिंतन मनन आणि कमी बोलणे , प्रत्येक गोष्ट स्वीकारायला शिकाल , अंतर्मुख व्हाल , मनाची शांतता आणि उभारी जाणवेल हे सर्व झाले तर उपासना योग्य मार्गाने जात आहे हा विश्वास ठेवा .

मनाच्या आतल्या गाभ्यातून , अगदी अंतर्मनातून घेतलेले नाम आणि गुरूंच्या चरणाशी संपूर्ण शरणागती हाच सुखी जीवनाचा मूलमंत्र आहे. करून पहा.

संकलन : सौ. अस्मिता दीक्षित 

संपर्क : 8104639230  

  




No comments:

Post a Comment