|| श्री स्वामी समर्थ ||
अंधकाराकडून प्रकाशाकडे नेणारे ज्योतिष हे दैवी शास्त्र आहे. उपासनेशिवाय सर्व व्यर्थ आहे त्यामुळे ह्या शास्त्राच्या अभ्यासकांनी उपासनेची शिदोरी दिवसागणिक वाढवली पाहिजे. अनेक ग्रंथांचा सखोल अभ्यास तसेच स्वतःची वैयक्तिक साधना केली पाहिजे . आपल्या स्वतःचा अभ्यासच शेवटी आपल्याला उपयोगी पडतो. चंद्र रवी मंगळ ह्याची माहिती कुठेही मिळेल आज ती देण्यासाठी प्रगत सोशल मिडिया सज्ज आहे पण त्याचे वेगवेगळ्या कुंडलीमध्ये होणारे फलित हे शेवटी आपल्यालाच सांगायचे आहे. Software आपल्याला फक्त गणिती भाग करून कुंडली समोर मांडेल पण पुढे काय ?
अभ्यासाची ठराविक दिशा हवी . सर्वप्रथम ग्रह समजले पाहिजेत त्यांची जातकुळी कळली पाहिजे . कुठला ग्रह काय देणार आणि तो काय द्यायला आला आहे . वेगवेगळ्या भावात तो कसा फळणार . नक्षत्रांचा सखोल अभ्यास हवा . नक्षत्र समजल्याशिवाय फलित येणारच नाही . अभ्यास करताना डोक्यात सगळ्याची खिचडी नको . आजकाल सगळे सगळच शिकतात मग त्यात कृष्णमुर्ती आले फलज्योतिष आले , जैमिनी आणि इतरही शाखा आल्या . समुपदेशन करताना आजकाल आपल्याकडे आलेला जातक तुम्ही पत्रिका कृष्णमुर्ती पद्धतीने पाहणार कि पारंपारिक चा उपयोग करून हेही विचारतो तेव्हा खरच हसू येते . मी सरळ सांगते कि मी तुमच्या समस्येचे उत्तर देणार .
बरेचदा पत्रिका कृष्णमुर्ती आणि पारंपारिक दोन्ही दृष्टीकोनातून पहावी लागते . असो . सांगायचे तात्पर्य असे कि आपले उत्तर बरोबर असले पाहिजे . त्यासाठी लागणारा वेळ हवा कारण जातकाला सगळ्याची घाई असते . अर्थातच असणार कारण अनेकदा उत्सुकता शिगेला पोहोचलेली असते आणि त्वरित उत्तर जाणून घ्यायची अपेक्षाही असते .
फलादेश करताना आपला स्वतःचा अभ्यास किती आहे ह्याचाही कस लागतो म्हणून उपासना हवी . ज्योतिष शास्त्राचा अभ्यास आणि फलित कथन हे येरयागबाळ्याचे काम नाही . मी स्वताही एक अभ्यासक आहे आणि तसेच राहणे पसंत करते . हे शास्त्र महान आहे ह्याला कुणी चालेंज करायच्या फंदात पडू नये कारण ते आहे फक्त सांगणारा अभ्यासू पाहिजे, त्याचा व्यासंग दांडगा असला पाहिजे इतकच . आपण कितीही म्हंटले सूर्य नाही तरी तो आहे तसलाच प्रकार आहे हा.
मानवी आयुष्यात अनेक समस्या असतात आणि त्यातून निर्माण होणार्या प्रश्नांमुळे मन व्यथित होते आणि मग ह्या शास्त्राचा आधार घ्यावासा वाटतो . ज्योतिषी हा सकारात्मक असला पाहिजे . स्वतःच्या वैयक्तिक आयुष्यात काहीही झाले तरी त्याचे पडसाद समुपदेशनावर दिसले नाही पाहिजे कारण तुम्ही तिथे मानधन घेत आहात त्यामुळे तिथे तुम्हाला तुमच्या डोक्याचा स्वीच on off करता आलाच पाहिजे. जातक आधीच त्रस्त असतो त्यामुळे मुळात पहिल्या 5 वाक्यात त्याला शांत करणे आपलेसे करणे आणि मुख्य म्हणजे त्याला बोलते करणे हि खुबी ज्योतिषाला जमली पाहिजे . जातक प्रश्नाचे उत्तर घेवून आलेला असतो . असो . ज्याला आपल्याकडून भविष्य कथन ऐकायचे आहे तो येयील अन्यथा नाही. कुणाच्याही मागे लागू नये नाहीतर ह्या शास्त्राचा अपमान होईल असे माझे मत आहे .
व्यक्ती तितक्या प्रकृती .असो. आपल्यालाही अनेक लोक भेटत जातात कधी आपल्याला अपमानास्पद सुद्धा बोलतात पण त्या गोष्टीही तिथेच ठेवायच्या आणि आपण पुढे जायचे. हे शास्त्र कुणी शिकायचे आणि शिकवायचे हे वरचा ठरवतो त्यामुळे जे शिकत आहेत त्यांनी स्वतःला भाग्यवान समजा . कुठलेही शास्त्र परिपूर्ण नाही कुठेतरी तृटी आहेत ह्याचेही भान ठेवले पाहिजे . हे कालविधान शास्त्र आहे , घटना कुठली कधी घडणार ह्याचा मागोवा घेणारे शास्त्र आहे.
आजकाल विवाह हा मोठा प्रश्न पालकांसमोर आहे. योग्य व्यक्ती जोडीदार म्हणून मिळणे हे नशीबच म्हणायला हवे. पत्रिका मिलन आणि गुण मिलन ह्या दोन्ही कसोट्यांवर उतरणारी पत्रिका परिपूर्ण असेलच असे नाही पण ह्या दोन्हीही कसोट्या डावलून मात्र चालणार नाही . तत्पूर्वी प्रत्येक मुलाने आणि मुलीने सर्व प्रथम स्वतःची पत्रिका समजून घेतली पाहिजे . आपल्यातील गुणदोष स्वीकारले पाहिजेत आणि अवगुण कमी करण्याचा मनापासून प्रयत्न केला पाहिजे. आपल्या ढीगभर अपेक्षा समोर ठेवताना आपण समोरच्या व्यक्तीच्या अपेक्षांना किती न्याय देणार आहोत हेही पाहिले पाहिजे. कुणीही इथे सर्वगुण संपन्न नाही त्यामुळे स्वीकारणे जमले कि सगळेच जमते . योग असला कि गोष्टी जुळून येणारच कधीतरी त्यासाठी संयमाचीही गरज असते .
अभ्यासकांनी प्रत्येक पत्रिकेचा सखोल अभ्यास करूनच भविष्य कथन करावे , अपुर्या ज्ञानामुळे ते चुकले तर जातकाचा आपल्यावर आणि मुख्य म्हणजे ह्या शास्त्रावरचा विश्वास उडतो आणि अनेकदा त्याचमुळे हे शास्त्र बदनाम होते . कुणाकडून भविष्य कथन करून घ्यावे ह्याचा अभ्यास सुद्धा जातकाने केला पाहिजे . एकदा तुम्हाला ते समजले कि आनंदाने त्याचे मानधन द्यावे आणि मगच प्रश्न विचारावे कारण जसा तुमचा प्रपंच आहे तसा ज्योतिषाचा सुद्धा आहे आणि त्याउपर हे ज्ञान फुकट का द्यावे आणि घ्यावे हाहा विचार व्हायला हवा .
पत्रिकेतील लग्नबिंदू पासून ते महादशे पर्यंत भाव , राशी , ग्रह आणि नक्षत्र ह्यातून निर्माण होणारे अनेक योग ह्याचा अभ्यास आपल्याला फलादेशा पर्यंत पोहोचवत असतो. जातकाची मानसिक अवस्था आणि त्याच्या प्रश्नाची खोली बघताना प्रश्नकर्ता आणि प्रश्न पाहणारा ह्या दोघानाही तितकीच तळमळ असेल तर उत्तर बरोबर येणार .
एकंदरीत काय ज्योतिषीय परिभाषा समजणे महत्वाचे आहे . ती एकदा समजली तर ग्रहांशी तुमचे हितगुज झालेच म्हणून समजा.
संकलन : सौ. अस्मिता दीक्षित
संपर्क : 8104639230
No comments:
Post a Comment