|| श्री स्वामी समर्थ ||
विवाह म्हंटले कि एक प्रश्न अगदी सहज विचारला जातो , तो म्हणजे “ दोघांचे किती गुण जुळत आहेत ? “ गुण मिलन करणे हे सोपस्कार झाले तरी ग्रह मिलन , ग्रहमैत्री पहावीच लागते. अनेकदा 36 गुण जुळणाऱ्या पत्रिका असूनही पुढे विवाह टिकत नाही त्यावेळी ग्रह मिलन किती महत्वाची बाब आहे हे ध्यानात येते . काळानुरूप ज्योतिषाच्या संज्ञा जरी बदलत असल्या तरी ह्या सर्व गोष्टी पहाव्यात असे वाटते कारण विवाह हा आयुष्यातील मोठा आणि कायमस्वरूपी टर्न आहे. तसेही ह्या गोष्टी एकेकदाच तर पहायच्या आहेत त्यामुळे त्या पहाव्यात. त्यात नुकसान नाही झाला तर फायदाच होयील.
नुसते गुण जुळले म्हणून विवाह करू नये .आजकालचे जग झपाट्याने बदलत आहे आणि त्यानुसार अनेक रूढी परंपरा ह्यांना आपण सोयीनुसार बगल देत आहोत जे चुकीचेच आहे . अनेक ठिकाणी मुहूर्त न पाहता रविवार हाच मुहूर्त धरला जातो का तर सगळ्यांना सुट्टीचा वार म्हणून. असो .विषयांतर नको .
पुढील सर्व बाबींचा विचार डोळसपणे करावा . आपल्या अपत्याची पत्रिका सर्वप्रथम व्यवस्थित समजून घ्यावी . आत्ता तो भारतात आहे पण पुढे 2-3 वर्षांनी त्याला कायम स्वरूपी परदेशातील नोकरी मिळू शकते हे समजले तर त्यानुसार परदेशात रहायची तयारी असणारी मुलगी बघता येयील निदान तशी कल्पना मुलीला द्यायला हवी . मुलाच्या पत्रिकेतील डाव्या उजव्या सर्व बाबी तपासून पाहाव्या . प्रत्येक आईला आपला मुलगा सर्व गुण संपन्न वाटतोच म्हणूनच म्हंटले कि आपणही इतके वर्ष संसार करत असल्यामुळे आणि आपली मुले आपल्याच समोर लहानाची मोठी झाल्यामुळे पत्रिकेच्या पलीकडे जाऊन त्यांचे गुण दुर्गुण आपल्यापेक्षा इतर कोण चांगले सांगणार
त्यामुळे मुलाच्या पत्रिकेतील अनेक बाबी तपासून घ्याव्यात .
पुढे पाच पंचवीस वर्षे त्यांचा सुखाचा संसार होण्यासाठी दोघांचीही आयु मर्यादा चांगली हवी . आर्थिक दृष्टीने दोघांच्याही पत्रिका समतोल असाव्यात . आर्थिक दृष्टीने नोकरीत किंवा व्यवसायात प्रगतीपथावर नेणारी पत्रिका हवी . आरोग्य हि बाब सुद्धा तितकीच महत्वाची आहे कारण आजकालच्या धकाधकीच्या आयुष्यात तरुण वयात सुद्धा मुलांना स्ट्रेस मुळे अनेक आजार अल्पावधीत होत असलेले आपण पाहतो त्यामुळे शरीरसंपदा उत्तम हवी . आयुष्यात काहीतरी करून दाखवण्याची जिद्द असली पाहिजे . पत्रिकेत विवाह पश्च्यात येणाऱ्या महादशा काळजीपूर्वक तपासाव्यात त्या विवाहाला पोषक नसणाऱ्या स्थानाच्या कार्येश असतील तर विवाह सौख्य बिघडेल .एखाद्याच्या पत्रिकेत विवाह टिकण्याचा योग नसेल तर निदान पुनर्विवाहाचा योग आहे का हेही पाहिले पाहिजे . “ चेहरा क्या देखते हो , दिल मे उतरकर देखो ना “ हे वास्तव आहे .रूप कायम टिकणारे नाही पण मनाचे सौंदर्य त्याहीपलीकडे आहे आणि ते सगळ्यात महत्वाचे आहे . दोघांचेही मानसिक स्थैर्य उत्तम असेल तर सामंजस्य अपोआप येते . नुसतेच शारीरिक आकर्षण फार काळ टिकत नाही त्यामुळे मनाचे सौंदर्य प्रथम पाहावे.
विवाह पश्च्यात प्रश्न येतो तो संततीचा . त्यामुळे त्याबाबत पत्रिका बोलक्या असाव्यात कारण आजकाल विवाहाचे वय सुद्धा खूप पुढे गेलेले आहे त्यात पुन्हा संततीला उशीर झाला तर , म्हणून ह्या गोष्टी महत्वाच्या आहेत .एकमेकांबद्दलचा आदर , परिस्थितीनुसार जुळवून घेण्याचा स्वभाव आणि सगळ्यात मुख्य म्हणजे संसार करण्याची आवड असायला पाहिजे. पाहुणे आले आहेत तरी मी माझा laptop घेवून बसणार हे कसे जमायचे , नाही का? नोकरीतील जबाबदार्या आहेत मान्य पण संसार हि सुद्धा जबाबदारी आहे आणि ती तुम्ही मनापासून स्वीकारली आहे म्हणूनच विवाह केला आहेत मग ह्यात समतोल साधता आला पाहिजे .
पत्रिका मिलन करणे हि ज्योतिषाची सुद्धा तितकीच जबाबदारी आहे. अनेकदा पत्रिकेत विवाह हि घटना घडवणाऱ्या दशाच लागत नाही तेव्हा जातकाला काय आणि कसे सांगावे हे समजत नाही कारण नकार स्वीकारणे कठीण असते . त्यामुळे उत्तम पद्धतीने समुपदेशन करता आले पाहिजे जेणेकरून प्राप्त परिस्थिती स्वीकारण्याची जातकाची मानसिक तयारी होयील. विवाह हि घटना न घडणे हे त्रासदायक असले तरी आपण जगणे तर सोडून देत नाही ना . आयुष्य पुढे जातेच नव्हे ते न्यावेच लागते . परमेश्वर सगळ्यांना जगवत असतो बघा कुठे ना कुठे करिअर म्हणा किंवा आवडते छंद ह्यात व्यक्ती प्रगतीपथावर जाते आणि आपले दुक्ख थोडे विसरते .
एकंदरीत काय तर नुसते गुण मिलन नाही तर “ गुण मिलन + ग्रह मिलन “ म्हणजेच पत्रिका मिलन होय .
पत्रिका मिलन करताना कुठली ग्रहस्थिती आणि योग तुम्हाला सुद्धा सहज तपासून बघता येतील त्याचा अभ्यास पुढील लेखात करूया.
संकलन : सौ. अस्मिता दीक्षित
संपर्क : 8104639230
No comments:
Post a Comment