|| श्री स्वामी समर्थ ||
आजकाल सोशल मिडिया फार प्रगत झाले आहे त्यामुळे जग सुद्धा जवळ आले . अनेकांना स्वतःची मते मांडण्यासाठी एक उत्तम व्यासपीठ लाभले पण त्याचा अनेकदा गैरवापर पण होत आहे . ज्योतिष शास्त्र हे दैवी शास्त्र आहे आणि त्याचा योग्य अभ्यास तुम्हाला अचूक उत्तर निश्चित देयील. ह्या शास्त्राचा अभ्यास करून त्याचे पूजन करणारे असंख्य लोक आहेत आणि हे शास्त्र न मानणारे सुद्धा आहेत . असो ज्याला जशी अनुभूती येते तसा त्याचा विश्वास असतो . प्रत्येकाची मते वेगवेगळी .
एका दिवसात ज्ञानप्राप्ती करून देणारे हे शास्त्र नाही , मुळातच हे शास्त्र शिकायला दैवी कृपा लागते , त्याच्या इच्छेशिवाय काहीच शक्य नाही म्हणा. उत्तम शिक्षक मिळणे हेही तितकेच महत्वाचे आहे ,त्याचसोबत स्वतःचे अध्ययन ,संशोधन वाचन सुद्धा . तळमळीने आणि मनापासून ह्याचा अभ्यास केला तर ते अवगत होणारच पण त्यात जीव ओतावा लागतो . कधी आपले भाकीत चुकले तर नव्याने अभ्यास करून पुनश्च हरिओम करावा लागतो . सहज सोपे काहीच नाही इथे. असो .
हे इतके आज लिहायचे कारण कि आजकाल लोक whatsapp किंवा फेसबुक वरती आपली पत्रिका इतक्या सहज पोस्ट करतात कि अचंबित व्हायला होते. खिरापत आहे का ती अशीच वाटायला ??????? कुठेही कधीही आपली जन्म तारीख वेळ अशीच कारणाशिवाय लिहू नये. आपल्याला एक कोरा कागद दिला तर त्यावर सही करू का आपण ? नाही ना? आधी वाचू काय लिहिले आहे ते आणि मगच आपली सही करू तसेच आहे हे. पत्रिका टाकून माझे भविष्य सांगा हा थिल्लर पण थांबला पाहिजे . ज्योतिषांनी तर ह्याला संपूर्ण आक्षेप घेतला पाहिजे . समाजाला उत्तम दिशा आणि मार्गदर्शन देण्याचे काम आपण केले पाहिजे. अनभिद्न्य लोकांना सुजाण जाणते केले पाहिजे. त्यांना अगदी सहज वाटणाऱ्या गोष्टी तश्या नाहीत ह्याची जाणीव करून देण्यासाठीच हा लेखन प्रपंच आहे. आत्ताच माझ्या एका पोस्ट वरती एकाने जन्मतारीख वेळ दिवस ठिकाण क्षणात पोस्त केले. देवाने 9 ग्रह तयार केले आहेत त्याचा अभ्यास आहे. पत्रिकेचा अभ्यास करून त्याचे विश्लेषण तुमच्या प्रश्नानुसार केले जाते तर आणि तरच उत्तर बरोबर येते.
ह्या शास्त्राचा योग्य तो सन्मान आपण केला पाहिजे पण तो करायला इतरानाही शिकवले पाहिजे . उठसुठ कुणीही जरा ज्योतिष येते म्हंटले कि लगेच पत्रिका समोर टाकतात . एखादी समस्या निर्माण झाल्याशिवाय त्याच्यावर भाष्य करू नये हा शास्त्राचा नियम आहे .आपल्या काही समस्या असतील तर योग्य ज्योतिषाकडून त्याचे योग्य ते मानधन देवून समुपदेशन करून घ्या ,चर्चा करा मोकळे बोला नक्कीच मार्ग मिळेल पण हे काय ? माझी रास कुठली ?माझा गुरु इथे , माझा शुक्र तिथे . आता शनी वक्री होणार मग माझ्या पत्रिकेत लग्नात आहे त्याचे फळ काय ? अरे काय चाललय काय ? टाईम पास करायला अनेक इतर गोष्टी आहेत त्या जरूर करा पण कृपया ह्या शास्त्राचा मान ठेवा इतकेच सांगायचे आहे.
आपली पत्रिका म्हणजे आपल्या आयुष्याचा आरसा जणू . उत्तम ज्योतिषाच्या हातात पत्रिका पडली तर तो आपला आयुष्याचा सारीपाट समोर मंडेल म्हणून उठ सुठ अश्या सोशल मिडीयावर कारण नसताना स्वतःच्याच आयुष्याचा खेळ करू नका आणि इतरांना तो करूही देऊ नका . ग्रह तारे आपल्या कल्याणासाठीच आहेत . आपल्या घरी पूजा असते तेव्हा गुरुजी नवग्रह मांडतात त्यांना आवाहन करतात ते उगीच का?
कुठलाही एक ग्रह तुमचे भविष्य सांगायला सक्षम नाही , प्रश्न कुठलाही असो त्यासाठी संपूर्ण पत्रिका समोर लागते . चुकीच्या पद्धतीने ह्या शास्त्राचा वापर केला तर आयुष्याला दिशा मिळण्याचे दूर , दिशाहीन व्हाल म्हणूनच काळ वेळ बघून योग्य व्यक्तीकडून प्राप्त परिस्थितीत आपल्या समस्येसाठी समुपदेशन करून घ्या .
हे शास्त्र दैवी आहे आपल्या सर्वाना त्याचा उत्तम लाभ व्हावा आणि वेळोवेळी उत्तम मार्गदर्शन मिळावे हीच त्या नवग्रहांच्या चरणी प्रार्थना .
संकलन : सौ. अस्मिता दीक्षित
संपर्क : 8104639230
No comments:
Post a Comment