Tuesday, 9 May 2023

विवाह एका “ Click “ वर

 || श्री स्वामी समर्थ ||


परवा एका नात्यात लग्न होते. अश्या समारंभात उपवर मुलामुलींची विचारपूस , चेष्टा मस्करी चालतेच . एका उपवर मुलाला विवाहाबद्दल विचारले असता त्याने सरळ सांगितले , अजून तशी कुणी “ Click “ नाही झाली . आजकाल हा शब्द अगदी परवलीचा झाल्यासारखा सारखाच कानावर येत असतो . थोडक्यात त्याचा अर्थ “ पसंत पडणे “ असा आहे. आपल्या पिढीला हा शब्द फारसा जवळचा नसला तरी आजच्या पिढीला तो जवळीक साधणारा वाटतो . “ Click “ मध्ये दडलेला नेमका अर्थ काय ?

मी त्याला विचारले अरे “ Click “ झाली नाही म्हणजे नेमके काय म्हणायचे आहे तुला ? तेव्हा म्हणाला बघताच क्षणी आवडली पाहिजे ना . म्हणजे नेमके काय काय आवडायला हवे ? माझी विचारचक्रे सुरु झाली म्हणजे रूप , देहबोली , चेहरा ह्याला प्राधान्य आहे तर पण फक्त तेव्हडेच म्हणजे सर्व नाही ना . चेहरा आणि वय तर काळानुसार बदलत राहणार आणि लग्न तर कायमस्वरूपीच आहे . जो चेहरा आपल्याला आयुष्यभर पाहायचा आहे तो आपल्या पसंतीचा हवा हे जरी मान्य असले तरी फक्त दिसणे हा एकच मुद्दा विवाह ठरवण्याचा निकष कसा काय असू शकतो . आजकाल instant चा जमाना आहे पण आपल्या आयुष्याचा जोडीदार निवडायचा त्याची पसंती हा काही instant विषय असू शकत नाही , नाही का? एका क्षणात असे काय काय लक्ष्यात येणार आपल्या ? तिचा स्वभाव , तिचे विचार , तिचे कुटुंब , तिचा दृष्टीकोण सगळे एका क्षणात कसे समजेल ?? माणसाचे मन एका क्षणात समजले असते तर अजून काय हवे होते ?

प्रथम दर्शनी आवडलेला मुलगा किंवा मुलगी इतर निकषावर नाही उतरले जसे स्वभाव आवडीनिवडी तर मग काय करणार त्या “ so called Click “ चे हा प्रश्नच नाही का ? आजकाल आधी मुलेच एकमेकांना भेटून आपली पसंती कळवतात मग घरचे भेटतात असे उलटे चक्र बघायला मिळते . पत्रिका बघण्यात सुद्धा अनेकांना रस नसतो. काही हरकत नाही पण मग “ आमचे विचार अगदी सेम आहेत , तो मला हवा तसाच आहे , आमचे सर्व ठरले आहे पुढे प्लानिग वगैरे “ हे जेव्हा 1- 2 वर्षातच संसारात वादळे निर्माण होतात तेव्हा कुठे जाते ?मुले एकमेकांना भेटतात आणि प्रथम दर्शनी पसंत करतात तेव्हा त्यात कितीसे प्रेम असते ? प्रेम कश्याशी खातात हेही ह्या मुलांना माहित नसते . असते ते फक्त एक आकर्षण ,त्यातून मग भेटी गाठी सुरु होतात .पण अनेकदा भेटून सुद्धा मुलांनी त्यांच्या मनातील सगळे प्रश्न , आपल्या घरातील रीतीरिवाज , एकंदरीत कौटुंबिक माहिती , आपले आयुष्याबाबत असणारे विचार , संतती चे बाबत असणारे विचार , नोकरी आर्थिक बाजू ह्याबाबत किती बोलणे झाले असावे ह्याबद्दल पालक साशंक असतात आणि म्हणूनच पालकांची सुद्धा मुलांसोबत भेट घेवून सर्व बाबींचा स्पष्ट खुलासा होणे गरजेचे असते . आयुष्यातील ह्या सगळ्यात महत्वाच्या नवीन वळणावर नात्यात जितका मोकळेपणा असेल , खरेपणा स्पष्ट व्यवहार तितके मानसिक स्वास्थ्य उत्तम राहील नाही का ? 

एखादी व्यक्ती आपल्याला आवडते तेव्हा त्यातले नेमके काय आवडले हे विचारले तर ह्या मुलांना सांगताही येणार नाही इतक्या झटपट त्यांची पसंती अनेकदा होते . विवाहापूर्वी दोघांनीही अनेकदा भेटून एकमेकांना जाणून घेतले पाहिजे. भेटीतून अनेक गोष्टींचा उलगडा होत जातो मग त्यातून आपल्यालाही समजते कि आपल्या किती निकषांवर आपला होणारा जोडीदार खरा उतरत आहे. आपल्या कुठे आणि कशी तडजोड करावी लागणार आहे उदा. आपले विभक्त कुटुंब आहे पण मुलाच्या कडे कदाचित 2-3 पिढ्या एकत्र राहत आहेत त्यात आपण जमवून घेवू शकू का किबहुना त्यांच्यात जमवण्याचा आपला पिंड आहे का ? वे सर्व बारकावे दोघांनीही पुरेसा वेळ घेवून तपासून बघितले तर भविष्यात किंतु परंतु कमी होतील .

विवाह झाल्यानंतर अनेक गोष्टीं समजल्या ज्याची आधी सुतराम कल्पनाही नव्हती असे चित्र कधीतरी दिसते आणि मग त्या नात्याला सुरुंग लागतो . मग इतक्या वेळा भेटलात बोललात तेव्हा काय हवापाण्याच्या गप्पा केल्यात का? असे विचारावेसे वाटते. आजकाल विवाह हि गोष्ट समाजापुढे आव्हानासारखी आहे . मनासारख्या जोडीदाराचा शोध , पुढे साखरपुडा विवाह .पण इतके होऊन हे थांबत नाही तर त्या दोघांचे पुढील आयुष्य सुद्धा दोन्ही कुटुंबांसाठी महत्वाचे असते . पुढचा प्रवास खरा असतो , त्यात जेव्हा ते दोघे एकमेकांना समजून घेताना दिसतात तेव्हा पालकांना खरच  “ नांदा सौख्य भरे “ म्हणावेसे वाटते. शेवटी कुटुंबातील लोक नंतर येतात , सगळ्यात आतले वर्तुळ तर त्या दोघांचेच असते ना.

जर सगळे सूर जुळले होते तर मग पुढचे चित्र बरेचदा इतक्या झपाट्याने का पालटले ? हा विचार करताना असे वाटते पालकांनी सुरवाती पासूनच सगळ्यात हस्तक्षेप करावा , मुलांना भेटण्यास जरूर मोकळीक द्यावी पण सगळ्याच गोष्टी मुलांवर सोडून देऊ नये. तुम्हा दोघांना पसंत तर मग आम्हालाही हे तर अजिबात म्हणू नये. परवाच एक केस पहिली . दोघांचे हितगुज खूप झाले पण प्रत्यक्षात पालकांच्या भेटीत चित्र पराकोटीचे वेगळे होते . काय आहे हे वय वेडेच असते त्यामुळे तिला तो कायमच परीकथेतील राजकुमार वाटत राहतो . मुलीच्या किंवा मुलाच्या देखणेपणा किंवा सौंदर्यावर भाळून तिचे किंवा त्याचे अनेक दुर्गुण किंवा न पटणार्या गोष्टींकडे दुर्लक्ष्य केले जाते आणि त्याच गोष्टी यक्ष प्रश्न म्हणून पुढे येतात आणि रौद्र रूप धारण करतात . मी सामंजस्य दाखविन हे कबुल करणारा जोडीदार प्रत्यक्ष आयुष्यात जेव्हा अजिबात तडजोड करत नाही तेव्हा मग ते गोंडस चित्र झपाट्याने बदलते .

म्हणूनच विवाहापुर्वीच्या भेटीगाठीत आपल्या अपेक्षा , विचार आपला भूतकाळ ,वर्तमान आणि अपेक्षित भविष्यकाळ स्पष्टपणे मांडता आला पाहिजे . सगळ्या विचारांची यशस्वी देवाणघेवाण झाली तर सहवासातून कालांतराने मनेही जुळतील आणि तरच मग ती किंवा तो  खर्या अर्थाने “ Click “ झाला असे म्हणता येयील कारण “ Click “ हि सुरवात आहे पूर्णत्वाकडे नेणारी पण ते पूर्णत्व नाही .

संकलन : सौ. अस्मिता दीक्षित 

संपर्क : 8104639230



 





 



No comments:

Post a Comment