Wednesday, 31 May 2023

ध्यास

 || श्री स्वामी समर्थ ||



जेव्हा सगळीकडे अंधार होतो तिथे त्यांचे राज्य सुरु होते . आपल्या संकटांनी ,निराशेनी भयभीत होऊन मार्ग मिळेनासा झाला कि आपण सद्गुरूंच्या चरणाकडे धाव घेतो . आता तूच काय तो पाठीराखा म्हणून त्यांना घट्ट मिठी मारतो आणि त्यांच्या सेवेत ( भजनी ?? ) रुजू होतो. 

सद्गुरूंची सेवा मी नक्की कश्यासाठी करतो हा प्रश्न प्रत्येकाने निदान एकदातरी स्वतःला विचारावा . अनेक पिढ्यांपासून घरात त्यांची सेवा आहे म्हणून जन्मल्यापासूनच गुरुसेवा बघत त्याचेच बाळकडू पाजल्यामुळे सेवा करतो , त्यांच्याबद्दल प्रेम आहे का ? कि फक्त प्रपंचातील एखाद्या दुक्खा पुरते मी स्वामी स्वामी करतो आणि काम झाले कि सगळे ठप्प . मग पुढील वेळी बघू संकट आले कि पुन्हा जप चालू असे आहे का? आजकाल सगळेच काहीतरी करत असतात म्हणजे जप , नामस्मरण , पारायण , यात्रा मग मी कसा सोवळा राहू मग मी फ्याशन म्हणून जप करतो कि सांगण्यापुरता करतो , कि बघूया काय प्रचीती मिळते म्हणून करतो ??? कि खरच मला त्यांच्या विषयी तळमळ आहे, ध्यानीमनी तेच आहेत आणि फक्त त्यांच्याच सेवेसाठी हे जीवन मी स्वीकारले आहे इतकी आर्तता इतकं सोळा आणे खरा भक्तीभाव आपला आहे म्हणून सेवेत आहोत ???????????? अगदी खर खुरे उत्तर मिळवण्यासाठी एकदा अगदी मनापासून जरा स्वतःच्याच मतांची उलटतपासणी करा आणि बघा काय उत्तर मिळते .

अहो त्यांनीच जन्माला घातलय आपल्याला , तुम्हा आम्हा सर्वांचा बाप आहे तो, पाठीराखा सखा . आपल्या मनात कुठलाही विचार येण्याच्या कितीतरी आधीच तो त्यांना समजलेला असतो ह्याचे भान ठेवले पाहिजे . आपण जगाला फसवू , स्वतःलाही फसवू पण त्यांना नाही , अहो तितकी कुवतच नाही आहे आपली .  मनुष्य हतबल झाला कि जे योग्य वाटेल ते बोलतो , मी नारळ ठेवीन मी यात्रा करीन त्यात चूक काहीच नाही त्याक्षणी जे सुचेल ते तो बोलतो पण फक्त कामापुरता मामा करू नका स्वामिना. ते जन्मोजन्माचे सोबती आहेत आपले. ते आहेत म्हणून जीवनाला आकार उकार आहे .स्वामी नामाचा उपयोग अंतर्बाह्य शुद्धीसाठी आहे, मनाच्या पवित्रतेसाठी आहे, हे नाम आपल्याला जगायला हसायला आणि इतरानाही जगायला शिकवते , वेगळा दृष्टीकोण देते , अंतर्मुख करते  आणि जीवनाचे रहस्य सुद्धा उलगडून दाखवते . 

आपण सर्व अहंकाराने ग्रासलेले असूनही दुसर्याबद्दल तोंडसुख घेत असतो. ज्याची जितकी पात्रता , भक्तीची खोली तितकेच पदरात घालणार स्वामी . आपल्याला अंतर्बाह्य ओळखतात महाराज आपल्याला . आपली आणि इतरांचीहि योग्यता आपण कोण ठरवणारे ? तो सर्वाधिकार त्यांचाच आहे आणि त्यांचाच राहणार . 

महाराजांवर मनापासून प्रेम करा , मग काही हवे असुदे नको असू दे , कश्यासाठी तरी भक्ती नको. उपासना अंतर्मानापासून केली तर काही मागायची गरजच उरणार नाही. तन मन धन त्यांच्या चरणाशी आणि आपले अखंड आयुष्य प्रत्येक श्वास त्यांच्याच चरणाशी वाहा आणि मग बघा मागण्यासारखे काही उरणारच नाही. 

त्यांच्याशिवाय आपले जगणेच काय आपले अस्तित्व सुद्धा नाही आहे. आरशात स्वतःचा चेहरा सुद्धा त्यांच्या शिवाय पाहणे अशक्य आहे आपल्याला. आपल्याला जागवणारे तेच आहेत . आपले एकेक पाऊल मृत्यूकडे जात आहे , सेवेचा वेळ कमी होत आहे असे असताना अखंड नामस्मरण करून आपण आपले जीवन आणि हा जन्म सार्थकी लावला पाहिजे . ज्यांना करायचे आहे ते करतील आणि ज्यांना करायचे नाही ते सबबी सांगतील. अहो वेळच वेळ आहे आपल्याला. नाम घ्यायला माळ लागत नाही काळवेळ लागत नाही तर मनात त्यांचा “ ध्यास “ असावा लागतो आणि तो असेल तर मुखी अखंड नाम असणारच असणार .

आपल्या जीवनाचा आधार प्रत्यक्ष स्वामी आहेत . स्वामिनी सांगितले आहे शेत पिकवून खा , वारेमाप कष्ट करा आणि तरच मी पाठीशी आहे. असेल हरी तर देयील खटल्यां वरी असे म्हणणाऱ्या आळशी लोकांचे स्वामी तोंड देखील बघणार नाहीत .

संकटांशी दोन हात करणार्या , मानाने , स्वाभिमानाने आपली मीठ भाकर मिळवून कष्टाने जगणाऱ्या भक्तांच्या पाठीमागे महाराज अखंड उभे आहेत . महाराज आणि आपल्यामध्ये  आपल्या “ मी “ ची भिंत उभी आहे ती एकदा कोसळून पडली कि आपण आणि स्वामी मग दुग्ध शर्करेसारखे एकजीव होऊ .

महाराजांचा तारक मंत्र तर जीवनाला एक संजीवनी आहे आणि ओरत्येकाला तो म्हणताना अद्भुत अनुभव येतातच.

काहीतरी मिळवण्यासाठी भक्ती नको , ती त्यानाही आवडणार नाही , त्याला तसाही काहीच अर्थ नाही . त्यांनी काही दिले काय नाही दिले काय मनापासून त्यांचे नाम घेणारच त्यांच्या समीप जाऊ शकतो , आज हजारो लाखो भक्त स्वामी नामाचा जयघोष करत आहेत पण किती जणांना ते प्रसन्न झाले आहेत ? कितीना अनुभूती आली आहे , कितीना त्यांचे मार्गदर्शन झाले आहे ???? जशी भक्ती तशीच प्रचीती .आता मागणे पुरे झाले आता फक्त द्यायचे प्रेम प्रेम आणि प्रेम .

महाराजांच्यावर ओतप्रोत प्रेम करा , त्यांना आपल्या श्वासावर ठेवा आणि बघा हेच जीवन किती सुंदर वाटेल. अहोरात्र त्यांचा ध्यास असावा तरच हि जीवन नौका पैलतीरी लागेल . आपल्या वेळेला किमत नाही तर त्यांनी ठरवलेली वेळ महत्वाची आहे. सर्व गोष्टी त्यांच्या वेळेप्रमाणे त्यांनी ठरवल्याप्रमाणेच होणार.

गुरु दर्शनाची लागे आस |

ध्यानी मनी तुमचाच ध्यास ||

संकलन : सौ. अस्मिता दीक्षित 

संपर्क : 8104639230 




 

  

   


1 comment:

  1. श्री. स्वामी समर्थ

    ReplyDelete