|| श्री स्वामी समर्थ ||
मुले वयात आली आजकालच्या परिभाषेत मुले सेटल झाली कि त्यांच्या विवाहाचा विषय घरोघरी चर्चिला जातो . आजकाल अनुरूप जोडीदार मिळणे हे जरा कठीण झाले आहे .बदलत्या काळानुरूप विवाहाच्या सुद्धा बदलत्या संकल्पना आहेत . मुला मुलींच्या अटी खूप आहेत असे एकंदरीत दिसून येते . मुलीसुद्धा आता खूप शिकतात आणि त्यांचे उत्पन्न बरेचदा मुलांपेक्षाही अधिक असते अश्यावेळी योग्य जोडीदार मिळणे त्यांना कठीण जाते. असो.
विवाह हा तर त्या दोघांचा असतो त्यात तिसऱ्याचे काहीच काम नसते असे गमतीने म्हंटले तरी विवाह म्हंटले कि दोन कुटुंबे एकत्र येतात म्हणून सर्वांचाच विचार होतो . आधुनिक काळातील विवाहाचे चित्र सर्वार्थाने बदललेले दिसते. पूर्वीचे कांदेपोहे आणि मानपानाच्या याद्या काळाच्या पडद्याआड गुडूप झाल्या असल्या तरी अजूनही विवाह म्हंटला कि लग्नाच्या बैठकी दोन कुटुंबातील व्यक्तींच्या विचारांची देवाणघेवाण , पसंती हे सर्व आहेच कि.
पसंती मुलांची असली तरी विवाह शेवटी घरातील मोठ्या व्यक्तीच ठरवतात. विवाहा नंतर ची स्थिती किबहुना सुरवातीचा काळ हा सगळ्यांसाठी महत्वाचा असतो . मुलींसाठी सगळेच बदलते .ज्यांच्या अंगाखांद्यावर वाढलो त्यांना आणि आपल्या घराला सोडून एका नवीन कुटुंबात प्रवेश करताना मनात असंख्य विचार येतात . आपल्या जोडीदाराशी नाते जोडताना त्या सोबत असंख्य नाती जोडली जातात आणि प्रत्येक नाते काहीतरी अपेक्षा घेवूनच येते .नवीन घरात अगदी चहा साखरेच्या डब्यांपासून ते घरातील आर्थिक व्यवहार उठबस रिती रिवाज हे सर्वच बदलते आणि त्यात जुळवून घ्यायला वेळ लागतो . घरातील मोठ्या व्यक्तींचा म्हणजेच मुलाच्या पालकांचा ह्यात सिंहाचा वाटा असतो असे म्हंटले तर वावगे ठरू नये .
आपली संस्कृती हि पुरुष प्रधान असली तरी स्वयपाक घरात प्रामुख्याने घरातील स्त्रीची हुकुमत असते ,ते तिचे हक्काचे राज्ज असते. त्यामुळे स्वयपाकघरात सुनेनेच काय अजून कुणीही बदल केले तर सहजासहजी पचनी पडत नाहीत . आपले आपल्या घरातील स्थान आता डळमळीत होणार दुसरे कुणीतरी येऊन आपल्याच बरोबरीने इथे वावरणार असेही काही जणींना वाटत असावे . पण आपण सुनबाई होतानाचे दिवस आठवले तर येणारी सून सुद्धा तेच अगदी तेच विचार करत असते हे ध्यानात येयील. अनेकदा सुरवातीला ज्या सुनेचे इतके कोड कौतुक केले जाते तिच्याच बद्दल बरेचदा काही काळानंतर दुसरे टोक गाठले जाते . म्हणूनच प्रत्येक गोष्टीसाठी वेळ दिला आणि घेतलाही पाहिजे .
प्रत्येक घरातील विचारधारा वेगवेगळी असते . इथे अत्यंत आधुनिक विचारांच्या स्त्रियासुद्धा तेच करताना दिसतात . गेले कित्येक वर्ष जे चालू आहे तेच चालू ठेवण्यात कसले आले आहे शहाणपण . काळानुरूप जो स्वतःच्या विचारात बदल करेल तोच पुढे जायील. सुनेचेही काही नवीन विचार असतील मग ते स्वयपाकघरातील नवीन वस्तू , स्वयपाकाची भांडी वापरण्यात असोत अथवा घरातील सजावट अन्य बाबीत ,तेही नक्कीच विचारात घेतले पाहिजेत . तिच्या हौशीने तिला तिचे घर सजवायला दिले तिच्या मतालाही किंमत दिली तर तिलाही हे नवीन घर आणि तेथील माणसे आपलीशी वाटू लागतील नाहीतर तिचे मन इथे खर्या अर्थाने रमणार नाही .पूर्वीच्या काळी असणारी तांब्या पितळेची भांडी आजही काही घरात वापरली जातात . उलट आजकाल ती वापरण्याकडे अधिक कल असतो पण नवीन प्रकार सुद्धा खूप आले आहेत त्यामुळे ह्या दोन्ही पिढ्यातील सुवर्णमध्य काढून संसार केला तर घराला मानसिक स्थैर्य लाभेल. हि एक गोष्ट झाली अश्या कित्येक गोष्टीत सामंजस्या ची भावना हवी .
आजकालच्या मुली सुशिक्षित , शिकलेल्या जग फिरणाऱ्या ,कार्यालयात अनेक जबाबदार्या पेलणार्या आणि स्वतंत्र विचारांच्या आहेत . कामाला करिअर ला प्राधान्य देणाऱ्या आहेत . त्यांच्या पालकांनी त्यांना व्यक्ती म्हणून घडवण्यासाठी अथक प्रयत्न केले आहेत आणि तिच्यातील अनेक गुण आवड्ल्यामुळेच तिच्याशी तुमच्या चिरंजीवानी विवाह केला आहे हे विसरून चालणार नाही . तात्पर्य असे कि थोडे आता आपल्यालाही बदलायचे आहे . “ आमच्याकडे हे असेच आहे “ हि वाक्य आता चालणार नाहीत . एक पाऊल मागे घ्यायची मनाची तयारी पाहिजे. ती आमच्या घरी आली म्हणजे सगळी तडजोड तिनेच केली पाहिजे का? तर ती घरातील सर्वांनी केली पाहिजे हा सारांश आहे . आम्ही मागच्या पिढीशी पण तडजोड केली आता पुढच्या पिढीशी पण आम्हीच करायची का तडजोड ? तर हो कारण त्यातच सर्वांचे सुख आहे आणि त्याला प्रत्येक वेळी तडजोड का म्हणावे ? सर्वांच्या सुखासाठीच आहे हे सर्व नाही का?
मुळातच त्या दोघांच्या संसारात म्हणजे विचारात , निर्णयात फार हस्तक्षेप करूच नये . त्या दोघांना त्यांचे विचार आणि आयुष्य स्वतंत्रपणे जगता यायला हवे . त्यांचे निर्णय त्यांना घेवू द्यावेत, निर्णय लादु नयेत . माझी सून हे करणार नाही हे गृहीत धरू नये तिला आपल्या कुळाच्या रीतीभाती समजावून सांगितल्या तर ती नक्कीच करेल हे सकारात्मक धोरण ठेवावे. पाण्यात पडतील आणि पोहायला शिकतील ..आपण त्यांना आता थोडे मोकळे सोडायला हवे. आजकाल च्या शब्दात त्यांना त्यांची स्पेस द्यायला हवी .त्यांना एकमेकांचे होवूदे ..ते एकमेकांचे झाले कि मग ते अपोआप आपलेही होतील .मुलांना कमीतकमी प्रश्न विचारावेत आणि त्यांना त्यांचे निर्णय स्वतः घ्यायला मदत करावी . आपण त्यांच्यावर आयुष्यभर उत्तम संस्कार केले आहेत त्या संस्कारांवर विश्वास ठेवावा . आजकाल मुली सुद्धा त्यांचे विचार करतात , त्यांचे आणि आपलेही व्यक्ति स्वातंत्र आपण अबाधित ठेवले तर एकंदरीत संसाराची गाडी सुरळीत चालेल .शेवटी आपल्याला त्यांचे सुख हवे आहे.
आजवर विवाहासाठी केलेल्या अनेक समुपदेशनातून मला विवाह आणि त्या संदर्भात अनेक विषय लेखनासाठी सुचले त्यातील हा एक विषय आज मांडावासा वाटला . विवाह पश्चात दोन्हीकडील वडील मंडळींचा प्रत्येक गोष्टीत होणारा हस्तक्षेप त्या दोघानाही नको आहे आणि त्यामुळे त्यांचे सूर जुळता जुळता राहून जात आहेत . मुलाला आईवडिलांना काही बोलता येत नाही त्यामुळे त्याचीही अनेकदा मानसिक कुचंबणा होते.
व्यक्ती तितक्या प्रकृती .एखाद्या मुलीला स्वयपाकाची खूप आवड असेल तर एखादीला आवड असूनही वेळ देता येणार नाही . ह्या त्या त्या कुटुंबातील लोकांनी समजून घेण्याच्या गोष्टी आहेत . इतर वेळी फार आधुनिक असणारे आपण ( म्हणजे निदान तसे दाखवतो तरी ) सुनेने घरात कसे वागावे ह्याबाबत क्षणात कर्मठ होऊन जातो आणि अनेक अवास्तव अपेक्षा ठेवतो . मुळात त्यांचे लग्न करून दिले आहे आता तुमचा संसार तुमचे निर्णय आणि तुमचे आयुष्य तुम्ही जागा हाच सुखाचा मूलमंत्र आहे . आम्हाला विचारलात तर आम्ही सल्ला नक्कीच देऊ पण विचारला तरच देणे हितावह ठरते , न विचारता दिला तर ती लुडबुड होते ( आपल्याला नाही वाटली तरी ती असते ). एकत्र कुटुंबात मी वरती मांडलेल्या सर्वच गोष्टी निसंकोच पणे होतील असे नाही पण विवाहापूर्वी मुलीला आपण एकत्र कुटुंबात राहणार आहोत हे माहित असल्यामुळे तिला ह्या सर्व गोष्टींची म्हणजे मुलाच्या घरातील चालीरीती , व्यक्तींचे स्वभाव ई ची माहिती असणारच म्हणजे असली पाहिजे .
आजकाल दोन पिढ्या एकत्र नांदणे सोडा ( अपवाद आहेतच ) ते दोघे एकत्र नांदले तरी खूप आहे अशी स्थिती आहे. त्यामुळे त्यांच्यातील मतभेदाला आपण कारणीभूत ठरायला नको इतके त्यांच्यात गुंतायचे नाही . आपण मुलांना मोठे केले त्यांना माणूस म्हणून घडवण्यासाठी सर्व काही केले त्यामुळे आता त्यांना त्यांच्या बेटर हाफ सोबत उर्वरित आयुष्य मजेत व्यतीत करता यावे बस इतकेच तर हवे आहे आपल्याला . सून आल्यामुळे आपला मुलांवरचा हक्क अजिबात कमी
होणार नाही .थोडा सहवास कमी निश्चित होईल पण तो त्यांचा आनंद आहे आणि आपलाही . शेवटी आपल्याला आयुष्याच्या संध्याकाळी घरात गोकुळ नांदलेले पाहता आले कि झाले अजून काही नको.
सरतेशेवटी इतकेच म्हणायचे आहे आपल्या आयुष्याच्या संध्याकाळी आपणही आपल्या जोडीदारा सोबत खूप वेळ घालवावा जो कदाचित आधी प्रपंचामुळे देता आला नसावा . भटकंती करावी , एकमेकांशी गप्पा , फिरणे आवडते छंद जोपासण्यात वेळ घालवावा . आपण उभारलेले घर नामक विश्व हे सहज सोडून देता येत नाही हे माहित आहे तरी प्रयत्नाला लागावे म्हणजे जमेल. पण आता नवीन पिढीवर विश्वास आणि जबाबदार्या टाकून थोडे निवृत्तीला लागावे .
मागील पिढीतील लोकांचा लग्न करून आल्यानंतर चा काळ आणि आजचा ह्यात खूप तफावत आहे . आपण घरात अनेक पिढ्यांतील व्यक्तीसोबत जमवून घेतले पण आताचे चित्र वेगळे आहे. आपण दोघे वेगळे राहूया असे सुनेने म्हणायला तसे चित्र निदान आपणच नको निर्माण करायला असे मला म्हणायचे आहे इतकेच. हा विषय खूप मोठा आहे आणि त्यावर चर्चा करावी लिहावे तितके कमी आहे त्यामुळे थोडे आवरते घेत आहे.
थोडक्यात काय तर आता मुलांचा गृहस्थाश्रम आणि आपला वानप्रस्थाश्रम सुरु झालेला आहे हे जाणावे तरच सर्व सुफळ संपूर्ण होईल आणि त्यांचा संसार आपल्याही पेक्षा अधिक आनंदाचा होयील.
हा विषय खूप मोठा आहे आणि प्रत्त्येक व्यक्तीप्रमाणे आणि कौटुंबिक गरजांनुसार तो बदलणार आहे हेही आहेच.
सगळ्यांना सगळी मते पटावीत हा अट्टाहास अजिबात नाही ,प्रत्येकाचे विचार , अनुभव वेगवेगळे असतील ते जरूर मांडावेत आणि चर्चा व्हावी जेणेकरून इतरानाही आपले विचार आणि अनुभव वाचायला मिळतील आणि त्यावर एक उत्तम विचारमंथन होईल.
संकलन : सौ. अस्मिता दीक्षित
संपर्क : 8104639230
No comments:
Post a Comment