|| श्री स्वामी समर्थ ||
विवाह जुळवताना वधू आणि वर ह्या दोघांच्या पत्रिका बघाव्या लागतात ..त्यात गुणमिलन हि पारंपारिक पद्धती डावलून चालत नाही पण फक्त गुणमिलनावर पत्रिकेचा निकष न काढता ग्रह मिलन , दशा , इतर ग्रहस्थिती ह्यांचाही विचार करावाच लागतो.. दशा स्वामीला डावलून पत्रिका मिलन करणे अत्यंत धोक्याचे ठरते .
दोघांच्याही पत्रिकांचा विचार करताना दोघांची विचारसरणी एकमेकांशी जुळणार कि नाही ते पाहण्यासाठी दोघांचे लग्न , लग्नेश तसेच मनाचा कारक चंद्र पाहावा.
लग्न हे उर्वरित आयुष्यात दोघानाही सुख प्रदान करणारे आहे का ? त्यांना संतती होईल का? वंशवेल वाढेल का ? आर्थिक स्थैर्य मिळेल का ? , संसारातील गोडवा जपला जायील का? संसारातील कुरबुरी , चढउतार , अचानक उद्भवणाऱ्या संकटाना दोघेही एकत्रित पणे सामोरे जातील का? थोडक्यात दोघानाही मानसिक , वैचारिक क्षमता आहे का? आयुष्यमर्यादा , उधळपट्टी करण्याची वृत्ती आहे कि संचय करण्याची वृत्ती अनेक पेहलू अभ्यासावे लागतात . थोडक्यात पुढील 25-30 वर्षाचे वैवाहिक सौख्य कसे असणार आहे ह्याचा मागोवा घ्यावा लागतो .वैचारिक , आर्थिक , मानसिक क्षमता त्याचसोबत लैंगिक क्षमताही महत्वाची आहे.
अनेकदा पत्रिकात मंगळ आहे म्हणून अनेक चांगली स्थळे हातातून निसटून जातात . पृथ्वीवरच्या 90% लोकांमध्ये मांगलिक दोष असू शकतो मग त्यांनी लग्न करायची नाही का? शास्त्रात त्यावर अनेक उप गोष्टी सुचवल्या आहेत . मंगळ क्षीण आहे का , कुज दोषात आहे का? हे सर्व न बघताच फक्त मंगळाची पत्रिका म्हणून नकार घंटा वाजवण्यात अर्थ नाही . मंगळा च्या पत्रिकांचे उगीच स्तोम करू नये .
पत्रिकेतील प्रत्येक ग्रहाचे नवमांश बळ सुद्धा पाहिले पाहिजे. संतती सौख्य हि विशेष बाब आहेच .
अनेकदा पत्रिका चुकीच्या पद्धतीने पहिली जाते तसे नसते तर मग वर्षभरात घटस्फोट कसे होतात असा विचार मनात येतो. पत्रिकेतील सर्व ग्रहांचा विशेषकरून पाप ग्रह , त्यात सप्तमेश पापग्रह असेल तर अगदी नक्कीच अभ्यास केला पाहिजे .
संसारिक सुखाचा कारक शुक्र सुस्थितीत आहे का? गुरूची बैठक योग्य आहे का? अनेकदा संसारात कलह होतील अशी ग्रहस्थिती असते पण त्यातून सुद्धा पुढे जायचे असेल तर कुटुंब भाव आणि चतुर्थ भाव चांगला हवा . तो नसेल तर संसार टिकवण्याकडे कल नसतो.
आजकाल विवाह होणे कठीण झाले आहे त्याला अनेक कारणे सुद्धा आहेत . दोघांच्यात शारीरिक , मानसिक आकर्षण , ओढ , प्रेम , एकमेकांसाठी जगण्याची अनेकदा समर्पण त्यागाचीही वृत्ती असली पाहिजे त्यासाठी चंद्र शुक्र मंगळ योग्य दिशा दाखवतील. दोघांचे लग्न एकमेकांच्या षडाष्टकात असेल तर विचारच जुळणार नाही . सरतेशेवटी दशा महत्वाची आहे.
विवाह हा फक्त त्या दोघांचा नसून दोन कुटुंबियांचा त्यात समावेश होणार असतो. अनेक नाती गोती बदलणार असतात . प्रत्येक नाते खुल्या दिलाने स्वीकारावे लागते तरच पुढची वाटचाल सुखकर होते . आपण समोरच्याला स्वीकारले तर समोरचा सुद्धा आपल्याला स्वीकारेल ह्याची खात्री ठेवा. प्रत्येक नाते फुलायला बहरायला वेळ लागतो आणि तो द्यावा लागतो त्यासाठी संयम ठेवला पाहिजे. आज आपण सुनेच्या भूमिकेत आहोत उद्या सासुच्याही असणार आहोत हा विचार आत्ताच केला पाहिजे नव्हे तो करणे आपल्याच हिताचे ठरेल. प्रत्येक नाते अनेक अपेक्षा घेवून येते त्या सर्वच पूर्ण होतील असे नाही. आपणही इतरांच्या सर्व अपेक्षांच्या कसोटीवर १००% उतरणार नाहीच कि . संसाराचा मार्ग कधी सोपा तर कधी खडतर असतो. तिथेच आपली साधना उपयोगाला येते , सद्गुरू आपल्याला संयमित करतात.
नवरा बायको चे नाते समर्पणाचे सुद्धा आहेच कि. एकमेकांसाठी जगण्यात गोडवा असतो . कधी तुझे आणि कधी माझे हे चालायचेच . लग्नात सुंदर दिसणारी बायको कायम सुंदर दिसणार नाही , आपणही बदलणार आहोतच , देह रंग रूप दिसणे हे शाश्वत नाही ह्याचे भान असले पाहिजे .आपण बदलणार तसे समोरची व्यक्ती सुद्धा .
आज एका मुलीने लग्नाची अट सांगितली कि “ मला सासूसासरे वयाने 55 च्या आत असणारे हवेत ..” काय हेतू असेल हे सांगण्यामागे तिचे तिलाच माहिती .
विवाह संस्था टिकवायची आहे आपल्याला आणि त्यासाठी आपल्या अनेक विचारणा मुरड घालावी लागणार हि खुणगाठ लग्नाला उभे असणार्या सर्व मुलामुलीनी करावी असे सुचवावेसे वाटते .
आज पालक आपल्या मुलांच्या डोक्यावर पडणार्या अक्षतांसाठी आतुर आहेत . शिक्षण घेतले , मोठ्या पगाराच्या नोकर्याही आहेत सर्व आहे. पण आपणच घातलेल्या नको त्या अटींच्या डोंगराखाली आपणच घुसमटत आहोत , वये पुढे जात आहे . कुठे थांबायचे ते ज्याला समजले तो जिंकला , ज्याने तडजोड केली सामंजस्याने विचार केला तर तो पुढे जायील , आता माझ्या मुलाला किंवा मुलीला स्थळेच सांगून येत नाहीत हि अवस्था तुमच्या आईवडिलांना पाहायला लावू नका. तुमची बाळलेणी तुमच्या मुलांच्या अंगावर घालायचे सुख त्यांच्या पदरी पडू दे .
आपण जोडीदार शोधात आहोत जो आपल्याला माणूस म्हणून वागवेल , आपल्या स्वप्नांच्या पूर्ततेसाठी खंबीर उभा राहील , आपले मन जपेल आणि विचाराना मान देयील असा हवा. आपण विकत घ्यायला जात नाही जोडीदार लग्नाच्या बाजारात . दुर्दैवाने तसे आहे नाहीतर मुलीनी पगार अमुक अमुक च्या वरती हवा अशी अट घातलीच नसती . कुठून आल्या ह्या अटी ? पगार ह्या एकाच निकषावर विवाह होणार कि काय ? भले शाब्बास . अश्या अटी पूर्ण करणारा नवरा मिळेलही पण तो प्रेम करणारा असेल का? कारण दोघांचेही विश्व भावना प्रेम नसून पैसा हे असेल. पैसा हीच पसंती असे सध्याचे चित्र आहे.
विचार करा पुन्हा पुन्हा विचार करा . आपण सुख शोधत आहोत , नवरा मुलगा विकत नाही घेत आपण , हि प्रेमाची देवाण घेवाण आहे पैशाचा सौदा नाही .लग्नाचा बाजार मांडू नका , पूर्वीच्या काळी मुली मिळवत सुद्धा नव्हत्या तेव्हा नाही ती केली कुणी पगाराची भाषा . ह्या कोशातून लवकर बाहेर या आणि सहजीवनाचे स्वागत करा इतकेच सांगायचे आहे. नाहीतर पुढे येणाऱ्या स्थितीला तुम्ही स्वतःच जबाबदार असला. वय वाढले कि शरीरातील ताकद , सौंदर्य , उमेद सर्व काही कमी होत जाते . विवाहासाठी पैसा पगार हे निकष कधीपासून झाले ? सुख समोर आहे त्याला आपलेसे करा , त्याच्याकडे पाठ फिरवू नका नाहीतर हा अहंकार तुमच्या पुढील आयुष्यातील एकटेपणाला कारणीभूत असेल . आपल्या मागे आपली मुले एकटी राहणार ह्या चिंतेने तुमचे पालक सुद्धा चिंताग्रस्त आहेत ह्याचा विचार करा . श्री स्वामी समर्थ
सौ. अस्मिता दीक्षित
संपर्क : 8104639230