Thursday, 4 September 2025

एकरूपता

 || श्री स्वामी समर्थ ||

भगवंत गोपाल कृष्ण एकदा रुक्मिणी सोबत रथातून जात असताना समोरून राधा कृष्णाचा धावा करत आली . तिला पाहून कृष्ण रथातून उतरले आणि तिच्याशी चार शब्द गुजगोष्टी करून पुन्हा रुक्मिणी सोबत निघून गेले. घरी आल्यावर रुक्मिणी ने विचारले , हि कोण होती तेव्हा तिची ओळख भगवंताने करून दिली. आता स्त्री हि स्त्रीचा मत्सर करणारच त्यात ती रुक्मिणी . प्रत्यक्ष आपल्या भगवंतावर प्रीती करणारी त्याला पुजणारी आहे तरी कोण ह्या मनातील द्वेषातून तिने राधेला एकदा घरी बोलावले आणि कडकडीत दुध तिला दिले. राधे ने कृष्णाचे नाव घेतच दुध प्राशन केले व घरी गेली. संध्याकाळी भगवंत घरी परतले .

ते दमले असतील म्हणून रुक्मिणी त्यांचे पाय दाबायला लागली असता तिला दिसले कि त्यांच्या पायावर फोड आलेले आहेत . तिने विचारले असता भगवंत उत्तरले आज राधा तुझ्याकडे आली असता तिला तू उकळते दुध दिलेस. कृष्णाचे नाव घेत तिने ते प्राशन केले . तिच्या अत्यंत प्रेमाने भरलेल्या हृदयात सदा सर्वकाळ विराजमान असलेले कृष्णाचे चरण त्यावर ते दुध पडले आणि भगवंतांचे पाय भाजले फोड आले.

राधेचे आपल्या आयुष्यातील आणि हृदयातील महत्व रुक्मीणीला भगवंतानी पटवून दिले. काय वर्णावी हि भक्ती आणि आपल्या देवाशी असलेली एकरूपता . खरच भक्ती असावी तर अशी . आपण सुद्धा ज्या देवतेचे पूजन करतो त्यावर अशीच निस्सीम श्रद्धा हवी . त्यांच्या बद्दल शंका घेवू नये . ते आपले काही वाईट करणार नाही हा भाव मनी ठेवूनच जीवन जगले पाहिजे. एखादी गोष्ट मनासारखी झाली नाही तरीही ती त्यांचीच कृपा असा भाव मनात दृढ असला पाहिजे. ते जे करतील त्यातच माझे हित आहे असा भाव असावा. नुसत्या पूजा , प्रदक्षिणा , पोथ्या वाचून आणि धार्मिक यात्रा करून भगवंताच्या समीप जाता येणार नाही . पण आपला १६ आणे खरा खुरा शुद्ध भाव मात्र क्षणात आपल्याला त्याच्या समीप नेऊ शकतो ह्यात शंकाच नसावी.

हवी आहे ती अपार श्रद्धा , भक्ती आणि एकरूपता .

श्री स्वामी समर्थ

सौ. अस्मिता दीक्षित

पत्रिकेसाठी संपर्क : 8104639230 

No comments:

Post a Comment