Tuesday, 9 September 2025

भाकीत म्हणजे ब्रम्हवाक्य नाही

 || श्री स्वामी समर्थ ||

ज्योतिष शास्त्राचा आवाका प्रचंड मोठा आहे त्यामुळे त्याचा अभ्यास सुद्धा तितकाच सखोल आहे. एखाद्याच्या पत्रिकेबद्दल भविष्य कथन करणे सोपे नाही. प्रचंड दांडगा व्यासंग आणि उपासना असेल तरीही केलेलं भाकीत अनेकदा चुकू शकते कारण हे शास्त्र पूर्णपणे परिपूर्ण नाही. शास्त्र हे कर्माच्या सिद्धांतावर अवलंबून आहे म्हंटले तर वावगे ठरू नये. भविष्य कथन करण्याच्या अनेक पद्धती प्रचीलीत आहेत पण पद्धत कुठलीही वापरली तरी उत्तर बरोबर आले पाहिजे हे महत्वाचे आहे .

सर्वच कुंडल्या काही सोप्या नसतात . अनेक कार्यशाळा करून ज्योतिष येयील का? तर नाही. त्यातून मिळालेले ज्ञान आपल्याला अभ्यासाची दिशा दाखवेल. पण तुमचा प्रत्यक्ष अनुभव तुम्हाला परिपूर्ण ज्ञान देयील ह्या मताशी बहुतांश सहमत होतील. पुस्तक आणि प्रत्यक्ष आयुष्य हे वगळे आहे आणि म्हणूनच पुस्तकात दिले आहे २ ७ ११ लागले कि विवाह होईल पण त्याचा दशा लागूनही जेव्हा विवाह होत नाही त्याचे कारण आपला स्वतःचा अभ्यासच देवू शकतो .थोडक्यात ग्रंथात दिलेले नियम आयुष्यातील अनेक प्रश्न सोडवताना कसे लावायचे ते समजले पाहिजे . जसे मेष लग्नाला कन्येचा शुक्र हा प्रनायासाठी उत्तम नसेल पण कन्येसारख्या पृथ्वी तत्वाच्या राशीत तो आर्थिक दृष्टीने चांगले फलित देयील. अवास्तव पैसा खर्च करणारी व्यक्ती नसेल तर पैशाचा संग्रह करील.

प्रत्येक पत्रिका हे ज्योतिष अभ्यासका समोर असलेल एक आव्हान असते जिथे आपल्या ज्ञानाची आकलन शक्तीची अक्षरशः कसोटी लागते. जातक आपण दिलेल्या निर्णयावर विश्वास ठेवून पुढील मार्ग आखणार असतो त्यामुळे सांगणाऱ्या ज्योतिषाचीही जबाबदारी वाढते . सप्तम भावाचा सब बुध असेल तर दुसरा विवाह होईल हे नेहमीच शक्य होत नाही हे लक्ष्यात आले पाहिजे

अनेक वेळा पत्रिकेतील ग्रह आपल्यासमोर पेच निर्माण करतात , गुगली टाकतात अश्यावेळी आपली वयक्तिक उपासना उपयोगी पडते . आपल्या ज्ञानाचा कस लागतो तिथे आपला आतला आवाज सुद्धा ऐकावा लागतो . ज्योतिषाची तळमळ जातकाचा प्रश्न सुटावा अशी असेल तर प्रश्न निश्चित सुटतो .

एखाद्या पत्रिकेचे उत्तर उदा. विवाहाचा प्रश्न असेल आणि विवाह हि घटना जातकाच्या आयुष्यात घडणार नसेल असे संकेत जरी ग्रह देत असतील तरीही ती खुबीने त्याला न दुखावता सांगणे हे कौशल्य असते . अनेकदा आपण वर्तवलेले भाकीत जरी नकारात्मक असले तरी ते खरे झाल्यामुळे जातकाचा आपल्यावर विश्वास बसतो आणि अश्याही अवस्थेत तो पुन्हा आपल्याकडे प्रश्न घेवून निश्चित येतो असा अनुभव आहे.

सांगितलेले खरे झाले ना? मग ते कदाचित आपल्या मनासारखे नसेलही असो , भाकीत खरे झाले हे महत्वाचे असते. शास्त्राला मर्यादा आहेत त्यामुळे वाटेल त्या गोष्टीचे मुहूर्त काढून द्या हे जरी सांगितले तरी ते देणे उचित ठरणार नाही जसे घटस्फोट लवकर व्हावा असे प्रश्न हे न हाताळलेले बरे. निसर्गासमोर माणसाने नतमस्तक व्हावे हेच योग्य .

काही आपले प्रारब्ध भोग सुद्धा असतात त्यामुळे प्रत्येक गोष्टीवर उपाय नसतो . जपताप्य , नामस्मरण , अनेकदा घटनेचा क्रम बदलवू शकत नाही पण आपली मनोधारणा बदलवू शकतात . आपले मतपरिवर्तन होवू शकते . एखादी गोष्ट

आयुष्यात घडणार नाही हे आपले मन स्वीकारते हाच नामाचा महिमा आहे. जसा काळ पुढे सरकतो तसे आयुष्य नव्याने सुरु करण्याची उमेद उपसना देत असते . आपले आप्त कुटुंबीय हे जग सोडून गेले तरी मागे राहिलेल्या व्यक्तींना जगावेच लागते तेही असलेल्या दुक्खाला दूर करून . कुणी कुणासाठी थांबत नाही हा संदेश आपल्याला ह्या घटनातून मिळतो.

ज्योतिष हे चमत्कार करणारे आणि होत्याचे नव्हते करण्याची ताकद असलेले शास्त्र नाही , ते परिपूर्ण शास्त्र आपल्याला पुढील घटनांचा फक्त संदेश देत असते . ग्रह आपल्या पुर्वकर्मांचा आरसा आहेत आणि त्याची फलिते देण्यास समर्थ आहेत म्हणूनच आपल्या पत्रिकेत त्या त्या भावात ठाण मांडून बसले आहेत . सारीपटावरील सोंगट्या प्रमाणे आपण त्यांना हलवू शकत नाही .आपल्या कर्मांनी आपल्या आयुष्याची जी वाट लावलेली असते ते आपले आयुष्य वाटेवर राजमार्गावर आणण्याचा प्रयत्न शास्त्र करते म्हणून त्याला मार्गदर्शक घटक म्हंटलेले आहे.

आजकाल लोकांना ज्योतिष हा एक छंद झालेला आहे. बर सांगितलेले उपाय करतील कि नाही हे ज्योतिषाला जातकाची पत्रिका बघूनच समजलेले असते पण तरीही मोठ्या आशेने तो उपाय सांगतो . उपाय करणे हे ज्याचे त्याचे प्रारब्ध आहे.

शास्त्राची परीक्षा घेण्यासाठी प्रश्न विचारू नयेत आणि ज्योतिष सांगूही नये. तितकी आपली पात्रता नाही हे नक्की. शास्त्र अनुभूती देणारे आहे आणि ते देतेच देते . ज्योतिष शास्त्रावर तुमचा विश्वास असो अथवा नसो सूर्य उगवायचा राहत नाही . निसर्ग ग्रह आपापली कामे चोख बजावत असतात . आपण सामान्य माणसे आहोत

आकाशातील ह्या लुकलुकणाऱ्या तारकांचा आपल्या जीवनावर परिणाम होत असतो आणि त्यांचे जन्मापासून असलेले विलक्षण आकर्षण आपल्याला त्यांचा अभ्यास करण्यात प्रद्युक्त करते . एखादे भविष्य चुकले तर पुन्हा अभ्यास करावा शेवटी भविष्य वर्तवणारा सुद्धा माणूसच आहे . खरतर स्वतःला ज्योतिष न म्हणवून घेता अभ्यासकच म्हंटले पाहिजे . हे तर्कशास्त्र आहे आणि त्याचा अभ्यास प्रत्येकाने करावा . आपले वेद , पुराण , ग्रंथ , उपनिषदे ह्या सर्वच अभ्यास करून आपल्या ऋषीमुनींचे आशीर्वाद मिळवण्याचा प्रयत्न करावा .

ग्रहतारे आपल्या जीवनाचा एक भाग आहेत आणि त्यांचा अभ्यास आपल्याला भाकीत वर्तवताना उपयुक्त होतो. पण म्हणून आपण केलेले प्रत्येक भाकीत हे ब्रम्हवाक्य असेल असे नाही आणि तसा अट्टाहास सुद्धा नसावा.

सौ. अस्मिता दीक्षित

पत्रिकेसाठी संपर्क : 8104639230 

No comments:

Post a Comment