|| श्री स्वामी समर्थ ||
नारदमुनी स्वतः मोठे साधक होते .सदैव “ नारायण नारायण “ जप करत असत. एकदा श्री विष्णूंच्या भेटीला ते गेले आणि महा विष्णुना नमस्कार करून म्हणाले कि मी आपला महान भक्त आहे कारण मी सदैव आपलेच स्मरण करत असतो . तेव्हा विष्णू मनोमन समजले कि ह्याला आपल्या भक्तीचा अहंकार झालेला आहे . त्यांनी नारदाला सांगितले अजूनही एक भक्त आहे पृथ्वी लोकात जो माझा परम भक्त आहे. तेव्हा नारदांनी ते सरळ नाकारले आणि कोण आहे तो अशी विचारणा केली.
त्यावर वेश बदलून दोघे पृथ्वी लोकात एका शेतात आले जिथे एक शेतकरी नांगर चालवीत होता . पण नुसताच नांगर चालवत नव्हता तर मुखाने सदैव विष्णूंचे नाम घेत होता .
विष्णूनी नारदाला सांगितले कि ह्या भक्तापेक्षा तू मोठा भक्त आहेस हे सिद्ध करण्यासाठी तू हा नांगर चालव . फक्त एक फेरी मार पण तो चालवताना एका हातात तेलाने भरलेले मातीचे भांडे घे ज्यातील तेल नांगर चालवताना खाली सांडले नाही पाहिजे आणि एकीकडे मुखाने नामस्मरण सुद्धा केले पाहिजे . इतकेच ना हे तर सोपे आहे असे म्हणून नारदमुनी एका हातात तेलाचे भांडे घेवून नांगर ओढू लागले पण इथे तिथे तेल सांडणार तर नाही ना ह्या भीतीने खरच थोडे तेल सांडले. विष्णूनी त्यांना काय शिकवले ते त्यांना समजले आणि आपल्या अहंकाराला तिलांजली देत नारदमुनी त्यांच्या समोर नतमस्तक झाले.
प्रपंच करून परमार्थ करणे हि सहजक्रिया जरी वाटत असली तरी त्यात सर्वस्व ओतावे लागते . प्रपंचातील सर्व कर्म करताना परमेश्वराच्या चरणी लीन व्हावे लागते . प्रत्येक कर्म करताना त्याला हृदयात स्थान द्यावे लागते . क्षणभर सुद्धा त्याला न विसरता प्रपंच करत राहणे हे खचितच सोपे नाही . हि कठोर परीक्षा आहे कारण नाम घेणे म्हणजे भौतिक सुखापासून परास्त होणे आणि ते जमणे महाकठीण असते .
सातत्य आणि श्रद्धा असेल तर हेही जमते . नाम घेण्यासाठी वेगळे काहीही करावे लागत नाही इतकी हि क्रिया सहज होवून जाते . आपणही रोजच्या आपल्या प्रपंचात “ वेळ नाही “ हि सबब सांगतो त्यात तथ्य नाही. पोळ्या करताना , कपडे वाळत घालताना , स्वयंपाक करताना , चालता बसता उठता झोपता , आपली नित्य कर्म करताना नाम घेत राहणे हि क्रिया तितकीच आपल्याही नकळत सहज होवून जाते . फक्त करण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती हवी .
सौ. अस्मिता दीक्षित
पत्रिकेसाठी संपर्क : 8104639230
No comments:
Post a Comment