Wednesday, 10 September 2025

स्थित्यंतरे दाखवणारा अष्टम भाव

 || श्री स्वामी समर्थ ||


आपल्या आयुष्यात काहीही वाईट झाले किंवा उलथापालथ झाली कि आपण सर्वात खापर फोडतो ते शनी राहू केतू मंगळ ह्यांच्यावर . पण अनेकदा ह्यातील कुणीच त्याला जबाबदार नसून इतर अनेक योग त्या घटना घडवत असतात . उदा द्यायचे झाले तर अष्टम भाव , त्यातील ग्रह किंवा अष्टमेशाची दशा . एखादा ग्रह जेव्हा अष्टमेशाच्या नक्षत्रात असतो तेव्हा जीवनात अनेक स्थित्यंतरे बघायला मिळतात . अष्टम भाव हा प्रामुख्याने लग्नापासून आठवा असल्यामुळे मुख्यतः शारीरिक पीडा तसेच आर्थिक मानसिक शांतता हरवून टाकतो . नको ते व्याप आणि मनस्ताप मागे लागतात .नोकरीत निलंबन ,पैसे अडकणे , उधारी , व्यसने , व्यवसाय अचानक बंद पडणे , शारीरिक त्रास उद्भवणे आणि त्यामुळे मानसिक संतुलन बिघडणे ह्या गोष्टीना जातकाला सामोरे जायला लागते.

अष्टम भाव हा सप्तमाचा धन भाव आहे अनेकदा आपला जोडीदार आपल्यामागे समर्थपणे उभा असतो त्यामुळे नेहमीच अष्टम भाव नकारात्मक फळे देयील असे नाही . भावेश आणि भावातील ग्रह जर अष्टमेशाच्या नक्षत्रात असतील तर काय फळे मिळतात ते बघुया .

प्रथमेश किंवा प्रथम भावातील ग्रह जर अष्टमेश किंवा अष्टम भावाच्या नक्षत्रात असतील तर अपघात , तीव्र डोकेदुखी, नैराश्य, आळशी , आत्मघातकी वृत्ती असते . धनेश किंवा धन भावातील ग्रह जर अष्टमेश किंवा अष्टम भावाच्या नक्षत्रात असतील तर उधळपट्टी , बोलण्यात अडखळणे , कौटुंबिक सौख्य नसणे , आर्थिक गुंतवणुकीत फसवणूक होते. तृतीयेश किंवा तृतीय भावातील ग्रह जर अष्टमेश किंवा अष्टम भावाच्या नक्षत्रात असतील तर खोट्या बातम्या पसरवणे , खोट्या सह्या , करारात फसवणूक , भागीदार फसवतील.

चतुर्थेश किंवा चतुर्थ भावातील ग्रह जर अष्टमेश किंवा अष्टम भावाच्या नक्षत्रात असतील तर घरात दडपण , शिक्षणात अडथळे , आईशी न पटणे , मनाची ताकद कमी आणि घरात एकटे राहायला भीती वाटणे , वाहन अपघात , घराची चुकीची कागदपत्रे . भाग्येश किंवा भाग्यातील ग्रह जर अष्टमेश किंवा अष्टम भावाच्या नक्षत्रात असतील तर उच्च शिक्षणात अडथळे , वडिलांशी वितुष्ट , देवधर्म न होणे , न्यायालयीन कामात अडथळे , लाभेश किंवा लाभतील ग्रह जर अष्टमेश किंवा अष्टम भावाच्या नक्षत्रात असतील तर मित्र आप्तेष्ट ह्यांच्याकडून नुकसान , कुसंगती . व्ययेश किंवा व्यय भावातील ग्रह जर अष्टमेश किंवा अष्टम भावाच्या नक्षत्रात असतील तर अपघात , सर्जरी , चुकीच्या गुंतवणुकीतून तोटा , मनस्ताप , परदेशी कंपन्यांच्या व्यवहारात फसवणूक होते.

अष्टम भाव अनेक कंगोरे देत असतो त्यामुळे अभ्यास करावा तितका थोडाच आहे. एखादा नियम अनेक पत्रिकातून अनुभवला तर त्याची अनुभूती मिळाली असे समजायला हरकत नाही . एखादी घटना फक्त एक ग्रह घडवत नाही तर त्यास अनेक योग , ग्रह दशा कारणीभूत असतात . एखादा ग्रह भरभरून देणारा तर एखादा अडथळे निर्माण करणारा. सगळे रंग समजले पाहिजेत . असाच अभ्यास करत राहूया . तूर्तास इथेच पूर्णविराम .

सौ. अस्मिता दीक्षित

पत्रिकेसाठी संपर्क : 8104639230

No comments:

Post a Comment