Wednesday, 3 September 2025

अद्भुत पंचम ( शेअर मार्केट )

 || श्री स्वामी समर्थ ||


पंचम हा धर्म त्रिकोणातील मुख्य भाव. अर्थातच धर्माने वागा आणि धर्माचे अनुकरण करा हे सांगणारा भाव पत्रिकेत अनन्यसाधरण असाच आहे. ह्या भावावरून आपण प्रेम , प्रणय , विद्या संतती , खेळ , कला , नाविन्य ,creativity , निर्मिती , ज्योतिष विद्या , तंत्र मंत्र आणि कमी कष्टात फायदा करून देणारे शेअर मार्केट पाहतो . आजचे युग प्रगत असले तरी संयम संपलेल्या पिढीचे आहे. आपल्याला न झेपणारी आव्हाने स्वीकारून मग स्वतःलाच बिझी आहे असे गोंडस नामकरण केलेल्या तरुणाईचे आहे.असो .

आज बाहेरील अनेक देश नोकरीसाठी सहज संधी उपलब्ध करून देत आहेत. पण ज्यांना ते शक्य नाही किंवा आहे त्यांचा मोर्चा शेअर मार्केट कडे सध्या मोठ्या प्रमाणात वळलेला आपल्याला दिसून येतो. आज मध्यमवर्ग सुद्धा ह्यात आपला सहभाग मोठ्या प्रमाणावर करत आहे .

आजच्या पिढीला ५-६ आकडी पगार मिळत असल्यामुळे विविध गुंतवणूक करताना शेअर मार्केट प्रथम दर्शनी डोळ्यासमोर आले तर नवल नाही . पण जसे आज कुंभ राशीतील राहुने AI दिले आहे तसेच कमी कष्टात अफाट फायदा करून देणारे शेअर मार्केट तरुणांवर प्रचंड हाबी आहे.

येथे असणारी रिस्क सुद्धा हसत घ्यायला ते तयार आहेत . चार मुले नाक्यावर किंवा कुठेही भेटली कि चहा सोबत चर्चेचा विषय म्हणजे गुंतवणूक हा असतोच . आपल्या चिमुकल्या जगाचे मोठे विस्तृत आधुनिक जग आपण स्वतःच केलेले आहे. आधुनिकतेच्या नावाखाली किंवा एक सोशल स्टेटस जपण्यासाठी अनेकविध गोष्टी आज घरात येत आहेत . घरात प्रत्येकाकडे फोन आहे अगदी लहान मुलांच्या कडे सुद्धा . मग पर्यायाने हे सर्व टिकवण्यासाठी मिळवला जाणार्या पैशाचा ओघ हा घरात अनेक पर्याया तून आलेला असावा ह्या हेतूने मग शेअर मार्केट हा एक मुख्य पर्याय निवडला जातो. अफाट मिळकत आणि त्यावर कर चुकवण्याची धडपड बस्स सध्या हेच जीवनाचे प्रमुख उद्दिष्ट झाल्यासारखे झाले आहे. सोशल मिडीयावर क्षणोक्षणी झळकणाऱ्या सोशल influencer च्या असंख्य जाहिराती मती गुंग करणाऱ्या आहेत .

एखादी नवीन गोष्ट करणे आणि त्याच्या आहारी जाणे ह्या दोन भिन्न गोष्टी आहेत .त्यात मागची पैपै करून मिळवलेली पिढी म्हणजे अगदी टाकावू , त्यांच्या मतांचे अस्तित्वच नाही . तर असे हे भूल मोहिनी काहीही म्हणा पण सगळ्यांना येड करणारे शेअर मार्केट अभ्यासपूर्वक हाताळले तर फायदेशीर नक्कीच आहे पण इथे क्षणात रावाचा रंक सुद्धा होवू शकतो . आभाळाला गवसणी घालायला जावे आणि रस्त्यावर यावे असे नको व्हायला.

झटपट श्रीमंत होण्याचा हा पर्याय असे वाटणाऱ्या लोकांना ह्याची दुसरी बाजू माहित नाही . कुठल्याही गोष्टीचा अंमल चढला कि त्याची धुंदी उतरायला वेळ लागतो . हे आभासी जग आहे जे राहूचे आहे. Gpay , net , RTGS वगरे म्हणजे राहू . झटपट पैसा मिळवण्याच्या नादात आपल्या कुटुंबाची वाताहत तर होणार नाही ना ह्याची काळजी सर्वप्रथम केली पाहिजे. आपली गुंतवणूक हि कमी नफा मिळवून देणारी असली तरी चालेल पण हृदयाचा ठोका थांबवणारी नसावी .

दिसायला जितके हे चित्र गोंडस आहे तितके ते खरच आहे का? आज दोन पुस्तके वाचून जसे लोक स्वतःला ज्योतिषी म्हणवतात तसेच एक दोन ट्रेड केले कि मला ह्यातील सर्व ज्ञान अवगत झालेले आहे असा भाव मनात अनेकांच्या येत आहे आणि हीच पुढील संकटाची नांदी आहे.

ह्या जुगारात अनेकदा अंदाज चुकले आणि लाखोंचा तोटा झाला तर तो पेलवायाची ताकद आपल्यात आहे का? मग मानसिक संतुलन बिघडते आणि त्यावर उपाय म्हणून मग सर्व व्यसने समोर हात जोडून उभीच आहेत कि. एकदा यश मिळाले कि हात जणू आभाळाला लागतात मग जीवघेणी खेळी सुरु होते . अधिक हाव अधिक लालसा अधिक नफा मिळवण्याची नशा चढते मग आहे ते सर्व पणाला लागते आणि पुढे ...सुज्ञास न बोलणे उत्तम . आयुष्याच्या सारीपटावर पुन्हा एकदा भला मोठा अंधार , आपली पत गमावणारा . मिळवलेली अब्रू वेशीवर टांगणारा आणि घराण्याचे नाव पात पणाला लावणारा हा अंधार खरच जीवघेणा कि कित्येक आयुष्य सुद्धा ह्या अंधारात कायमची लुप्त होतात .

इतकी मोठी जोखीम घेणारा मध्यमवर्ग अनेक संकटाना तोंड देताना दिसतो . घरातील स्त्रीवर्गाचे दागिने सुद्धा गहाण ठेवून झटपट श्रीमंत दाम दुपटीने पैसा मिळवावा हे स्वप्न दाखवणारा हा जुगार मती गुंग करणारा आहे.

रोज मिनिटा मिनिटाचे ट्रेडिंग करणे , डोळ्याच्या खाचा आणि मेंदूला मुंग्या येयीपर्यंत आपले रोजचे काम सोडून ह्यात गुंतणे हे अत्यंत धोक्याचे आहे. फायदा हवा तर जोखीम घ्यायचीही तोटा सहन करण्याचीही मानसिकता हवी . सगळे कानाला कायम गोड गोड कसे ऐकायला मिळणार ???

हा जुगार जीवघेणा आहे. कुटुंब आणि कुटुंबाचे सुख स्वतःच्या हाताने नष्ट करताना दहा वेळा विचार करा . लक्ष्मी इतकी सहज नाही . अपार मेहनत करून ती कमवावी लागते . एखाद्या गोष्टीचा अपुरा अभ्यास पण डोंगर इतका ध्यास जीवनाला वेगळी कलाटणी देवू शकतो . ज्याला हा जुगार संयमाने खेळता आला तो ह्यात तरेल पण इतरांचे काय ?झटपट मिळवायचे कि झटपट घालवून बसायचे ????

एखाद्या ट्रेड मध्ये फायदा झाला कि मग हाव सुटते आणि मग अजून हवे अजून हवे हि जीवघेणी न संपणारी इर्षा अधिकच फुलत जाते . सुगीचे दिवस क्षणात संपतात आणि आपण भानावर येतो तेव्हा ओंजळीतून सर्व निघून गेलेले असते असे मात्र व्हायला नको .

ह्या सर्वच परिणाम मन शरीर झोप विचार ह्या सर्वावर होत असतो आणि कालांतराने तो हाताबाहेर जावून मोठ्या आजारांचे मूळ ठरतो . सतत २४ तास हाच विचार . एकमेकांची चौकशी बाजूलाच राहिली . फक्त पैशाची भाषा हेच आजचे बहुतांश जग झालेले आहे.

शेअर मार्केट अजिबात वाईट नाही . पण त्याची मोहिनी पडून त्यात आयुष्याची वाताहत झाली तर अर्थ नाही त्याला. अभ्यास पूर्वक आपले अंदाज बांधून त्यात पैसे लावणे हे नेहमीच समर्पक राहील .

सुरवात केली पण कुठे थांबायचे कुठे मनाला आवर घालायचे ते समजले पाहिजे .

ज्योतिषीय विश्लेषण पाहताना ज्यांचे पंचम अबाधित आहे किंवा जिथे बुध राहू दुषित नाहीत , धन पंचम लाभ हे भाव देत आहेत ह्या दशेत ह्यातून पैसा मिळू शकतो . पण ज्यांचे अष्टम , व्यय भाव कार्यान्वित आहे त्यांना काही न काही नुकसान होणार हे ठरलेलेच आहे .

घेतलेले शिक्षण आणि मिळकत त्याची मोट रोजच्या जीवनातील प्रश्नांशी बांधताना मग शेअर मार्केट सारखा झटपट श्रीमत होण्याचा मार्ग सोपा वाटतो आणि आपल्याही नकळत आपण त्यावर चालू लागतो . आज स्वतःचे घर नाही म्हणून अनेकांचे विवाह होत नाहीत हे चित्र आहे मग पैसा मिळवायचा तरी कसा. त्यासाठी अनेक इतर पर्याय आहेत पण ते झटपट पैसा देणारे नाहीत म्हणून ते खुणावत नाहीत किबहुना ते पर्याय म्हणून स्वीकारले जात नाहीत .

पैसा दुसर्याकडून उधार घेवून सुद्धा अनेकजण ह्या शर्यतीत भाग घेतात आणि मग तो डूबला कि तो परत कसा द्यायचा हा यक्षप्रश्न समोर उभा राहतो . त्यात मग स्वतःच्या ठेवी विकणे त्यावर कर्ज घेणे हे प्रकार सुरु होतात , घरची शांतता भंग होते आणि मग अश्यावेळी दोन घास सुखाचे खात होतो तेच बरे असे म्हणायची वेळ येते .

हव्यास मग तो कश्याचाही असो वाईटच असतो पण तो जीवघेणा नसावा. आपण जसे आहोत तसे आहोत . नशिबात असेल तो पैसा मिळणार आणि जायचा तो जाणार . कुणाला विचारायचे नाही , सल्ला घ्यायचा नाही स्वतःला शहाणे समजायचे अश्या व्यक्तींच्या अनेक पत्रिका पाहून हा लेख लिहायची इच्छा झाली . पुन्हा एकदा सांगावेसे वाटते कि शेअर मार्केट हा पर्याय प्रत्येकाने स्वीकारावा पण अभ्यासपूर्वक , त्याच्या अधीन जावू नये , त्याला सर्वस्व मानु नये इतकेच कारण जेव्हा मार्केट पडते आणि तोटा सहन करायला लागतो तो करायचीही हिम्मत नसेल तर सर्वस्व होते नव्हते ते सर्व पणाला लावायची खरच गरज आहे का? कुणाला दाखवायचे आहे श्रीमंत होवून ??????? विचार प्रश्न स्वतःलाच आणि बघा काय उत्तर मिळतेय ते . आपल्या मागील पिढ्यांनी आपल्याही पेक्षा आनंदात आयुष्य काढले हे विसरून चालणार नाही.

यश आणि अपयश दोन्ही खुल्या दिलाने स्वीकारता येण्याची धमक पाहिजे . नैराश्येच्या गर्तेत नेणारा हा बाजार आहे ह्याचे भान योग्य वेळेस झाले तर बरे. आपल्या आधीच्या पिढ्यांनी नाही का गुंतवणूक केली , पण सुरक्षित सावध , अनेक पर्याय आजही आहेत जे दोन टक्के कमी देणारे पण सुरक्षित आहेत . पोस्टात लोक आजही गुंतवणूक करतात जी सुरक्षित आहे त्याची लाज वाटायला नको .

माणूस पोटासाठी कष्ट करतो आणि धन कमावतो . पण त्यासाठी झटपट श्रीमत होण्याचा अट्टाहास नको . सगळे आयुष्य पणाला लावून मिळणार काय ? मोठे आजार , व्यसने , कौटुंबिक मतभेद कि नात्यातील संबंधातील तिढा ? नक्की काय हवे आहे आपल्याला ????????

आपले आयुष्य सुरक्षित असते जेव्हा आपण मिळवलेल्या संपत्तीचा विनियोग आणि गुंतवणूक योग्य ठिकाणी केलेली असते. आपली झोप उडवणारी कुठलीही गोष्ट लाभ देयील ? कि जीवनातील आनंद हिरावून घेयील ??????????? उत्तर आपले आपणच शोधायचे आहे . ज्याची त्याची सुखाची व्याख्या वेगळी असू शकते पण समाधानाची व्याख्या महत्वाची आहे आणि सर्वात महत्वाचे म्हणजे कुठे थांबायचे ते समजले पाहिजे . गेल्या कित्येक दिवसात शेअर मार्केट मध्ये अपयशाला सामोरे जावून कर्ज बाजारी होवून आयुष्याची वाताहत झालेल्या पत्रिका पहिल्या आणि मन सुन्न झाले. माणसाला नक्की मिळवायचे तरी काय असते ??? कसला हव्यास असतो नेमका ? कुणासाठी चालले आहे हे सर्व ? कुणाला दाखवायचे असते हे वैभव ?????एक न दोन प्रश्न पडले आणि हे वास्तव आपल्यासमोर मांडावेसे वाटले .

ऑप्शन ट्रेडिंग , इंट्रा डे ट्रेडिंग हे आकर्षण निर्माण करते पण ते क्षणिक असते . फ्युचर ऑप्शन , कॅडल स्टिक , निफ्टी , सेन्सेक्स , असेट अलोकेशन असे शब्द कानावर आदळू लागतात आणि माणूस ह्या चक्रात ओढला जातो. राहू सावधपणे आपली खेळी खेळत असतो पण ती समजायला आपल्याला उशीर होतो. समजते तेव्हा सर्व संपलेले असते .

गुंतवणुकीचे इतर अनेक मार्ग आहेत पण अपुरा अभ्यास ह्यामुळे आपल्याच आयुष्याचे चित्र बदलते .

आयुष्यभर ताठ मानेने , अभिमानाने जगलो , आयुष्याच्या अखेरच्या श्वासापर्यंत कुणाही वर अवलंबून नको राहायला म्हणून थोडे थांबून विचारपूर्वक ,अभ्यास करून योग्य सल्ला घेवून गुंतवणूक करा . आपले आयुष्य दिशाहीन होण्यापासून आपणच वाचवायचे आहे, तसेच आयुष्यात शोर्ट कट नसतात हे सांगण्यासाठी हा लेखन प्रपंच .

विघ्नहर्ता सर्वाना चांगली बुद्धी देवूदेत .

श्री स्वामी समर्थ

सौ. अस्मिता दीक्षित

पत्रिकेसाठी संपर्क : 8104639230

No comments:

Post a Comment