Thursday, 31 December 2020

आनंद पोटात माझ्या माईना

 ||श्री स्वामी समर्थ ||

 

गुरुपुष्याला पारायण करायचे म्हणून कधीपासून तयारी केली होती . वर्षाचा अखेरचा दिवस. हे वर्ष खरच लक्ष्यात राहण्याजोगे गेले पण शेवटच्या दिवशी गुरुपुष्य आले म्हणून शेवटचा दिवस खरच गोड झाला आणि नवीन वर्षाची सकाळ सुद्धा. काल दुपारी पारायण सुरु केले आणि गुरुपुष्य संध्याकाळी सुरु झाल्यावर २१ वा अध्याय वाचला .आरती केली नेवैद्य झाला. महाराजांनी माझ्याकडून पारायण करून घेतले म्हणून त्यांचे मनापासून आभार मानले.

माझ्या अनेक ओळखीचे लोक गेल्या काही दिवसात ई-पास घेवून शेगावला दर्शन करून आले म्हणून माझ्याही मानत सारखे येत होते कि आपण इथेच राहिलो आपल्याला दर्शन कधी होईल. महाराजांच्या एका कृपा कटाक्षाची अभिलाषी मी नेहमीच असते. पण म्हणतात ना भक्तांचे त्यांच्यावरील प्रेम, तळमळ त्यांना नक्कीच समजते आणि आपल्यावर त्यांचा वरदहस्त कायम असतोच ह्याचा पुन्हा एकदा अनुभव आला.

आज वर्षाचा पहिला दिवस. आज सकाळीच 5 वाजता walk ला गेले असताना माझ्या ओळखीचे एकजण माझ्या समोर आले आणि त्यांनी माझ्या हातावर शेगावच्या गजानन महाराजांचा प्रसाद ठेवला. सद्गदित झाले .पुढे माझ्या मनाची काय अवस्था झाली असेल ते तुम्हाला समजलेच असेल. खरोखरच निशब्द झाले. आनंद पोटात माझ्या माईना ग माईना अश्या अवस्थेत घरी आल्यावर त्यांच्या फोटो कडे पाहून नमस्कार केला ,मनाने मी कधीच शेगावला पोहोचले होते. ..अग मुली शेगावला पण बोलवीन तुला पण आज प्रसाद पाठवलाय बघ नवीन वर्षाची सुरवात आनंदात कर असेच जणू ते मला सांगत होते. प्रसाद सर्वाना वाटला आणि आनंद द्विगुणीत झाला.

खरच २०२१ आपल्या सगळ्यांसमोर अनेक आव्हाने, व्यवसायातील अनेक संधी घेवून उभे ठाकले आहे. सगळ्यात सांभाळायची आहे ती आपली प्रकृती आणि मानसिकता. हे सर्व करताना प्रत्यक्ष सद्गुरूकृपा लाभली तर अजून काय हवे ? आणि त्यासाठी सतत आपल्या गुरूंचे स्मरण , नित्य उपासना ह्याची सातत्याने गरज आहे. आयुष्य कसेही असो कितीही चढउतार असुदेत आपण त्यांचे चरण सोडायचे नाही आणि नित्य सेवेत राहायचे इतकेच मला समजते . अनेक संकल्प आपण करत असतो अनेक आराखडे बांधत असतो ,आपल्या अध्यात्मिक सेवेचाही असाच आराखडा मी प्रत्येक वर्षी करते. कमीतकमी इतकी तरी सेवा झालीच पाहिजे कारण हि उपासनाच आपल्याला सुखाचे , समाधानाचे क्षण आणि शांत झोप मिळवून देयील.

आपल्या नित्य प्रापंचिक ,धकाधकीच्या जीवनातून सहज जमेल अशीच हि उपासना आहे ,करून बघा.

वर्षातून एकदातरी महाराजांचे दर्शन घ्यावे. वर्षातून निदान एका व्यक्तीला श्री गजानन विजय पोथी भेट द्यावी जेणेकरून वर्षातून आपल्याकडून एक भक्त महाराजांच्या सेवेत रुजू होईल.

वर्षातून २१ पारायणांचा नेवैद्य महाराजांना अर्पण करावा. प्रत्येक महिन्याच्या १ ते २१ तारखेपर्यंत रोज एक अध्याय असे प्रत्येक महिन्यात एक पारायण होईल.अशी वर्षातून १२ पारायणे होतील. प्रगट दिन , ऋषी पंचमी , गुरु पौर्णिमा , दत्त जयंती , माघी गणेश जयंती , श्रावण आणि मार्गशीर्ष गुरुवार ४ अशी २१ पारायणे वर्षातून करावीत . ह्या उपर जमेल तशी पारायणे करत राहावी ,मनात दृढ निश्चय हवा पुढे महाराज आपल्याकडून करून घेण्यास समर्थ आहेत . नित्य जमेल तसा महाराजांचा जप आणि मानसपूजा करावी. ह्या सर्वांमुळे साधनेत सातत्य राहते. संकट आले कि मग महाराज असे होत नाही.

शेवटी त्यांच्याकडे एकाच मागायचे आहे ..आमरण वारी घडो आणि सदैव तुमचे चिंतन राहो.

अस्मिता

 

 

Wednesday, 30 December 2020

Think Big..Welcome 2021

 || श्री स्वामी समर्थ ||



दिसामागुन दिस , ऋतुमागून ऋतू गेले आणि बघता बघता नवीन वर्ष म्हणजेच 2021 उंबरठ्यावर आले सुद्धा. हे वर्ष आपल्या सर्वांसाठीच जणू  शिकवणीचे वर्ष होते असे म्हणायला हरकत नाही . करोनाने आपल्याला खूप काही शिकवले पण त्यातून आपण खरच किती शिकलो हे महत्वाचे .नाहीतर मागचे पाढे 55 असे नाही झाले म्हणजे मिळवले.  

म्हणतात ना “ Show must go on...” तसे आपण आपली सर्व ताकद एकवटून ,सकारात्मकता ठेवून आणि पुन्हा आशेचे पंख लावून 2021 चे स्वागत करणार आहोतच. ह्या वर्षात कित्येकांचे सगेसोयरे अचानक सोडून गेले . सगळ पुन्हा मिळवता येते पण गेलेले आप्तेष्ट कसे पुन्हा मिळवायचे. जाणारा जातो पण मागे राहतात त्यांची खरी परीक्षा असते . करोनाचा धुमाकूळ कमी होता कि काय म्हणून त्यात नैसर्गिक अपत्तीनेही अनेकांना देशोधडीला लावले. कुटुंबे उध्वस्त झाली, मुलेबाळे निराधार झाली. निसर्गाच्या रौद्र रूपापुढे आपले काहीच चालले नाही ह्याची पुन्हा एकदा प्रचीती आली. करोनाने कित्येकांची भाकिते खोटी ठरवली. मी मला हवा तेव्हाच जायीन असे जणू तो आपल्याला ठणकावून सांगत असावा.

विधात्याने त्याच्या हातात काही पत्ते राखून ठेवले आहेत ह्याचा पदोपदी प्रत्यय देणारे 2020 होते.

पण पुन्हा उभे राहण्याची ताकद सुद्धा तोच आपल्याला देणार आहे ह्यावर आपला अभेद्य विश्वास असायला हवा आणि तो आहेच. म्हणूनच कि काय आता पुन्हा एकदा अर्थचक्र जोमाने फिरू लागले आहे. प्रत्येकाच्या डोळ्यात आता नवीन आशा , उमेद दिसू लागली आहे. सगळ्यांच्या प्रपंचाची विस्कटलेली घडी पुन्हा एकदा बसू लागली आहे.

2020 मध्ये शिकलेला प्रत्येक धडा आणि अनुभव गाठीशी धरून नवीन वर्षात आनंदाने पदार्पण करायचे आहे. देव सारखा रडवत नाही कधीतरी हसवतोच कि ,हे मनात पक्के करुया.

तेव्हा मंडळी , चला पुन्हा जोमाने कामाला लागुया , भरपूर पैसे कमवूया ,पण धनसंचय सुद्धा करुया. इतके सुंदर आयुष्य दिल्याबद्दल क्षणोक्षणी परमेश्वराचे आभार मानूया . एकमेकांना मदत करुया , एकमेकांसाठी उभे राहूया. असूया , मत्सर , द्वेष ह्या सर्वाना कायमची तिलांजली देवूया. आनंद घेवूया आणि देवूया .केलेल्या चुकांमधून शिकूया, नवीन आव्हाने स्वीकारुया , आपले कुटुंब , आपला समाज आणि पर्यायाने आपल्या देशाला प्रगतीच्या पथावर नेण्यासाठी  2021 चे स्वागत जल्लोषात करुया.

Let’s “ Think Big ”

आपल्या सर्वाना 2021 हे स्वप्नपूर्तीचे ,आनंदाचे , उत्तम आरोग्याचे असुदे हीच परमेश्वर चरणी प्रार्थना. सर्व वाचकांना नवीन वर्षाच्या मनापासून शुभेछ्या .


अस्मिता

 antarnad18@gmail.com

 

 

  

 

 

Friday, 18 December 2020

तुज सगुण म्हणू कि निर्गुण रे.

 ||श्री स्वामी समर्थ ||


चराचरात असलेल्या परमेश्वराची अनंत रूपे आहेत आणि खर्या सच्च्या भक्ताला कुठल्या ना कुठल्या रुपात तो दर्शन देतच असतो . प्रत्येक भक्त हा आपल्या इष्ट देवतेच्या दर्शनासाठी व्याकूळ असतोच आणि त्याचे दर्शन झाल्यावर तो कृतकृत्य होतो. पण ह्या दर्शनाची कास किंवा अभिलाषा असणे हि भावनाच मुळात परमेश्वरावरील असीम भक्तीपोटी येते.

लहानपणापासून आपल्यावर घरात शुभंकरोति , मनाचे श्लोक ,रामरक्षा म्हणण्याचे संस्कार होत असतात. तेच बाळकडू पुढे आपण आपल्या मुलानाही देत असतो . सांगायचे तात्पर्य असे कि देवाचे वेड हे आपल्याला आपल्यावरील संस्कारातून लागते आणि पुढे ते आपल्यात रुजतेही. भविष्यात कुठल्यातरी संकट समयी आई आजीला आपण देवाला साकडे घालताना पाहतो आणि मग त्यातून संकटाच्या वेळी बाप्पा धावून येतो हि भावना आयुष्यभरासाठी मनात रुजते. आपणही पुढे आपल्या प्रापंचिक अडचणीसाठी पारायण ,नामस्मरण करू लागतो. आपण पूजन करत असलेल्या देवतेवर आपली निस्सीम श्रद्धा असते .

भगवंताचे रूप हे निर्गुण निराकार आहे हे शास्त्रात सांगितले आहे आणि संतानीही त्याला दुजोरा दिला आहे. आपला देह हा देवाचे मंदिर असून आत्मा हा परमेश्वर आहे. आत्मस्वरूप धारण करणारा देह हा सगुणरूपात असतो तर प्रत्यक्ष आत्मस्वरूप हे निर्गुण असते. श्रीकृष्णाने त्याच्या जन्मापासून भक्तांना विविध रुपात दर्शन दिले पण त्याचे मूळ रूप हे निर्गुणच आहे. बाप्पासमोर नेवैद्य ठेवला कि तो त्याचा प्रसाद म्हणून आपणच ग्रहण करतो ,तो कुठे येतो फोटोतून बाहेर नेवैद्य खायला असे प्रश्न विचारून लहान मुलेही आपल्याला भंडावून सोडतात नाही का .पण ह्या निर्गुण रूपातील भगवंताने आपल्या भक्तीवर प्रसन्न होवून आपल्या हृदयात सगुण रूप कधीच धारण केलेले असते .भक्तीच्या परमोच्च क्षणी भक्त आणि भगवंत जणू एक होवून जातात जसे दुधात साखर .आपल्या मनातील घालमेल आपल्याही आधी त्याला समजते इतकी एकरूपता होते किबहुना ती होणे अपेक्षित असते.

माझ्या घरात श्री गजानन महाराजांचा एक छान फोटो आहे. माझा मुलगा लहान असताना त्याने हातपाय पुसून टॉवेल माझ्याकडे देताना चुकून फोटोवर पडला. तेव्हा मी आणि त्याने महाराजांची माफी मागितली. मुलानेही विचारले अग आई महाराज खरेच कुठे आहेत तिथे. त्या चिमुकल्या च्या डोक्यातून आलेला प्रश्न लहान असला तरी त्यात दडलेला अर्थ खूप मोठा होता. त्याला काय समजवावे मला समजेना पण मी त्याला सांगितले तो फोटो नाही त्यात महाराज खरेखुरे आहेत आणि तु अभ्यास करत आहेस ,शुभं करोति म्हणत आहेस हे ते पाहत आहेत आणि तुला शाबासकीही देत आहेत .त्याच्या बालबुद्धीला तेव्हा इतके पुरे होते . आपल्या सारख्या भक्तांना आपल्या देवाची भक्ती करायची तीही अंतर्मनाने इतकेच समजते. त्याचे सगुण किंवा निर्गुण रूप म्हणजे काय ह्यात न अडकता भक्तीत रममाण व्हावे हे जरी खरे असले तरी आज त्याची उकल करावीशी वाटते .परमपूज्य बाबामहाराज सातारकर ह्यांच्या TV वरील एका मुलाखतीत त्यांनी ह्याबद्दल अप्रतिम विश्लेषण केले. त्यांनी सांगितले मुलाखत घेणारा मला दिसत नाही पण त्याचा आवाज ऐकायला येतोय .त्याच्या प्रश्नांना मी उत्तर देतोय. म्हणजेच प्रश्नकर्ता मला दिसत नसला तरी तो आहे. तो असूनही नसल्यासारखा वाटणे हे त्याचे निर्गुण रूप आणि तरीही तो प्रत्यक्षात आहे हे त्याचे सगुण रूप. भल्याभल्यांना सांगता येणार नाही अश्या ह्या प्रश्नाचे उत्तर त्यांनी किती साधे उदाहरण देवून सांगितले पहा, खरच त्यांना साष्टांग दंडवत.

निर्गुण रूपातील भगवंताला आपल्या भक्तीने भक्त सगुण रूप धारण करायला लावतो तेव्हा त्याची भक्ती किती सोळा आणे सच्ची आणि अंतर्मनापासून असते त्याचा दाखला मिळतो जणू .

डहाणू येथे समुद्राच्या जवळ श्री गजानन महाराजांचा छान मठ आहे. ह्या मठाचे सर्वेसर्वा दादा पवार आज आपल्यात नाहीत. दादा महाराजांचे निस्सीम भक्त होते. त्यांनी त्यांचे संपूर्ण जीवन महाराजांच्या नावाचा प्रसार करण्यात व्यतीत केले. समुद्राच्या ठिकाणी असल्यामुळे तिथे हिवाळ्यात कडाक्याची थंडी असे .रात्री झोपायच्या आधी दादा वाटीत गरम तेल घेवून महाराजांच्या पायाला मालिश करत असत. त्यांना गरम कपडे घालत असत. काय म्हणावे ह्या भक्तीला? महाराजांचे अस्तित्व तिथे कायम होते अश्या सगुण रूपातील महाराजांनी अनेकदा त्यांना दर्शन दिले होते. अश्या ह्या निस्सीम भक्ताचे पाय माझ्याही घराला लागले होते हे आमचे पूर्वसुकृतच म्हणायला हवे.

महाराज फोटोत आहेत ते जरी निर्गुण रुपात असले तरी ते आहेत ह्याचे भान ठेवून भक्ती आणि आपले कर्म करत राहणे हे महत्वाचे आहे. रूप हे रूप आहे मग ते सगुण असो अथवा निर्गुण ,आपली भक्ती ह्या सगळ्याच्या पलीकडेच असायला हवी ,नाही का? आपला भाव हा सर्वश्रेष्ठ आहे. एखाद्या झोपडी वजा घरात एखादा महाराजांचा भक्त असेल आणि त्याच्याकडे महाराजांचा फोटो सुद्धा नसेल पण तरीही त्याने अंतर्मनाने त्याला हात जोडले ,प्रार्थना केली तर ती त्याच्यापर्यंत निसंदेह पोहोचणार .संत शिरोमणी श्री गजानन महाराजांनी क्षेत्र शेगाव येथे समाधी घेतली तरी आजवर अनेक भक्तांना ते दर्शन देत आहेत. आपल्या भक्तीला कसलेही निर्बंध किंवा भिंती नसाव्यात ,भगवंत आहे आणि तोही सगुण रुपात हे जेव्हा मनात पक्के असेल तेव्हा त्याचा परिणाम आपल्या प्रत्येक कर्मावर होत राहील . महाराजांच्या नजरेचा धाक आपल्यातील षडरिपू कमी करेल इतकच नाही तर आपली प्रत्येक कृती विचारपूर्वक व्हायला लागेल. सुकर्म वाढतील आणि आयुष्य अधिक सुकर होईल. महाराजांचे अस्तित्व आहेच आणि ते अबाधित आहे . आपले कसे आहे महाराजांचा फोटो भिंतीवर लावून आपण आपल्याला हवे ते करायला मोकळे असतो . आपल्याला हव्या असतील तेव्हा आणि हव्या तश्या सगुण आणि निर्गुण ह्याच्या व्याख्या बदलत असतो . नामस्मरण आपल्याला घडवते आणि अंतर्बाह्य बदलवते हे खरे आहे . अध्यात्मातील प्रवास आपल्याला विचारी करतो . वरवर हा महाराजांचा फोटो आहे हे म्हणणारे आपण त्याचे सगुण अस्तित्व खरतर अंतर्मनात मान्य करत असतो .कालांतराने आपली भक्ती एकेक पायरी वर चढू लागते आणि आपल्याला महाराजांचे अस्तित्व जाणवू लागते . मुळात कुठल्यातरी अपेक्षेने भक्ती करूच नये. आई आपल्या मुलांवर प्रेम करते तेही कुठलीही अपेक्षा न ठेवता अगदी तसेच प्रेम आपल्या देवतेवर असावे. कुठल्यातरी अंतस्त हेतूने केलेली भक्ती आपल्याला त्यांच्यापासून दूर नेते कारण त्यात प्रेम ,माया काहीच नसते त्यात असतो फक्त व्यवहार .

भगवंताचे अस्तित्व कसे आहे ह्याबद्दलच्या आपल्या कल्पना कश्याही असोत पण आपण करत असणार्या भक्तीमुळे आपल्यात आणि आपल्या आयुष्यात काय चांगले सकारात्मक बदल होत आहेत ह्याकडे मात्र आपले लक्ष असायला हवे. अनेक वर्ष नामस्मरण करून ,पारायणे करून आपल्यात अंतर्बाह्य बदल होणे अपेक्षित आहे. जसा भगवंत चराचरात आहे अगदी तसेच आपल्या मनात अंतर्मनात सुद्धा त्याचे अस्तित्व जाणवू लागते. नामस्मरणाने आपले मन अधिक विचारी होत जाते ,शांत होते . भगवंताशी एकरूप होणे हे खचितच सोपे नाही .पी हळद हो गोरी हा नियम इथे लागत नाही. तो आपल्या अनेक परीक्षा घेयील आपण त्याच्या प्रत्येक परीक्षेत पास व्हायचेच . एक काळ असा येतो कि आपले सततचे मागणे आपली हाव कमी होते .सतत काहीतरी हे दे ते दे मागण्यातच जन्म जातो आपला आणि भक्ती करणे राहूनच जाते .तसेही मागणे म्हणजे भिकच कि ,कश्याला सतत काहीतरी मागायचे ,आपण आपली भाकरी कष्टानेच मिळवली तर त्याची अवीट गोडी चाखता येते. असेल हरी तर देयील खाटल्यावरी असे करणाऱ्या भक्तांना महाराजांना कशी मदत करणार ,विचार करा .

आपल्या स्वतःच्या आयुष्याकडे जेव्हा आपण त्रयस्थाच्या नजरेतून बघू तेव्हा खरे. आपण ज्या देवाची भक्ती करतो तो आपल्याला किती समजला आहे ह्याचा अभ्यास केला पाहिजे ,आपल्यात किती बदल झालाय ? आपले किती अवगुण सुगुणामध्ये परिवर्तीत झाले आहेत ? जराजराश्या गोष्टीनी , अपयशाने चिडचिड करणे ,खचून जाणे हे कमी झाले आहे का? कुणाबद्दल वाटणारी असूया ,मत्सर कमी झाला आहे का? आपण अधिकच प्रयत्नवादी झालो आहोत का? ह्या सर्वाची उत्तरे मिळाली पाहिजेत. नुसते सगुण आणि निर्गुण रुपात न अडकता आपली भक्ती किती शुद्ध ,बावनकशी सोन्यासारखी होईल , आपण आपल्या अराध्याच्या किती जवळ जावू हे महत्वाचे.

भक्ताने आपल्या लाडक्या भगवंताचे रूप कसेही पाहावे मग ते निर्गुण असो अथवा सगुण पण सेवा आणि भाव मात्र खरा असावा .भक्तीत भेसळ नसावी . आपला देव आपल्याला कधीच अंतर देत नसतो .अधून मधून आपणच त्याला दुरावत असतो , आयुष्य चांगले असते तेव्हा ह्याच भगवंताला आपण किती सहजतेने विसरतो आणि संकटसमयी बरोबर त्याची आठवण येते ,हेही चूकच. भक्ती निरपेक्ष हवी , भक्तीत व्यवहार नको ,तु माझे हे काम कर मग मी ५ नारळाचे तोरण बांधीन असा व्यवहार भगवंताशी तर नकोच नको. फक्त एकदा मनापासून जिथे असाल तिथून त्याला हाक मारली तर तो तत्क्षणी तुमच्या मदतीला धावून येयील ह्यावर आपली श्रद्धा असली पाहिजे.

इतकी सेवा भक्ती करूनही जेव्हा एखाद्या गोष्टीची काळजी करत राहतो म्हणजे आपल्या भक्तीत निश्चितच काहीतरी राहून गेले आहे. हो ना? ज्या क्षणी आपण आपल्या महाराजांवर आपले आयुष्य सोडून देवू तो क्षण खरा ,मग कशाचीच चिंता उरणार नाही कारण एकदा त्यांच्या शाळेत नाव घातले कि मग ते नेतील तिथे हा भाव वृद्धिंगत होईल आणि मग जे आयुष्य जगू ते पैशाने किती समृद्ध असेल माहित नाही पण मानसिक समाधान ओतप्रोत भरलेले असेल , रात्रीची शांत झोप असेल हे नक्की.

प्रत्येक दिवशी आपली वाटचाल मृत्यूच्या दिशेने होते आहे , सेवा करण्याचा वेळ कमीकमी होत आहे .आपल्याला नेमून दिलेले काम झाले कि आपण इथून जाणार पण जाताना पुढील जन्मासाठी लागणारी पुण्याची शिदोरी बरोबर घेवूनच .तसेच शेवटचा क्षण सुद्धा गोड व्हावा ह्याचसाठी हा सारा अट्टाहास म्हणून साधना ,ध्यानधारणा हवी . घ्यानात ,आपल्या विचारात ,मनात अंतर्मनात सतत त्याचे विचार हवेत तरच आपण त्याच्याशी एकरूप होवू . जितका वेळ ध्यान तितका वेळ तोंड खाण्यासाठी आणि बोलण्यासाठीही बंद राहील . म्हणजे पहा किती कर्म कमी झाली आपली. तसेच आपण केलेल्या नामस्मरणाचा परिणाम सुद्धा आपल्या शरीरावर ,मनावर आणि आपल्या वास्तूवर होत असतो. आपल्या भक्तीमुळे ,केलेल्या सेवेमुळे महाराजांची कृपा आपल्यावरच नाही तर आपल्या लेकरांवर , संपूर्ण घराण्यावर होते ह्याचे अनेक दाखले पोथी पुराणातून मिळतात . शेगावच्या संत शिरोमणी श्री गजानन महाराजांची कृपा पाटील वंशावर होती ह्याची नोंद श्री गजानन विजय ह्या ग्रंथात आढळते .आपल्या भक्तीचा आलेख हा उंचावत गेलाच पाहिजे आणि जितक्या लवकर आपण त्याच्याशी एकरूप होवू तितका तो वाढतच जाणार. 

एक क्षण असा येतो कि त्याच्या सहवासात आपल्याला शांत ,समाधानी वाटते , आता काहीच नको असे वाटायला लागते ,जे जे दिलेस त्यासाठी मनात कृतज्ञता असते आणि समाधानाच्या त्या उत्तुंग शिखरावर असताना मग म्हणावेसे वाटते ..तुज सगुण म्हणू कि निर्गुण रे.

 

अस्मिता

लेख आवडला तर अभिप्राय द्यायला विसरू नका.

Antarnad18@gmail.com

 

Monday, 14 December 2020

श्री कृष्णार्पणमस्तु (मार्गशीर्षारंभ)

|| श्री स्वामी समर्थ ||



हिंदू संस्कृतीमध्ये व्रत वैकल्ये ,उपासना ह्याला अनन्य साधारण महत्व आहे. प्रत्येक महिन्यात येणारे ऋतू आणि त्यातील सण, उत्सव याचीही योग्य सांगड विधात्याने घातली आहे. श्रावण महिना जसा व्रत वैकल्ये ,पूजापाठ ह्यासाठी महत्वाचा आहे तश्याच प्रकारे येणारा मार्गशीर्ष मास सुद्धा. मार्गशीर्ष हे सुद्धा भगवान कृष्णाचेच एक रूप मानले आहे म्हणून मार्गशीर्ष महिना हा कृष्णभक्तीसाठी विशेष मानला आहे.

मृगशीरा हे 27 नक्षत्रातील एक नक्षत्र आहे. मार्गशीर्ष पौर्णिमेचा संबंध हा मृगशीरा ह्या नक्षत्राशी असल्याने ह्या महिन्याला मार्गशीर्ष म्हणतात .श्रावण महिन्याप्रमाणेच मार्गशीर्ष महिन्यात हवेत सुखद गारवा असतो. ह्या महिन्यात सर्व प्रकारच्या भाज्या भरपूर प्रमाणात येतात. उपासना , साधना , नामस्मरण ह्यासाठी पोषक असा हा काळ असतो .ह्या महिन्यात पवित्र नदीतील स्नानाला विशेष महत्व आहे. कृष्णभक्तांसाठी मार्गशीर्ष मास हि उपासनेसाठी एक अनोखी पर्वणी आहे. ओंम नमो भागवते वासुदेवाय ह्या जपाचे अनुष्ठान करून श्रीकृष्णाच्या सेवेत रुजू होणारे असंख्य भक्तगण आहेत. अनेक ठिकाणी वैयक्तिक किंवा सामुदायिक रीतीने श्री भगवत गीतेचे पारायण केले जाते. मार्गशीर्ष महिन्याला सत युग सुद्धा म्हंटले जाते.

मार्गशीर्ष महिन्यात दर गुरुवारी स्त्रिया महालक्ष्मीचे म्हणजेच वैभव लक्ष्मीचे व्रत करतात. महालक्ष्मीची पूजा करून वैभवलक्ष्मीच्या पोथीचे वाचन आणि नेवैद्य करतात . शेवटच्या गुरुवारी ह्या व्रताचे उद्यापन केले जाते.



मार्गशीर्ष पौर्णिमेला मृगशीर्ष ह्या नक्षत्रावर दत्ताचा जन्म झाला म्हणून त्या दिवशी दत्त जयंती सर्वत्र साजरी केली जाते. पूर्वीच्या काळी भूलोकावर आसुरी शक्ती प्रचंड प्रमाणत वाढल्या त्यांच्या विनाशासाठी सर्व देवगण उभे ठाकले पण ह्या आसुरी शक्ती म्हणजेच दैत्यांचा पराभव करण्यास देवांना यश प्राप्त झाले नाही . त्यावेळी ब्रम्हदेवांच्या आदेशावरून दत्त देवता अनेक ठिकाणी प्रगट झाली आणि ह्या दैत्यांचा संहार झाला म्हणून दत्त जयंती साजरी होते. दत्त जयंतीच्या दिवशी दत्ततत्व हे भूलोकावर हजार पटीने कार्यरत असते म्हणून ह्या दिवशी दत्ताची उपासना आणि श्री गुरुदेवदत्त हा जप केल्यास अधिक फलदायी होते.

श्री गुरुचरित्राचे पारायण दत्त जयंतीच्या आधी सात दिवस सुरु करून दत्त जयंतीच्या दिवशी त्याची नेवैद्य दाखवून सांगता करावी. नेवैद्या मध्ये घेवड्याच्या भाजीचा समावेश असावा. श्री गुरुचरित्राच्या संक्षिप्त पोथीचे पारायण सुद्धा करता येते.

दत्ताच्या हातातील कमंडलू आणि जपमाळ हे ब्रम्हदेवाचे ,शंख चक्र विष्णूचे तर त्रिशूल आणि डमरू हे शंकराचे प्रतिक आहे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त हा जयघोष आपण नेहमी ऐकतो. अवधूत म्हणजे नेहमी आनंदात असणारा ,वर्तमानात जगणारा . त्याप्रमाणे आपणही नेहमी आनंदात आणि वर्तमानात जगले पाहिजे . प्रत्येक क्षण आनंदात जगता आला पाहिजे .

अध्यात्म ,उपासनेचा आपल्या जीवनाशी घनिष्ठ संबंध आहे. कुठलेही व्रत किंवा नामस्मरण हे डोळसपणाने त्याचा अर्थ समजून घेतले तर अधिक उत्तम होईल आणि चिरकाल टिकणारा आनंद देवून जायील ह्यात शंकाच नाही. उगाचच ह्याने त्याने सांगितले म्हणून काहीतरी करणे उचित नाही. आपण करत असलेल्या उपासनेत जीव ओतला तर आणि तरच त्याचे फळ मिळेल .धरसोड उपयोगाची नाही .

ह्या वर्षाची अखेरही आणि नवीन वर्षाची सुरवात देखील अत्यंत शुभ होणार आहे कारण 31 डिसेंबर रोजी गुरुपुष्यामृत योग आहे. तेव्हा साधकांसाठी हा मार्गशीर्ष महिना व्रत वैकल्ये ,उपासना , पारायण ह्या सर्वांसाठी शुभ फळे प्रदान करणारा आहे. माणसाच्या आयुष्यातील अधून मधून येणाऱ्या संकटांनी तो हताश होतो आणि त्याला मार्ग दिसत नाही. अश्यावेळी उपासना त्याला मार्गस्थ करते. अध्यात्माला आपल्या जीवनात अनन्य साधारण महत्व आहे. प्रपंच करून परमार्थ केला तरच तो यश प्रदान करेल . खुलभर दुधाची गोष्ट आपल्या सर्वाना माहितच आहे .श्री गजानन विजय ,श्री साई चरित्र, श्री गुरुचरित्र अश्या धार्मिक ग्रंथांचे पठण , नित्य उपासना , कुलस्वामीनीचां जप , कुंकुमार्चन अश्या विविध माध्यमातून आपण आपल्या इष्ट देवेतेची उपासना करू शकतो.

उपासना आपल्याला मार्ग दाखवते , संकटांचा सामना करण्यास धीर देते आणि आपले मनोबल वाढवते. परमेश्वराची भक्ती करण्यासाठी सुद्धा त्याची कृपा व्हावी लागते आणि ती ज्यावर झाली त्याची जीवनरूपी नैया पार होणार ह्यात शंकाच नाही.

तेव्हा अश्या ह्या परमेश्वरी कृपेचा आनंद तुम्हा आम्हा सर्वाना प्राप्त होवूदे आणि सर्वांचे आयुष्य आनंदाने बहरून जावूदे हीच त्या परमेश्वरचरणी प्रार्थना .

 

अस्मिता

लेख आवडल्यास अभिप्राय द्यायला विसरू नका.

antarnad18@gmail.com

 

 

 

 

 

 

 

  

थेट मनाला भिडले...

 ||श्री स्वामी समर्थ ||


व. पु. काळे माझे अत्यंत आवडते लेखक आहेत. अत्यंत वाचनीय असे शेअर करत आहे त्यांच्याच शब्दात...

एखादा माणूस माझ्या मनातून उतरला की, मी आयुष्यभर त्याच्याकडे ढुंकूनही बघणार नाही.. ह्या अश्या स्वतःच्या ग्रेट स्वभावाचा काही लोकांना प्रचंड गर्व असतो, म्हणूनच हा मेसेज मला सगळ्यांबरोबर शेअर करावासा वाटला..

कधी तरी निवांत बसून आयुष्यात येऊन गेलेल्या आणि दुरावलेल्या नात्यांचा डोळसपणे अभ्यास केला की, लक्षात येतं की, असे अनेकजण ज्यांनी "आपल्याला दुखावलं" म्हणून आपल्या आयुष्यातून आपण त्यांना  वजा केलं होतं ते अनेकदा समर्थनीय नव्हतंच !

भावना दुखावल्या, असं म्हणत आपण आपल्या अहंकाराला विनाकारण जोपासत बसलो..आणि सोन्यासारखी माणसं आपल्या प्रतिक्षेला कंटाळून आपापल्या मार्गे निघूनही गेली.

त्यांची एखादी कृती, चूक हा जणूकाही जन्म-मरणाचा प्रश्न बनवून ती हकनाक आपल्या अहंकाराची बळी कधी झाली, हे कळलंच नाही.

आपण जसे जसे परिपक्व होत जातो तसं तसं लक्षात येतं की, भावना आणि अहंकार ह्यांच्यात असलेली सूक्ष्म रेषा योग्य वेळी जाणून वागायला हवं होतं.

त्या माणसांनी आपल्यासाठी केलेल्या चांगल्या गोष्टी लक्षात ठेवायला हव्या होत्या. स्वतःच्या चुकासुद्धा आठवून निदान स्वतःशी तरी मान्य करायला हव्या होत्या...

भावना क्षमाशील असते तर अहंकार मात्र एक घाव दोन तुकडे करून मोकळा होतो..
भावना दुखावली,असं आपण म्हणतो तेव्हा खूप वेळा भावना नाही तर अहंकार दुखावलेला असतो !

अगदी एखादी आनंदाची बातमी जरी कुणी आपल्याला उशिरा दिली, तर त्या गोष्टीचं दुःख आणि राग म्हणून त्यांचं अभिनंदनही आपण केलेलं नसतं आणि हे अनेकदा घडतं..

जगणं म्हणजे फक्त श्वास घेणं नसतं, तर त्या जगण्यालाही स्वतःचं असं वेगळं रूप आणि अस्तित्व असतं..

कुणाचंच कुणावाचून काही अडत नाही, पण आयुष्यात आलेली चांगली माणसं जेव्हा गैरसमजुतींमुळे दुरावतात..

तेव्हा मात्र जर ती माणसं आपल्या आयुष्यात राहिली असती तर जगणं अजून सुंदर आणि अर्थपूर्ण झालं असतं, असं मात्र नक्कीच वाटून जातं.

क्षणभंगुर आयुष्याचे लाड करताना आपल्या जगण्याचा दर्जा आपण राखायला हवा, आणि ह्यासाठीच ते जगणं सुसंस्कृत आणि अर्थपूर्ण बनवणाऱ्या चांगल्या माणसांची ओळख आणि जोपासना करणं आणि अहंकारामुळे त्यांना न गमावणे हे जाणीवपूर्वक आपण करावं असं मनापासून वाटतं..

बऱ्याचदा तर समोरच्या व्यक्तिच्या वागण्याचा आपण आपल्या मतानुसार अर्थ काढतो, तसा विचारही समोरच्याचा नसतो, तो सहज आपलं म्हणून वागत असतो.. परंतु आपण चुकीचा अर्थ काढून समोरच्याला आयुष्यातून सहज काढून टाकतो, अन आपला अहंकार आपल्याला या गोष्टीची जाणीवही होऊ देत नाही.

म्हणून...कुणाची कितीही मोठी चूक असली तरी ती आयुष्यापेक्षा व नात्यापेक्षा मोठी नाहीच...!

व.पू.काळे

Monday, 7 December 2020

 || श्री स्वामी समर्थ ||




हसत खेळत ज्योतिष शिकूया . ह्या कार्यशाळेचा डिसेंबर महिन्यातील वर्गही छान झाला. मुलांसोबत आपलेही ज्ञान वृद्धिंगत होते आहे , वाचन वाढते आहे ह्याचा मलाही खूप आनंद आहे.

स्वामी समर्थांच्या कृपेशिवाय हे शक्य नाही तेव्हा त्यांची कृपादृष्टी अशीच राहूदे हीच त्यांच्या चरणी प्रार्थना .


अस्मिता

Wednesday, 2 December 2020

अमृततुल्य योग –गुरुपुष्यामृत

 || श्री स्वामी समर्थ ||




अमृततुल्य योग –गुरुपुष्यामृत

आपले आयुष्य प्रत्येक क्षणाला बदलत असते . कधी हे बदल आपल्या पथ्यावर पडतात म्हणजे शुभ असतात तर काही बदल आपल्याला कठीण वळणांवर आणतात . प्राप्त परिस्थितीतून मार्ग काढणे हेच आपल्या हाती असते आणि अश्यावेळी अध्यात्म , उपासना मनुष्याला मदत करते.

उपासना , साधना ह्यासाठी शुभ असलेल्या “गुरुपुष्य योगा ” बद्दल आज जाणून घेवूया. पुष्य नक्षत्र जेव्हा गुरुवारी येते त्या दिवसाला “ गुरुपुष्य ” म्हंटले जाते.

पुष्य हे शनीचे शुभ नक्षत्र आहे . पुष्य म्हणजे पोषण करणारा .हे नक्षत्र अत्यंत शुभ आणि कल्याण करणारे ,सकारात्मकता , उर्जा देणारे आहे पण तरीही हे विवाहास वर्ज्य मानले आहे . ह्या दिवशी केलेल्या सर्व गोष्टींची वृद्धी होते म्हणून ह्या दिवशी सोने खरेदी केले जाते.

ह्या योगावर केलेले जप , ग्रंथ पोथी वाचन ,पारायण ,तप , ध्यान धारणा , दान मोठे फळ देते .कुठल्याही नवीन किंवा बंद पडलेल्या कामाचा श्री गणेशा ह्या योगावर केला तर यश नक्कीच मिळते . भगवंताची आराधना करून त्याचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी साधक ह्या दिवशी साधना करतात . ह्या योगावर केलेली श्री महालक्ष्मीची साधना सुद्धा विशेष फलदायी होते.

गुरुपुष्य योगावर केलेली साधना वृद्धिंगत होते म्हणून ह्या योगावर संकल्प करून धर्मग्रंथांचे पारायण , जपजाप्य केले जाते.

श्री दासगणू महाराजांनी श्री गजानन महाराजांच्या लीला शब्दांकित केलेला श्री गजानन विजय ह्या पवित्र , रसाळ ग्रंथांचे पारायण गजानन भक्त गुरुपुष्यामृत योगावर आवर्जून करतात . ह्या ग्रंथाच्या २१ व्या अध्यायात श्री दासगणू महाराज लिहितात ..जो ह्या अमृततुल्य ग्रंथाचे पारायण दशमी एकादशी आणि द्वादशी ह्या दिवशी तसेच गुरुपुष्य योगावर करील त्याच्या अवघ्या मनोकामना खचितच   होतील पूर्ण .कसल्याही असोत यातना त्या निरसन होतील. श्री गजानन विजय ह्या ग्रंथात प्रचंड ताकद आहे .आपल्याला मार्ग नक्कीच मिळतो आणि संकट हरण होते हे नक्की , अनुभव जरूर घ्यावा .

आपल्या अध्यात्मिक प्रगतीसाठी ,उपासनेसाठी ,साधनेसाठी आणि शुभकार्याचा श्रीगणेशा करण्यासाठीचा हा अमृततुल्य “ गुरुपुष्य योग ” 31 डिसेंबर 2020 रोजी येत आहे. हा योग सायंकाळी 7.48 पासून ते १ जानेवारी सकाळी 7.14 पर्यंत असणार आहे.

2020 हे वर्ष आपल्या सर्वांसाठीच प्रत्येक क्षणी परीक्षा देणारे ठरले. शेवटी हे 2 हस्तक आणि एक मस्तक त्या परमेश्वरालाच जोडायचे आहे ह्याची अनुभूती प्रत्येक क्षणी आपल्याला मिळाली . नवीन वर्षाची म्हणजेच २०२१ ची सुरवात गुरुपुष्या सारख्या अमृततुल्य योगाने होत आहे हि खचितच आनंदाचीच बाब आहे. आपल्या सर्वांवर हाबी झालेल्या ह्या कोविड च्या संकटातून आपली 2021 मध्ये सुटका होवूदे ह्या साठी ह्या योगावर साधना , जप , प्रार्थना नक्कीच करू शकतो. आपले  सर्व व्यवहार , अर्थचक्र पुन्हा एकदा गतिमान होवूदे , सर्वाना मोकळा श्वास घेता येऊदे ह्यासाठी त्या विधात्याला आपण साकडे घालूया .

“गुरुपुष्यामृत ” योगासारख्या अत्यंत प्रभावी योगावर केलेली प्रत्येक साधना विशेष आणि अद्भुत फलदायी आहे . प्रत्येकाने ह्या योगावर आपल्या कुलस्वामिनीचा , इष्टदेवतेचे नामस्मरण अथवा पारायणरुपी साधना करून आपले जीवन कृतकृत्य करावे.

केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे ह्या युक्तीला धरून साधनेस आरंभ करावा आणि गुरुकृपेचा लाभ घ्यावा.

शुभं भवतु


अस्मिता

लेख आवडला तर अभिप्राय द्यायला विसरू नका .


antarnad18@gmail.com

हसत खेळत ज्योतिष शिकूया ह्या कार्यशाळेचे यश .

 || श्री स्वामी समर्थ ||



उत्तम शिक्षक मिळणे हे जसे विद्यार्थ्यांचे भाग्य असते , तसेच उत्तम विद्यार्थी मिळायला सुद्धा नशिबाची साथ लागते . आजवर माझ्या "हसत खेळत ज्योतिष शिकूया " ह्या कार्यशाळेला उत्तम प्रतिसाद लाभला पण त्याही पेक्षा उत्तम जिज्ञासू , संशोधन करणारे , ह्या शास्त्राचा सन्मान करणारे ,वाढवणारे आणि शिकण्याचा वसा घेणारे एकापेक्षा एक उत्तम, वेगवेगळ्या वयोगटाचे आणि अनेक उत्तम क्षेत्रात आपला ठसा उमटवणारे  विद्यार्थी ह्या कार्यशाळेला लाभले हि केवळ स्वमिकृपाच आहे ,नाही का?

ह्या सर्वांमुळे माझाही उत्चाह दुपटीने वाढला . त्यांना शिकवताना माझेही ज्ञान वृद्धिंगत झाले. ज्ञान फुकट दिले तर त्याची किंमत नसते हे बाळकडू माझ्या गुरूंकडून मिळाले त्यामुळे आजकालच्या कोविड च्या स्थितीचे भान ठेवून  मानधन घेतले .  आजवर घेतलेली प्रत्येक कार्यशाळा खरोखरच हसतखेळत झाली हि  परमेश्वर कृपाच म्हणायची .

अगदी कमी काळात उत्तम गृहपाठ आणि शिकण्याची कास ह्यामुळे  ह्या कार्यशाळेला  एका कुटुंबाचे स्वरूप आले  आहे. रोज त्यात नवीन नवीन सदस्याची भर पडत आहे .

तुम्हा सर्वांच्या पाठींब्यामुळे मी हि वाटचाल करू शकले आणि पुढेही करीन म्हणून कृतज्ञतेचे हे २ शब्द ,इतकच .

आपला पाठींबा असाच राहूदे हि सद्गुरू चरणी प्रार्थना.

अस्मिता


Saturday, 28 November 2020

जीवनाची सूत्री आणि ज्योतिष

 ||श्री स्वामी समर्थ ||

 

माणसाचे मन हे मोठे विचित्र आहे ,ते क्षणात सुखाच्या शिखरावर जाते तर दुसर्या क्षणाला दुक्खाच्या खाईत जाते. ऊन पावसाच्या खेळाप्रमाणे आपल्या आयुष्यात सुद्ध सुख आणि दुक्ख पिंगा घालत असते. आपल्याला जीवनात अनेक माणसे भेटत जातात . हि माणसे अनेक स्वभावाची असतात . त्यातील काही आपल्याशी जवळीक साधतात तर काही कायम नुसती ओळखीचीच राहतात . माणसे हि आयुष्यातील खरी संपत्ती मानते मी आणि म्हणूनच जर आपल्याला माणसे समजली ,त्यांचे स्वभाव समजले तर त्यांच्याशी कसे वागायचे ह्याची सूत्रे समजतात आणि मग पुढे सगळेच सोपे होवून जाते . म्हणूनच माणसांचा अभ्यास हवाच हवा. सकारात्मकता हि जीवन जगताना महत्वाची असते ती असेल तर आयुष्यातील सगळे चढउतार आनंदाने पार होतात . अशी माणसे नेहमीच चांगला विचार करतात कारण त्यांच्यात असतो तो आशावाद. ह्याउलट जराश्या संकटांनी हवालदिल झालेली माणसेही असतात कारण त्यांच्यात असते ती नकारात्मकता . ह्यामुळे आत्मविश्वास कमी होतो आणि कुठलेही पाऊल टाकायला हिम्मत राहत नाही. लोभ ,मोह , माया , मत्सर ह्यापलीकडेही चांगला विचार करता येतो हे त्यांना माहितच नसते . अश्या नकारात्मक प्रभावाखाली असणार्या व्यक्तींचा AURA बिघडलेला असतो . सततच्या नकारात्मक विचारांच्या प्रभावामुळे त्यांचे अस्तित्व सुद्धा नकोसे वाटते .अश्या व्यक्तींचा सहवास किंवा संपर्क आपल्यातील सकारात्मकता बिघडवू शकतो हे नक्की.

तर अश्या ह्या सर्व व्यक्ती आणि वल्लींचा अभ्यास करुया. ह्या अभ्यासात आपल्याला ज्योतिष शास्त्र नक्कीच मदतीला येते. आपल्या संपर्कात येणार्या आजूबाजूच्या व्यक्तींचा , त्यांच्या वागण्याचा अभ्यास केला तर त्यांच्या व्यक्तिमत्वाचा आपल्याला अंदाज येवू शकतो आणि मग त्यांच्याशी कसा व्यवहार करायचा ह्याचा अंदाज येतो.

तसे पहिले तर आपला पूर्ण दिवस सुद्धा अनेक आनंद ,व्यथा घेवून येतो. प्रत्येक वेळी आपण चांगल्या मनस्थिती मध्ये असूच असे नाही .अश्या मानसिक स्थितीत मग आपल्याला कुठलीच गोष्ट आनंद देत नाही किबहुना त्याचा आनंद आपण घेवू शकत नाही त्याउलट उत्तम मानसिक स्थितीत आपण लहानसहान गोष्टीनी सुद्धा आनंदी होतो .माणसाच्या शारीरिक गरजा आहेत तश्याच मानसिक गरजसुद्धा असतात . आपल्या मनासारखे होते तेव्हा आपण खुश असतो हे ओघानेच आले पण मनाविरुद्ध घटना घडून सुद्धा तारतम्य बाळगणे,मनावर ताबा ठेवणे हे कौशल्य ज्याला जमले तो जिंकला.

आपल्या इंद्रियामार्फत आपण सुख दुक्ख अनुभवू शकतो. आपली मानसिक स्थिती चांगली नसेल तर कुठल्याही गोष्टीचा आस्वाद जसे उत्तम पदार्थाची चव सुद्धा त्यावेळी आनंद देणार नाही. आपले मन सर्व काही भोगत असते. आपल्या मनासारख्या घटना मनाला आनंद देतात तर मनाविरुद्ध विचार आपल्याला मनाला त्रास देतात .

माणूस हा समाजप्रिय प्राणी आहे ,तो एकटा राहू शकत नाही म्हणूनच पर्यायाने तो कळपाने राहतो आणि त्यातूनच कुटुंबव्यवस्था उदयास आली आहे. आपल्या मनातील विचारांचे आदानप्रदान म्हणजेच संवाद होणे हि माणसाची मुलभूत गरज आहे. कुणाशीतरी बोलले कि बरे वाटते ,मोकळे वाटते हा अनुभव आपण सगळे नेहमीच घेतो. लोकांत मिसळून राहणे हि आपली गरज आहे. आपल्या चांगल्या कृतीला दाद देताना वडीलधार्या मंडळींनी पाठीवरून हात फिरवला तर किती बरे वाटते. आपल्या चांगल्या कामाची कुणी दखल घेवून चारचौघात त्याची स्तुती केली तर अंगावर रोमांच उभे राहतात .आपले कौतुक करणारी , शाबासकी देणारी आणि प्रोत्चाहन देणारी मंडळी आजूबाजूला असली कि आयुष्याच्या गाडीला वेग येतो . नवनवीन कल्पना सुचतात ,सकारात्मकता जागृत होते आणि पर्यायाने मनासारख्या घटना घडल्याने आयुष्य आनंदी होते जगावेसे वाटते. म्हणूनच माणसे हि अमूल्य संपत्ती जपलीच पाहिजे .आपल्या आवडत्या व्यक्तींशी संपर्कात राहणे आपल्याला मनापासून आवडते. ज्यांच्याशी आपले जेमतेम जमते त्यांना घेवूनही आयुष्याचा प्रवास करावाच लागतो त्यांना वगळून चालत नाही. नातेसंबंध टिकवायला कधी आपल्याला तर कधी समोरच्याला तडजोड करावी लागते. कधीतरी आपल्याला आपल्याच कोशात राहायला आवडते म्हणजेच एकांत प्रिय वाटू लागतो . कधीतरी शांत बसून आपल्याशीच संवाद साधला तर आपल्या चुका आपल्याला सुद्धा उमगतात .वय कितीही पुढे गेले तरी आपल्याला प्रेमाची ,आपुलकीची गरज भासतेच कदाचित उतार वयात शरीर थकलेले असते तेव्हा ह्याची जास्ती गरज असते. संसार झालेला असतो , मुलानातवंडांच्या गोकुळात आपण असतो . अश्यावेळी कुणीतरी जवळ बसावे आपले ऐकावे त्याचेही सांगावे अश्या शांत शांत क्षणांची गरज असते. आयुष्यात प्रत्येक पायरीवर आपण स्वतंत्र उपभोगत असतो ,आपल्या पद्धतीने जीवन जगता आले पाहिजे . आपल्या विचारांचा आणि कृतीचा रिमोट कंट्रोल आपल्याकडेच असायला हवा , आपल्याला मानसन्मान मिळाला पाहिजे ,आपले निर्णय आपलेच असले पाहिजेत तसेच जीवन जगताना असलेले आपले स्वातंत्र अबाधित असले पाहिजे , परावलंबी जीवन नको ह्या सर्व भावना आपल्यात असतातच आणि त्या पूर्ण झाल्या किंवा तसे जीवन आपल्याला जगायला मिळाले कि जीवनाचा खरा आस्वाद आपल्याला घेता येतो. कुणीतरी सतत आपल्याला terms dictate करत राहणे आवडत नाही आपल्याला.

आपल्यातील अध्यात्मिक जीवन जगणार्यांच्या गरजा वेगळ्या असतात . त्यांना मनन ,चिंतन , साधना ह्यासाठी स्वतःचा असा वेळ हवा असतो त्यात कुणाची लुडबुड नको असते. सतत शिकण्याचा ध्यास त्यांना आसतो त्यातून ते आपली बौद्धिकता प्रगत करत असतात .त्यांच्या शिकण्याने त्यांच्यात नवीन उर्जा सतत प्रवाहित राहते .जीवनात येणारी अनुभूती त्यांना प्रगल्भ करत जाते.

मनोरंजन , मित्रांशी गप्पा ह्यातून मिळणारा आनंद तसेच चालणे , व्यायाम ह्याची गरज ह्या सर्व गोष्टी मनासारख्या होणे आवश्यक असते. आपले छंद जोपासायला लागणारा वेळ मग त्यात वाचन असो अथवा घरातील बाग फुलवणे, एखाद्या मुकबधीर मुलांच्या शाळेत शिकवून सामाजिक बांधिलकी जपणे किंवा आपले छंद जोपासणे हे त्या त्या वेळी आवश्यक असते आणि ते पूर्ण करणे हि बाबा सुद्धा मन आनंदी करते.

मानसिक शारीरिक गरजा पूर्ण झाल्या तर तेच निरास जीवन छान वाटू लागते. प्रत्येक वेळी ह्या गरजा वेगवेगळ्या असतात जे घरातील कामे संपवून ठराविक लोकल धावपळ करून पकडली . जागा मिळाली म्हणून शांतपणे आपण बसलो आहोत पण त्याचवेळी शेजारील व्यक्ती फोनवर जोरजोरात बोलत असेल तर आपली उरलीसुरली शांतताही भंग होयील आणि आपला त्रागा वाढेल. त्यावेळी आपल्याला असलेली शांततेची गरज पूर्ण होणार नाही .

अगदी खरे सांगायचे तर प्रत्येक व्यक्तीला आपली स्वतःची अशी space हवी असते. कधीतरी आपण आपली स्वतःची कंपनी सुद्धा njoy करतोच कि. व्यक्त होणे हि सुद्धा आपली एक गरज आहे तसेच कुणीतरी आपल्याला विचारावे ,आपली मते ऐकावीत ,आपल्याला मोठेपणाही द्यावा ह्या सर्व गोष्टींचे अभिलाषी आपण असतोच.

आयुष्यातील transperancy महत्वाची असते. आयुष्यातील वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यावर अनेक गरजा असतात आणि त्या पूर्ण होणे हि आपली माफक गरज असते. ह्या सर्व गरजा पूर्ण होताना आपण सुखावतो .

ज्योतिषशास्त्रातील ग्रह , नक्षत्रे आपल्याला ह्या अभ्यासात निश्चितपणे मदत करतात . आपल्याला प्रत्येक ग्रहाची मुलभूत कारकत्वे माहित आहेत . ज्योतिष शास्त्र आणि मनुष्याची मानसिकता ह्याचा घनिष्ठ संबंध आहे आणि ग्रह आपली मानसिकता दाखवतात . एखादी घटना घडली कि त्याचा उहापोह करण्यापेक्षा त्यामागील कारणमीमांसा करण्याची म्हणजेच कुठली मानसिकता होती म्हणून एखादी घटना घडली हा अभ्यास आवश्यक आहे.

चंद्रमा मनसो जातः . चंद्राला आईची उपमा दिली आहे. कारण आईची माया चंद्र माणसात जागृत करतो. चंद्र प्रभावित व्यक्ती ह्या मायाळू किंवा ममतेची गरज असणार्या असतात आणि म्हणून त्या सोशिक , शांत ,प्रेमळ असतात .दुसर्यांवर सतत मायेचा वर्षाव करत असतात .चिडणे हा त्यांचा स्वभाव नसतो .

रवी हा अधिकार प्राप्तीसाठी उतावळा असतो , मान्यता , अधिकार ,पद भूषवणे हे त्याला आवडते . स्वतंत्र विचार आणि स्वातंत्र त्याला हवे असते आणि स्वभावही हेखेखोर ,गर्विष्ठ असतो . मंगळ हा काहीसा उतावळा ग्रह ,सतर्क असतो कारण त्याला नेहमी सुरक्षितता हवी असते. मनाविरुद्ध काही घडले कि आवडत नाही ,कुणाचे ऐकूनही घेत नाहीत .

मिथुन रास हि सगळ्यात मिसळू वागणारी कारण संवादाची गरज मिथुनेत खूप आहे त्यामुळे त्यांना लेखन ,बोलणे ह्या माध्यमातून सतत संवाद साधने आवडते.

म्हणूनच ग्रह , नक्षत्रे ह्यांची तत्वे समजली तर समोरच्या व्यक्तीवर कुठल्या तत्वाचा प्रभाव व्यक्तीवर अधिक आहे हे समजते आणि ह्या तत्वांनी व्यक्तीमध्ये कुठल्या गरजा उत्पन्न केल्या आहेत हेही समजते.

चंद्र , लग्नेश ,लग्न ,लग्नातील ग्रह ,राशीस्वामी आणि रवी ह्यातून आपली मानसिकता दर्शवतात .

अग्नीतत्व प्रधान व्यक्तीना स्वतंत्र हवे असते म्हणून मनाविरुद्ध काहीही झाले कि उफाळून येतात . स्वातंत्र प्रिय , प्रतिष्ठा , मानमरातब , कौतुक , सन्मान ह्याचे अभिलाषी असतात . नेतृत्व करायला आवडते, त्यांना नवीन आव्हाने स्वीकारायला आवडतात. त्यांचे स्वतःचे असे स्वतंत्र मत असते आणि ते मांडणे त्यांना आवडते. पण प्रत्यक्ष व्यवहारात वर नमूद केलेल्या गोष्टींपैकी कुठली गोष्ट प्रत्यक्षात झाली नाही म्हणजे त्यांनी केलेली एखाद्या चांगल्या कामाची प्रशंसा झाली नाही , कौतुक झाले नाही , त्यांच्या कर्तुत्वाला कामाच्या ठिकाणी किंवा घरत वाव मिळाला नाही , त्यांचे मत विचारातच घेतले नाही तर मग अश्या व्यक्ती रागाने उफाळून उठतात .त्यंनी केलेल्या कामाचे श्रेय दुसर्याला दिले गेले ,किंवा त्यांच्यातील नेतृत्वगुणाला वाव मिळाला नाही ,मुद्दामून त्यांना डावलले गेले किंवा त्याना मनाविरुद्ध तडजोड करायला लागली तर त्यांना ते सहन होत नाही मग त्यांची मानसिकता बिघडली तर नवल ते काय ? अग्नी हा झुंजणारा आहे. त्यांना स्वातंत्राची आवड आहे, स्पष्टवक्तेपणा , नेतृत्व ,कौतुक होणे अपेक्षित असते ,नुसते बसून अश्या व्यक्ती नाही राहू शकत ,रटाळ आयुष्य आवडत नाही ,शारीरिक आणि मानसिक शक्ती आणि उर्जा हि इतर तत्त्वांपेक्षा अफाट आहे. अहंकार ,गर्व सुद्धा ठासून भरलेला आहे त्यामुळे ह्या उत्चाहाला साजेसे आयुष्य आणि संधी त्यांना मिळाल्या तर ते सुखी असतात पण ह्याउलट झाले कि त्यांना संधी मिळूनही डावलले गेले किंवा नेतृत्व गुण असूनही तशी संधी मिळाली नाही ,त्यांच्या गुणांची कदर झाली नाही ,त्यांचे मत लक्ष्यात घेतले नाही ,त्यांच्या कामाचे कौतुक झाले नाही तर अश्यावेळी अश्या वेळी व्यक्ती अस्वस्थ होतात आणि त्यामुळे अश्या लोकांना तसाच जोडीदार मिळायला हवा नाहीतर आयुष्य उदास होईल म्हणजे तो म्हणेल आपण कुठेतरी ट्रेकिंग ला जाऊ आणि ती नको म्हणेल .अश्यावेळी विसंवाद होवू शकतील.

पृथ्वीतत्व म्हणजे स्थिरावणे .अश्या वृषभ ,कन्या आणि मकर राशीचे लोक स्थिरावतात. त्यांना सुरक्षितता लागते . मानसिक , शारीरिक आणि आर्थिक सर्वच प्रकारच्या सुरक्षिततेला ते प्राधान्य देतात . त्यांना सहसा बदल नको असतो आणि मानवातही नाही ,चौकटीतले आयुष्य ते जगत असतात .पृथ्वीचा गुण ती सर्व साठवते त्यामुळे संग्रह करत राहतात . अश्या लोकांकडे ठोस अशी माहिती असते .सतत आधार लागतो. ह्यांच्या जीवनात अस्थिरता आली किंवा रोजच्या जीवनात बदल आले किंवा वास्तवता जिथे कमी होते तिथे ह्या लोकांचा जीव गुदमरेल त्यांना ते मानवणार नाही . वास्तवापेक्षा कल्पनांना जास्ती वाव आहे तिथे ह्यांचे जमणार नाही कारण ते practical असतात .त्यांना कुठे रिस्क घ्यावी लागली तर त्यांना ती स्थिती पचवणे कठीण जाते.

वायुतत्व म्हणजे बुद्धिमान राशी मिथुन तूळ आणि कुंभ ह्या आहेत .वायू नावाप्रमाणेच एका जागी स्थिर राहत नाही त्याचप्रमाणे सगळ्या गोष्टीची आवड जसे मैत्री ची , संवादाची आवड असणे ,विचार करणे , तर्क लावणे ,चिंतन करणे ,एखाद्या गोष्टी शिकणे ,समतोल पणा असणे, बदल घडवणे जसे शनीची दशा असेल किंवा शनी ज्या स्थानातून जात असेल त्या स्थानाच्या संबंधी मोठे बदल घडतात कारण शनी हा वायूतत्वाचा ग्रह आहे. कन्या राशीतील सर्व नक्षत्रे हि वायुतत्वाची असल्यामुळे ती बुद्धिमान राशी आहे. वायू एकाजागी राहत नाही. त्यामुळे आहे तिथे न थांबता परिस्थितीतून मार्ग काढणे , शेअर करा आणि पुढे जाणे हे वायू शिकवतो. अश्या लोकांच्या बुद्धिमत्तेला वाव मिळाला नाही किंवा अत्यंत कोरड्या व्यक्तींसोबत त्यांना राहावे लागले किंवा जिथे चिंतन ,मनन विचारला बुद्धीला खाद्य नाही असे निरास आयुष्य जगायला लागले किंवा एकटेपणा आला किंवा फक्त भावनिकता असलेल्या व्यक्तींशी जुळवून घ्यायला लागले जिथे बुद्धीचा दूरपर्यंत विचारच नाही तिथे अश्या व्यक्ती अस्वस्थ होतील.

जलतत्व म्हंटले कि भावना आल्या. हळुवारपणा , संवेदना , प्रेमळपणा , एकमेकांना समजून घेण्याची वृत्ती , कौटुंबिक ओढ ,एकमेकातील बंध ,नाती जपणे टिकवणे आणि फुलवणे , आपल्याला कुणीतरी आपले म्हणणे आणि आपणही दुसर्याला जीव लावणे ,आपले छंद जोपासणे कारण कुठल्याही गोष्टीतील रस हा आपल्याला चंद्र शुक्र आणि जलराशीच देतील.तार अश्या ह्या गोष्टी हि जलतत्वाच्या लोकांची मानसिक गरज असते आणि ह्या गोष्टी त्यांना मिळाल्या नाहीत किंवा त्यांना अगदी कोरडे आयुष्य जगायला लागले जिथे भावनिकता नावालाही नाही किंवा हेवेदावे , एकटेपणा ,वियोग सहन करायला लागला , नातेसंबंध तुटले ,दुरावले तर त्यांना अस्वस्थ वाटेल.

अश्या विविध मानसिक गरजा  प्रत्येक तत्वाच्या व्यक्तीत असतात आणि त्या जर आपल्याला ओळखता आल्या किंवा आपण त्या अंशतः पूर्ण करू शकलो तर ती व्यकी आपल्याबरोबर सुखी राहते किंवा ह्या गरजा त्या व्यक्तीच्या पूर्ण झाल्या तर  व्यक्ती सुखी राहते अन्यथा ती व्यक्ती दुखी राहते.

ह्या चार तत्वानुसार आपण व्यक्तीच्या काय गरजा असतील ते आपल्याला समजले पण ह्या गरजा किती अंशी पूर्ण होतील हे समजणे सुद्धा महत्वाचे आहे.

अग्निप्रधान व्यक्ती हि गर्विष्ठ ,अहंकारी असेलच पण प्रत्येकवेळी तो गर्व लोकांना समाजाला दिसून येयीलच असे नाही कारण त्यांना मानमरातब , वरचे पद मिळाल्याने त्यांचा अहंकार सुखावला आहे. त्यामुळे त्यांच्या स्वभावाचे हे पेहलू असूनही समोर येणारच नाहीत .हा गर्व सुखावतोय पण जेव्हा अश्या व्यक्ती ना मान मिळत नाही ,त्यांना डावलले जाते ,त्यांच्या नेतृत्वगुणाची वाहवा होत नाही अश्यावेळी ह्या व्यक्तींचा संताप होयील आणि तो समोर येयील.

आपल्याला व्यक्तीच्या गरजा समजल्या पण त्या कितपत पूर्ण होतील आणि त्यांचा एकंदरीतच जीवनातील सुख आणि दुक्खाकडे पाहण्याचा दृष्टीकोन काय असेल ? ह्याचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. ह्यासाठी आपण चंद्र , लग्न आणि चतुर्थस्थान विचारात घेऊया. पत्रिकेतील प्रत्येक भाव आपल्याला सुख दुख देतातच. आपल्या ओळखीत अनेक व्यक्ती असतील ज्या श्रीमंत असतील , सुखाची सर्व आयुध जसे पैसा , मोठे घर ,वाहन सर्व काही असले पण रात्रीची झोप नसेल आणि त्याउलट एखादी गरीब कष्टाळू व्यक्ती जी जेमतेम पोटापुरते मिळवत असेल  ती मात्र पडल्यापडल्या शांत झोपत असेल आणि आनंदी असेल. त्यामुळे जीवनात सुख आपल्यात किती भिनवून घेवू आणि आपला दृष्टीकोन कसा बनवतो ह्यावर आपले जीवन किती आनंदी किंवा दुखी होईल ते ठरते .

प्रामुख्याने चंद्र , चतुर्थस्थान  आणि लग्नस्थान . ज्यांच्या पत्रिकेत हि स्थाने चांगली सुस्थितीत असतात त्यांचा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टीकोण निश्चितपणे सकारात्मक असतो . ह्याउलट ह्यातील जास्तीत जास्त ग्रह बिघडले तर आयुष्य असमाधानी असते म्हणजे विचार त्यानुसार असतात .

चंद्र – चंद्र हा पृथ्वीच्या जवळचा ग्रह असल्याने चंद्राचा परिणाम आपल्यावर आणि पृथ्वीवरील जीवसृष्टीवर सर्वाधिक होतो. जलतत्वाचा ग्रह असल्याने भावनांशी जवळीक साधतो. समुद्रातील भरती ओहोटी चंद्राचा पृथ्वीवरील ताण वाढल्याने होतो.

पाण्याला स्वतःचा रंग नाही त्यात जो रंग टाकाल तसा त्याचा रंग होतो. चंद्रावर इतर ग्रह आणि राशी , नक्षत्रांचा परिणाम लवकर होतो.जन्माच्या आधी आईच्या गर्भातून आपण गरजा घेवून जन्मतो तसेच पुढे जन्मल्यावर प्राप्त परिस्थिती , अनुभव ह्यातून तयार होतात .गर्भाच्या वाढीवर चंद्राचा अंमल आहे. आईच्या संस्कारांनी आणि जवळच्या माणसांनी केलेले संस्कार आपल्यावर असतात . आपल्या मानसिक जडणघडणीत चंद्राचा प्रभाव सर्वाधिक आहे. चंद्र सुस्थितीत असेल तर माणसाचे जीवन कसे असेल त्याचा अंदाज येतो. चंद्राला राशीबल हवे . तसेच इतर ग्रहांशी होणारे योग बघितले तर चंद्र शुभ आहे कि पापाग्रहांचा परिणाम आहे ते समजेल. चंद्रावर होणारे इतर ग्रहांचे योग व्यक्तीच्या मानसिकतेवर परिणाम करत असतात . चंद्राचे पत्रिकेतील स्थान , त्याचे नक्षत्र देवगणी किंवा मनुष्यगणी असेल ,चंद्राचे शुभग्रहांचे योग किंवा परिणाम होत असतील आणि पत्रिकेतील गुरु जो जीवनात समाधान देणारा ग्रह आहे त्याचा चंद्राशी होणारा योग ह्या सर्वातून चंद्राची स्थिती आणि त्या व्यक्तीची मानसिकता समजते.

चंद्र जर ६ ८ १२ मध्ये असेल त्यावर पापग्रहांची दृष्टी असेल जे व्यक्तीत तामसी वृत्ती देतो .चंद्र राशीबली नसेल तर चंद्र बिघडला असेल आणि अश्या व्यक्तीच्या मानसिक गरजा पूर्ण होत नाहीत , जीवनात प्रतिकूल वातावरण निर्माण होते आणि व्यक्तीला खूप तडजोडी कराव्या लागतात . म्हणून बिघडलेला चंद्र हा संघर्ष देतो.

चतुर्थस्थानाला सुखस्थान म्हणतात . घरात आपल्याला छान वाटते ,कारण घर प्रिय असते. घराशी आपली नाळ जोडलेली असते , घरात आपली माणसे आपली वाट पाहत असतात . आपल्या मनातील अंतरंग ,विचार ,आपल्या मनावर झालेले संस्कार ,सुख आणि दुक्खाच्या कल्पना आणि ती वाटून घेण्याची वृत्ती ,झोप ,घराबाबत असणारी मानसिक ओढ ह्या गोष्टी चतुर्थ स्थानावरून पाहतात .

दशमस्थान म्हणजे मध्यानीचा सूर्य त्याउलट चतुर्थस्थान हे पायाखाली दडलेले आकाश आहे जे दिसत नाही. समाधान दर्शवणारी कर्क रास नैसर्गिक कुंडलीत चतुर्थात येते आणि म्हणूनच समाधान दर्शवणारा गुरु हा कर्क राशीत उच्चीचा होतो. नैसर्गिक शुभग्रह येणे हे मानसिकतेच्या दृष्टीने चांगले असते . नैसर्गिक पापग्रह चतुर्थात असमाधानी करतात कारण ते हाव निर्माण करतात . आपण आयुष्यात किती सुखाची चव चाखू शकतो आणि आपण सुख लोकांना किती वाटू शकतो हे महत्वाचे आहे. कारण जो स्वतः सुखी असेल तोच इतरांना सुखी ठेवू शकतो.

लग्नस्थान म्हणजे आपण स्वतः आणि आपल्यातील सुख आणि दुख होय. माझा माझ्याकडे पाहण्याचा दृष्टीकोण हे लग्नावरून ठरते आणि त्यामुळे मी लोकांपुढे कसा प्रोजेक्ट करीन हे सुद्धा लग्नावरून ठरतात. लग्न सुस्थितीत असेल त्यावर शुभ ग्रहांचा परिणाम असेल तर व्यक्ती आनंदी , उत्साही , समंजस असेल. तिचा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टीकोण सुद्धा सकारात्मक असेल.

बाह्य जगाचे परिणाम आपल्यावर कसे होतील हे चतुर्थस्थान आणि चंद्रावर अवलंबून असते आणि आपण बाह्य जगाशी कसे व्यक्त होवू हे आपल्या लग्न स्थानाशी संबंधित असते . लग्न आणि लग्नेश सुस्थितीत असेल तर व्यक्ती आनंदी असेल. आशावाद असतो. लग्नेश बिघडला तर अश्या व्यक्तींचा स्वतःशीच द्वंद्व, संघर्ष चालू असते. चंद्र ,चतुर्थस्थान आणि लग्नाबाबत जास्तीतजास्त घटक सुस्थितीत असतील तर अश्या व्यक्तींच्या आयुष्यातील गरजा आणि सुख मिळण्याची शक्यता अधिक असते.

अश्याप्रकारे आपल्याला जागवणार्या आणि आपले आयुष्य समृद्ध करणार्या व्यक्तींच्या स्वभावाचा सखोल अभ्यास केला तर आपल्याला त्यांच्या स्वभावाचा  अधिक परिचय होईल आणि नाती वृद्धिंगत होतील ह्यात शंकाच नाही .

शेवटी एकमेकांना समजून घेणे ,जगणे आणि जगवणे हेच तर जीवन आहे नाही का? आज माणसे घट्ट धरून ठेवण्याची गरज आहे आणि ज्याला हे जमले तोच आयुष्याचा आस्वाद खर्या अर्थाने घेवू आणि देवूही शकेल.  

लेख आवडला तर अभिप्राय द्यायला विसरू नका .

antarnad18@gmail.com

 अस्मिता