Saturday, 24 October 2020
विजयादशमीच्या शुभेछ्या
Friday, 23 October 2020
फॅशनेबल
स्त्रिया आणि फॅशन्स ह्यांचे घट्ट अतूट नाते आहे. प्रत्येक स्त्रीला आपण फॅशनेबल असावे असे वाटतेच. पूर्वी स्त्रिया सरसकट ९ वारी साड्या नेसत असत पण आता ९ वारी ची ६ वार झाली. पूर्वी बायकांचा जास्तीत जास्त वेळ घरातच जायचा पण आता स्त्रिया घराबाहेर पडू लागल्या आहेत ,स्वतःच्या पायावर उभ्या आहेत . शाळा ,महाविद्यालये ,कार्यालये इथे स्त्रीवर्ग मोठ्या प्रमाणात कार्यरत आहे. दिवसभर ट्रेन, बस चा कंटाळवाणा प्रवास करावा लागतो, म्हणून आता साडीवरून पंजाबी ड्रेस ,चुडीदार ,आधुनिक पेहराव जसे स्कर्ट, शर्ट अश्या सुटसुटीत पेहरावांकडे जास्ती कल दिसून येत आहे.
आज फॅशन जगतात मोठ्ठीच क्रांती झाली आहे हे म्हणणे वावगे ठरू नये. जगभरात फॅशन चे एक वेगळे वर्तुळ आहे .अनेक Brands आधुनिक फॅशन चे कपडे design करून ह्यात उतरत आहेत. ह्या क्षेत्राकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलला असल्यामुळे आता इथे रोज काहीतरी नवीन पाहायला मिळते आणि अनेक स्त्रियासुद्धा हे क्षेत्र आपली करिअर म्हणून निवडत आहेत . अनेक महिला उद्योजकांनी ह्यात आपल्या अनुभवाचा आणि कलात्मकतेचा उपयोग करून विविध अत्याधुनिक कपडे बाजारात आणले आहेत .
रश्मी अद्वैत पटवर्धन... हे नाव आज फॅशन च्या जगतात नवीन नाही . रश्मीने प्रामाणिक मेहनत , हुशारी आणि कलात्मकता ह्याचा सुरेख मेळ घालून ह्या क्षेत्रात आपला एक वेगळा ठसा उमटवला आहे. IT क्षेत्रात रमलेल्या रश्मीच्या मनात काहीतरी वेगळे करावे असे विचार घोळू लागले.
“Jwellery ” आणि “Fashion ” हि दोन्ही क्षेत्रे तिला खुणावत होती . “ Project Manager ” म्हणून कार्यरत असणार्या रश्मीने अखेर आपल्या मनाचा कौल घेतला आणि “ Fabrication ” हे आवडते क्षेत्र निवडले .2013 मध्ये पुण्यातील सदाशिव पेठेत “रश्मी फॅशन्स ” चा श्रीगणेशा झाला. नवीन क्षेत्र निवडले खरे पण त्यातील अनेक गोष्टी तिला अनभिद्न्य होत्या. ड्रेस वरील ओढण्याची विशेष आवड असल्याने सुरवातील ते बाजारातून विकत आणून त्यावर “Patch work ,handwork ”करून त्याला एक वेगळा लुक देवून त्याची विक्री करायला सुरवात केली. पुढे हैद्राबाद , जयपूर ह्या ठिकाणी स्वतः जावून रश्मीने उत्तम ,तलम अशी कापडे खरेदी करायला सुरवात केली. ग्राहकांना द्यायचे तर उत्तमच हा धडा तिने पहिल्या दिवसापासून गिरवला आणि त्यात आजवर खंड पडलेला नाही ,त्यामुळे रश्मी फॅशन्स हा Brand ग्राहकांच्या पसंतीस खरा उतरला. काहीतरी उचलून ग्राहकांच्या माथी मारणे हे रश्मीच्या तत्वात कधीच बसले नाही .सुरवातीला विविध प्रकारची कापडे त्याचे design करणे ,ह्या सर्वात संपूर्ण वर्ष खर्ची घातले.
तुम्ही कितीही उत्तम काम करत असलात तरी कुठल्याही व्यवसायात सुरवातीला बर्याच सलग्न गोष्टी लागतात त्यातील प्रमुख आणि महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही आपला माल ग्राहकांपर्यंत कसा पोहोचवणार .म्हणतात ना आयुष्यात कुठलाही अनुभव फुकट जात नाही अगदी तसेच झाले .रश्मीला IT क्षेत्रातील तिच्या अनुभवाचा इथे फायदा झाला . 2014 मध्ये आपली स्वतःची वेबसाईट बनवून हे सर्व Unstiched कपडे तिने Online विकायला सुरवात केली आणि त्याला तिला ग्राहकांकडून उत्तम प्रतिसाद मिळाला. ४ वर्षे ह्या online marketing मुळे तिचा व्यवसाय आणि आत्मविश्वास वाढत गेला.
रश्मीला नेहमीच वेगळेपणाचा ध्यास होता. अगदी स्वतःचे कपडे खरेदी करतानाही त्यात काहीतरी “हटके” असावे ह्याकडे तिचा कटाक्ष असे आणि तिच्या मैत्रिणी ,कार्यालयातील सहकारी ह्यांना ते खूप आवडत असत . आपण काहीतरी वेगळे करू शकतो आणि ग्राहकांना वेगळे देवू शकतो हा आत्मविश्वास तिच्यात आला आणि ह्या गुणाचा तिला ह्या व्यवसायात खूप फायदा झाला. बाजारात मिळणाऱ्या सरसकट एकाच प्रकारच्या कपड्यातून काहीतरी वेगळे देण्यात ती यशस्वी झाली. तिने design केलेले कपडे हटके असल्यामुळे लक्ष वेधून घेवू लागले. मार्केट ट्रेंड ,नाविन्य , रंगसंगतीचे भान आणि तिची हटके designs ह्या सगळ्यामुळे अधिकाधिक ग्राहक तिच्याकडे आकर्षित होवू लागला. रश्मीच्या घरी तिच्या आईनेही साड्या तसेच लहान मुलांचे कपडे शिवणे हे व्यवसाय केले असल्याने तिला अगदी घरातूनच ह्याचे बाळकडू काही प्रमाणत मिळाले होते.ह्या सर्वामुळेच कपड्याच्या व्यवसायाकडे ती जास्ती आकर्षित झाली.
तिच्याकडील ग्राहकास ईक्कत २०० ते ८०० रुपयापर्यंत विकत मिळते आणि ते का ह्या रेंज मध्ये आहे हे समजावून सांगण्याकडे तिचा अधिक कल असतो. आपल्याकडे असणार्या विणकामात किती विविधता आहे हे ती आवर्जून सांगते ,जेणेकरून लोकांना त्याची माहिती व्हावी. प्रत्येक ग्राहकाचे बजेट वेगळे असते त्यामुळे आपल्याकडे आलेल्या प्रत्येक ग्राहकाला त्याच्या बजेट प्रमाणे पण काहीतरी वेगळेपण असणारे कपडे खरेदी करण्याचा आनंद मिळावा ह्याकडे ती जातीने लक्ष देते.
रश्मी भरभरून आपल्या प्रवासाबद्दल बोलत होती कारण “ रश्मी फॅशन्स " तिने शून्यातून निर्माण केले आहे आणि तो सर्व प्रवास उलगडून सांगताना ती पूर्णतः त्यात रमली होती. तिच्या बोलण्यात तिच्या व्यवसायाबद्दल समाधान तर होतेच पण ग्राहकांबद्द्ल होती ती कृतज्ञता .
कुठलाही व्यवसाय असो त्यात ग्राहकांची पोचपावती मिळाल्याशिवाय त्याला मूर्त स्वरूप येत नाही.
आज फॅशनच्या क्षेत्रात जिथे प्रत्येक क्षणी काहीतरी नवीन येत आहे, तिथे आज तु ह्या स्पर्धेत टिकण्यासाठी काय करतेस ह्या माझ्या प्रश्नावर रश्मी म्हणाली , हे सर्वस्वी एक आव्हान आहे पण आम्ही ते लीलया पेलले आहे.
नवीन ट्रेंड्स शोधात राहणे हे ह्या क्षेत्रात टिकण्यासाठी गरजेचे आहे म्हणून स्वतःचे ब्लॉग तिने तयार केले . चहा किटली, टिकत्याकटो, जिनीचा दिवा ,टिंग नावाचा दिवा ,बंदिश कलेक्शन ज्यात सर्व musical motifs, सारेगमा caligraphi आहे हे सर्व तिचे स्वतःचे ब्लॉग खरच अप्रतिम आहेत आणि त्यावर रश्मी फॅशन्सच्या वेगळेपणाचा ठसा आहे. आपले स्वतःचे वेगळेपण जपणारे हे सर्व ब्लॉग ग्राहकांच्या पसंतीस उतरले आहेत. सतत वेगळेपण जपणार्या रश्मीला designer साड्या विकण्यात रस नाही का हे विचारल्यावर ती म्हणाली कि भविष्यात मी नक्कीच त्याचा विचार करीन ,किबहुना अनेकांनी ते सुचवलेली आहे पण त्यातही मी माझा वेगळेपणा जपण्याचा प्रयत्न करीन. काहीतरी वेगळेपणा देवून रश्मीने आणलेले “ स्कर्ट्स ” ग्राहकांनी विशेषतः युथने उचलून धरले. त्यामुळे ह्यापुढे जे जे करीन त्यात काहीतरी खास ,हटके करीन आणि वेगळेपणा जपण्याचा प्रयत्न करीन हे तिने आवर्जून सांगितले.
IT क्षेत्रातील high salary देणारा जॉब सोडून आपले काहीतरी वेगळे सुरु करणे हा निर्णय खचितच सोप्पा नव्हता .पण रश्मीला तिच्या कुटुंबाने नुसताच पाठींबा नाही तर प्रोत्चाहन सुद्धा दिले .
कुटुंबाची स्वतःची जागा असल्याने तिला सुरवातीच्या काळात दुकानाचे भाडे द्यायला लागले नाही त्यामुळे तो पैसा तिला व्यवसायात वापरता आला . नोकरीमधील सेविंग मधून भांडवल उभे राहिले. सतत वेगळेपणा जपायचा असेल तर विविध कसब असलेले कारागीर लागतात आणि ते टिकत सुद्धा नाहीत ,त्यामुळे उत्तम कसलेल्या कारागिरांची शोधमोहीम सतत चालूच असते आणि ती चालूच राहणार ,त्याला पर्याय नाही . आपण व्यवसाय करत असताना मिळालेल्या कुटुंबाच्या प्रोत्चाहानामुळे रश्मीला मनाची उभारी आली आणि तिने नाविन्याचा जणू ध्यास घेत स्वतःला कामात झोकून दिले .
निरनिराळ्या प्रदर्शांत भाग घेतला ,त्यात तिची सोबत केली ती तिच्या आईवडिलांनी . यजमानांनी सुद्धा त्यांची नोकरी सांभाळून तिला ब्लॉग करण्यात ,video ,फोटोशूट करण्यात मदत केली . सर्वांच्या मदतीमुळे व्यवसाय फुलू लागला आणि आनंद द्विगुणीत झाला. रश्मीचा हा प्रवास नक्कीच सोप्पा नव्हता. आज मागे वळून पाहताना तिला सर्व आरश्यासारखे स्वछ्य दिसतेय. चांगली वाईट आनंदाची उताराची सगळी वळणे पार करून इथवर आल्यावर खरतर ओंजळीत आनंदच आहे. झालेल्या परिश्रमांचे सार्थक झालेय आणि त्याचे सर्व श्रेय ती तिच्या कुटुंबीयांसोबत ,सहकार्री आणि ह्या प्रवासात सोबत असलेल्या ,प्रोत्चाहन देणाऱ्या प्रत्येकाला, सर्व ग्राहकांना ज्यांनी वेळोवेळी तिच्या पाठीवर शाबासकीची थाप मारली त्या सर्वाना देते .आपल्यातील अनेक मैत्रिणी रश्मी सारखीच व्यवसायाची स्वप्ने उराशी बाळगून आहेत ,कर्तुत्ववान आहेत त्यांना हवी आहे फक्त एक संधी .
Partywear साठी लागणारे ड्रेस design करण्याचा विचार का केला नाहीस ह्यावर हसून ती म्हणाली अग सगळीकडे सगळे करत बसण्यापेक्षा एकावर लक्ष केंद्रित करून त्यात आपला ठसा उमटवणे योग्य वाटले आणि ह्या प्रकारचे ड्रेससाठी बाहेर खूप option आहेत. त्यामुळे ह्यात काही करण्याचा मानस नाही. सगळा focus तिने casual, daily wear आणि cotton कलेक्शन वरती ठेवलाय . काहीतरी वेगळे देताना त्याचे महत्वही ग्राहकांना सांगावे लागते जसे स्क्रीन प्रिंट (50 रुपये मीटर)आणि ब्लॉग प्रिंट(२०० रुपये मीटर) ह्यातील फरक सांगावा लागतो. ते सांगितल्यावर मग आपण जे विकत घेतलय ते नक्कीच चांगले आहे हा विश्वास ग्राहकांना पूर्णपणे वाटतो .जो फील तुम्हाला अजरक चे कापड देयील तो फील तुम्हाला कॉटन किंवा स्क्रीन प्रिंट देवू शकणार नाही . कमी किंमत मोजून काहीतरी गळ्यात मारून घेण्यापेक्षा चारऐवजी दोन कपडे घ्या पण ते जास्त टिकतील आणि पैसा वसुल असतील.
एखादी गोष्ट वापरल्याशिवाय समजत नाही त्यामुळे कधीही quality मध्ये तडजोड करू नये. कमी घ्यावे पण दर्जेदार घ्यावे. आज लोक डोळसपणे खरेदी करतात, आजच्या युगात इंटरनेट वर सगळी माहिती आहे त्यामुळे लोकांचा खरेदी करतानाचा अवेअरनेस नक्कीच वाढलाय. त्यामुळे एकच गोष्ट २०० ते २००० रुपयापर्यंत मिळते ,पण त्यात quality काय आहे ते महत्वाचे असते.
आजकाल प्रसिद्धी माध्यमांना ऊत आलाय ,जिथेतिथे फसवणूक आहे. ९९ रुपयाला साडी म्हंटले कि लगेच बटण दाबून खरेदी न करता जरा थांबून डोळसपणे विचार केला पाहिजे म्हणजे फसवणूक होणार नाही ,हि विनंती रश्मी सर्वांनाच करते.
रश्मी सर्वांसाठी सर्व देण्याच्या प्रयत्नात quality मध्ये मात्र कधीही तडजोड करत नाही. पण येणारा ग्राहक उत्तम कापडामुळे नेहमीच संतुष्ट होवून खरेदी करतो. सर्वांसाठी सर्व मग त्यात पुरुष वर्ग आणि मुलेही आलीच कि ,त्यांच्यासाठी काय आहे ह्यावर रश्मी म्हणाली अग त्यांना विसरून कसे चालेल. पुरुषांसाठी सुद्धा वेगळे शर्ट आहेत तसेच रश्मी फॅशन्स च्या खास सिग्नेचर कलेक्शन वर आता मी जास्ती फोकस करणार आहे. पुण्यात थाटलेले तिचे दुकान आता अनेकांसाठी “ shopping spot ” झाले आहे. रोज ऑफिस ला जाण्यासाठी , लहानश्या छोटेखानी कार्यक्रमांसाठी लागणारे छानसे सुटसुटीत कुर्ते घेणारे ग्राहक वाढत आहेत. रश्मी कडून घेतलेला कुठलाही ड्रेस बाहेर “ कुठून घेतला? ” हे लोक हमखास विचारतातच .अशी पोचपावती मिळते तेव्हा घेतलेले सगळे कष्ट भरून निघतात आणि पुन्हा नव्याने जोशात काम करण्याची स्फूर्ती मिळते हे सांगताना रश्मीचा आनंद ओसंडून वाहत होता .
www.https://www.rushmefashions.com |
रश्मीच्या चेहऱ्यावर समाधान दिसत होते. किती बोलू असे झाले होते तिला . भविष्यातील व्यवसायाची अनेक स्वप्न डोळ्यात दिसत होती. ती पूर्ण करण्यासाठी कंबर कसून कितीही कष्ट करायची तिची तयारी आहे हे वेगळे सांगायची गरज नाही . रश्मी आपल्यातीलच एक आहे. अगदी तुमच्या माझ्यासारखी . तिचा पुण्यातील स्टुडीओ तिने अगदी झक्कास सजवला आहे. "Happening Place " आहे ती. तेथील रंगीबेरंगी विविधतेने नटलेले कपडे आपल्याला मोहित करतात , तिच्या चेहऱ्यावरील हास्य आणि डोळ्यातील आनंद प्रत्येकाला आपलेसे करतो. तिच्या स्टुडीओतील माहोल सकारात्मक उर्जा निर्माण करतो . “ रश्मी फॅशन्स” मधील आपलेपणा आणि आदरातिथ्य आपल्याला क्षणभर तिथेच खिळवून ठेवते.
स्वप्न सगळीच बघतात , पण त्याचा पाठपुरावा करून मेहनतीने ती सत्यात उतरवायला लागतात नितांत परिश्रम , मेहनत आणि जिद्द . ह्या सर्वास जर प्रामाणिकपणाची जोड मिळाली तर त्यातूनच मग साकारते “ रश्मी फॅशन्स ”.
आज मला भावलेल्या व्यक्तीमत्वांमधील “रश्मी पटवर्धन ” ह्या धडाडीच्या मैत्रिणीशी साधलेले हितगुज आपल्यासोबत शेअर करताना मला विलक्षण आनंद होत आहे. नाविन्याचा ध्यास असलेल्या आपण सर्वांनी “रश्मी फॅशन्स ” ला आवर्जून भेट द्या. आपल्याला हवे आहे त्याहीपेक्षा सुंदर असे तुम्हाला तिथे मिळेल ह्याची खात्री वाटते .
रश्मीला आपल्या सर्वांतर्फे तिच्या पुढील वाटचालीस मनापसून शुभेछ्या.
अस्मिता
लेख आवडल्यास अभिप्राय द्यायला विसरू नका.
Antaranad18@gmail.com
Thursday, 22 October 2020
||श्री स्वामी स्मार्थ ||
हिंदू संस्कृतीत सणांची
रेलचेल असते. ह्या सर्व सणातून आपल्याला आपल्या रूढी आणि परंपरा किती खोलवर
रुजल्या आहेत ह्याची माहिती तर मिळतेच पण ह्यातील प्रत्येक गोष्ट आपल्या आयुष्याशी
कशी निगडीत आहे हे सुद्धा समजते.
अश्विन शुद्ध
प्रतिपदेपासून नवरात्र सुरु होते आणि आदिशक्तीचा जागर सर्वत्र सुरु होतो. सूर्याचा
हस्त नक्षत्रातील प्रवेश भोंडला म्हणजेच हादगा ,ह्याचा श्रीगणेशा करतो .पूर्वीच्या
काळी खेड्यापाड्यातून मुली पाटावर समृद्धीचे प्रतिक असणार्या हत्तीचे चित्र काढत.
मनोभावे त्याची पूजा करून नैवेद्य दाखवून त्या पाटाभोवती फेर धरून गाणी म्हणत असत.
समृद्धीचे प्रतिक असणार्या हत्तीचे पूजन |
गुजराथ ,कलकत्ता इथेही हा
सण दुर्गा मातेची पूजा करून खूप मोठ्या प्रमाणत साजरा होतो. नवरात्रीच्या ९ रात्री
देवी समोर आरती आणि फेर धरून गरबा खेळून जागवल्या जातात .महाराष्ट्रामध्ये कोकण
आणि पश्चिम महाराष्ट्रात देवीचा जागर करताना भोंडला खेळण्याची परंपरा आहे. भोंडला
म्हणजे देवीची आरती करून फेर धरून भोंडल्याची गाणी म्हणून खेळ खेळून रात्र जागवली
जाते .
आजकाल भोंडला म्हणजेच काय
ते माहित नसल्यानं भोंडल्याची गाणी तरी कशी माहिती होणार .त्याची माहिती व्हावी
ह्यासाठी हा लेखन प्रपंच.
पूर्वीच्या काळी चूल आणि
मुल इतकेच स्त्रीचे विश्व होते. त्यामुळे अश्या सणांच्या निम्मित्ताने एकत्र जमणे,
नवीन वस्त्र परीषण करून दागदागिने घालून आनंद साजरा करणे ह्या गोष्टी त्यांना
प्राप्त संसारात आनंद देवून जात आणि नात्यातील गोडवा वृद्धिंगत होत असे. ह्यानिम्मित्ताने घरातील स्त्रियांना नवचैतन्य
मिळत असे आणि घरात गोडधोड होत असे, जुनी नाती कात टाकून पुन्हा नव्याने बहरत असत.
आपल्या माहेरची आणि
सासरची माणसे ,त्यांच्याबद्दल आपल्याला वाटणाऱ्या भावना ,त्यांचे गोडवे गाणारी हि
भोंडल्याची गाणी असत .काही कारणाने झालेली संसारातील धुसफूस आणि कलुषित झालेली मने
ह्यानिम्मित्ताने का होईना पुन्हा एकत्र होवून आनंदाने फेर धरू लागत आणि पुन्हा
एकदा संसारावर प्रेमाचे शिंपण होई. म्हणूनच माणसातील प्रेम ,विश्वास आणि
एकमेकांबद्दल वाटणारी ओढ सतत कायम ठेवणाऱ्या ह्या सर्व सणांना अतिशय महत्व आहे.
जग खूप पुढे जात असले तरी
अजूनही खेड्यापाड्यातून नाही तर अगदी मुंबई पुण्यासारख्या औद्योगिक शहरातून सुद्धा
आदिशक्तीचा जागर मोठ्या प्रमाणत होत असताना दिसतो.
आपल्या जवळचे मित्र ,
नातेवायिक आणि समाजातील सर्व स्थरातील लोक ह्या सणांच्या निम्मित्ताने आपली दुक्ख
, वेदना काही काळापुरती विसरून आनंदाने एकत्र येतात म्हणूनच ह्या सर्व सणांना
महत्व आहे.आजकालच्या आधुनिक काळात मुलामुलीना ह्या रूढी परंपरा माहित सुद्धा नाहीत
त्यामुळे येत्या काही वर्षात ह्या नामशेष होतील कि काय अशीच भीती वाटते .आपणही
समाजाचे ऋण लागतो आणि म्हणूनच ह्या सर्व रिती ,रुढींची माहिती आपल्या पुढील
पिढ्यांना व्हावी त्यांनीही हा वारसा जपावा म्हणून सर्वत्र होणार्या ह्या
आदिशक्तीच्या जागरात आपण सहभागी होवून आपली परंपरांची मुल्ये जपली पाहिजेत .
स्त्रीला सुद्धा देवीचेच
,लाक्ष्मिचेच रूप मानून तिचा सन्मान केला पाहिजे. आपल्या संसाराचा गाडा घराघरातील
गृहलक्ष्मी समर्थपणे चालवत आहे. ह्या सार्या शक्ती , आदिस्वरुपच आहेत आणि
त्यांच्यासमोर आपण नतमस्तक झाले पाहिजे.
येणाऱ्या सर्व पिढ्यांना
आपल्या आईआजीकडून ह्या सर्व सणांचा अनमोल ठेवा ,वारसा सुपूर्द व्हावा आणि
त्यांनीही आपल्या पूर्वजांप्रमाणे आपल्या रूढी परंपरा जपाव्यात ,त्या वृद्धिंगत
व्हाव्यात हीच त्या जगदंबेच्या चरणी प्रार्थना .
आपली संस्कृती, रूढी
ह्यांचा ठेवा जपणे आणि तो पुढील पिढ्यांकडे सुपूर्द करणे हे आपले आद्य कर्तव्य आहे
, प्रत्येक सणात काहीतरी शिकवण आहे. आयुष्य कसे जगायचे ह्याचे गोड गुपित ह्या सर्व
सणात दडलेले आहे. आदिशक्तीचा जागर असाच पुढेही चालत राहावा आणि तुम्हा आम्हा
सर्वाना आई अंबेचा आशीर्वाद लाभावा हीच प्रार्थना .
अस्मिता
लेख आवडल्यास अभिप्राय
द्यायला विसरू नका.
antarnad18@gmail.com
भोंडल्याची गाणी (
संग्रहित )
१.
ऐलमा पैलमा
गणेश देवा, माझा खेळ मांडून दे, करीन
तुझी सेवा
माझा खेळ मांडिला वेशीच्या दारी, पारवं घुमतय
पारावरी
मांडला ग
मांडला वेशीच्या दारी,
पारवळ घुमतं
बुरजावरी
गुंजावनी
डोळ्यांच्या साजीव टिक्का,
आमच्या
गावच्या भुलोजी नायका
एवीन गाव
तेवीन गाव,
कांडा
तिळूबाई तांदूळ घ्या
आमच्या आया
तुमच्या आया,
खातील काय
दूधोंडे
दूधोंड्यांची
लागली टाळी,
आयुष्य दे रे
ब्रम्हाळीं
माळी गेला
शेता भाता
पाऊस पडला
येता जाता
पड पड पावसा
थेंबोंथेंबी
थेंबाथेंबी
आळव्या लोंबी
आळव्या या
लोंबती अंगणा
अंगणात होती
सात कणसं
हादग्या तुझी
सोळा वर्ष
2)
श्रीकांता
कमलाकांता असं कसं झालं.
असं कसं वेडं
माझ्या नशिबी आलं
वेडयाच्या बायकोने
केले होते लाडू
तिकडून आला वेडा
त्याने डोकावून पाहिले
चेंडू चेंडू
म्हणून त्याने खेळायला घेतले
वेडयाच्या
बायकोने केला होता चिवडा
तिकडून आला वेडा
त्याने डोकावून पाहिले
केरकचरा म्हणून
त्याने बाहेर फेकला
वेडयाच्या
बायकोने केल्या होत्या करंज्या
तिकडून आला वेडा
त्याने डोकावून पाहिले
होडया होडया
म्हणून त्याने पाण्यात सोडल्या
वेडयाच्या
बायकोने केल्या होत्या चकल्या
तिकडून आला वेडा
त्याने डोकावून पाहिले
बांगडया बांगडया
म्हणून त्याने हातात घातल्या
वेडयाच्या
बायकोने केले होते श्रीखंड
तिकडून आला वेडा
त्याने डोकावून पाहिले
क्रीम क्रीम
म्हणून त्याने तोंडाला फासले
वेडयाच्या
बायकोने केल्या होत्या शेवया
तिकडून आला वेडा
त्याने डोकावून पाहिले
गांडूळ गांडूळ
म्हणून त्याने फेकून दिल्या.
वेडयाची बायको
झोपली होती
तिकडून आला वेडा
त्याने डोकावून पाहिले
मेली मेली
म्हणून त्याने जाळून टाकले
*************************
3)
नणंदा भावजया
दोघी जणी
घरात नव्हतं
तिसरं कोणी
शिंक्यावरचं
लोणी खाल्लं कोणी
मी नाही खाल्लं
वहिनीनी खाल्लं
आता माझा दादा
येईल गं
दादाच्या
मांडावर बसेन गं
दादा तुझी बायको
चोरटी
असेल माझी गोरटी
घे काठी घाल
पाठी
घराघराची लक्ष्मी
मोठी
४)
कृष्णा घालितो
लोळण,
आली यशोदा धावून
काय रे मागतोस
बाळा तुला देते मी आणून
आई मला चंद्र दे
आणून,
त्याचा चेंडू दे
करून
असलं रे कसलं
मागणं तुझं जगाच्या वेगळं
कृष्णा घालितो
लोळण,
आली यशोदा धावून
आई मला विंचू दे
आणून त्याची अंगठी दे करून
असलं रे कसलं
मागणं तुझं जगाच्या वेगळं
कृष्णा घालितो
लोळण,
आली यशोदा धावून
आई मला साप दे
आणून त्याचा चाबूक दे करून
असलं रे कसलं
मागणं तुझं जगाच्या वेगळं
कृष्णा घालितो
लोळण,
आली यशोदा धावून.
5)
एक लिंबू झेलू
बाई दोन लिंबं झेलू
दोन लिंबं झेलू
बाई तीन लिंबं झेलू
तीन लिंबं झेलू
बाई चार लिंबं झेलू
चार लिंबं झेलू
बाई पाच लिंबं झेलू
पाचा लिंबांचा
पाणोठा
माळ घाली
हनुमंताला
हनुमंताची निळी
घोडी
येता जाता कमळं
तोडी
कमळाच्या
पाठीमागे लपली राणी
अगं अगं राणी
इथे कुठे पाणी
पाणी नव्हे
यमुना जमुना
यमुना जमुनाची
बारिक वाळू
तेथे खेळे
चिल्लारी बाळू
चिल्लारी बाळाला
भूक लागली
सोन्याच्या
शिंपीने दूध पाजले
पाटावरच्या
गादीवर निजविले
निज रे निज रे
चिल्लारी बाळा
मी तर जाते
सोनार वाडा
सोनार दादा
सोनार दादा
गौरीचे मोती
झाले की नाही
गौरीच्या घरी
तांब्याच्या चुली
भोजन घातले
आवळीखाली
उष्टया पत्रावळी
चिंचेखाली
पान सुपारी
उद्या दुपारी
6)
अक्कण माती
चिक्कण माती ,
खळगा जो खणावा
अस्सा खळगा
सुरेख बाई, जातं ते रोवावं
अस्सं जातं
सुरेख बाई,
रवा-पिठी काढावी
अश्शी रवा-पिठी
सुरेख बाई करंज्या कराव्या
अशा करंज्या
सुरेख बाई तबकी भराव्या
अस्सं तबक सुरेख
बाई शेल्याने झाकावं
अस्सा शेला
सुरेख बाई पालखीत ठेवावा
अशी पालखी सुरेख
बाई माहेरी धाडावी
अस्सं माहेर
सुरेख बाई खायला मिळतं
अस्सं सासर
द्वाड बाई कोंडोनी मारीतं
अस्सं आजोळ गोड
बाई,
खेळायला मिळतं
7)
अडकित जाऊ
खिडकीत जाउ खिडकीत होता बत्ता
भुलाबाईला लेक
झाला नाव ठेवा दत्ता ॥१॥
अडकित जाऊ
खिडकीत जाउ खिडकीत होता वाटी
भुलोजीला लेक
झाली नाव ठेवा चाटी ॥२॥
अडकित जाऊ
खिडकीत जाउ खिडकीत होती भाकर
भुलाबाईला लेक
झाला नाव ठेवा प्रभाकर ॥३॥
अडकित जाऊ
खिडकीत जाउ खिडकीत होता चेंडू
भुलोजीला लेक
झाला नाव ठेवा बंडू
॥४॥
अडकित जाऊ
खिडकीत जाउ खिडकीत होता चष्मा
भुलाबाईला लेक
झाली नाव ठेवा सुषमा / रेश्मा ॥५॥
अडकित जाऊ
खिडकीत जाउ खिडकीत होता रुपया बंधा
भुलोजीला लेक
झाली नाव ठेवा चंदा
॥६॥
अडकीत जाऊ
खिडकीत जाऊ खिडकीत ठेवला अडकित्ता
भुलाबाईला मुलगी
झाली,
नाव ठेवलं
स्मिता ॥७॥
अडकित जाऊ
खिडकीत जाउ खिडकीत होता पाटा
भुलोजीला लेक
झाला साखर खडी वाटा,
बाणा बाई बाणा, स्वदेशी बाणा, गाणे संपले खीरापत आणा ॥५
८)
कारल्याचा वेल
लाव गं सुने ,लाव गं सुने
मग जा आपुल्या
माहेरा माहेरा
कार्ल्याचा वेल
लावला हो सासुबाई लावला हो सासुबाई
आता तरी जाऊ का
माहेरा माहेरा ॥१॥
कार्ल्याचा वेल
वाढू दे ग सुने वाढू दे ग सुने
मग जा तू
आपुल्या माहेरा माहेरा
कार्ल्याचा वेल
वाढला हो सासुबाई वाढला हो सासुबाई
आता तरी जाऊ का
मी माहेरा माहेरा ॥२॥
कार्ल्याला फूल
येउ दे गं सुने येउ दे गं सुने
मग जा आपुल्या
माहेरा माहेरा
कार्ल्याला फूल
आलं हो सासुबाई आलं हो सासुबाई
आता तरी जाऊ का
माहेरा माहेरा ॥३॥
कार्ल्याला फळ
येऊ दे गं सुने येउ दे गं सुने
मग जा आपुल्या
माहेरा माहेरा
कार्ल्याला फळ
आलं हो सासुबाई आलं हो सासुबाई
आता तरी जाऊ का
माहेरा माहेरा ॥४॥
कार्ल्याची भाजी
कर गं सुने कर गं सुने
मग जा आपुल्या
माहेरा माहेरा
कार्ल्याची भाजी
केली हो सासुबाई केली हो सासुबाई
आता तरी जाऊ का
माहेरा माहेरा ॥५॥
कार्ल्याची भाजी
खा गं सुने खा गं सुने
मग जा आपुल्या
माहेरा माहेरा
कार्ल्याची भाजी
खाल्ली हो सासुबाई खाल्ली हो सासुबाई
आता तरी जाऊ का
माहेरा माहेरा ॥६॥
आपलं उष्टं काढ
ग सुने काढ ग सुने
मग जा तू आपल्या
माहेरा माहेरा
माझं उष्टं
काढलं हो सासुबाई काढलं हो सासुबाई
आता तरी जाऊ का
मी माहेरा माहेरा
आणा फणी घाला
वेणी जाऊ द्या राणी माहेरा माहेरा
आणली फणी घातली
वेणी गेली राणी माहेरा माहेरा ॥७॥
9)
आज कोण वार बाई
। आज कोण वार?
आज आहे सोमवार ।
शंकराला नमस्कार ।
आज कोण वार बाई
। आज कोण वार?
आज आहे मंगळवार
। देवीला नमस्कार ।
आज कोण वार बाई
। आज कोण वार?
आज आहे बुधवार ।
बृहस्पतीला नमस्कार ।
आज कोण वार बाई
। आज कोण वार?
आज आहे गुरुवार
। दत्ताला नमस्कार।
आज कोण वार बाई
। आज कोण वार?
आज आहे शुक्रवार
। अंबाबाईला नमस्कार ।
आज कोण वार बाई
। आज कोण वार?
आज आहे शनिवार ।
शनिला नमस्कार ।
आज कोण वार बाई
। आज कोण वार ?
आज आहे रविवार ।
सुर्याला नमस्कार ।
१०)
कारल्याचा वेल ,त्याची पाने गोल गोल
तुला न्यायाला
कोण कोण आलं.
अरडी गं बाई परडी, परडी एवढं काय गं
परडी एवढं फूल
गं,
दारी मूल कोण गं?
दारी मूल सासरा
सासर्याने काय
आणलं ग बाई ?
सासर्यानं
आणल्या पाटल्या
पाटल्या मी घेत
नाही,
सांगा मी येत
नाही,
चारी दरवाजे
लावा ग बाई,
झिप्रं कुत्र
सोडा ग बाई ॥१॥
अरडी गं बाई
परडी,
परडी एवढं काय
गं
परडी एवढं फूल
गं,
दारी मूल कोण गं?
दारी मूल सासू
सासूने काय
आणलंय गं?
सासुने आणले गोट
गोट मी घेत नाही, सांगा मी येत नाही,
चारी दरवाजे
लावा ग बाई,
झिप्रं कुत्र
सोडा ग बाई ॥२॥
अरडी गं बाई
परडी,
परडी एवढं काय
गं
परडी एवढं फूल
गं,
दारी मूल कोण गं?
दारी मूल दीर
दीरानं काय आणलं
ग बाई ?
दीरानं आणल्या
बांगड्या
बांगड्या मी घेत
नाही,
सांगा मी येत
नाही,
चारी दरवाजे
लावा ग बाई,
झिप्रं कुत्र
सोडा ग बाई ॥३॥
अरडी गं बाई
परडी,
परडी एवढं काय
गं
परडी एवढं फूल
गं,
दारी मूल कोण गं?
दारी मूल जाऊबाई
जावेनं काय आणलं
ग बाई ?
जावेनं आणली नथ
नथ मी घेत नाहीं, सांगा मी येत नाही,
चारी दरवाजे
लावा ग बाई,
झिप्रं कुत्र
सोडा ग बाई ॥४॥
अरडी गं बाई
परडी,
परडी एवढं काय
गं
परडी एवढं फूल
गं,
दारी मूल कोण गं?
दारी मूल नणंद
नणदेने काय
आणलंय गं?
नणदेने आणल्या
तोरड्या
तोरड्या मी घेत
नाही,
सांगा मी येत
नाही
चारी दरवाजे
लावा गं बाई,
झिप्रं कुत्र
सोडा ग बाई ॥५॥
अरडी गं बाई
परडी,
परडी एवढं काय
गं
परडी एवढं फूल
गं,
दारी मूल कोण गं?
दारी मूल नवरा
नवर्याने काय
आणलंय गं?
नवर्याने आणलं
मंगळसूत्र
मंगळसूत्र मी
घेते,
सांगा मी येते
चारी दरवाजे
उघडा गं बाई,
उघडा गं बाई
झिपर्या
कुत्र्याला बांधा गं बाई,
बांधा गं बाई
॥६॥
११)
सासरच्या वाटे
कुचूकुचू काटे
माहेरच्या वाटे
नारळ फुटे
कोण कोण पाहुणा
आला गं बाई
सासरा पाहुणा
आला गं बाई
सासऱ्याने काय
काय आणले गं बाई
सासऱ्यानी
आणल्या पाटल्या गं बाई
पाटल्या मी घेत
नाही
सांगा मी येत
नाही
चारी दारं लावा
गं बाई
झिपरं कुत्रं
सोडा गं बाई
सासरच्या वाटे
कुचूकुचू काटे
माहेरच्या वाटे
नारळ फुटे ...
कोण कोण पाहुणा
आला गं बाई
नणंद पाहुणी आला
गं बाई
नणंदेने काय काय
आणले गं बाई
नणंदेने आणला
पोहेहार गं बाई
पोहेहार मी घेत
नाही
सांगा मी येत
नाही
चारी दारं लावा
गं बाई
झिपरं कुत्रं
सोडा गं बाई
सासरच्या वाटे
कुचूकुचू काटे
माहेरच्या वाटे
नारळ फुटे ...
कोण कोण पाहुणा
आला गं बाई
दीर पाहुणा आला
गं बाई
दिराने काय काय
आणले गं बाई
दिराने आणले गोठ
गं बाई
गोठ मी घेत नाही
सांगा मी येत
नाही
चारी दारं लावा
गं बाई
झिपरं कुत्रं
सोडा गं बाई
सासरच्या वाटे
कुचूकुचू काटे
माहेरच्या वाटे
नारळ फुटे
कोण कोण पाहुणा
आला गं बाई
सासू पाहुणी आला
गं बाई
सासूने काय काय
आणले गं बाई
सासूने आणला राणीहार
गं बाई
राणीहार मी घेत
नाही
सांगा मी येत
नाही
चारी दारं लावा
गं बाई
झिपरं कुत्रं
सोडा गं बाई
सासरच्या वाटे
कुचूकुचू काटे
माहेरच्या वाटे
नारळ फुटे ...
कोण कोण पाहुणा
आला गं बाई
नवरा पाहुणा आला
गं बाई
नवऱ्याने काय
काय आणले गं बाई
नवऱ्याने मंगळसूत्र आणले गं बाई
मंगळसूत्र मी
घेते
सांगा मी येते
चारी दारं उघडा
गं बाई
झिपरं कुत्रं
आवरा गं बाई
12)
हस्त हा जीवनाचा
राजा
पावतो जनांचिया
काजा
तयासी नमस्कार
माझा ।।
दहा मधले आठ
गेले
हस्ताची ही पाळी
आली
म्हणोनी त्याने गंमत
केली ।।
ज्याच्या योगे
झाला चिखल
त्याही चिखलात
लावल्या केळी ।।
एकेक केळ मोठालं
भोंडल्या देवा
वाहिलं
*************************
१३)
माझ्या
सुंद्रीचं लगीन
वराडी कोण कोण
येणार,
माझ्या
सुंद्रीचं लगीन
भाऊ म्हणे मी
भाऊ,
आणीन नवरा पाहून
माझ्या
सुंद्रीचं लगीन
बहिण म्हणे मी
बहीण,
करवली मी होईन
माझ्या
सुंद्रीचं लगीन
बाप म्हणे मी
बाप,
खर्चीन हुंडा
लाख
माझ्या
सुंद्रीचं लगीन
आई म्हणे मी आई, करीन लग्नात घाई
माझ्या
सुंद्रीचं लगीन
चुलता म्हणे मी
चुलता,
येईन जेवणापुरता
माझ्या
सुंद्रीचं लगीन
चुलती म्हणे मी
चुलती,
येईन वरातीपुरती
माझ्या
सुंद्रीचं लगीन
मावसा म्हणे मी
मावसा,
बसेन
दागिन्यासरसा
माझ्या
सुंद्रीचं लगीन
मावशी म्हणे मी
मावशी,
फराळाचे
माझ्यापाशी
माझ्या
सुंद्रीचं लगीन
मामा म्हणे मी
मामा,
येईन सर्व कामा
माझ्या
सुंद्रीचं लगीन
भट म्हणे मी भट, धरीन अंतरपाट
माझ्या
सुंद्रीचं लगीन
भटीण म्हणे मी
भटीण,
सगळ्याच पोळ्या
लाटीन
माझ्या
सुंद्रीचं लगीन
१४)
सासरच्या जाच
सांगणाऱ्या ह्या मुली सासरची बढाई सुद्धा तेवढीच रंगवून सांगायच्या.
भुलाबाई भुलाबाई
सासरे कसे गं सासरे कसे?
कचेरीत बसले हे
वकील जसे गं वकील जसे ॥१॥
भुलाबाई भुलाबाई
सासू कशा गं सासू कशा?
कपाळभर कुंकू
पाटलीन जशा गं पाटलीन जशा ॥२॥
भुलाबाई भुलाबाई
पुतणे कसे गं पुतणे कसे?
हातामध्ये घडी
मास्तर जसे गं मास्तर जसे ॥३॥
भुलाबाई भुलाबाई
जाऊ कशी गं जाऊ कशी?
हातामध्ये लाटणं
स्वयंपाकीण जशी गं स्वयंपाकीण जशी ॥४॥
भुलाबाई भुलाबाई
दीर कसे गं दीर कसे?
डोळ्यावर गॉगल
डॉक्टर जसे गं डॉक्टर जसे ॥५॥
भुलाबाई भुलाबाई
नणंद कशी गं नणंद कशी?
हातामध्ये घडी
मास्तरीन जशी गं मास्तरीन जशी ॥६॥
भुलाबाई भुलाबाई
पती कसे गं पती कसे?
जटातून गंगा
वाहे शंकरजी जसे गं शंकरजी जसे ॥७॥
भुलाबाई भुलाबाई
आपण कशा गं आपण कशा?
शंकराच्या
मांडीवर पार्वती जशा गं पार्वती जशा ॥८॥
भुलाबाई भुलाबाई
मुल कसे गं मुल कसे?
वाकड्या सोंडाचे
गणपती जसे गं गणपती जसे ॥९॥
१५)
माहेरचा बडेजाव
सांगणाऱ्या स्त्रीला मुद्दाम हिणवणारे हे गाणे :-
'तुझ्या ग माहेरच्यांनी काय काय दिलं ?'
'माझ्या ग माहेरच्यांनी दिल्या मला साखळ्या ।'
'असल्या कसल्या साखळ्या बाई फुलाच्या पाकळ्या
॥'
'तुझ्या ग माहेरच्यांनी काय काय दिलं ?'
'माझ्या ग माहेरच्यांनी दिल्या मला पाटल्या ।'
'असल्या कसल्या पाटल्या बाई हाताल्या दाटल्या
॥'
'तुझ्या ग माहेरच्यांनी काय काय दिलं ?'
'माझ्या ग माहेरच्यांनी दिले मला गोट ।'
'असले कसले गोट बाई हत्तीचे रोट॥'
'तुझ्या ग माहेरच्यांनी काय काय दिलं ?'
'माझ्या ग माहेरच्यांनी दिली मला बिंदी ।'
'असली कसली बिंदी बाई कपाळाला चिंधी ॥'
'तुझ्या ग माहेरच्यांनी काय काय दिलं ?'
'माझा ग माहेरच्यांनी दिला मला हत्ती ।'
'असला कसला हत्ती बाई उधळतो माती ॥'
'तुझ्या ग माहेरच्यांनी काय काय दिलं ?
'माझ्या ग माहेरच्यांनी दिला मला गडी ।'
'असला कसला गडी बाई, मिजास बडी ॥'
'तुझ्या ग माहेरच्यांनी काय काय दिलं ?'
'माझ्या ग माहेरच्यांनी दिली मला बाई ।'
असली कसली बाई
तिला रीतच न्हाई
16)
आड बाई आडोणी,
आडाचं पाणी
काढोणी।
आडात पडली
सुपारी,
आमचा भोंडला
दुपारी ।।
आड बाई आडोणी
आडाचं पाणी
काढोणी।
आडात पडली
मासोळी
आमचा भोंडला
संध्याकाळी ।।
आड बाई आडोणी
आडाचं पाणी
काढोणी।
आडात पडली
कात्री
आमचा भोंडला
रात्री ।।
आड बाई आडोणी
आडाचं पाणी
काढोणी।
आडात पडला
शिंपला
आमचा भोंडला
संपला