Wednesday, 21 October 2020

अनोख्या क्षेत्रातील उत्तुंग झेप

|| श्री स्वामी समर्थ ||

Costume Designer  Geeta Godbole


आजच्या तांत्रिक , आधुनिक जगात शिक्षणाची अनेक दालने खुली झाली आहेत. आपल्या आवडीच्या कलाक्षेत्रातही आपल्याला प्राविण्य मिळवण्याची आणि आपली कला जोपासण्याची संधी ह्यामुळे मिळत आहे. शिक्षणाची बैठक भक्कम असेल तर मग अर्थार्जनाची उत्तम संधी मिळून आयुष्य सुकर जाते. पण एखादे वेगळे क्षेत्र निवडून ,त्यात स्वतःला झोकून देवून इतरांना आपल्या कामाची दखल घेण्यास भाग पाडणे हे खचितच सोपे नाही. भरीस भर म्हणून एखादे Creative क्षेत्र निवडून त्यात आपले वेगळेपण सिद्ध करणे हे एक आव्हानच ठरू शकेल.

Makeup Artist आणि Costume Designer म्हणून चित्रपट सृष्टी , दूरचित्रवाणी आणि जाहिरात अश्या विविध क्षेत्रात गेले 22 पेक्षा अधिक वर्ष आपल्या बुद्धिमत्तेचा ,कलेचा अविष्कार करून आपले स्वतःचे अस्तित्व सिद्ध करणारी, अत्यंत लाघवी आणि प्रेमळ मैत्रिणीची म्हणजेच गीता गोडबोले हिच्याशी आज हितगुज करुया.

SNDT Home Science मधून B.Sc. झालेल्या गीताने Shaman Beauty College,Mumbai मधून makeup ई. विषयांचा वर्षाचा अभ्यासक्रम पूर्ण केला. कालांतराने हे कॉलेज पुण्याला शिफ्ट झाले आणि गीता इथे पूर्णवेळ काम करू लागली. ह्यातच पुढे तिथे पार्लर सुरु झाले तेही ती सांभाळत असल्याने तिथूनच अनुभवाची खरी सुरवात झाली. प्रत्येक स्त्रीमध्ये काहीतरी वेगळे काम करण्याची इच्छा असते पण संसारात ती एकदा गुरफटली कि मुले हेच तिचे विश्व होवून जाते. गीताचे एकत्र कुटुंब होते आणि सुहृद आणि मृण्मयी हि  दोन्ही मुले लहान होती , त्यांचे शालेय शिक्षण चालू असल्याने म्हणावा तितका वेळ तिला ह्यात देणे मनात असूनही शक्य झाले नाही .त्याकाळात कुटुंब आणि मुले ह्यात ती रमली होती. मुलांना ज्यावेळी माझी गरज होती त्यावेळी मी त्यांना भरपूर वेळ दिला आणि त्यांच्यासोबत होते ह्याचा तिला मनस्वी आनंद आहे कारण हे मुलांचे लहानपण परत येत नाहीत. मुले लहान असताना पूर्णवेळ एक गृहिणी म्हणून जगताना खरच मी प्रत्येक क्षण आनंदात घालवला.त्यामुळे आज पूर्णवेळ बाहेर काम करताना आपण मुलांसोबत त्यांना हवे होतो तेव्हा नव्हतो हि रुखरुख मनात नाही .

आजकालच्या मुलींचे अमुक एक विषयात करिअर करायचे असे ठरलेले असते, तसे माझे काहीच ठरले नव्हते .पण हे क्षेत्र मला खूप आकर्षित करत होते हे सांगताना गीता म्हणाली कि ह्या क्षेत्र त्यावेळी खूप मोठेही असे नव्हते. मुले मोठी झाल्यावर मग ह्या क्षेत्रात काम करायचे ठरले आणि सुरवातीला विक्रम गायकवाड ह्यांच्याकडे कामाचे पहिले धडे गिरवले ,ज्यात मिळालेल्या अनुभवाने माझा आत्मविश्वास वाढला.1999 च्या सुमारास टेलिव्हिजन च्या छोट्या पडद्यावर अनेक chanel सुरु झाली .ह्याच सुमारास माझे पती श्री. श्रीरंग गोडबोले ह्यांचेही ह्या क्षेत्रात पदार्पण झाले आणि मुलांचे शालेय शिक्षणहि पूर्णत्वाकडे येत होते. मलाही आता वेळ मिळणार होता . तरअसा हा सर्व योग जुळून आला आणि माझेही ह्या क्षेत्रात पदार्पण झाले. करिअर च्या सुरवातीचा काळ कसा होता हे सांगताना गीता म्हणाली कि माझे पहिले काम म्हणजे केप्र च्या जाहिरातीसाठी मी Costume Design केले तसेच राम गोपाल वर्मा ह्यांच्या “ गायब “ ह्या फिल्म मधील रसिका जोशी हिचा संपूर्ण लुक मी केला होता. पुढे त्यांच्या २-३ फिल्म केल्या. आजवर 40 पेक्षा फिल्म साठी तिने काम केले आहे .


किती मोठा प्रवास असेल नाही हा? श्रीरंग गोडबोले ह्यांच्या IMEPL ह्या कंपनीत तयार होणार्या अनेक जाहिराती ,फिल्म ,सेरीअल ह्या केल्या .गीता स्वतः स्वतंत्र काम करत असल्याने अनेक production Houses सोबतही काम केले .ह्याशिवाय तिने संपूर्णपणे “Art Department ” ची जबाबदारी सांभाळली आहे तसेच गोदरेज ह्या कंपनीच्या १० पेक्षा अधिक जाहिरातीही यशस्वीपणे केल्या आहेत. आपल्या आवडत्या क्षेत्रात काम करतानाच आनंद मी आज २२ वर्ष अनुभवते आहे हे गीताने नमूद केले.

खर पाहता सुरवातीला मी Makeup Artist म्हणूनच काम करत होते. कामाचे स्वरूप उलगडून सांगताना गीता म्हणाली कि अग आपल्याला जेव्हा स्क्रिप्ट वाचायला मिळते आणि डोळ्यासमोर जेव्हा एखादे पात्र किंवा Character उभे राहते त्यावेळी ते कसे उभे असायला हवे ह्याची आखणी मनात तयार होते . मग अश्यावेळी त्याची केशरचना एकाने ,Makeup  दुसर्याने आणि Costumes अजून तिसर्यानेच केले तर त्या कामाला पूर्णतः न्याय मिळत नाही आणि कुणीच त्या कामाचा संपूर्ण आनंद घेवू शकत नाही. कारण प्रत्येकाची कल्पना, विचार वेगळे असतात ,म्हणून हि तिन्ही कामे एकाच माणसाने करावीत ह्या निष्कर्षाला मी पोचले आणि त्यानुसार एकत्रितपणे काम करू लागले. Character Design करणे हे नक्कीच एक आव्हान आहे कारण इथे तुमच्या कलात्मकतेचा कस लागतो .

आपल्याला त्या Character शी एकरूप व्हावे लागते ,ते समजून घ्यावे लागते आणि आपणच ते करत आहोत हा फील असावा लागतो तरच ते प्रेक्षकांच्या पसंतीला उतरते. गेली २२ वर्षे Makeup, Costume ,Hair, Accessories सर्वच एकत्रितपणे गीता करत आहे. आपल्या ह्या प्रवासाबद्दल त्यातील आठवणी सांगताना त्यात किती चढ उतार आले असतील ह्याचा अंदाज आपण करू शकतो.

आपल्या करिअर बद्दल ती खूप समाधानी आहे. आपल्या कामाबद्दल ती सांगत होती. मी स्वतःला परिपूर्ण समजतच नाही ,मी अजूनही शिकतच आहे आणि शिकतच राहणार कारण प्रत्येक काम काहीतरी नवीन आव्हान घेवून येते . प्रत्येक Character अभ्यासावे लागते . मला जर कपड्यात लेदर चा वापर करायचा आहे तर त्याचा मुळापासून अभ्यास करावा लागतो , रंगसंगती साजेशी कशी होईल हेही पाहावे लागते. प्रत्येक वेळी कपडे छानच असतील असे नाही एखाद्यावेळी अगदी भिकार्याचे Character असेल तर अगदी फाटक्या कपड्यात आणि त्या Makeup मध्ये तो खरा भिकारी दिसला आणि प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला तर त्या Chatacter ला आपण 100% न्याय दिला असे समजायला हरकत नाही .


 आजच्या पिढीतील मुलांना ह्या क्षेत्राबद्दल काय सांगशील ? ह्या क्षेत्राकडे करिअर म्हणून पाहावे का? ह्या माझ्या प्रश्नांना उत्तर देताना गीता म्हणाली , का नाही ?नक्कीच यावे. पण हे क्षेत्र नुसतेच Glamorous आहे म्हणून येवू नये. इथे अभ्यास आहे आणि अपार कष्ट आहेत .त्याशिवाय इथे उभे राहता येणारच नाही. इथे कसलेही shortcut नाहीत आणि Overnight Success सुद्धा नाही . ह्यांची कष्ट करण्याची तयारी आहे, कामात विविधता आणण्याचे कौशल्य आहे आणि सर्वात मुख्य म्हणजे संयम आहे त्यांना ह्या क्षेत्रात पदार्पण करायला काहीच हरकत नाही . आज इथे खूप काम आहे अगदी रोज नवीन प्रोजेक्ट  येत आहेत त्यामळे इथे काम करण्याराला खूप आव्हानेही आहेत.

 ह्या क्षेत्रात चांगले अर्थार्जनही असल्याने घेतलेल्या कष्टांचा आर्थिक दृष्टीनेही चीज होतेच. Costume आणि Fashion Design मध्ये खूप फरक आहे हे सांगताना गीता म्हणाली ह्या दोन क्षेत्रात बर्याचदा गल्लत होते. Fashion Design मध्ये एकदाच Prsesentation असते पण Costume Design करताना Character शी आपण किती एकरूप होतो हे महत्वाचे ठरते ,नुसती स्क्रिप्ट वाचून ते सध्या होत नाही तर त्या Character चा फील घ्यायला लागतो तरच ते प्रत्यक्षात पडद्यावर येते तेव्हा प्रेक्षकांची वाहवा मिळवते .गीताकडे सहकारी म्हणून येणाऱ्या मुलीना गीता तेच सांगते ,कि अभ्यास करून या कारण नुसते स्केच काढले आणि मग तो Costume तयार झाला ह्या संभ्रमात राहू नका . ते Character जगायला शिका. गीता आपल्या कामाबद्दल भरभरून बोलत होती आणि तिच्यासोबत ह्या क्षेत्रातील नाविन्य मीही अनुभवत होते. 

गीता आपले अनुभव सांगताना म्हणाली अग आज २२ वर्षाच्या करिअर नंतर सुद्धा आज नवीन प्रोजेक्ट करताना अभ्यास करायला लागतो , उत्तम लिहिलेल्या स्क्रिप्ट ला costume,makeup,hair ह्या सर्वांची तशीच उत्तम साथ मिळाली तर ते Character चपलख बसते आणि अजरामर होते.  इथे प्रत्येक क्षणाला आव्हान आहे. मला आजही स्वतःला इथे परिपूर्ण आहे असे वाटत नाही ,अजूनही मला खूप शिकायाचे आहे आणि त्यासाठी लागणारा संयम मी ठेवलेला आहे. 


आपण कुठल्याही क्षेत्रात काम करताना स्वतःला सर्वज्ञ समजलो तर आपल्या शिक्षणाला पूर्णविराम मिळेल. आज जग झपाट्याने बदलत आहे आणि त्यामुळे ह्या क्षेत्रातही रोज नवीन काहीतरी घडताना दिसते. Producer, Director ह्यांच्या दृष्टीकोनातून ते Character कसे असायला हवे हे समजणे हे आपले खरे यश आहे. ह्या क्षेत्रातील स्पर्धा इतकी मोठी आहे कि आपल्याला इथे पाय रोवून उभे राहायचे असेल तर सर्वप्रथम  संयम , शिकण्याची जिद्द , उमेद ,आत्मविश्वास आणि डोळसपणे आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टीतून शिकत राहणे हे हवेच. परिश्रमाला कुठलाही पर्याय नाही ,आजही एखाद्या नवीन प्रोजेक्ट मध्ये असणारे काम नवीन असेल तर मलाही तिथे अगदी गमभन पासून सुरवात करून अभ्यास करायला लागतोच .मी परिपूर्ण आहे हे मी इतक्या वर्षांच्या अनुभवानंतर सुद्धा म्हणण्याचे धाडस करणार नाही कारण अजूनहि रोज मी शिकतच आहे.

ह्या क्षेत्रात कुठलेही भांडवल असे लागत नाही पण तुमची कष्ट करण्याची तयारी , ज्ञान ,जिद्द  शिकण्याची तयारी हेच तुमचे भांडवल असते.Costumes Design करण्याचे पैसे , makeup चे साहित्य हे सर्व Production House देते आणि तुमचे Charges सुद्धा दिले जातात.
ह्या क्षेत्रात पदार्पण करणाऱ्या सर्वाना मी एकच सांगीन कि इथे खूप काम आहे , पण “ पी हळद हो गोरी ” इतके सहज इथे काहीच नाही हे मनात पक्के करूनच या.

तु तुझ्या करिअर कडे त्रयस्थाच्या चष्म्यातून कशी पाहशील ,ह्यावर गीता म्हणाली अग आज मागे वळून पाहताना असे वाटते कि २२ वर्षापूर्वी मी केलेला एखादा प्रोजेक्ट मी अजून चांगला करू शकले असते, हे राहून केले ,ते अजून वेगळे करता आले असते असे मनात येते . त्या त्या वेळच्या त्या गोष्टी असतात ,त्यामुळे आता जे आहे ते अधिकाधिक सुंदर करण्याच्या प्रयत्नात आहे .तेव्हा मी केलेलं काम तेव्हा छानच होते आणि आज करत असलेलेही. माझे घर , कुटुंब, मुले ह्या सर्व जबाबदार्या नीट पार पाडल्याचे मी आज पूर्ण समाधान आहे. आज माझ्या संपूर्ण कुटुंबाला माझ्या कामाचा अभिमान आहे आणि ते सर्व माझ्यामागे खंबीर उभेही आहेत .


अजून मला खूप काम करायचे आहे ,शिकायचे आहे . गीताला स्टेट अवार्ड , झी अवार्ड अश्या  कित्येक अवार्डनी सम्मानित करण्यात आले आणि तिच्या कामाचे कौतुकही खूप झाले. एखादा कुठला क्षण जो मनाला स्पर्शून गेला ,अविस्मरणीय आनंद आणि कामाची पावती देवून केला का ह्यावर तिने एक किस्सा सांगितला. “चिंटू “ ह्या चित्रपटासाठी काम करताना सतीश आळेकर ह्यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव आला. त्यांनी मला काम करताना समोरासमोर प्रथमच पहिले होते. शुटींग च्या दरम्यान त्यांनी मला जवळ बोलवून सांगितले, “गीता ,तु आणि श्रीरंग उत्तम काम करत आहात आणि मला तुमच्या कामाचा अभिमान आहे. तुम्हाला मी तुमच्या लग्नाआधीपासून पाहत आहे आणि तुम्ही पुढेही खूप यश मिळवाल ह्याची मला पूर्ण खात्री आहे . आज तुम्हाला एकत्र काम करताना पाहून आनंद होतोय .”..हे त्यांचे शब्द माझ्यासाठी कित्येक अवार्ड पेक्षाही जास्ती आहेत . त्याक्षणी मला काय वाटले असेल हे व्यक्त करायला माझे शब्दभांडार खूप लहान आहे .

आयुष्यात कष्टाशिवाय काहीच मिळत नाही त्यामुळे कष्टाला पर्याय नाही हेच बाळकडू आम्ही नेहमी आमच्या मुलांना पाजत आलो आहोत. आज आम्हाला २४ तास कष्ट करताना मुले पाहत आहेत आणि त्यांना आमच्या कामाबद्दल आदर तर आहेच पण अभिमानही आहे. 


गीतासोबत गप्पा मारणे हि माझ्यासाठी पर्वणीच होती. आज Costume Design ,MakeUp  ह्या अत्यंत Creative आणि तितक्याच आव्हानात्मक क्षेत्राबद्दल इतकी सखोल माहिती मिळाली आहे कि ती “अंतर्नाद ” च्या वाचकांना नक्कीच प्रेरणा देयील. ज्यांना ह्या क्षेत्राबद्दल कुतूहल आहे आणि अधिक माहिती जाणून घ्यायची आहे त्यांना आज भरभरून ज्ञान मिळाले आहे. एखादे Character उभे राहण्यासाठी जे जे लागते ते सर्व गीता आज २२ वर्ष सातत्याने करत आहे. तीचा हा प्रवास नक्कीच सोपा नाही . त्यात अविश्रांत मेहनत आहे. इतके मोठे यश मिळवून सुद्धा आज गीताचे पाय जमिनीवर आहेत ह्याचा उल्लेख केल्याशिवाय हा लेख पूर्णच होवू शकत नाही . कुठल्याही स्त्रीसाठी गीता एक अनुभवसंपन्न अशी कार्यशाळाच आहे  असे म्हंटले तर वावगे ठरू नये. तिच्याशी इतक्या गप्पा झाल्या पण एक क्षणभरही “ मी पणाचा ” लवलेशही  देहबोलीतून जाणवला नाही. बोलण्यातील विनम्रता ,माधुर्य आणि अत्यंत साधे व्यक्तिमत्व ह्याने ती समोरच्याला क्षणात आपलेसे करते. 



गीताला आज आपल्या मुलांचे बालपण पुन्हा एकदा आपल्या नातवंडात अनुभवतेय. ह्या क्षेत्रात आले नसते तर नक्कीच छान घर ,मुले संसार सांभाळला असता असे ती हसून म्हणाली. गीताला स्वयंपाक करण्याची आवड आहे त्याचसोबत शेती करण्याचीही हौस ती आपल्या फार्महाउस वरती पूर्ण करत आहे. आजही पूर्वीच्याच उत्चाहाने तिला काम करताना पाहून समजते कि ती आपल्या कामात किती एकरूप झाली आहे. इतक्या वर्षाच्या अनुभवानंतरही ती अजून शिकण्याचा ध्यास उराशी बाळगून आहे. ह्याचे करावे तितके कौतुक थोडे आहे . गीताच्या ह्या क्षेत्रातील पुढील प्रवासासाठी आपल्या सर्वांतर्फे मनापासून खूप शुभेछ्या. 







भविष्यात तिला अजूनही उत्तम प्रोजेक्ट वर काम करण्याची संधी मिळो आणि तिच्या प्रत्येक कलाकृतीला खास असा “ गीता टच ” मिळूदे हीच परमेश्वराचरणी प्रार्थना.


अस्मिता


लेख आवडल्यास अभिप्राय द्यायला विसरू नका.


Antarnad18@gmail.com
















No comments:

Post a Comment