|| श्री स्वामी समर्थ ||
डॉ. राजश्री केळकर |
Breast , Oncoplasty Surgery ह्यात २४ वर्षाचा प्रदीर्घ अनुभव
आज आपण तंत्रज्ञानाच्या युगात वावरत आहोत , प्रत्येक क्षेत्रात मानवाने आज आश्चर्यजनक प्रगती केली आहे. येणारा काळ हा कदाचित यंत्र मानवाचा म्हणजेच “ Robotics ” चा असणार आहे. गेल्या काही दशकात वैद्यकीय क्षेत्रसुद्धा प्रगत झाले आहे. तंत्रज्ञानाच्या विकासाचा फायदा अर्थातच सर्वच क्षेत्रांना झालाय तसाच तो वैद्यकीय क्षेत्रालाही नक्कीच झालाय.
पूर्वीच्या काळी डॉक्टर हि संकल्पनाच अस्तित्वात नव्हती. तेव्हा वैद्य असत. झाडपाल्याची औषधे , मुळ्या उगाळून त्याचे चाटण करून देणे ह्यापलीकडे औषध नावालाही माहित नव्हते. पण आज परिस्थिती बदलली आहे. आज अगदी खेडोपाड्यात डॉक्टर आहेत. पूर्वी कधीही बरे न होणार्या आजारांवर आता औषधे उपलब्ध आहेत आणि त्यामुळे मनुष्याचे सरासरी जीवनमान देखील वाढले आहे. पण कितीही झाले तरी आजही काही आजार असे आहेत कि त्याचे नाव ऐकूनच माणसाचे उसने अवसान गळून पडते आणि त्यातील एक आजार म्हणजे “ कॅन्सर ”. आज हा आजार सुद्धा बरा होतो पण तरीही जनमानसात ह्याबाबत भीती आहे. विशेषतः स्त्रियांमध्ये हा आजार होण्याच्या शक्यता अधिक प्रमाणात दिसून येत आहेत . म्हणूनच आज ह्याबाबत अधिक जनजागृती होणे आवश्यक आहे .
अत्यंत कर्तुत्ववान ,डॉक्टर राजश्री केळकर ह्यांचा आणि त्यांच्या वैद्यकीय क्षेत्रातील प्रवासाबद्दल. राजश्री मुळची मुंबईतील. 1992 मध्ये MBBS चे शिक्षण Grand Medical College मधून पूर्ण केल्यानंतर 1996 मध्ये Bombay Hospital मधून Master In General Surgery(MS) पूर्ण केले. MS झाल्यानंतर राजश्री इंग्लंड ला गेली आणि तिथे National Health Service (NHS) मध्ये काम करू लागली. काम करत असताना तिने FRCS पूर्ण केले. हे काम करत असतना तिथे तिला Breast Surgery ह्या विषयात खूप अनुभव मिळाला. 2002 मध्ये भारतात परतल्यावर तिने ह्याच विषयात करिअर करायचे हे मनाशी ठरवले. भारतात परतल्यावर कुठेही पूर्णतः काम करणारे Breast Surgeon नव्हते हि गोष्ट तिच्या लक्ष्यात आली. २० वर्षापूर्वी समाजात Breast Cancer विषयी म्हणावी तितकी जनजागृती नव्हती उलट गैरसमजच आणि भीती होती .
हे सर्व पाहता आपण ह्यात पूर्णवेळ काम करून जनजागृती करावी आणि ह्याच क्षेत्रात कार्यरत राहावे हे ध्येय तिने उराशी बाळगले. आज सैफी आणि शुश्रुषा रुग्णालयात काम करताना तिच्या गाठीला आज अनेक अनुभव आहेत आणि त्यावरच आज मोकळेपणाने चर्चा करायची आहे. राजश्री J. J. Hospital तसेच Grand Medical College अश्या अनेक नावाजलेल्या हॉस्पिटल मध्ये कार्यरत आहे. आज राजश्री General Surgeon म्हणून काम करत असली तरी तिच्याकडे येणारे ९०% हून अधिक पेशंट हे Breast Surgery साठी येत आहेत. इंग्लंड हून परतल्यावर एक गोष्ट प्रामुख्याने जाणवली कि Cancer साठी Breast Surgery झाल्यावर पुन्हा Breast पूर्वीसारखी कशी करता येयील ह्यावर तिथे मोठ्या प्रमाणात संशोधन झाले. तिथे मोठ्या अनेक Surgery झाल्या ज्यात ती अनभिद्न्य होती म्हणून अलीकडच्या काळात तिने Post Graduate Certificate Course In “Breast Oncoplastic ” पूर्ण केला आणि आता ती Breast Oncoplasty म्हणजेच Plastic आणि Cancer Surgery एकत्रितपणे करते, ज्यामध्ये पेशंटचे Breast पुन्हा जितके पाहिल्यासारखे करता येयील तितके करणे हे एक मोठे आव्हानच आहे कारण पूर्वी पेशंट चे Breast संपर्ण काढून टाकले जात असे पण आता नुसतेच ते काढून न टाकता पूर्ववत कसे दिसेल ह्यात तिने प्राविण्य मिळवले आहे. General Surgery मधला गेली २४ वर्षाचा प्रदीर्घ अनुभव असल्याने आता ह्या क्षेत्रात एक Senior Surgeon म्हणून मान्यता पावली आहे . ह्या क्षेत्रात रोज काहीतरी नवीन संशोधन होत आहे त्यामुळे राजश्री ह्यात अधिकाधिक अभ्यास करून प्राविण्य मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे .
आज जगभरात ह्या आजार पसरत आहे आणि त्याची काय कारणे किंवा प्राथमिक लक्षणे आहेत ह्या माझ्या प्रश्नावर राजश्री म्हणाली अग ह्याचे अमुक एक कारण नाही , तर अनेकविध कारणांमुळे हा आजार होवू शकतो. हा आजार मागील पिढीत कुणाला झाला होता का , आपले रोजचे जीवनमान कसे आहे, आपले वजन ,आपल्या सवयी जसे मद्यपान , धुम्रपान करणे ह्या सवयी सुद्धा ह्या आजाराचे कारण ठरू शकतात.
आपण राहत असलेले वातावरण किती प्रमाणात शुद्ध आहे तसेच आपला आहार कसा आहे , आपण किती प्रमाणात जंक (Package)फूड खातो का ह्या सर्व गोष्टी विचारात घेणे आवश्यक आहे. पूर्वी मासिक पाळी वयाच्या १३ ते १५ च्या दरम्यान येत असे पण आजकाल सरासरी मासिक पाळी हि वयाच्या ११ ते १३ ह्या वयातच येत असे निदर्शनास आले आहे. तसेच वयाच्या ५५ वर्षापर्यंत सुद्धा मासिक पाळी जात नाही याचा अर्थ असा आहे कि आपल्या शरीरातील अंडाशयाचे हार्मोन्सचे शरीरात ५ ते ७ वर्ष अधिक expansion झाल्याने Breast Cancer होण्याची प्रक्रिया ,शक्यता वाढते. लवकर पाळी येणे आणि उशिरा जाणे ह्यामुळे सुद्धा Cancer ची शक्यता अधिक वाढते हे लक्ष्यात घेतले पाहिजे.
ह्या आजाराची प्राथमिक लक्षणे सांगताना ती पुढे म्हणाली कि माझ्या इतक्या वर्षाचा अनुभव सांगतो कि स्त्रियांना माहित असते कि आपल्या छातीत गाठ आहे पण एकतर त्या त्याकडे दुर्लक्ष करतात किंवा त्याचा काहीच त्रास होत नाही म्हणून डॉक्टरकडे जायचे टाळतात. पण वेदनारहित छातीत गाठ होणे हीच Cancer ची सुरवात असू शकते . छातीत अनेक गाठी असतात पण प्रत्येक गाठ हि Cancer चीच असेल असे नाही पण योग्य वेळी तपासणी करून आपली शंका दूर करून घेणे अत्यावश्यक आहे. ह्यात काहीच घाबरण्याचे कारण नाही. तेव्हा सर्वात प्रथम लक्षण म्हणजे वेदनारहित गाठ होणे . दुसरे लक्षण म्हणजे स्तनातून रक्तस्त्राव होणे किंवा गुलाबी रंगाचे पाणी येणे . हेसुद्धा महत्वाचे आहे आणि त्यासाठी त्वरित तपासणी करून घेतली पाहिजे.
छातीवरील निप्पल आत खेचले जाणे आणि लाल दिसणे तसेच आपल्या खाकेत गाठ येणे हि Breast Cancer ची लक्षणे असू शकतात .त्यामुळे ह्यातील कुठल्याही प्रकाराकडे दुर्लक्ष करणे, भीतीने लपवून ठेवणे असे न करता योग्य वेळी त्याचे निदान झाले तर उपचार होवू शकतात.
राजश्री ची आपल्या सर्वाना ह्या लेखाच्या माध्यमातून विनंती आहे कि ह्यापैकी कुठ्ल्याही प्रकारे त्रास होत असेल तर लगेचच आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा आणि Breast Surgeon च्या सल्ल्याने टेस्ट करून घ्याव्यात .
हा आजार टाळण्यासाठी आपली जीवनशैली संतुलित ठेवणे आवश्यक आहे , तसेच आपला आहारही अत्यंत सकस आणि हलका , सहज पचेल असा हवा. व्यायामासोबत योगासनेही महत्वाची आहे. सर्वात मुख्य म्हणजे आपण आनंदी राहणे अति आवश्यक आहे. आनंदी राहिल्यामुळे शरीरातील सर्व क्रिया संतुलित राहण्यास मदत होते. पाश्चिमात्य लोकांच्या आहाराची कॉपी करून जंक फूड खाणे हे चुकीचेच ठरेल. आपल्या हवामानाला आणि शरीराला जे पचेल , रुचेल तेच खावे हे तिने आवर्जून सांगितले.
राजश्रीच्या सोबत असलेल्या गप्पातून तिचा अनुभव बोलत होता. अजूनही ह्या आजाराबाबत लोकांच्या मनात भीती आहे त्यासाठी एक डॉक्टर म्हणून काय सांगशील ह्या माझ्या प्रश्नावर ती म्हणाली कि जनमानसात भीती आहे हे निर्विवाद सत्य आहे. ह्या आजारापेक्षा त्याच्या साठी असणार्या उपायांची भीती अधिक आहे. मी ह्यातून वाचणार का कि माझा ह्यातच शेवट होणार हि भीती खोलवर रुजते , त्यात ती स्त्री तरुण असेल तर मग मुलांच्या विचारांनी ती मानसिक दृष्टीने अधिक कोलमडून जाते . अश्या सर्व स्त्रियांसाठी राजश्री म्हणाली कि जर हा आजार जितक्या लवकर अगदी प्राथमिक पायरीवर असताना समजला तर लवकर उपाय करता येतात. अर्थात ऑपरेशन किंवा अन्य बाबी होणार त्यात थोडा त्रास सहन केला तर आपले आयुष्य अगदी पाहिल्यासारखे होते , ह्यात शंकाच नाही. पूर्वीसारखे आयुष्य तुम्ही आनंदाने जगू शकता. कुणाचेही आयुष्य परिपूर्ण नाही, कुणाला मुलांचे प्रश्न तर कुणाला आपल्या जोडीदाराचे , कुणाला घराची चिंता तर कुणाला पैशाची . असे असंख्य प्रश्न असतात ,म्हणून आपण जगणे सोडून देत नाही तर त्यातून मार्ग काढतो आणि पुढे जात राहतो अगदी तसेच ह्याही बाबतीत आपण थोडे धैर्य दाखवले ,मार्ग काढला तर Cancar कडे बघण्याचा आपला दृष्टीकोन बदलू शकतो. पण ह्या सर्वासाठी आजार लवकरात लवकर समजणे आवश्यक असते हे विसरून चालणार नाही . अगदी शेवटच्या क्षणी आपण डॉक्टर कडे गेलो तर आपल्यावर उपचार करण्यासाठी तोही हतबल होईल .
जगभरात ह्या आजाराचे प्रमाण भारताच्या तुलनेने खूप जास्ती आहे हि बाब चांगली असली तरीपण अलीकडच्या काळात भारतात सुद्धा ह्याचे प्रमाण वाढताना दिसत आहे तेही तरुण मुलींमध्ये ह्याचे प्रमाण अधिक आहे. जवळजवळ 30% पेक्षाही केसेस ३५ ते ४५ ह्या वयोगटात पहायला मिळतात .बाहेरच्या देशात हे प्रमाण वयाच्या ५० शी नंतर पाहायला मिळतात. जगभरात साधरण १५ ते २० स्त्रियांमागे एकीला हा आजार होतो तर आपल्याकडे हे प्रमाण 25 ते 30 स्त्रियांमागे एक असे आहे . आपल्याकडे हा आजार जास्ती लवकर पसरतो असेही निदर्शनास आले आहे. 2018 मध्ये GlobeCon केलेल्या निरीक्षणात असे दिसून आले आहे कि जवळजवळ दीड ते २ लाख स्त्रियांना प्रत्येक वर्षी नवीन Cancer होतो आणि हे प्रमाण दिवसागणिक वाढत असल्याने ह्याविषयी अधिकाधिक जनजागृती होणे अत्यावश्यक आहे असे तिने सांगितले. हा आजार २० ते ८० वर्षापर्यंत कुणालाही होवू शकतो त्यामुळे अमुक एका वयातच तो होईल हे सांगणे चुकीचेच ठरेल. कुणालाही कुठल्याही वयात होवू शकतो. ह्यासाठी Breast ची स्वयं चाचणी करून घेतली पाहिजे. प्रत्येक स्त्रीने १८ वर्ष वयापासून पुढे हि चाचणी आपली आपणच केली तर उपयुक्त ठरेल , ह्यात आपल्या Breast ची ठेवण ,आकार हा समजला आणि त्यात कधी थोडा बदल झाला असे निदर्शनास आले तर डॉक्टरांना सुद्धा ह्याबाबत टेस्ट किंवा उपचार करणे अधिक सुलभ जाते.
गर्भारपणात सुद्धा हा आजर होवू शकतो त्यामुळे मुलाला स्तनपान करताना एखादी गाठ लागली तर ती दुधाचीच असेल असे गृहीत न धरता किंवा घाबरून न जाता योग्य ती चाचणी त्वरित करून घेतली पाहिजे. दुधाची गाठ असेल तर त्यावरही उपचार आवश्यक आहेत कारण दुधाच्या गाठीत पस होवून त्याचेही Infection होवू शकते .
ह्या विषयावर राजश्रीने आपल्याकडे आलेली एक केस सांगितली. मुलाला दुध पाजताना एका स्त्रीला छातीत गाठ लागत होती पण तिच्या जवळच्या मंडळींनी ती दुधाची आहे जाईल असे सांगितल्यामुळे तिने त्याबाबत काहीच केले नाही . दीड वर्षानंतर राजश्रीकडे ती आली कारण अजूनही ती गाठ होती आणि आतातर मोठी झाली होती . दुखाची गोष्ट ती Cancer चीच गाठ होती त्यामुळे कुणीही कुठल्याही गोष्टीकडे दुर्लक्ष करू नये हे तिने आवर्जून सांगितले.पुढे तो Cancer वाढला आणि २ वर्षांनी त्यातच तिचा अंत झाला.
बाळंतपणात आपण स्त्रिया इतक्या गुरफटून जातो कि ह्या महत्वाच्या अतिनाजूक गोष्टींना पाहिजे तितके महत्व दिले जात नाही आणि नेमके हेच आपल्याला भोवते . त्यामुळे मुलाचे आरोग्य जितके महत्वाचे त्याही पेक्षा कितीतरी पटीने आपले स्वतःचे आरोग्यही महत्वाचे आहे , ह्याचे भान प्रत्येक स्त्रीने ठेवले पाहिजे.
मद्यपान आणि धुम्रपान म्हणजे Cancer ला आमंत्रणच हे सांगताना राजश्री म्हणाली कि स्त्रियांनी आपल्या सवयी ,आपला आहार आणि आपली so called lifestyle पुनश्च तपासून पहावी.आपल्या क्षणिक सुखाच्या कल्पना वेळीच बदलाव्यात नाहीतर अनर्थ ओढवल्याशिवाय राहणार नाही.आजच्या काळातील मुली धुम्रपान करण्यात मुलांच्याही पुढे गेल्या आहेत हे आजच्या समाजातील ऋण बाजू दर्शवणारे चित्र आहे.
ह्या बाबत समाजजागृती तीव्रपणे झाली पाहिजे कारण ह्याच मुली भावी काळातील माता आहेत.व्यसनाधीन असणारी मुलगी आपले , आपल्या बाळाचे आणि संपूर्ण कुटुंबाचे आरोग्य जपू शकेल का? मुलांवर संस्कार वगैरे खूपच दूरची बाब आहे. आपण पाश्चात्य संस्कृतीचा जरूर पाठपुरावा करावा , त्यांच्यातील खूप चांगल्या गोष्टी घेण्यासारख्या आहेत पण हे सर्व करताना आपली पाळेमुळे आपल्याच संस्कृतीत रुजली आहेत ह्याचा विसर पडू देवू नये. देवाने आपल्याला सुंदर आयुष्य दिले आहे आणि त्याचा उपभोग आपण घेवू शकतो जर आपण निरोगी असू तर आणि तरच.
आनंदी आणि निरोगी आयुष्याची गुरुकिल्ली म्हणजे आपला आहार .भारतीय आहार हा सकस , पौष्टिक आणि संतुलित आहे. आपल्या जेवणातील वरणभात तूप,कडधान्ये ,डाळी, पाले भाज्या आपल्याला संतुलीत आहार देण्यास परिपूर्ण आहेत. प्राथमिक स्टेज मध्ये समजून आलेला Cancer हा ९५% स्त्रियांमध्ये पुढे निरोगी आयुष्य देतो.
Cancer च्या उपचारपद्धतीमध्ये ऑपरेशन एकदा करावे लागते . Surgery, किमोथेरपी, रेडीएशन, हार्मोनल थेरपी अश्या चार उपचारपद्धती कराव्या लागतात. अर्थात cancer कुठल्या स्टेज ला आहे त्यावर हे सर्व अवलंबून असते. कॅन्सरची केली जाणारी कुठलीही उपचार पद्धती थोडी गुंतागुंतीची असते ,खर्चिकही असते त्यामुळे पेशंट थोडे कचरतात आणि ह्या सर्वाचे दडपण सुद्धा घेतात. अर्थात कॅन्सर किती पसरला आहे ह्यावर सर्व अवलंबून असते . म्हणूनच मुळात आजार होवू नये ह्यासाठी प्रयत्नशील राहिले पाहिजे. आपला आहार विहार , नित्याची थोडी उपासना , व्यायाम , योगा, शांत झोप ,आपले छंद , आपला आनंद ह्या सर्वाचा योग्य तो मेळ घातला तर आयुष्य अधिकाधिक सकारात्मक होईल आणि ह्या आजारांची शक्यताच नामशेष होयील हे त्रिवार सत्य आहे. ज्यांच्या कुटुंबात आधी कुणाला हा आजार असेल तर त्यांनी वयाच्या ३५ नंतर नेहमी टेस्ट करून घेतली पाहिजे .सरकारी दवाखान्यात ह्या उपचार पद्धती कमी खर्चात केल्या जातात,त्यामुळे टेस्ट खर्चिक आहेत म्हणून करायच्याच नाहीत असे होवू देवू नये.
राजाश्रीकडून आज खूप आणि बहुमोल मार्गदर्शन मिळाले . वेळीच उपाय केलात तर बरे होण्याची शक्यता खूप जास्ती वाढते. सैफी हॉस्पिटल मध्ये काम करताना राजाश्रीला खूप अनुभव मिळाला.प्रत्येक Cancer मध्ये Breast काढण्याची आज गरज नाही. राजश्रीने “Oncoplasty Surgery ” केलेले कित्येक पेशंट आज बरे झाले आहेत.
मंडळी उमीद पे दुनिया कायम आहे .आजार बारा होण्यासाठी आज विविध उपचारपद्धती निघालेल्या आहेत पण सर्वात प्रथम तो होवू नये ह्यासाठी तितकीच खबरदारी घेणे गरजेचे आहे. आज राजश्रीने ह्या आजाराबद्दल इतके मुळापासून केलेलं मार्गदर्शन तुमच्यापर्यंत ह्या लेखाद्वारे पोहोचवताना मला विशेष आनंद होतो आहे. डॉक्टर छान असला कि आपला आत्मविश्वास सुद्धा वाढतो .
सदैव हसतमुख असलेल्या राजाश्रीशी बोलताना अनेक गोष्टी जाणवल्या. तिच्या चेहऱ्यावरील मोकळे हास्पेय पेशंट ला एका क्षणात विश्वास देवून जाते, तिचा अनुभव तिच्या बोलण्यातून दिसतोच पण कुठल्याही स्टेज ला ती पेशंट ला एकटेपणाची भावना देत नाही. प्रत्येक क्षणी पेशंट सोबत एका मैत्रिणीसारखी राहते ह्यासाठी खरतर तिचे विशेष कौतुक .आपल्याला हा आजार झालाय हे समजताच खचून , अर्धमेल्या झालेल्या पेशंट ना सर्वाधिक गरज असते ती मानसिक आधाराची आणि आत्मविश्वास देण्याची. ह्या दोन गोष्टी राजश्री आपल्या पेशंटना देण्यासाठी विशेष मेहनत घेताना दिसते. डॉक्टर हे देवाचे दुसरे रूप आहे हे म्हणतात ते खोटे नाही. ह्या क्षेत्रात ज्यांच्याकडून तिला अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या त्या सर्वांबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना ती म्हणाली माणसाने सतत अभ्यास करत राहिले पाहिजे ,विद्यार्थीच राहिले पाहिजे . मी सुद्धा माझ्या पेशंटचा हा आजार लवकर कसा बरा होयील , त्यांना कमीतकमी त्रास कसा होईल ह्यासाठी सातत्याने प्रयत्न करत असते आणि करत राहीन.
भल्याभल्यांची झोप उडवणारा कॅन्सर ह्या आजाराबद्दल आपण आज माहिती घेतली . कुठल्याही गोष्टीला घाबरून गेलो तर त्याचे स्वरूप मोठे होते पण निर्भय होवून आत्मविश्वासाने तोंड दिले तर आपण त्याच्याशी नक्कीच चारहात करू शकतो. आपण सकारात्मक दृष्टीकोन ठेवला तर आयुष्श्रीयातील प्नत्येक गोष्टीतून आणि आजारातून बरे होवू शकतो ह्यात शंकाच नाही .
आपल्या व्यस्त दिनक्रमातून इतकी अमूल्य माहिती देण्यासाठी राजश्रीने वेळ दिला ह्याबद्दल मी तिचे आभार मानीन .खर सांगते तिच्याशी ह्या विषयावर नुसते बोलायलासुद्धा माझी गाळण उडाली होती ,ह्यावरून ह्या विषयाची किती भीती जनमानसात आहे ते समजले पण जसजसा संवाद पुढे गेला तश्या गप्पा रंगल्या , इतका मोठा विषय तिने तितकाच सहजतेने मांडला हे तिचे कौशल्य .तिथून निघताना माझ्याही भीती पार निघून केली होती .
डॉक्टर राजश्रीला तिच्या करिअर मधील पुढील प्रवासासाठी मनापासून खूप शुभेछ्या.
Dr Rajashri Kelkar
https://www.facebook.com/Mumbai-Breast-Services-by-Dr-Rajashri-Kelkar-104234501345021
rajashri19@yahoo.co.uk
अस्मिता
Thanks a lot Dr Rajashree .khup sope Karun margadarshan kele.Varsha tuze sudha abhar mantel Karan tuzha mulech sarvana evdhe mahiti sarvana milali.
ReplyDeleteफारच उपयुक्त माहिती
ReplyDeleteVery good information about cancer and also of Dr Rajshree Kelkar. We had very good experince of Dr Rajshree Kelkar 10years back.
ReplyDelete