Tuesday, 30 November 2021

निसर्गकुंडली –अवघे ब्रम्हांड

 || श्री स्वामी समर्थ ||



निसर्ग कुंडली म्हणजेच कालपुरुषाची कुंडली किंवा ज्याला आपण ठोकळा कुंडली म्हणतो. त्यावरून अनेक गोष्टींचा विचार केला जातो. इथे असणारे  १२ भाव आणि त्यातील ग्रह, राशी आणि नक्षत्रे आपल्या गत जन्माशी संधान साधतात . हि कुंडली आपल्या संपूर्ण आयुष्याचा ,कर्माचा लेखाजोखा मांडते. आपला जन्म कुठल्या कुटुंबात झाला , त्यातील गुणदोष , आपल्या जन्माचे रहस्य ,आपली कर्तव्ये, आपली भावंडे ,आप्त स्वकीय , शेजारी त्यांच्याशी असणारे आपले भावनिक संबंध ह्यातून व्यक्त होतात. 

आपला शैक्षणिक दर्जा ,बुद्धिमत्ता , विद्वत्ता , ज्ञान ग्रहण करण्याची आणि देण्याची क्षमता , अध्यात्मिक ओढ , साधनेची बैठक , समाजातील वावर , मानसन्मान , पद प्रतिष्ठा ,अर्थार्जन  ह्याचा परामर्श इथे आहे. आपले सहजीवन , त्यातील ओलावा , प्रेम ,मुलांचे सुख ,आजारपण , कर्ज ,वृद्धापकाळ एक ना दोन अगदी सगळ्या सगळ्याचा मागोवा घेणारी हि निसर्ग कुंडली खरच अद्भुत म्हंटली पाहिजे. 

एका कुंडलीवरून माणसाच्या टाळूपासून ते पावलापर्यंत च्या शरीराचा तसेच त्याच्या आवडीनिवडी , जगाकडे बघण्याचा दृष्टीकोन , विचारांचा वेग , संकटांवर मात करण्याची क्षमता , शत्रुत्व आणि मित्र अनेक गोष्टींवर दृष्टीक्षेप टाकता येतो. मनुष्याची नाळ निसर्गाशी किती घट्ट जुळली आहे हेच जणू हा अभ्यास  दाखवत असतो आणि म्हणूनच प्रत्येक कुंडलीचे विवेचन करताना लग्न कुंडलीचा  वरवरचा नाही तर सखोल अभ्यास महत्वाचा आहे.  कुंडलीचा  अभ्यास करताना आपण स्वतःच्याच कुंडलीकडे त्रयस्थाच्या ( जमणे अवघड, पण जमवायचे ) दृष्टीने बघितले तर त्यातील मर्म लवकर  उमगेल . एखादा ग्रह फलीतापर्यंत नेणार नाही त्यासाठी अनेक ग्रहयोग , भाव ,दशा अश्या अनेक गोष्टींचा एकत्रित विचार व्हावा लागतो. म्हणूनच वाटते कि निसर्ग कुंडली म्हणजे ब्रम्हांडच आहे. ज्यात पंचमहाभूते सामावली आहेत .

ज्योतिष शास्त्र क्षणभर बाजूला ठेवून आपण आपल्याच आयुष्याकडे वेगळ्या दृष्टीकोनातून पहिले तर अनेक प्रश्नांच्या उत्तरापर्यंत आपण स्वतःच पोहोचू शकतो. आपल्या मुलांपासून सुख नाही  ह्याचे उत्तर आपण आपल्या आई वडिलांशी कसे वागलो आहोत ह्यात दडलेले आहे. येतंय ना लक्ष्यात .सहज सोपे आहे अगदी. 

अस्मिता

संपर्क : 8104639230

फेसबुक पेज : @yashasweejyotish


Thursday, 25 November 2021

अपत्यसुख

 || श्री स्वामी समर्थ ||



आपल्या आयुष्यात आपल्या मुलांपासून आपल्याला सुख मिळणार का ? हा विचार प्रत्येक दांपत्य त्यांच्याही नकळत करतच असते. मुले आपल्याला अक्षता घेवून आम्हाला जन्माला घाला असे सांगायला आली म्हणून आपण त्यांना जन्माला घातले नाही तर तो आपल्या प्रेमातून फुललेल्या नवनिर्मितीचा आनंद आहे. आपल्या मुलांकडे आपल्या म्हातारपणाची काठी म्हणून न पाहता आपल्याला त्यांना उत्तम माणूस म्हणून घडवायचे आहे हाच सदविचार असला पाहिजे. काय वाटते ? 

म्हातारपणी मुले सुना परदेशी निघून जातील मग आम्ही एकटे राहू हा विचार करून नका ,उलट परदेशी जावून तुम्ही दिलेल्या शिक्षणाचे मुलांनी चीज केले असा विचार करून त्यांचे पंखही कापू नका. इतकी उंच गरुड भरारी त्यांनी घ्यावी ह्यासाठी  आपण आपल्या जीवाचे रान केले , आयुष्यभर झिजलो आपल्या अनेक इच्छा आकांक्षांना मुरड घातली .वेळप्रसंगी  व्यक्तिगत आनंदसुद्धा बाजूला ठेवला आहे.  मग आपणच लावलेले लहानसे रोपटे फुलताना बहरताना पाहताना शंका कुशंका कश्यासाठी मन कश्याला अधीर होत आहे आपले ?  आपण आपले इतिकर्तव्य पूर्ण केले आणि त्याचा परमोच्च आनंद अनुभवता येणे हे तर आपले परम भाग्यच म्हंटले पाहिजे. असो विषयांतर नको.

आजकाल  पालकांना मुलांचे  प्रश्न भेडसावत असतात जसे मुले ऐकत नाहीत , व्यसनाधीनता , नोकरीत धरसोड , कुठे कसलीच बैठक नाही , घरात दुरावा , मनमोकळे वागणे बोलणे नाही . मुलांच्या मनात काय चालू आहे हे समजत नाही असाही सूर अनेकांचा असतो. 

ह्या सगळ्यांची उत्तरे शोधण्यासाठी पालक आपल्याकडे  त्यांच्या मुलांची पत्रिका घेवून येतात . पण ह्या सर्व प्रश्नांची उत्तरे मुलांच्या नाही तर पालकांच्या  स्वतःच्याच  पत्रिकेत असतात . पालकांचे पंचम स्थान बिघडले असेल तर नक्कीच अपत्यसुखात कमतरता येते. पंचमेश चतुर्थात ,पंचमात राहूसारखा ग्रह ,अपत्यकारक गुरु पत्रिकेत बिघडलेला असेल तर, अश्या अनेक ग्रहयोगामुळे अपत्य सुख प्राप्त होत नाही .

मंडळी पंचमाचे भाग्य स्थान म्हणजे लग्न स्थान . पर्यायाने मुलांना घडवण्याचे महान कार्य नव्हे तर जबाबदारी आपलीच असते. येतंय ना लक्ष्यात ? सुज्ञास सांगणे न लगे.

अस्मिता

संपर्क : 8104639230

फेसबुक पेज : @yashasweejyotish


Tuesday, 23 November 2021

जानेवारी 2022 ची पहिली “ हसत खेळत ज्योतिष शिकूया “ हि कार्यशाळा.

 || श्री स्वामी समर्थ ||


वर्ष बघता बघता संपेल आणि 2022 कधी सुरु होईल समजणार सुद्धा नाही. नवीन वर्ष नवीन संकल्प , योजना घेऊन सज्ज असणारच आहे.  आपले आयुष्य हळूहळू पूर्ववत  होत आहे ,तेव्हा काहीतरी नवीन शिकण्याचा निश्चय करुया . ज्योतिष आणि आपले आयुष्य ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत तेव्हा ह्या शास्त्राचा अभ्यास आपल्याला निश्चित आपल्या स्वतःकडे बघण्याचा नवीन दृष्टीकोन देईल ह्यात शंकाच नाही. 8 जानेवारी 2022 ह्या दिवशी वर्षातील  पहिली कार्यशाळा सुरु होत आहे .ज्योतिष शास्त्र ह्या विषयाची पाटी अगदी कोरी असणार्या पण हे शास्त्र शिकण्याची इच्छा असणार्या सर्वांसाठी हि कार्यशाळा आहे .  ह्या कार्यशाळेत  प्रवेश घ्यायचा असेल त्यांनी खालील क्रमांकावर whastapp मेसेज करावा , पुढील माहिती देण्यात येईल. 6 दिवसांची हि कार्यशाळा असली तरी whatsapp ग्रुप दोन आठवडे शंकांचे समाधान करण्यासाठी  असतोच ह्याची नोंद घ्यावी .धन्यवाद.

अस्मिता 

संपर्क : 8104639230

फेसबुक पेज : @yashasweejyotish



Friday, 19 November 2021

गुरू बदल कि स्वतः मधील बदल ?

 || श्री स्वामी समर्थ ||

गुरु परमात्मा परेषु


२० नोव्हेंबर ,२०२१ रोजी गुरु महाराज आपली मकर  राशी सोडून कुंभ राशीत संक्रमित होत आहेत. ग्रहमालिकेत प्रत्येक ग्रहाला काहीना काही विशेष असे कारकत्व बहाल केलेले आहे. जसे बुध हा बुद्धीचा तर गुरु हा ज्ञानाचा कारक आहे. कुंभ राशी हि शनीची आवडती राशी आहे. ह्या राशीत ज्ञानाने भरलेला कुंभ आहे.  

गुरुचे आपल्या जीवनातील स्थान हे अनन्यसाधारण आहे. गुरुविणा जीवन व्यर्थ आहे . ज्यांना गुरु लाभले त्यांच्या जीवनाला गुरुंचा परीसस्पर्श जाणवल्याशिवाय राहणार नाही . गुरु आपल्याला राजमार्गाने चालायला शिकवतात . आपल्याला जे दिसत नाही ते त्यांच्या ज्ञानाच्या दिव्य चक्षुंनी दाखवण्याचा ,अनुभवण्याचा प्रयत्न करतात . प्रपंच आणि परमार्थातील दुवा म्हणजे गुरु . प्रपंच करत असताना पारमार्थिक जगतात फेरफटका मारणे  हे केवळ त्यांच्या अस्तित्वाने शक्य होते. शेवटी आपण सर्वच मोक्षाच्या मार्गावर चालत आपले जीवन कंठीत असतो. शेवटचा क्षण गोड होण्यासाठी गुरूंचे बोट घट्ट पकडून मार्गक्रमण करत असतो. गुरु आपल्यासाठी जे जे काही उत्तम आणि योग्य आहे तेच घडवतात ह्यावर आपली निस्सीम श्रद्धा असली पाहिजे ,ती असेल तर त्यांच्या इच्छेत आपली इच्छा विलीन करणे हे उत्तम कारण त्यातच आपले हित असते.

गुरु हा आकाश तत्वाचा ग्रह आहे. अग्नी ,पृथ्वी , वायू आणि जल ह्या सर्व तत्वांना सामावून घेणारा आहे. गुरु हा विशाल आहे , आपली दृष्टी जाते त्याहीपलीकडे त्याचे अस्तित्व आहे आणि ते चराचरात व्यापून उरलेले आहे . आकाश  हे आपल्या डोक्यावर आहे म्हणजेच गुरूंचा वरदहस्त सुद्धा आपल्या डोक्यावर आहे असे म्हंटले तर वावगे ठरायला नको. 

गुरु महाराज अंदाजे १२ महिन्यांनी आपली राशी बदलून पुढील राशीत मार्गस्थ होतात . त्यालाच आपण गुरुचे गोचर भ्रमण म्हणतो आणि गुरु ज्या भावात ज्या राशीत पदार्पण करतात त्यानुसार त्याचा फलादेश असतो. जसे सप्तमस्थानात गुरुचे गोचर भ्रमण भावंडांशी असलेले संबंध अधिक दृढ करेल. इच्छापूर्ती करेल .  प्रत्येक वेळा गुरु बदलताना आपण उत्सुक असतो कि आता हा गुरूबद्दल मला काय देयील माझ्या आयुष्यात कुठल्या आनंदाची बरसात होईल . 

आज ह्या सर्व गोष्टींचे मनन चिंतन करताना मनात अनेक विचार येऊ लागतात .जन्मस्थ पत्रिकेत  आपल्या पूर्व कर्मानुसार गुरु स्थान ग्रहण करतात आणि मग दर वर्षी त्याच्या पुढील स्थानात संक्रमित होतात . गुरूंचे आपल्या आयुष्यातील स्थान अढळ आहे त्यांची पूजा , जप , नामस्मरण ,पारायण ह्या सर्व गोष्टी तसेच आपली नित्य उपासना आपण करतच असतो . ह्या सततच्या उपासनेमुळे आपला गुरूंच्या वरचा विश्वास आणि श्रद्धा वृद्धिंगत होत असते. मग कितीही कठीण प्रसंग आले तरी शेवटच्या क्षणी गुरु धावून येतात आणि संकटाचे हरण करतात ह्याचाही अनुभव कळतनकळत येऊ लागतो. शेवटी भक्तिविना प्रचीती नाही हेच खरे .

प्रत्येकाचे गुरु वेगळे असू शकतात जसे कुणी आपल्या आईवडिलांना गुरु मानतील तर कुणी शेगावच्या श्री गजानन महाराजांना , कुणी साईबाबा , अक्कलकोट स्वामींच्या चरणी आपल्या निष्ठा वाहतील. पण गुरूंची रूपे अनेक असली तरी गुरुतत्व एकच आहे आणि आपण गुरुतत्वाचे पूजन केले पाहिजे. 

कुठल्याही गुरूची निर्भत्सना , टिंगल अशोभनीय आहे कारण प्रत्यक्ष ती आपल्या गुरुना सुद्धा रुचणार नाही. 

प्रत्येकाच्या श्रद्धेचा आदर करणे हीच सर्वश्रेष्ठ पूजा आहे.  माणसाने माणसाशी माणुसकीच्या नात्याने वागावे , प्रपंच करूनच परमार्थ साधावा , आपल्या कर्तव्यापासून तसूभर सुद्धा परावृत्त होऊ नये हेच तर गुरुतत्व आपल्याला शिकवत असते.  प्रत्येक वेळा होणार्या गुरु बदलाच्या वेळी आता आपल्या आयुष्यात काय बदल होणार ह्यापेक्षा आपण स्वताहून आपल्या आयुष्यात किती बदल केले ,आपला स्वभाव आपली वागणूक किती बदलली ? आपण किती सकारात्मक झालो ? आपण आपल्या कुटुंबाच्या जबाबदार्या नीट पार पाडल्या का ? ह्या अश्या अनके प्रश्नांची उत्तरे आपल्यालाच शोधायची आहेत .

मनुष्य हा स्वार्थीच आहे , प्रपंचात अनेक कठीण प्रसंगांनी तो घेरला जातो त्रस्त होतो , अंधारात चाचपडत राहतो आणि मग निराश होवून शेवटी गुरूंच्या चरणी आश्रय घेतो . आपण आजवर केलेली उपासना आणि श्रद्धा फळास नक्कीच येते आणि त्या मिट्ट अंधारात आशेचा किरण दिसू लागतो. गुरु पुन्हा एकदा त्यांचे अस्तित्व आणि भक्तावरील प्रेम त्यांच्या प्रचीती च्या रुपात देतात आणि आपण निशःब्द होतो, नतमस्तक होतो.

म्हणूनच वाटते कि गुरूंची भेट होण्याची वेळ आपल्या आयुष्यात लिहून ठेवलेली असते .ज्या क्षणी गुरु चरणाशी आपण स्वतःला अनन्यभावे समर्पित करतो त्याच क्षणी त्यांचे अस्तित्व जाणवू लागते . आपली भक्ती श्रद्धा त्यांना आपल्यापर्यंत अक्षरश खेचून आणते आणि तोच आपल्या आयुष्यातील अत्युच्य आनंदाचा क्षण असतो .

गुरुबदल आपल्याला काय देयील त्यापेक्षा आपण गुरूना आपल्यातील बदलेल्या किती गोष्टी दाखवू शकतो ? किती अवगुणांचे गुणात रुपांतर झालेले आहे? आयुष्यात गुरुंमुळे किती अमुलाग्र बदल झाले आहेत ? ह्या सर्वाचा  विचार व्हायला पाहिजे. 

गुरु कुणाचेच वाईट करत नाहीत . म्हणूनच त्याला आकाशतत्व बहाल केले आहे. आकाश जसे सर्वाना सामावून घेते अगदी तसेच आपलेही आचरण असले पाहिजे हेच तर सुचवायचे नाही ना गुरूना .

मी असा मी तसा मी हे केले मी ते केले ,जसे काही निसर्ग चक्र आपल्यामुळेच अस्तित्वात आहे अश्या अविर्भात असणारे आपण किती क्षणभंगुर आयुष्य जगात असतो ज्याची जाणीव आपल्याला गुरुसेवा करताना घडते . पराकोटीला पोहोचलेला अहंकार क्षणात नेस्तनाबूत करणाऱ्या आपल्या गुरूचा सन्मान प्रत्येकाने केला पाहिजे. 

प्रत्येक कृती करत असताना ती त्यांना आवडेल का असा क्षणभर विचार केला तर चुकीची कर्मे हातून कमी होतील नाही का? गोचरीने गुरु महाराज आपल्या अष्टम स्थानात आले तरीही ते काहीच वाईट करत नाहीत कारण ते साधनेचे स्थान आहेच. प्रत्येक वेळी गुरु स्थान परिवर्तन करतील तेव्हा आपणही कात टाकल्यासारखे नवीन रुपात त्यांना सामोरे गेलो तर त्यानाही ते नक्कीच आवडेल , काय वाटते ?

शेवटी एकच वाटते ग्रहांना आपले काम करुदे आपण आपले काम करत राहूया .

अस्मिता

संपर्क : 8104639230

फेसबुक पेज : @yashasweejyotish


Monday, 8 November 2021

शुक्राची चांदणी

 ||श्री स्वामी समर्थ ||


नवग्रहातील महत्वाचा ग्रह म्हणजे “ शुक्र “ . आयुष्य – शुक्र = निरस ,उदास ,अरसिक आयुष्य असे म्हंटले तर वावगे ठरणार नाही . शुक्राचार्य हे दैत्यांचे गुरु .त्यांचा मानही तितकाच मोठा. आपल्या आयुष्यातील आनंदाचा सौख्याचा आणि सगळ्या भौतिक, ऐहीक सुखाचा कारक म्हणजे शुक्र . शुक्र हा रसिक ग्रह आहे. जिथे जिथे आनंद आहे तिथे शुक्र आहेच . 

शुक्र आपल्याला दैनंदिन जीवनात सुद्धा सतत भेटत राहतो .बघुया   

१ गालावरची खळी म्हणजे शुक्र 

२. प्रणयाचा कारक 

३. काळ्याभोर केसांचा केशसंभार 

४. उंची पेहराव , दागदागिने , वस्त्रे 

५. अत्तरे 

६.  पार्टी , क्लब ,मॉल 

७ ब्युटी पार्लर 

८ वैवाहिक सुखाचा कारक ग्रह 

९ पर्यटन 

१० कला 

लक्ष्यात येतेय का? बघा किती साध सोप्प आहे शुक्र समजणे , हो ना? रोज आपल्या अवतीभवती फिरणारा हा ग्रह शुभ ग्रह आहे. तसा प्रत्येक ग्रह हा पूर्णतः शुभ किंवा अशुभ नसतोच.  शुक्र बिघडला तर वाईटच.  कुठल्याही गोष्टी एका मर्यादेत असल्या तरच त्या चांगल्या असतात .

आज शुक्राचेच पूर्वाषाढा नक्षत्र चालू आहे. 

चला तर तुम्हालाही शुक्र कुठेकुठे भेटू शकेल ते लिहा ..आपण अभ्यास करतोय त्यामुळे विचारांचे आदान प्रदान झालेच पाहिजे .

अस्मिता

संपर्क : 8104639230

फेसबुक पेज :  @yashasweejyotish 


Sunday, 7 November 2021

गैरसमजाचे वारे – राहू

 || श्री स्वामी समर्थ ||

आपल्या सगळ्यांनाच कधीना कधीतरी  आयुष्यात  समज गैरसमजाला  तोंड द्यावे लागते. गोष्ट अगदी शुल्लक असते पण त्यावेळी अशी काही परिस्थिती निर्माण होते कि समोरच्याचा आपल्याबद्दल गैरसमज होतो . हा गैरसमजुतीचा घोटाळा आहे हे आपल्याला समजले असते आणि आपण तो दूर करण्याचा प्रयत्न सुद्धा करतो. समोरचा सुज्ञ असेल तर प्रकरण मिटते अन्यथा आयुष्यभर त्या गैरसमजाच्या वादळाला सामोरे जायला लागते . अश्यामुळे मनस्ताप तर होतोच पण नाती तुटतात आणि संबंध दुरावतात ते कायमचेच .

कधीकधी हे गैरसमज आपल्याही नकळत होतात , आपली एखादी कृती किंवा बोललेला शब्द गैरसमज निर्माण करण्यासाठी  पुरेसा असतो. आपला हेतू तसा नसतोहि पण घडायचे ते घडतेच .  बरेचदा तिथे असणारी तिसरी व्यक्ती सुद्धा आपल्यातील झालेला गैरसमज सहज मिटवू शकते कारण त्यांच्याचमुळे गैरसमज झालेला असतो ,पण तसे न करता ती सगळे प्रकरण दुरून बघून आनंद घेत असते . त्यामुळे ह्या झालेल्या गैरसमजामुळे आपल्याला आपल्याच जवळच्या व्यक्तींचा नव्याने परिचय होतो असे म्हंटले तर वावगे ठरू नये. 

कधी कधी समोरचा आपल्याबद्दल मुद्दाम गैरसमज निर्माण करून देतो पण दोष त्याचा असतो का ?  तर नाही. समंजस , साधक बाधक विचार करणाऱ्या व्यक्ती गैरसमज करून घेत नाहीत . कधीकधी एखाद्या प्रकरणात आपण नको तितका पुढाकार घ्यायला जातो आणि फसतो. त्याचा खरा सूत्रधार बाजूलाच राहतो. पण गोम अशी आहे कि त्याच्याच मुळे आपण मात्र गैरसमजाच्या चक्रात गुरफटतो . सूत्रधाराच्या लक्ष्यात आलेले असते कि आपल्यामुळे नाहक दुसर्याबद्दल अकारण गैरसमज होत आहे पण तो दूर न करता तो दूर उभे राहून गंमत बघत असतो. 

गेल्या काही दिवसात मी स्वतः असा एक अनुभव घेतला . झालेला गैरसमज दूर करण्यासाठी मी बोलले सुद्धा पण ती व्यक्ती इतकी निर्ढावलेली आहे कि लक्ष्यात आणून दिल्यानंतर सुद्धा तिने गैरसमज दूर करण्यासाठी पाऊल उचलले नाही. अश्यामुळे आजवरच्या चांगल्या केलेल्या गोष्टींवर सुद्धा पाणी पडले. चांगल्या केलेल्या १०० गोष्टी लक्ष्यात राहात नाहीत पण आपण केलेली एक चूक लक्ष्यात राहते हा मनुष्य स्वभाव आहे, कुणीही त्याला अपवाद नाही . मीही शेवटी ते सोडून दिले ,अर्थात मनातून ते जाणे अशक्य आहे कारण तुमच्यामुळे गैरसमज झाला आहे आणि तो दूर करा हे सांगून सुद्धा  त्या व्यक्तीने काहीच केले नाही .आता ह्या प्रसंगातून घडलेल्या घटनेचा काय अर्थ  घ्यायचा तो मी घेतलेला आहे. नकळत घडतो तो गुन्हा पण समजून सवरून केलेल्या गोष्टी म्हणजे पाप.

बरेचवेळा दोन व्यक्तितला गैरसमज हा घडवून आणला जातो आणि तो तसाच कसा राहील ह्यासाठी सुद्धा प्रयत्न केला जातो. असो परमेश्वर आहे आणि तोही हे सगळे बघत आहे . मी सुद्धा अभ्यास केला तेव्हा अश्या व्यक्तींचे आर्थिक मानसिक कौटुंबिक स्वास्थ्य किती बिघडलेले असते ह्याचा प्रत्यय आला. 

दुरून गम्मत बघत बसताना मजा येते पण त्यांच्या ह्या दुष्कृत्याचे  दूरगामी पडसाद त्यांना भोगायला लागतात . ज्योतिष अभ्यासकांना अश्या आणि तत्सम घटनांचा कारक राहू आहे हे माहितच आहे. राहू हा गैरसमज ,छल कपट , फसवणूक, धूसर चित्र निर्माण करणारा, म्हणजेच आपल्याला वाटते  दुध आहे पण असते ताक , धूर्त , लबाड असा पापग्रह आहे. अवकाशात लाखो मैल दूर असणारा एक अगदी लहानसा ठिपका आहे पण त्याच्या करामती बघा .

अश्या घटना घडतात किंवा फसवणूक होते तेव्हा आपल्या पत्रिकेत कुठे ना कुठे म्हणजे महादशा , अंतर्दशा , विदशा किंवा गोचर भ्रमणातून राहू active झालेला असतो . म्हणूनच राहू दशेत शब्द कमी आणि मौन अधिक . राहू दशेत समाजात सुद्धा अधिक मिसळू नये . अधिकाधिक नामस्मरण करावे आणि सतर्क राहावे. राहू महादशा हि 18 वर्षांची असते. कधी कधी पहिली 9 वर्षे चांगली जातात आणि पुढील 9 वर्षे  रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग अशी जातात . प्रत्येकाचा अनुभव वेगळा असतो. पण भल्याभल्यांची झोप  हा राहू निसंशय उडवतो हे अनुभवास येतेच .

प्रत्येक ग्रह हा संपूर्णतः  शुभ किंवा अशुभ नसतो . ह्याच राहूमुळे जग जवळ आले आहे आणि आपण माझा लेख सुद्धा वाचू शकत आहात . राहू चांगला त्यांचे नेट चांगले .काय पटतय ना?  राहू दशेत दुर्गेची आणि महादेवाची आराधना फलद्रूप होते. अश्या ह्या राहुसमोर मी नतमस्तक आहे.

अस्मिता

संपर्क 8104639230
फेसबुक पेज : @yashasweejyotish












Saturday, 6 November 2021

ग्रहांचा खेळ आणि मेळ ( हसत खेळत ज्योतिष कार्यशाळा 20 नोव्हेंबर ,2021)

 || श्री स्वामी समर्थ ||



ग्रहांचा खेळ आणि मेळ ( हसत खेळत ज्योतिष कार्यशाळा  20 नोव्हेंबर ,2021)

आपली खूप स्वप्ने असतात .  शेअर मार्केट मध्ये मोठी झेप घ्यायची असते . पण हजारांचे लाख होणार कि लाखांचे हजार हे जाणून घेण्यासाठी आपली स्वतःची पत्रिका समजणे खूप महत्वाचे असते . मी नक्की कुठला व्यवसाय करू ? कुठल्या शाखेचे अध्ययन करू ? आपल्या पत्रिकेवरून आपल्याला बरेच आराखडे बांधता येतात , भविष्याची चाहूल समजते , दिशा मिळते , आयुष्यातील पुढे घडणाऱ्या घटनांचा मागोवा घेता येतो. 

आज प्रत्येक मुलाला परदेशी जावून स्थायिक व्हायचे आहे. मुलापेक्षाही त्याच्या पालकांना त्याचे वेध जास्ती लागलेले असतात . मग तसे योग मुलाच्या पत्रिकेत आहेत का? असतील तर सोन्याहून पिवळे पण नसतील तर ? प्रत्येकाच्या पदरात देवाने त्याच्या पूर्व सुकृताप्रमाणे दान टाकले आहे. त्याप्रमाणे सुख दुक्खाचा खेळ , आशा निराशेचा खेळ आपल्या आयुष्यात होतच असतो . 

अवकाशातील हे सगळे ग्रह आणि तारे आपल्याला काहीतरी देण्यासाठीच तर आले आहेत , त्यांच्याशी मैत्री करून ,त्यांना समजून घेवून  आयुष्याचा निर्भेळ आनंद लुटण्यासाठी  ज्योतिष शास्त्राच्या अभ्यासाची नितांत गरज आहे.  आजच्या तरुण पिढीने तर नक्कीच ह्या शास्त्राचे अध्ययन करावे .

दिवाळीचा आनंद लुटून आता ह्या ग्रहांच्या विश्वात पाऊल टाकायला तुम्हाला नक्कीच आवडेल. आपल्या स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव करून घेण्यासाठी  नक्कीच “ हसत खेळत ज्योतिष शिकूया “ ह्या कार्यशाळेत सहभागी व्हा . खालील क्रमांकावर whatsapp मेसेज करा म्हणजे पुढील माहिती मिळेल. 


अस्मिता

संपर्क : 8104639230

फेसबुक पेज : @yashasweejyotish