Sunday, 7 November 2021

गैरसमजाचे वारे – राहू

 || श्री स्वामी समर्थ ||

आपल्या सगळ्यांनाच कधीना कधीतरी  आयुष्यात  समज गैरसमजाला  तोंड द्यावे लागते. गोष्ट अगदी शुल्लक असते पण त्यावेळी अशी काही परिस्थिती निर्माण होते कि समोरच्याचा आपल्याबद्दल गैरसमज होतो . हा गैरसमजुतीचा घोटाळा आहे हे आपल्याला समजले असते आणि आपण तो दूर करण्याचा प्रयत्न सुद्धा करतो. समोरचा सुज्ञ असेल तर प्रकरण मिटते अन्यथा आयुष्यभर त्या गैरसमजाच्या वादळाला सामोरे जायला लागते . अश्यामुळे मनस्ताप तर होतोच पण नाती तुटतात आणि संबंध दुरावतात ते कायमचेच .

कधीकधी हे गैरसमज आपल्याही नकळत होतात , आपली एखादी कृती किंवा बोललेला शब्द गैरसमज निर्माण करण्यासाठी  पुरेसा असतो. आपला हेतू तसा नसतोहि पण घडायचे ते घडतेच .  बरेचदा तिथे असणारी तिसरी व्यक्ती सुद्धा आपल्यातील झालेला गैरसमज सहज मिटवू शकते कारण त्यांच्याचमुळे गैरसमज झालेला असतो ,पण तसे न करता ती सगळे प्रकरण दुरून बघून आनंद घेत असते . त्यामुळे ह्या झालेल्या गैरसमजामुळे आपल्याला आपल्याच जवळच्या व्यक्तींचा नव्याने परिचय होतो असे म्हंटले तर वावगे ठरू नये. 

कधी कधी समोरचा आपल्याबद्दल मुद्दाम गैरसमज निर्माण करून देतो पण दोष त्याचा असतो का ?  तर नाही. समंजस , साधक बाधक विचार करणाऱ्या व्यक्ती गैरसमज करून घेत नाहीत . कधीकधी एखाद्या प्रकरणात आपण नको तितका पुढाकार घ्यायला जातो आणि फसतो. त्याचा खरा सूत्रधार बाजूलाच राहतो. पण गोम अशी आहे कि त्याच्याच मुळे आपण मात्र गैरसमजाच्या चक्रात गुरफटतो . सूत्रधाराच्या लक्ष्यात आलेले असते कि आपल्यामुळे नाहक दुसर्याबद्दल अकारण गैरसमज होत आहे पण तो दूर न करता तो दूर उभे राहून गंमत बघत असतो. 

गेल्या काही दिवसात मी स्वतः असा एक अनुभव घेतला . झालेला गैरसमज दूर करण्यासाठी मी बोलले सुद्धा पण ती व्यक्ती इतकी निर्ढावलेली आहे कि लक्ष्यात आणून दिल्यानंतर सुद्धा तिने गैरसमज दूर करण्यासाठी पाऊल उचलले नाही. अश्यामुळे आजवरच्या चांगल्या केलेल्या गोष्टींवर सुद्धा पाणी पडले. चांगल्या केलेल्या १०० गोष्टी लक्ष्यात राहात नाहीत पण आपण केलेली एक चूक लक्ष्यात राहते हा मनुष्य स्वभाव आहे, कुणीही त्याला अपवाद नाही . मीही शेवटी ते सोडून दिले ,अर्थात मनातून ते जाणे अशक्य आहे कारण तुमच्यामुळे गैरसमज झाला आहे आणि तो दूर करा हे सांगून सुद्धा  त्या व्यक्तीने काहीच केले नाही .आता ह्या प्रसंगातून घडलेल्या घटनेचा काय अर्थ  घ्यायचा तो मी घेतलेला आहे. नकळत घडतो तो गुन्हा पण समजून सवरून केलेल्या गोष्टी म्हणजे पाप.

बरेचवेळा दोन व्यक्तितला गैरसमज हा घडवून आणला जातो आणि तो तसाच कसा राहील ह्यासाठी सुद्धा प्रयत्न केला जातो. असो परमेश्वर आहे आणि तोही हे सगळे बघत आहे . मी सुद्धा अभ्यास केला तेव्हा अश्या व्यक्तींचे आर्थिक मानसिक कौटुंबिक स्वास्थ्य किती बिघडलेले असते ह्याचा प्रत्यय आला. 

दुरून गम्मत बघत बसताना मजा येते पण त्यांच्या ह्या दुष्कृत्याचे  दूरगामी पडसाद त्यांना भोगायला लागतात . ज्योतिष अभ्यासकांना अश्या आणि तत्सम घटनांचा कारक राहू आहे हे माहितच आहे. राहू हा गैरसमज ,छल कपट , फसवणूक, धूसर चित्र निर्माण करणारा, म्हणजेच आपल्याला वाटते  दुध आहे पण असते ताक , धूर्त , लबाड असा पापग्रह आहे. अवकाशात लाखो मैल दूर असणारा एक अगदी लहानसा ठिपका आहे पण त्याच्या करामती बघा .

अश्या घटना घडतात किंवा फसवणूक होते तेव्हा आपल्या पत्रिकेत कुठे ना कुठे म्हणजे महादशा , अंतर्दशा , विदशा किंवा गोचर भ्रमणातून राहू active झालेला असतो . म्हणूनच राहू दशेत शब्द कमी आणि मौन अधिक . राहू दशेत समाजात सुद्धा अधिक मिसळू नये . अधिकाधिक नामस्मरण करावे आणि सतर्क राहावे. राहू महादशा हि 18 वर्षांची असते. कधी कधी पहिली 9 वर्षे चांगली जातात आणि पुढील 9 वर्षे  रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग अशी जातात . प्रत्येकाचा अनुभव वेगळा असतो. पण भल्याभल्यांची झोप  हा राहू निसंशय उडवतो हे अनुभवास येतेच .

प्रत्येक ग्रह हा संपूर्णतः  शुभ किंवा अशुभ नसतो . ह्याच राहूमुळे जग जवळ आले आहे आणि आपण माझा लेख सुद्धा वाचू शकत आहात . राहू चांगला त्यांचे नेट चांगले .काय पटतय ना?  राहू दशेत दुर्गेची आणि महादेवाची आराधना फलद्रूप होते. अश्या ह्या राहुसमोर मी नतमस्तक आहे.

अस्मिता

संपर्क 8104639230
फेसबुक पेज : @yashasweejyotish












4 comments: