Friday, 19 November 2021

गुरू बदल कि स्वतः मधील बदल ?

 || श्री स्वामी समर्थ ||

गुरु परमात्मा परेषु


२० नोव्हेंबर ,२०२१ रोजी गुरु महाराज आपली मकर  राशी सोडून कुंभ राशीत संक्रमित होत आहेत. ग्रहमालिकेत प्रत्येक ग्रहाला काहीना काही विशेष असे कारकत्व बहाल केलेले आहे. जसे बुध हा बुद्धीचा तर गुरु हा ज्ञानाचा कारक आहे. कुंभ राशी हि शनीची आवडती राशी आहे. ह्या राशीत ज्ञानाने भरलेला कुंभ आहे.  

गुरुचे आपल्या जीवनातील स्थान हे अनन्यसाधारण आहे. गुरुविणा जीवन व्यर्थ आहे . ज्यांना गुरु लाभले त्यांच्या जीवनाला गुरुंचा परीसस्पर्श जाणवल्याशिवाय राहणार नाही . गुरु आपल्याला राजमार्गाने चालायला शिकवतात . आपल्याला जे दिसत नाही ते त्यांच्या ज्ञानाच्या दिव्य चक्षुंनी दाखवण्याचा ,अनुभवण्याचा प्रयत्न करतात . प्रपंच आणि परमार्थातील दुवा म्हणजे गुरु . प्रपंच करत असताना पारमार्थिक जगतात फेरफटका मारणे  हे केवळ त्यांच्या अस्तित्वाने शक्य होते. शेवटी आपण सर्वच मोक्षाच्या मार्गावर चालत आपले जीवन कंठीत असतो. शेवटचा क्षण गोड होण्यासाठी गुरूंचे बोट घट्ट पकडून मार्गक्रमण करत असतो. गुरु आपल्यासाठी जे जे काही उत्तम आणि योग्य आहे तेच घडवतात ह्यावर आपली निस्सीम श्रद्धा असली पाहिजे ,ती असेल तर त्यांच्या इच्छेत आपली इच्छा विलीन करणे हे उत्तम कारण त्यातच आपले हित असते.

गुरु हा आकाश तत्वाचा ग्रह आहे. अग्नी ,पृथ्वी , वायू आणि जल ह्या सर्व तत्वांना सामावून घेणारा आहे. गुरु हा विशाल आहे , आपली दृष्टी जाते त्याहीपलीकडे त्याचे अस्तित्व आहे आणि ते चराचरात व्यापून उरलेले आहे . आकाश  हे आपल्या डोक्यावर आहे म्हणजेच गुरूंचा वरदहस्त सुद्धा आपल्या डोक्यावर आहे असे म्हंटले तर वावगे ठरायला नको. 

गुरु महाराज अंदाजे १२ महिन्यांनी आपली राशी बदलून पुढील राशीत मार्गस्थ होतात . त्यालाच आपण गुरुचे गोचर भ्रमण म्हणतो आणि गुरु ज्या भावात ज्या राशीत पदार्पण करतात त्यानुसार त्याचा फलादेश असतो. जसे सप्तमस्थानात गुरुचे गोचर भ्रमण भावंडांशी असलेले संबंध अधिक दृढ करेल. इच्छापूर्ती करेल .  प्रत्येक वेळा गुरु बदलताना आपण उत्सुक असतो कि आता हा गुरूबद्दल मला काय देयील माझ्या आयुष्यात कुठल्या आनंदाची बरसात होईल . 

आज ह्या सर्व गोष्टींचे मनन चिंतन करताना मनात अनेक विचार येऊ लागतात .जन्मस्थ पत्रिकेत  आपल्या पूर्व कर्मानुसार गुरु स्थान ग्रहण करतात आणि मग दर वर्षी त्याच्या पुढील स्थानात संक्रमित होतात . गुरूंचे आपल्या आयुष्यातील स्थान अढळ आहे त्यांची पूजा , जप , नामस्मरण ,पारायण ह्या सर्व गोष्टी तसेच आपली नित्य उपासना आपण करतच असतो . ह्या सततच्या उपासनेमुळे आपला गुरूंच्या वरचा विश्वास आणि श्रद्धा वृद्धिंगत होत असते. मग कितीही कठीण प्रसंग आले तरी शेवटच्या क्षणी गुरु धावून येतात आणि संकटाचे हरण करतात ह्याचाही अनुभव कळतनकळत येऊ लागतो. शेवटी भक्तिविना प्रचीती नाही हेच खरे .

प्रत्येकाचे गुरु वेगळे असू शकतात जसे कुणी आपल्या आईवडिलांना गुरु मानतील तर कुणी शेगावच्या श्री गजानन महाराजांना , कुणी साईबाबा , अक्कलकोट स्वामींच्या चरणी आपल्या निष्ठा वाहतील. पण गुरूंची रूपे अनेक असली तरी गुरुतत्व एकच आहे आणि आपण गुरुतत्वाचे पूजन केले पाहिजे. 

कुठल्याही गुरूची निर्भत्सना , टिंगल अशोभनीय आहे कारण प्रत्यक्ष ती आपल्या गुरुना सुद्धा रुचणार नाही. 

प्रत्येकाच्या श्रद्धेचा आदर करणे हीच सर्वश्रेष्ठ पूजा आहे.  माणसाने माणसाशी माणुसकीच्या नात्याने वागावे , प्रपंच करूनच परमार्थ साधावा , आपल्या कर्तव्यापासून तसूभर सुद्धा परावृत्त होऊ नये हेच तर गुरुतत्व आपल्याला शिकवत असते.  प्रत्येक वेळा होणार्या गुरु बदलाच्या वेळी आता आपल्या आयुष्यात काय बदल होणार ह्यापेक्षा आपण स्वताहून आपल्या आयुष्यात किती बदल केले ,आपला स्वभाव आपली वागणूक किती बदलली ? आपण किती सकारात्मक झालो ? आपण आपल्या कुटुंबाच्या जबाबदार्या नीट पार पाडल्या का ? ह्या अश्या अनके प्रश्नांची उत्तरे आपल्यालाच शोधायची आहेत .

मनुष्य हा स्वार्थीच आहे , प्रपंचात अनेक कठीण प्रसंगांनी तो घेरला जातो त्रस्त होतो , अंधारात चाचपडत राहतो आणि मग निराश होवून शेवटी गुरूंच्या चरणी आश्रय घेतो . आपण आजवर केलेली उपासना आणि श्रद्धा फळास नक्कीच येते आणि त्या मिट्ट अंधारात आशेचा किरण दिसू लागतो. गुरु पुन्हा एकदा त्यांचे अस्तित्व आणि भक्तावरील प्रेम त्यांच्या प्रचीती च्या रुपात देतात आणि आपण निशःब्द होतो, नतमस्तक होतो.

म्हणूनच वाटते कि गुरूंची भेट होण्याची वेळ आपल्या आयुष्यात लिहून ठेवलेली असते .ज्या क्षणी गुरु चरणाशी आपण स्वतःला अनन्यभावे समर्पित करतो त्याच क्षणी त्यांचे अस्तित्व जाणवू लागते . आपली भक्ती श्रद्धा त्यांना आपल्यापर्यंत अक्षरश खेचून आणते आणि तोच आपल्या आयुष्यातील अत्युच्य आनंदाचा क्षण असतो .

गुरुबदल आपल्याला काय देयील त्यापेक्षा आपण गुरूना आपल्यातील बदलेल्या किती गोष्टी दाखवू शकतो ? किती अवगुणांचे गुणात रुपांतर झालेले आहे? आयुष्यात गुरुंमुळे किती अमुलाग्र बदल झाले आहेत ? ह्या सर्वाचा  विचार व्हायला पाहिजे. 

गुरु कुणाचेच वाईट करत नाहीत . म्हणूनच त्याला आकाशतत्व बहाल केले आहे. आकाश जसे सर्वाना सामावून घेते अगदी तसेच आपलेही आचरण असले पाहिजे हेच तर सुचवायचे नाही ना गुरूना .

मी असा मी तसा मी हे केले मी ते केले ,जसे काही निसर्ग चक्र आपल्यामुळेच अस्तित्वात आहे अश्या अविर्भात असणारे आपण किती क्षणभंगुर आयुष्य जगात असतो ज्याची जाणीव आपल्याला गुरुसेवा करताना घडते . पराकोटीला पोहोचलेला अहंकार क्षणात नेस्तनाबूत करणाऱ्या आपल्या गुरूचा सन्मान प्रत्येकाने केला पाहिजे. 

प्रत्येक कृती करत असताना ती त्यांना आवडेल का असा क्षणभर विचार केला तर चुकीची कर्मे हातून कमी होतील नाही का? गोचरीने गुरु महाराज आपल्या अष्टम स्थानात आले तरीही ते काहीच वाईट करत नाहीत कारण ते साधनेचे स्थान आहेच. प्रत्येक वेळी गुरु स्थान परिवर्तन करतील तेव्हा आपणही कात टाकल्यासारखे नवीन रुपात त्यांना सामोरे गेलो तर त्यानाही ते नक्कीच आवडेल , काय वाटते ?

शेवटी एकच वाटते ग्रहांना आपले काम करुदे आपण आपले काम करत राहूया .

अस्मिता

संपर्क : 8104639230

फेसबुक पेज : @yashasweejyotish


3 comments:

  1. Khup chaan lihile Madam 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

    ReplyDelete
  2. खूप छान आहे सहज व सोपी भाषा, अभिनंदन 👍🙏🚩

    ReplyDelete
  3. So easy to understand and realize d difficult subject

    ReplyDelete